आणि आमरसाने घात केला !
“लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात !” असं म्हणतात. आता यासाठी देवाचे आभार मानावे का तक्रार करावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न ! पण लग्नाच्या कांहीच वर्षांत म्हणजे साधारणपणे मुलंबाळ झाल्यावर, “मी, आहे म्हणून टिकली हो, दुसरी कोणी असती तर कधीचीच सोडून गेली असती” आणि “तुझ्या घरच्यांनी फसवलं मला, दाखवली वेगळी आणि गळ्यात बांधली दुसरीच” असे दोन वेगवेगळे “ताल” एकाच सुरात रंगताना दिसतात. आमचं जोडपं त्याला अपवाद कसं असेल. शेवटी “घरो घरी मातीच्या चुली” !!
त्याच झालं असं, आमच्या एका ओळखीतून माझ्या यजमानांच स्थळ मला सांगून आलं. मुलगा चांगला उच्चशिक्षित, निर्व्यसनी आहे आणि मुख्य म्हणजे लोक चांगली आहे, असा सगळा सारासार विचार करून माझा फोटो व बायोडाटा पाठविण्यात आला. स्थळ जरी अमरावतीचं होतं तरी त्यावेळेस माझे यजमान नोकरी निमित्याने मुंबईला वास्तव्यास होते. त्यामुळे माझ्या फोटोसह बायोडाटाची रवानगी मुंबईला करण्यात आली. माझ्या यजमानांची उंची ५ फूट १० इंच आहे. म्हणून त्यांना बायकोही उंचच हवी होती. आणि मी आहे फक्त ५ फूट ! तस बायोडाटामध्ये उंचीसह इतर माहितीही नमूद करण्यात आली होती. पण नेमका बायोडाटाच कसाकाय गहाळ झाला, हे देवच जाणे पण ! फोटोवरून “मुलगी उंच आहे” असा अंदाज बांधित यजमानांनी बघण्याच्या कार्यक्रमास होकार दिला. आता याला फोटोग्राफरची किमया म्हणा किंवा माझ्या हिलच्या चप्पलची महिमा !!
दोन्ही पक्षाच्या सहमतीनुसार बघण्याच्या कार्यक्रमाची तारीख, दिवस ठरला. हे माझे पहिलेच स्थळ असल्यामुळे घरातील सगळ्यांमध्ये खूप उत्साह होता. पाहुणे परगावहून येणार म्हणून “आमरसपुरीचाच” बेत आखण्यात आला.
बघण्याच्या कार्यक्रमचा दिवस उजाडला. पाहुणे येता येता ऐन दुपार झाल्याने पाणी देवून थेट जेवणाची ताटच घेण्यात आली आणि मग काय “आमरसाचा आग्रह” चालू झाला. मलाही आग्रहाने आमरस वाढण्यास सांगितले आणि तेव्हाच बघण्याचाही कार्यक्रम होईल, हे त्यामागचं गणित. पण देवा शप्पथ ! जेवताना यजमानानी मान वर केलीच नाही !! आमरसावर ताव मारण्यात मग्न होते. पंगतीतील सगळ्यांची जेवणं आटोपली पण यजमानांचा आमरसाचा सपाटा चालूच होता आणि घरच्यांचा आग्रह. पण ! अजून न झालेल्या जावयाला आमरस खूप आवडला, हे पाहून माझ्या घरच्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकल. जेवण उत्तम झाल्याची पोचपावती देत पाहुण्यांनी निरोप घेतला आणि दुसऱ्याच दिवशी “तिकडून होकार” देखील आला. मग माझी संमती घेत नावापुरती बैठक घेऊन तीन महिन्यांनी लग्नाची तारीख काढली. यादरम्यान आम्हां दोघांचे फोनवर वरचेवर बोलणे व्हायचे पण भेटीचा योग काही आला नाही.
लग्नाचा दिवस उजाडला. जावयाला “आमरस” आवडतो म्हणून लग्नातही मेनूमध्ये “आमरस” चा समवेश केला गेला. लग्नातही जावयाला आमरसचा खूप आग्रह झाला. लग्न उत्तमरीत्या पार पडल. सासरकडील लोक खूप समंजस असल्याने कुठेही रुसवे फुगवे झाले नाही. मी माहेरच्या लोकांचा जड अंतकरणाने निरोप घेत, माझ्या नव्या आयुष्याचा प्रवास चालू केला.
माझ्या गृहप्रवेशाची तयारी सासरकडील मंडळांनी उत्तम केली होती. सासूबाईंकडून आज्ञा मिळताच, मी “हिलची चप्पल” काढून माप ओलांडून गृहप्रवेश केला. तेच माझे यजमान पटकन म्हणाले, “अरे ही तर “टू बाय टू बाय” आहे !! फोटो मध्ये तर खूप उंच दिसत होती. च्याला ! हिच्या घरच्यांनी इतका आग्रहाने “आमरस” खाऊ घातला, की मला हिला पाहायचं राहूनच गेलं. अरे देवा “आमरसाने घात केला माझा !! तसे माझे यजमान खूप मिश्किल स्वभावाचे. पण अजून त्यांच्या या स्वभावाची सवय न झाल्याने आणि आधीच घरच्या आठवणीने अर्धी झालेल्या मला लगेच रडायला आले. हे पाहताच सासूबाईंनी नवऱ्याचे कान पिळत चांगलाच दम देत माझी माफी मागायला लावली. प्रकरण चांगलंच तापलं आहे हे पाहून, “अगं आपली अमिताभ आणि जया बच्चनची जोडी आहे.” असं म्हणत माझ्या यजमानाने सारवासारव केली.
त्यानंतर थेट १७ वर्षानंतर, परवा माझ्या नवऱ्याने पुन्हा “आमरसाचा” विषय काढत माझी मस्करी करण्याचा प्रयत्न केला. पण आता मी कसली रडते….मी तर आता मुरलेलं लोणचं.. मीही मस्करीत जाब विचारले, अहो मग लग्न का केले ?” तर लगेचच त्यांच्या मिश्किल थाटात सुधीर मोघेंच्या कवितेचा आधार घेत म्हणाले…
“खरं म्हणजे, आपण एकटे सुखात जगत असतो,
एका दुर्लभ क्षणी, एक चेहरा आपल्याला भेटतो,
अक्कल गहाण पडते, भेजा कामातून जातो,
टक्क उघड्या डोळ्यांनी, आपण चक्क लग्न करतो,
त्या चेहऱ्याचं असली रूप, मग आपल्याला कळतं,
बायको नावाचं वेगळेच प्रकरण आपल्यासमोर येतं,
हा दारूण मनोभंग अगदी झालाचं पाहिजे का ?
सगळ्यांचं लग्नानंतर हे असंच होतं का ???”
असं म्हणत यजमान हातातील पिशवी गरागरा फिरवत भाजी
आण्यास बाहेर पडले आणि मी “सावकाश जा हो” असं म्हणत हसतंच दार बंद केलं..

— लेखन : सौ.आश्लेषा गान. सातारा
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
Khub chan ❤️
Too good, relatable 👌🏼
मस्त लिहीलं आहेस अश्लेषा ❤️👏🏼
Wow…so good.. very well written.. keep it up.