Saturday, September 14, 2024
Homeलेखहलकं फुलकं

हलकं फुलकं

बाल्कनी

तुमच्या पैकी काहींना जर आठवत असेल, तर पूर्वीच्या फ्लॅट्सना मोठमोठ्या बाल्कनी असायच्या. इतक्या मोठ्या की त्यात तुम्ही झाडं लावू शकत होतात, मस्त पैकी टेबल खुर्ची लावून सकाळ संध्याकाळचा चहा पिऊ शकत होतात. उन्हाळ्याच्या दिवसात गाद्या टाकून झोपू शकत होतात, वाळवणं घालू शकता होतात.

त्याकाळी अनेक गोष्टीं करता बाल्कनीचा उपयोग व्हायचा. पुढे काही लोकांनी ह्या बाल्कनीचे रूपांतर खोलीमध्ये करायला सुरुवात केली. नंतर बांधकामाचे नियम बदलत गेले आणि हळूहळू फ्लॅटमधून बाल्कनीज तशा गायब होऊ लागल्या. हल्ली पुन्हा डेक/बाल्कनीवाली घरं बांधायला सुरुवात झाली आहे. पण पूर्वीच्या बाल्कनीची मज्जा काही औरच होती.

ह्या बाल्कनी मधे उभं राहून शेजारी एकमेकांशी तासंतास गप्पा मारायचे. घरातील कोणी बाहेर गेलं असेल तर घरातील इतर मंडळी बाल्कनीत उभं राहून त्याची वाट बघायचे. हल्ली तसं दृश्य फारच कमी दिसतं. करोनामध्ये टाळ्या आणि घंटा वाजवण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी, 12 वर्षात प्रथमच आम्ही आमच्या शेजारच्यांना बाल्कनीत बघितलं. कारण आमची बाल्कनी ती कसली हो, उंदीर पण फिरायला मागणार नाही त्यात, एवढी ती टिचभर. त्यात काय उभ राहणार आणि काय शेजारच्यांशी गप्पा मारणार ?

हल्लीच्या बाल्कनीला ना तो चार्म नाही राहिला. माझ्या लहानपणी आम्ही मरोळला ब्लॉसम सोसायटीमध्ये राहत होतो. आमच्या चौथ्या मजल्यावरच्या दोन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये दोन बाल्कनीज होत्या. त्यातील हॉलला लागून जी बाल्कनी होती ती बरीच मोठी होती. आमच्या दादांची म्हणजे माझ्या वडिलांची पूर्ण फुलबाग त्या बाल्कनीत होती. अगदी विविध रंगांचे गुलाब, मोगरा, जाई, जुई, कौठी चाफा ह्या फुलांपासून ते कडीपत्ता पर्यंत अशी अनेक झाडं त्या बागेत (बाल्कनीमध्ये) होती. त्या शिवाय एक काळ्या रंगाचा मोठा फोल्डिंग सोफा त्या बाल्कनीत होता.

माझ्या करता ती बाल्कनी म्हणजे माझं सगळं विश्वच होतं. माझे सगळे एकलकोंडे खेळ त्या बाल्कनीत चालायचे. अर्थात त्या बाल्कनीवर सगळ्यात पहिला हक्क आमच्या दादांच्या क्लायंट्सचा होता कारण बाल्कनीला लागून जी बेडरूम होती त्यात दादांनी त्यांचं ऑफिस थाटलं होत. माझ्या आत्याचे यजमान श्री हेमचंद्र राजे हे नखशिल्पकर होते. आमच्या घरच्या गौरी गणपतीचे मखर हे तेच बनवत असत. आणि त्यांनी बनवलेले मखर महजे असे मोठे मोठे देखावे असतं. हे मखर देखील गणपतीच्या अधल्या दिवशी एक रात्रीत त्या बाल्कनीमध्ये तयार व्ह्यायचे.

उन्हाळ्याच्या सुट्टीत तर बाल्कनीमध्ये खूपच धमाल असायची. सगळे काका,आत्या, मामा राहायला आले की ह्या बाल्कनीत पत्यांचे डाव रंगायचे. उन्हाळ्यात होम मेड आईस्क्रिम (पॉट मधलं) देखील ह्या बाल्कनीतच बनायचं. बाल्कनीमध्ये पॉट लावायचा आणि आळीपाळीने सगळे काका, मामा आणि मोठे भाऊ पॉट मधल्या दुधाचे आइस्क्रीम होईपर्यंत पॉट फिरवायचे आणि आम्ही लहान मुलं त्या बाल्कनीमध्ये लुडबुड करत असायचो.

आता हे झालं आमच्या बाल्कनीचं. मला माझ्या मावशीच्या वडाळ्याच्या बॉम्बे पोर्ट ट्रस्ट कॉलनी मधल्या घराची बाल्कनी पण आठवते. ही अशी भली मोठी होती ती बाल्कनी. आणि आमच्या मोठ्या आत्याच्या नायगावच्या कलसी सदनच्या चौथ्या मजल्यावरची बाल्कनी पण अशीच खूप मोठी होती.

परंतु ह्या सगळ्या झाल्या वरच्या मजल्यावरच्या बाल्कनी. खरी गम्मत तर तळमजल्यावरच्या बाल्कनीमध्ये असते. तळमजल्यावरच्या बाल्कनीच्या कट्या वर तुम्ही बिनधास्त बसू शकता. पडायची काही भीती नसल्यामुळे मस्त बसून टाईम पास करू शकता. रस्त्याकडे तोंड करून बसलात तर आल्या गेल्याशी बोलू शकता, टिवल्याबावल्या करू शकता. घराकडे तोंड करून बसलात तर घरच्यांशी गप्पा मारू शकता आणि दोन्ही साध्य करायचे असेल तर काय सोपं आहे. फटफटी वर (म्हणजे स्कूटर हो) बसल्या सारखे दोन बाजूला पाय टाकून बसायचं. आता म्हणू नका हां “अय्या ! अस कस बसायच ?” नाहीतर अगदी मोरूची मावशी मधला डायलॉग वाटेल आणि त्यातलंच उत्तर मिळेल, “अस बसायच.” पण आम्हाला कुठे ते सुख होत तळमजल्याच ? आमचं घर चौथ्या मजल्यावर. त्याच्या कट्यावर बसले असते तर आज हा लेख लिहिता नसता आला ना. पण म्हणून काही मी होप्स सोडले नाहीत हां. मी माझा स्वतःचा असा एक कट्टा तयार केला ज्याला मी नाव दिलं ‘ग्राउंड फ्लोरचा कठडा’. ओळखा पाहू कसा असेल तो कठडा. नाही आलं ओळखता? तर हे बघा. माझी मोठी बहीण (आमच्या तीन बहिणीनंमधली मधली) झोपली की मी खुशाल तिच्या अंगावर स्कूटर वर दोन पाय टाकून बसतो तशी विराजमान व्हायचे आणि म्हणायचे, “हा माझा कठडा, ग्राउंड फ्लोरचा कठडा, कठडा, कठडा, कठडा.” आमच्या फॅमिलीमध्ये हा कठडा बऱ्यापैकी फेमस आहे बरका. पण नशीब हा लेख लहान मुलं वाचत नाहीत. नाहीतर लेखा खाली अशी वॉरनींग टाकावी लागली असती “These stunts are done under expert’s supervision. Don’t risk yourself to get beaten by your parents”.

वरती लिहिल्याप्रमाणे पुढे लोकं ही बाल्कनी रूममध्ये कन्व्हर्ट करू लागले. कुटुंब मोठी होऊ लागली. घरातील एखाद्या मुलाचे लग्न झाले की त्याला स्वतंत्र खोली मिळावी. किंव्हा मुलं मोठी होऊ लागली की त्यांना झोपण्याकरता, अभ्यास करण्याकरता स्वतंत्र खोली मिळावी ह्या हेतूने बाल्कॅनीचे बेडरूम, स्वैपाकघर होऊ लागलं. आता पुन्हा डेक/ बाल्कनीची घर दिसू लागली आहेत. पण ह्या बाल्कनीचे रूममध्ये रूपांतर व्हायला फार वेळ लागेल असे वाटत नाही.

तर अशी ही माझी त्या भव्य बाल्कनीज ना एक छोटीशी श्रद्धांजली ! Balcony we miss you

— लेखन : सोनल साटलेकर. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments