Monday, February 17, 2025
Homeलेखहलकं फुलकं

हलकं फुलकं

“सायकल ची गंमत”

ठाण्याला शिकायला असताना मी आणि माझी आत्ये बहीण दादाची सायकल घेऊन ती दुपारी शिकत असू. म्हणजे माझी आत्ये बहीण दादाची सायकल चालवत असे आणि मी सायकलच्या मागे मागे धावत असे. तिला सायकल वळवता येत नसायची. त्यामुळे दुसऱ्या गल्लीतून फिरवत राहायचो.

पुढे जरा जमल्यावर ताईने एकदा मला मागे कॅरिअरवर बसवले. मला चारचाकीत बसल्यासारखेच वाटले. आता मला सायकल चालवावी असे वाटू लागले. पण माझे पाय पायंडलवर पोहोचत नव्हते. म्हणून मी सीट वर न बसता आतून पाय टाकून सायकल चालवत असे. एक दिवस रस्त्यावर ताईची मैत्रीण सुमा भेटली म्हणून ताईने सायकल माझ्या हातात दिली व म्हणाली थांब इथे. त्या गप्पा मारू लागल्या, तशी मी वाट पाहून कंटाळली आणि सायकलवर टांग टाकून त्यांच्या मागून सायकल घेऊन निघाले.

रस्त्यात ट्राफीक होती. त्यात आज मी एकटीच होते म्हणून सायकल रोड वरून खाली घेताना एकदम बाजूच्या गटारात पडले. गटारात कमरेपर्यंत काळे काळे पाणी होते. दोन्ही गुडघे बधीर झाले. लोकांनी मला कसेबसे वर काढले.

मी रडत होते. सायकलचे हँडल वाकडे झाले होते. आरसा फुटला होता. गर्दी बघून ताई धावत आली. मी रडतच होते. ती पण माझा अवतार बघून घाबरली. घरी काय सांगायचे हा प्रश्न होता.

ताईने सायकल हातात घेतली व आम्ही निघालो. माझं ध्यान काळे गटाराचे पाणी, चिखल याने बरबटले होते. मी लंगडत चालत होते. गुडघ्यातून, हातातून रक्त वाहत होते. आता अशा घाणेरड्या अवस्थेत चाळी समोर जायचे होते. सर्व बघत होते. सगळी चाळ गोळा झाली.
“कोण, रे ! अरेरे ! ‘कसं झालं ते विचारत होते. इतक्यात माझ्या वर्गातले मेघा, सुशा, आनंद, पल्या हसत होते, हां हां$$ करत होते. त्यांना उद्याला वर्गात गंमत सांगायला मस्त खजिना मिळाला होता. मी रागाने बघत होते.

घरी पोहोचल्यावर काकूला मी कोण आहे तेच कळलं नाही. ती विचारतेय म्हणून सगळे अजून जोरात हसत होते. आत्या, ताई वरच रागावल्या. एक बालदी पाणी डोक्यावर टाकले व मागच्या दाराने ये असे म्हणाल्या. पण आता दहा-बारा जणांची वानर सेना माझ्यामागे व मी वानर पुढे अशी वरात निघाली.अशी गंमत झाली सायकलची.

पुढे सायकल कधीच हातात दिली नाही.गौरीची सायकल मात्र शाळेत जाताना मला मिळत असे. पण ते पाहून पोरांच्या पोटात दुखायचे. ते मला हुल देवून पाडायला बघायचे. मग गौरी भांडायची. कारण तिला सायकल चालवायचा कंटाळा यायचा तर मला मजा वाटायची.असो.

पुढे ‘गटार प्रकरण’ बरेच दिवस हसायचा विषय झाला होता. अजून दोन्ही गुडघ्यावर चकाकणारे डाग आठवण देतात. नंतर कॉलेजला जायला सायकलच होती म्हणा.

डॉ अंजली सामंत

— लेखन : प्रा डॉ अंजली सामंत. डहाणू
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments