“मसाला डोसा”
शीर्षक वाचून तोंडाला पाणी सुटले की नाही? चला तर मंडळी, आज थोडं पोटाकडे वळूया. हल्ली घरोघरी स्वैपाकघरात निरनिराळ्या प्रांतातील खाद्यपदार्थ बनवले जातात. अगदी चायनीज, कोरियन, कॉन्टिनेन्टल, मेक्सिकन, इटालियन पासून ते पंजाबी, गुजराती, राजस्थानी, मालवणी, साऊथ इंडियन पर्यंत. कधी कधी मराठी सुध्धा ह !
मला तसं खायला सगळेच आवडते पण आज इथे माझ्या एका खास आवडीच्या पदार्थावर थोडं लिहीत आहे आणि लेखाच्या नावावरून तुम्हाला समजलं असेलच की आज मी मसाला डोसा ह्या पदार्थाबद्दल लिहीत आहे. नाही इथे काही मी रेसिपी शेअर करत नाहीय. कारण तेवढी मी सुगरण नाही. पण आपण असं म्हणू शकता की मसाला डोसा ह्या डिश बद्दलचे प्रेम मी इथे व्यक्त करत आहे.
तर झालं असं, की पुण्यात जंगली महाराज रॉडवर डेक्कन जिमखान्याजवळ पूना कॉफी हाऊज ह्या हॉटेलमध्ये मी हा मसाला डोसा खायला शिकले. मला ओळखणारे असा विचार करतील की ही मुंबईची बाई तिकडे कुठे गेली मसाला डोसा खायला ? पुण्याचं आणि आमचं एक वेगळच नातं होतं. हे नातं आमच्या दादांमुळे जोडलं गेलं होतं. दादा म्हणज माझे वडील, प्रसिद्ध कामगार नेते कॉ. मदन फडणीस. दादा कामानिमित्त सतत पुण्याला जायचे आणि आम्हाला सुट्टी लागली, की आम्हाला ही घेऊन जायचे. पुण्यात गेलं की आम्ही काही ठरलेल्या गोष्टी हमखास करायचोच. त्या पैकी एक म्हणजे सकाळचा नाश्ता पूना कॉफी हाऊसमधे. आणि तिथेच हा मसाला डोसा खायला मी शिकले.
सुरुवात झाली साधा डोसा खाण्यापासून. मग हळूहळू मसाला डोस मागून त्यातला फक्त डोसा खायला लागले. नंतर हळू हळू डोस्यातला मसाला म्हणजे उकडलेल्या बटाट्याची भाजी पण आवडू लागली. तर असा हा मसाला डोस झाला माझा खूप लाडका.
असं नव्हतं की मुंबईत मसाला डोस मिळत नव्हता. अनेक ठिकाणी मिळायचा. त्या काळात जवळजवळ सगळी हॉटेल्स उडीपी असायची. त्यामुळे मसाला डोसा सगळीकडे मिळायचा. खरतर हॉटेलमध्ये जाऊन खायचे जन्नस त्या काळात तसे कमीच असायचे आणि त्यामुळे हॉटेलमध्ये गेलं की सहसा मसाला डोसा खायचा ही त्याकाळचा ट्रेण्ड होता. पण सगळीकडच्या डोस्याला सारखी चव नसायची. काही ठिकाणची चटणी बरी नसे तर काही ठिकाणचा सांबर बरा नसे.
हल्ली घराघरात डोसे बनले जातात. पूर्वी फक्त दक्षिण भारतीयांच्या घरी डोसे बनायचे. आपल्या महाराष्ट्रीय लोकांच्या घरी व्हायचे ते घावन, आंबोळी, तांदुळाचे गोड पोळे. त्यामुळे मसाला डोसा कुठे ही मिळाला की तो खायला आवडायचं अर्थात माझ्या बहिणीला आवडतो त्या पेक्षा कमीच. शाळेच्या मधल्या सुट्टीत सुद्धा कधी तरी आईकडून पैसे घेऊन मी शाळेच्या शेजारच्या संगम टॉकीज खालच्या संगम हॉटेलमधून इतर मुलींबरोबर जाऊन डोसा आणून खायची.
पुढे आम्ही अंधेरी वेस्टला जुहू लेन येथे राहायला गेलो आणि मग काय आम्हाला डोसा खायचं एक हक्काचं ठिकाणचं मिळालं. अंधेरीला एस. व्ही रोडवर त्या वेळच्या अंबर-ऑस्कर थिएटर आणि आताच्या शॉपर्स स्टॉपच्या समोरच राधाकृष्ण नावाचं एक नावाजलेले हॉटेल आहे. अनेक वर्षे न चुकता दर रविवारी आमचा सकाळचा नाश्ता राधाकृष्ण हॉटेलमधून यायचा. मसाला डोसा, इडली आणि मेदू-वडा सांबर हा मेनू ठरलेला. आजही अंधेरीला गेलं की राधाकृष्णचा डोसा खावासा वाटतो.
पूर्वीच्या काळात पातेल्यात इडली आणि बरणीत सांबर घेऊन इडली विकायला सायकलवरून लोक दारावर यायचे. त्या दारावर विकायला आलेल्या इडल्या खाण्यात वेगळीच मजा असायची. आम्हाला ती मज्जा माटुंग्याला काकांकडे लुटायला मिळायची. नंतर आम्ही ताईकडे जमशेदरपूरला देखील घरावर विकायला आलेल्या इडल्या खूप खाल्या आणि डोसे देखील खाल्ले. परंतु आम्ही लहान असताना रस्त्यावर डोसे वाले दिसायचे नाहीत. हल्ली मात्र ठीक ठिकाणी रस्त्यावर डोसेवाले दिसतात आणि त्यांच्याकडे विविंध प्रकारचे डोसे मिळतात. पावभाजी, डोसा काय आणि नूडल्स डोसा काय, पण तसं असलं तरी हॉटेलमधल्या मसाला डोस्याला कोणी टक्कर देऊ शकत नाही.
रस्त्यावर डोसे मिळायला लागल्यापासून घरातील छोट्या मोठ्या समारंभाला डोसेवाल्याला बोलवून डोसे करण्याची प्रथा सुरू झाली. माझ्या आजोळी म्हणजे सुळयांकडे गणपतीत गौरीला घावन करायची पद्धत आहे. काही वर्षांपूर्वी माझ्या मामांनी गौरीच्या दिवशी घरी डोसेवाल्याला बोलवून डोस्याचा प्रोग्रॅम करायला सुरुवात केली.
आमच्याकडे, आम्ही पहिल्यांदा डोसेवाला बोलावलं तो १९९२ साली माझी बहिण वृषाली हिच्या लग्नातल्या गरबाच्या प्रोग्रॅमला. त्या काळी लग्नात आज जसं संगीत ठेवलं जातं तसं गरबा आयोजित करायचे. आमच्या वृषालीच्या सासरची काही मंडळी गुजरातकडची असल्यामुळे आम्ही आवर्जून गरबा ठेवायचा ठरवलं आणि त्या दिवशी डोसेवाला बोलवून डोस्यांचा बेत केला. मग पुढे काही वर्षे ती प्रथाच झाली.
हल्ली तर लग्नाच्या जेवणात पण डोस्याचा काउंटर असतोच. पंचतारांकित हॉटेलात सुद्धा बुफ्फे ब्रेकफास्ट मध्ये डोसा काउंटर असतो. त्या बुफ्फे मधे इतर ब्रम्हांड असो पण मसाला डोसा खाल्याशिवय काही मी रहात नाही. डोस्याबरोबर आणखी एक माझा ठरलेला पदार्थ आहे. त्या बद्दल पुन्हा कधी तरी नक्की लिहीन. आज घरा घरात मसाले डोसा बनू लागला आहे. डोस्यावरची दाक्षिणात्य लोकांची मोनोपॉली आता रद्द झाली असून त्यांनी आता नाश्त्याचा सगळ्यात लाडका पदार्थ असल्याचा बहुमान पटकवला आहे. उडीपी हॉटेल मधून निघून केवळ रस्त्यावर टाईम पास न करत राहता पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांनी आपले पाय भक्कम रोवले आहेत. लग्न, पार्टी आदी ठिकाणी तो दिमाखाने डोलू लागला आहे.
मसाला डोसा म्हटलं आणि सेंट्रल माटुंगा येथील कॅफे मद्रासची आठवण आली नाही असं होणार नाही. पूर्वापार चालत आलेलं एक दक्षिण भारतीय पदार्थ मिळण्याचे ठिकाण आजही होतं त्याच जागेत थोडी रंगरंगोटी करून हे हॉटेल चालतं. कधी ही गेलं तरी किमान अर्धा तास नंबर यायला आपल्याला थांबावं लागतं. उत्तम मसाले डोसा खायचं हे आणखी एक ठिकाण. कोणत्याही शिवसागर, सुखसगर नावाच्या हॉटेल मधे मसाला डोसा बरा मिळतोच पण विलेंपार्ले पूर्व येथील शिवसागरचा मसाला डोस मला जाम आवडतो. अरे हो आणि त्या हॉटेलला मी कसे विसरू ? जिथला मसाला डोसा खाऊन माझी मुलं मोठी झाली. आमच्या जुहू गल्लीततील शिव-प्रसाद. गुलशन वासीयों कृपा करून हे वाक्य न वाचल्यागत करा.
आजही अनेकवेळा हॉटेलमधे जाताना ठरवते, मसाला डोस बिलकुल नाही खाणार, पण……
तर ह्या माझ्या आणि माझी लाडकी बहीण प्रतिमा बावकर हिच्या लाडक्या मसाले डोस्याला माझा सलाम आणि खूप खूप आभार. मसाला डोसा तुम जिते रहो. एवढं म्हणून मी इथेच थांबते.
मसाला डोसा बद्दलचे तुमचे मत ऐकायला मी उत्सुक आहे !
— लेखन : सोनल साटेलकर. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
अलका ताई खूप खूप धन्यवाद
सोनल मसाले डोशावर प्रेम तर सगळ्यांचच असतं . पण त्यावर इतका चुरचुरीत लेखही होऊ शकतो? हा प्रश्न पडणं सहाजिक आहे नाही का? हलक्या फुलक्या शब्दातून तुमचं मसाला डोसा वरील प्रेम दिसलं हं.