आज हनुमान जयंती आहे.त्या निमित्ताने न्यूज स्टोरी टुडे परिवारातील ज्येष्ठ लेखक, श्री नागेश शेवाळकर यांच्या येत्या २६ तारखेला प्रकाशित होणाऱ्या ‘पवनपुत्र‘ या पुस्तकातील एक कथा पुढे देत आहे. सर्वांना हनुमान जयंती च्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
बाल हनुमंताचे अन्न संस्कार मोठ्या उत्साहाने पार पडले. त्यानंतर हनुमान मोठ्या आवडीने केलेला पदार्थ खाऊ लागला. ते पाहून अंजनीमातेला त्याला काय करून खाऊ असे झाले.
हनुमानाला सारेच पदार्थ आवडत. त्यातही मोतीचुराचे लाडू जास्त आवडत. हे पाहून अंजनी मातेने एक दिवस लाडू बनवायला सुरुवात केली. त्याचा सुवास सर्वत्र पसरला. हनुमान मित्रांसोबत खेळत होता. त्यांच्यापर्यंत तो वास पोहोचला. एका मित्राने विचारले,
“हनुमाना, आज काय विशेष आहे ? लाडूंचा मस्त वास येत आहे.”
दीर्घ श्वास घेत तो सुवास हनुमानाने आत ओढला. मनोमन खुश होत तो म्हणाला, “अरे, व्वा, खरेच की! मी बघून येतो.” असे म्हणत धावत स्वयंपाक घरात गेला. पाहतो तर काय, बायका लाडू बांधत होत्या.तिथे तर लाडवांचा सुवास जास्तच येत होता. त्या सुवासाने आणि लाडवांनी भरलेली पाच-सहा ताटं पाहून हनुमानाच्या तोंडाला पाणी सुटले. अचानक खूप भूक लागल्याची जाणीव त्याला झाली. त्याने इकडेतिकडे पाहिले. बायका लाडू बांधण्यात, कुणी लाडू भाजण्यात दंग होत्या. तो हलक्या पावलांनी लाडवांच्या ताटाजवळ गेला. पाच-सहा लाडू उचलून त्याने तोंडात टाकले. त्याच अवस्थेत तो पुटपुटला, “व्वा! किती चवदार, गोड लाडू आहेत हे. आवडले बुवा!” असे म्हणत तो एकामागून एक लाडू तोंडात टाकू लागला. पाहता पाहता तीन चार ताटांमधील लाडू त्याने फस्त केले. तितक्यात त्याला मित्रांची आठवण झाली. तिथे असलेली लाडवांची पाच-सहा ताटं उचलून तो निघाला.
हनुमानाची वाट पाहत असलेला एक मित्र म्हणाला, “अरे, त्याला जाऊन खूप वेळ झाला. अजून कसा आला नाही ?”
“अरे, त्याला लाडू खूप आवडतात. म्हणून तर अंजनी मावशीने लाडू बनवले असतील. तो नक्कीच तिथे लाडू खात बसला असेल. आपल्याला विसरुन तर गेला नसेल ?”
“नाही. तो आपल्याला नक्कीच विसरणार नाही.”
“बघा. आला आपला मित्र खूप सारे लाडू घेऊन.”
“अरे, घ्या. लाडू. इतके छान झाले आहेत ना ! मी अशा पाच-सहा ताटातील लाडू खाऊन आलो आहे.”
“काहीही हं. इतके लाडू कुणी कसे खाऊ शकतो ? तू आमची गंमत करतोस ना ?”
“अरे, हा आपला मित्र आहे. तो काहीही करू शकतो. हो ना, हनुमाना ?”
“होय. खरेच सांगतोय. थांब. तुम्हाला खरे वाटत नाही ना… बघ.” असे म्हणत हनुमानाने एकामागून एक साऱ्या ताटातील लाडू खाऊन टाकले. ते पाहून मित्र आश्चर्यात पडले. एक मित्र म्हणाला,
“हे रे काय ? आमच्यासाठी आणलेले लाडू तू खाल्लेस, आता आम्ही काय खावे ?”
“अरे, थांब. आत्ता जातो आणि लाडवांची ताटं घेऊन येतो.”
“अरे, पण मावशीला सांगितले ना ?”
“आईला काय सांगायचे ? ती तर माझ्यासाठीच लाडू बनवत आहे ना…” असे म्हणत तो पुन्हा स्वयंपाक घराकडे निघाला.
स्वयंपाक घरात लाडू करणाऱ्या बायकांच्या लक्षात ती गोष्ट आली. एक बाई म्हणाली,
“अगं बाई, लाडवांची ताटं कुठं गेली ? आठ-दहा ताटं भरून लाडू केले होते. एकही लाडू दिसत नाही.”
“खरेच की ! ही काय जादू म्हणावी ? कुणी पळवले असतील लाडू ?”
“हनुमानाने तर नेले नसतील ?”
“पण, तो तर इकडे आलेला दिसला नाही.” अंजनी माता म्हणाली. तितक्यात अंजनीचे लक्षात आले की, कुणीतरी अदृश्यपणे तिच्याजवळ आले आहे. तिने पाहिले तो हनुमान होता. अंजनीने पटकन त्याचा कान पकडला.
“आई, कान सोड ना. मी तुला दिसू नये म्हणून अदृष्य होऊन आलो. पण तू मला पकडलेस.”
“हनुमाना, मी तुझी आई आहे. आई आपल्या मुलाला कोणत्याही रुपात असला तरी ओळखते. मी तुला सांगितले होते की, तुझ्याजवळ असलेल्या शक्तींचा उपयोग अशा छोट्या गोष्टींसाठी करायचा नाही म्हणून…”
“ठीक आहे. आई, पुन्हा असे करणार नाही. आता कान तर सोड.” कान खूप दुखत असल्याचे नाटक करत तो म्हणाला. त्याचा तो अभिनय पाहून मातेने कौतुकाने हसत त्याचा कान सोडला.
“माते, मी माझ्यासाठी लाडू नेले नाहीत. माझ्या मित्रांसाठी नेले आहेत.”
“ठीक आहे. आता तुला सोडते. पण, यानंतर असे केलेस तर शिक्षा देईन.” माता म्हणाली. कुणाला काही समजण्याच्या आतच हनुमान घाईघाईने चार-पाच ताटं उचलून पळत सुटला. ते पाहून अंजनीसह साऱ्याजणी हसायला लागल्या…

— लेखन : नागेश शेवाळकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800