“सकाळी-सकाळी“
नमस्कार मंडळी.
“सकाळी सकाळी” हे दोन शब्द उच्चारणारे अनेकजण आपल्याला नेमके “सकाळी सकाळी” भेटतात, या शब्दात काय नि किती आशय, अर्थ दडलेला आहे, याचा शोध मला स्वतःलाही “सकाळी सकाळी लागलाय”.
मला सकाळी सकाळी सूनवणारे भेटले ते काय बोलले-
बघा, काही उदाहरणे-
१. लहानपणीची घाईगर्दीच्या सकाळी आई मला जवळच्या किराणा-दुकानात पिटाळायची, एकदम अर्जंट एक-दोन वस्तू आणव्या लागत.
तिथे गेल्यावर दुकानदार काका बाजूला उभे करून थांबायला लावीत, म्हणत…
सकाळी सकाळी ऊधारीचे गिऱ्हाईक आलं तर कसं रे, नगदी बोहनी होउदे, मग देतो तुला.
अर्जंट काम, उशिराने व्हायचे.
२. शाळेत जातांनाची घाई म्हणजे हमखासपणे होमवर्क न केल्याने “सकाळी सकाळी पहिल्या तासात बेंचावर उभे राहण्याची शिक्षा” अनेकदा भोगली आहे.
३. पुढच्या काळात म्हणजे “बायकोच्या राजवटीत”,, रम्य पहाटेची स्वप्नं पहाण्याच्या योग बायकोच्या जुलमी कारभारामुळे येणे बंद पडले. “अंथरुणात लोळत पडणे” या अत्यन्त आवडत्या सवयीला बाईसाहेबांनी गादीत गुंडाळून ठेवले”, आणि सकाळी सकाळी” मी काय काय केले पाहिजे याचे प्रशिक्षण सत्र घेत, तिला हवे तसे “मला ट्रेंड केले”.
४. प्रशिक्षित नवरा “झालेलो मी रोबोसारखा अचूकपणे कामे करू लागलो” हे पाहून “बायकोचा आनंद गगनात मावेनासा झाला”, मग काय, तिने अगदी तिखट-मीठ लावून, तिने मला कसे वळण लावले, हे जिवलग मैत्रिणींना हर्षभरीत स्वरात सांगितले.
५. परिणामी, आमच्या घराच्या रस्त्यावरून पब्लिकची ये-जा वाढू लागली, बाहेरच्या अंगणात मी खाली मान घालून अंगणात साफ-सफाई करतांना दिसलो की “महिलांना आनंदाच्या उकळ्या फुटत”. माझे समवयस्क मित्र धास्तावून गेले, त्यांना संभाव्य संकटाची चाहूल लागली होती.
६. सकाळी सकाळी पोरांच्या ड्रेसेसना इस्त्री करणे, बुटांची आणि सॉक्स जोडी लावून ठेवीत, चिडचिड न करता मुलांना शाळेसाठी तयार करणे, यात मी इतका तरबेज झालो की, मुलांनी आईला साफ बजावले- आई, तू किचनमध्ये बरी आहेस, आम्हाला बाबा तयार करतील, तू सकाळी सकाळी फार किटकीट करतेस.
७. पाहुणे येतात तेव्हा, “दुध संपले, पटकन जा आणि घेऊन या, भाजी पण आणा, तुमची चक्कर वाचेल”, हे काम पेपर वाचायचे सोडून देत “सकाळी सकाळी” करावं लागतं.
असं आहे बघा “सकाळ महात्म्य”!
— लेखन : अरुण वि. देशपांडे. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
व्वा.. मस्त