Monday, September 9, 2024
Homeसेवाहवा हवाई भाग २

हवा हवाई भाग २

कॅडेटशिपचे दिवस

दिनांक ११ ऑगस्ट २०२४, रविवार. कमिशन मिळून मला बरोबर ५२ वे वर्ष सरले. आज पुणे येथील विमाननगरच्या
माझ्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमधे कॉम्प्युटरवर आरामात बसून हवाईदलातील माझ्या स्मृती चाळवताना – लिहिताना विलक्षण आनंद व समाधान वाटते.

मात्र १९७२ च्या जून १७ ला परिस्थिती फार वेगळी होती. पहाटे उठून युनिफॉर्ममधे तयार होण्याला बराच वेळ लागला होता. कारण त्या दिवशीचा नट्टापट्टा वेगळाच होता. कांजी केलेली कॉटनची कडकडीत खाकी पॅंट व शर्ट, पायात सफेद अँकलेट्स, कमरेला करकचून बांधलेला पांढरा पट्टा, ब्रासो पॉलीशने रगडून चकचकीत केलेले त्याच्या पितळी पट्टयांना व ऑर्डर्ली रामासामीने थूक मारून मारून पॉलिश केलेले जड जड बूट, उजव्या हाताच्या मधल्या बोटाने तोलून धरलेली ३०३ डमीरायफल. खाडखाड करत आमची फ्लाईट मैदानात पोचली. फॉर्मेशन झाले. एयर कमोडर लॅझॅरस आले. आमच्या खांद्यावरील ईगलच्या पांढऱ्या पिप्स काढून निळ्या रिबिनीला काळी बॉर्डरच्या हवाईदलातील पायलट ऑफिसरच्या रॅँकची पिप्स त्यांनी आपल्या हाताने लावल्या आणि आमच्या कॅडेटशीपचे दिवस संपले.

ट्रेनिंग संपले तेव्हा..

एकेक आठवू लागले… मिरजेला मला पाठवणी करायला स्टेशनवर आमच्या रिंग खेळातील दोस्त मोहन्या जोशी आला होता. माझी काळ्या रंगाची जड ट्रंक, त्यातील यादी बरहुकुम कपड्यांचे जोड व अन्य वस्तू असा मी निघालो. बंगलोरला बदललेल्या गाडीत माझ्या डब्यात आणखी एक जण चढला. त्याला पोहोचवायला आलेले घरचे अनेक लोक, नमस्कार-चमत्कार पाहून माझी बोळवण तशी जरा कोरडीच झाली असे वाटले.

गाडी पहाटेपहाटे कोईमतुरात पोचली. एका ट्रक वजा खटाऱ्यातून, त्याला थ्रीटनर म्हणतात असे नंतर कळले ! आम्ही जमलेले एएफएसी – “एयर फोर्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉलेजच्या” कॅडेट मेसमधे जमलो. अकाउंट्स, अॅडमिन व लॉजेस्टिक्स अशा तीन ब्रांचेससाठी, आमची नं.५० जीडीओसीची पन्नासच्या आसपास मंडळी जमली.
त्यात माझ्यासारखे डायरेक्ट एन्ट्रीवाले १४ एक्स-एनडीएतून काही ना काही कारणांनी गळालेले २६ व उरलेले ११ एक्स-एयरमन अशी ५१ जणांची विभागणी होती.

सुरुवातीचा मी

माझ्या सारखा कॉलेजात एनसीसी मधेही न गेलेला अगदी कोरा करकरीत मी एकटाच होतो. त्यामुळे मला बुजल्यासारखे वाटे. पण मी शाळेत ड्रिल, पीटीत लीडरचे काम करीत असे. २६ जानेवारी, १५ ऑगस्टला ड्रम वाजवणे, झेंडा उभारणी आदी कामाचा सराव मला होता. पण इथे रायफल हाताळण्यापासून तयारी होती.

कॅडेट मित्र रंगनाथन

इंग्रजी बोलण्याचा सराव मला मुळीच नव्हता. त्यामुळे मला खूप चोरट्यासारखे होई. बरं मला येत तर सर्व होते पण तोंड उघडायचा संकोच व इतरांच्यात मिसळून बोलण्याचे साहस होत नसे. पुढे लवकरच त्यावर तोड निघाली. एक्स-एयरमन रंगनाथनशी माझी दोस्ती झाली. तो एजुकेशन इन्सट्रक्टर म्हणून एयरमनच्या ग्रेडमधून भरती झाला होता. पुढे सार्जंट पर्यंत नोकरी झाल्यावर हुशारीमुळे तरुणपणातच त्याची ऑफिसर ग्रेडसाठी निवड झाली होती. तो तमिळ असल्याने १३ वर्षे सर्व्हीसमधे राहूनही त्याला हिंदीचा सराव नव्हता. मला इंग्रजीचा नव्हता. आमची गट्टी जमली. माझी भीड चेपली.
मी धडाधड गप्पा मारु लागलो. ब्लडी, फकिंन, क्लाऊन, डफर, असे शब्द मराठीतील नेहमी वापरातील च्यायला सारखे , माझ्या जिभेवर दर वाक्याला नाचू लागले. यू सी, यु नो, आय से, असे आपले प्रस्थ माजवणाऱ्या जोडगोळी शब्दांनी माझ्या संभाषणाला जोर येऊ लागला. दडपून बोलायचे, असा खाक्या असलेले नंतर मला कितीतरी भेटले.

आमच्या अकाउंट्स खात्यात कोणत्याही बाबीची अॅथॉरिटी कोट केल्याशिवाय बोलण्याला जोर येत नाही. एयर फोर्स ऑर्डर्स, इन्स्ट्रक्शन्स, लॉमधील पीनलकोडचे सेक्शन्स, ट्रॅव्हल रेग्युलेशन्स, फिनान्सशियल रुल्स, रेग्युलेशन्स, काही अंतच नाही. एखादा क्लेम, पे ऑर्डर, अन्य कामे, का करता येणार नाहीत यासाठी समोरच्याशी वा बॉसशी वादावादीला त्या सर्व अॅथॉरिटीज तोंड पाठ असणे अतिआवश्यक असते. ते माझ्या अंगवळणी पडले. पण ते कोणापुढे पाजळावयाचे याचे तारतम्य हवे. यावरून एक किस्सा आठवला. कानपुरात असताना एक अकाउंट्स ऑफिसर महाशय होते. त्यांना तोंडाला येईल त्या एथॉरिटीज समोरच्यावर फेकून इंप्रेस करायची सवय जडली होती. एकदा तो आम्हा इतर अकाउंट्सच्या मित्रांसमोर बोलताना असेच आपले पोपटपंची ज्ञान ‘फेकू’ लागला. तेंव्हा त्याला आमचे सीनियर्स म्हणाले, “ओए यू इडीयट, स्टॉप दॅट क्रॅप. यू कॅन इंप्रेस आदर्स. डोंट थ्रो दोज एथॉरिटीज, रुल्स एँड रेग्ज टू अस. वी नो मोअर दॅन यू” असे अधून मधून त्याला खडसवावे लागे !

अकाऊंट्सच्या विषयासाठी खास इन्स्ट्रक्टर होते. स्क्वाड्रन लीडर के के मुर्ती म्हणून. त्यांना आम्ही ‘कुंडू कुंडू’ म्हणायचो. ते एक सॅडिस्ट अर्क होते. तोंडात चिरुट वा सिगारेटींचे धुराडे. रात्री रमचा ग्लास हातात. तोंडाला मा-भा च्या शिव्यांपासून वाक्याची सुरवात करण्याची सवय. आमच्या कमरेचा पट्टा काढून आम्हाला फटके लगवायी तर कधी आम्ही पेपर लिहिताना पंच मशीनच्या अडकित्याने आमच्या शर्टाच्या बाह्यांना भोके पाडण्याची खोड. येता जाता प्रत्येकाला काही ना काही म्हणून खिजवायची आदत. असे ते आमचे आदर्श !

एक्स एनडीएतील मुलांच्या एकी व दादागिरीमुळे आम्हाला जाब विचारणारा कोणी नाही अशी परिस्थिती होती. दोन दिवस रॅगिंगचे प्रकार झाले. पण आमच्या सीनियर्सची ‘डाल गळेना’ म्हणून रॅगिंग थंडावले. मला आठवते आम्ही सगळे ओळीने उभे होतो. एकेकाला सिगरेट्स तोंडात कोंबून दीक्षा दिली जात होती. माझ्यासारखा नवा माल, सिगरेटीचा अनुभव नाही म्हणताच त्यांना चेव चढणार हे दिसत होते. पण काय झाले कोणास ठाउक ! माझी बारी येण्याच्या आधीच त्यांची रॅगिंगची तलफ गेली व मी सिगरेटी फुंकायच्या शिक्षेपासून बचावलो. इतकी की पुढे आयुष्यात कधी फुंकली नाही.

एकदा नाटकातून काम करताना चेन स्मोकर असलेल्या नायकाची भूमिका करताना मी नुसता सिगरेट ओठांवर ठेऊन वेळ मारून नेत असे. पण सिगरेट ओढायची वेळ कधी आली नाही. मला वाटते की माझ्या वडिलांना पान-तंबाखुचा नाद होता. त्यांच्यासाठी मला पानपट्ट्याच्या ठेल्यांवर जावे लागे. तेथील वातावरण, पान बनवण्यातील अस्वच्छता याचा एक परिणाम माझ्यावर झाला त्यामुळे मला एक प्रकारचा तिटकारा आहे त्याचा. आजही मी पान-विडा खातो पण चेहरा वाकडा करत. असो.

काही काळानंतर मी रुळलो. मेसमधील जेवण आवडीने खाऊ लागलो. कोईमतूरमधे राहणारे वागळे नावाचे एक प्रोफेसर व कुलकर्णी नावाच्या कुटुंबियांशी ओळख झाली. कुलकर्णीच्या आदरातिथ्याचा पाहुणाचार आमच्यासारखी दर कोर्सेस मधील नवखी मराठी मुले घेत. काहींचे किस्से फार मजेचे होते. इंग्रजीची बोंब, घरच्या जेवणाची, वातावरणाची, आईवडिलांची आठवण येऊन, रॅगिंगच्या जाचाला कंटाळून पळून जाण्याचे विचार अनेकांनी त्यांच्या घरी मनमोकळे केले होते. कुलकर्णी कुटुंबियांच्या आस्थेवाईक स्वभावामुळे कित्येकांना धीर मिळाला. घरी परतायचे विचार मागे पडले. पुढे तेच कॅडेट्स मोठमोठ्या ऱँकचे ऑफिसर होऊन त्यांनी त्यावेळी दिलेल्या मानसिक व भावनिक आधाराचा स्नेहपूर्ण उल्लेख करत आवर्जून भेटून जात. माझ्या घरच्यांना पासिंग आऊट परेडला येणे जमणार नसल्याने मी त्यांनाच विशेष अतिथी म्हणून बोलावले होते.

ट्रेनिंग चे दिवस

पुढे १९७९ मधे मी व मला एक वर्ष सीनियर सुहास केळकर एडव्हान्स अकाऊंट्सचा एक कोर्स करत असताना त्यांना असेच आवर्जून भेटून आलो. तेंव्हा ते थकलेले वाटले. नंतर ८९-९१ सालच्या सुलूरच्या पोस्टींग मधे त्यांनी घर बदलून दूर गेल्याचे कळले. नंतर प्रत्यक्ष कधीच भेट झाली नाही.
   
अल्ब्युमिनचे किटाळ !

कॅडेट असताना मी एकटाच असा होतो की ज्याने एकदाही ‘सिक रिपोर्ट’ केले नव्हता. मुद्दाम मी काहीच केले नव्हते. शरीर ठणठणीत जर होते तर मी काय करणार ? काही जणांना मात्र परिक्षा, परेड टाळायला आजारी असल्याचा बहाणा करावा लागे. मात्र त्याचे उट्टे मला वार्षिक परिक्षेच्या अगदी ऐन वेळी हॉस्पिटलची वारी करून भरावे लागले. त्याचे झाले असे की, आमची फायनल मेडिकलही ड्यू होती. ब्लड-युरीन सॅंपल देऊन झाल्यावर मला पुन्हा बोलावण्यात आले. पुन्हा टेस्ट झाली. मग रिपोर्ट आला की अल्ब्युमिन नावाचे द्रव्य माझ्या सॅंपलमधे सापडले असून त्याची आणखी सखोल चाचणी घेण्यासाठी मला वेलिंग्टनच्या मिलिटरी हॉस्पिटलमधे जावे लागेल. मित्रांच्या सांगण्यावरून ती टेस्ट मी बाहेरच्या लॅब मधून करून आणली. ती पुर्ण नॉर्मल होती. परिक्षा ८-१० दिवसावर आली होती. मूर्तींनीही सांगून पाहिले. बाहेरचे रिपोर्ट दाखवले. पण मेडिकलवाले हट्ट सोडेनात. शेवटी मी वेलिंग्टनच्या हॉस्पिटलत भरती झालो. तेथे ऑफिसर वॉर्डातील व्यवस्था पंचतारांकित होती. दुसऱ्या मजल्यावर बसून कुनूर व्हॅलीची सीनरी पाहाणे हा एक जीवनातील अद्वितीय अनुभव होता. मी पुस्तके घेऊन बसे पण फुकट या झंझटात अडकलो असे वाटून वैताग येई. होता होता माझी सुखरूप सुटका झाली. मात्र अभ्यासाचा वेळ वाया गेला व मला तिसऱ्या क्रमांकावरून सातव्या पर्यंत घसरावे लागले.

त्या काळातील आठवणींमधे मजेशीर प्रसंग आठवताना कुकरीवाल्या भयंकर हरालूची, दिवस अन् रात्र गिटार वाजवत बसणाऱ्या पॅक्कियम, अत्यंत खोडकर म्हणून प्रसिद्ध देवकर, दादागिरी करुन मला छेडणारा एस पी सिंग, असे एक्स एन्डीएचे नग होते. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात ते उगाच नाही. यांचे कर्तृत्व कॅडेट असतानाच दिसत होते. नंतरच्या नोकरीत यांच्यापैकी प्रत्येकाने असे दिवे पाजळले की काही विचारू नका. नागालँडचा एकुलता एक म्हणून शेफारलेला ‘हरालू’ – हरामी’ (नंतर लोकांनी ठेवलेले नाव !) हरालू म्हणून दोनदा कोर्टमार्शल होऊन तब्बेतीत राहात होता. देवकरच्या खोड्यांना उत येऊन आग लावण्याचे पर्यंत मजल गेल्याने त्याला रस्टिकेट केलेले असताना देखील त्याने एनडीएत असताना ‘गोल्ड मेडलिस्ट’ होतो याचे भांडवल करून एयर चीफ पर्यत लग्गा लाऊन तो पुन्हा आमच्या नंतरच्या बॅच मधून कमिशन मिळवून बसला. नंतर बायकोला फसवून व काही चोऱ्या करून कारावासाची शिक्षा भोगत असताना तेथून परदेशात पळाल्याचे ऐकिवात आले.

माझ्या शेजारच्या रुममधे राहणाऱ्या पॅक्कियमला गिटारपुढे काही सुचत नव्हते. ‘आम्हाला एनडीएतून फ्लाईंगसाठी सिलेक्ट केलेले होते पण तेथून काढल्याने आम्ही फ्रस्ट्रेट झालो आहोत. आम्हाला या पुळचट शिक्षणाची गरज नाही’. असे तो कधी कधी म्हणे. त्याला काढून टाकल्यावर स्टेशनवर सोडून आल्याने निश्वास सोडणाऱ्या स्टाफला माहित नव्हते की तो पुढल्या स्टेशनात उतरून परत ट्रेनने एएफएसीतील कॅडेट मेसमध्ये दोन महिने आरामात राहात होता! असे दोनदा झाल्यावर तो एकदाचा परत गेला. गोव्यात कुठेतरी एका बँडमधे तो इंग्रजी गाण्याचे कार्यक्रम करत असे असे कोणी म्हणे.

असेच एक महाभाग होते, ‘आय जे’ (इंदरजीत) सिंग. पायाला फारसे काही झालेले नसताना वर्षभर पट्टी बांधून फिरणारा आयजे घोड्यावरचा पटू होता. एकदा पडण्याचे निमित्त झाले व नंतर स्वारीने आयुष्यभर नाटक केले. लग्न झाले. बायकोशी पटेना. पैशावरून भांडणांचा कळस झाला. आमचे काम पगाराचे वाटप करण्याचे असल्याने अशा केसेस आम्हाला नेहमीच हाताळाव्या लागत. मात्र आयजेला वाटे की मी त्याचा कोर्समेट असल्याने मी त्याची बाजू घेऊन नेहमीच मदत करावी. तशी मी केलीही. पण कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच ! तसे दरवेळेला मदतीचा हात मी नाकारला की तो माझ्यावर खवळे.
हरालू चंदिगडला व नंतर कानपुरच्या पोस्टींगला माझ्या बरोबर होता. ‘एयर फोर्सच्या पैशाच्या सेफची चावी दे रे’ असे मला तो खुणावे. ‘चल भाग चलते है’ असा त्याचा होरा असे. अधुन मधुन माझ्याकडून खाजगीत पैशाची मागणी करून ‘पगाराच्या पैशातून परत घे’. असे म्हणत असे. मी कित्येकदा त्याला कोर्समेटच्या इमानामुळे हात उसने पैसे दिले. कधी नाही म्हटले तर माझ्यावर गुरकारायला तो कमी करीत नसे. मग मला ती आठवण येई. आजही आठवले की थरकाप होतो. एकदा आमच्या कोर्सचा कॅडेट-इन-चार्ज व अकाऊंट्सचा पी एन मिश्रा एकदम जीव घेऊन पुढे पळाला. त्याच्या मागे फुटभराचा जंबिया घेऊन हरालू वाटेत येणाऱ्या झाडाझुडपांना सपासप तोडत त्याच्या मागे मारायला धावला. नेमके आमच्या बिलेटमधे येउन हरालूने मिश्राला गाठले. काही क्षणांचा उशीर झाला असता तर काही भलतेच घडणार होते. मात्र आमच्या सारख्यांनी त्या हरालूला गच्च धरून ठेवले. मिश्राला लांब नेले गेले व वेळ टळली.

लग्नानंतर हरालू च्या घरी जेवणात फक्त भाताचे डेचके व कुत्र्याच्या तंगडीचे मटन पाहून मला शिसारी येणार नाही तर काय होईल ? माझे मित्र सांगत तो इस्टमधे आसामात असताना तेथील कुत्री, हा दिसला की जीव घेऊन पळत. तो नेम मारून खेकडे, झुरळे, सापांना त्याच्या पोटाचा घास बनवत असे. कानपुरात नंतरच्या भेटीत नवीन पोरीची, “ही माझी बायको“ म्हणून ओळख करुन दिल्यावर माझ्या उंचावलेल्या भुवयांना पाहून म्हणाला, “ये नया माल है”. असो.

असे ‘कोर्टमार्शल मटेरियल’ आमच्या समोर दिसत असे तेंव्हा वाटे की हे कसले ‘जंटलमन कॅडेट’ ?  हे तर राक्षस! पुढे जंगल कॅम्पला त्यांची महती आम्हाला कळली. विरप्पन फेम मुरुडूमलाई जंगलात रोज जेवणाला मिळणारे नॉनव्हेज पदार्थ त्यांनी केलेल्या शिकारीले प्राणी असत. जंगल कॅम्पातील प्रत्येक वॉरगेम त्यांनी लीलया जिंकली. तेंव्हा हळूहळू लक्षात आले की सेनेला असेच विक्षिप्त जवान हवे असतात. त्याना पोसण्याचे एक असेही कारण असते की हेच ‘एक्सेंट्रिक’ लोक युद्धातील “करो या मरो” स्थितीतील जिगरबाजीची कामे करतात. युद्धातील पराक्रमाची कामगिरी करताना अशाच लोकांची साहसी मनोवृत्ती कामी येते. अनेकदा सिनेमातही एरव्ही कामातून गेलेले ‘कडके दारूबाज’ विलक्षण मर्दूमकी गाजवताना दाखवतात ते असेच असते. असो.

आमचे शिक्षण अर्धे झाले. ४ डिसेंबर १९७१ला भारत-पाक युद्ध सुरु झाले. रोज बातम्या ऐकताना आम्हाला सांगण्यात आले की जर लढाई रेंगाळली तर लगेच म्हणजे एका वर्षां ऐवजी सहा महिन्याच्या ट्रेनिंग नंतर कमिशन देण्याची कुणकुण होती. मात्र तसे झाले नाही. बांगलादेशची निर्मिती झाली व आमची मिड-व्हेकेशन मात्र सहा आठवड्या वरून दोन आठवड्यांची झाली. आमचा युद्धाच्या काळातील सेवेचा चान्स हुकला तो निवृत्त होईपर्यंत…!
क्रमशः

— लेखन : शशिकांत ओक. विंग कमांडर, पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. प्रिय वाचक हो,
    देवेंद्र आणि अलका भुजबळांनी न्यूज स्टोरी टुडे वर माझे हवाईदलातील दिवस आणि किस्से दर शुक्रवारी प्रकाशित करायला प्रोत्साहित केले आहे.
    यातील भाग काही हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. https://alkaoaksebookshoppy.online/
    वर जाऊन ईबुक माध्यमातून वाचायला मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments