Saturday, October 5, 2024
Homeसेवाहवा हवाई भाग ४

हवा हवाई भाग ४

“…बुरी तरहसे फँसा तू रे’ असं मी मला म्हणत होतो. कुठून या चंदीगडला आलो व आल्या आल्या आता माझ्याविरुद्ध रिपोर्ट वगैरे ऐकून मला भिती वाटायला लागली…
…‘साहेब, अहो बँडवादनात माझी जिंदगी सरली. इथे फक्त परेडच्या सरावाला, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी अन पार्टीच्या वेळी ‘बँड इन अटेंडन्स’ असेल तर ‘डायनिंग इन नाईट’ च्या वेळी बोलावणे येते. 4-6 रमच्या बाटल्या आम्हाला देऊन “शाबाश” म्हणून बोळवण केली जाते…’
…मला त्या उद्गारांची आठवण कायम लक्षात राहावी अशी मनावर कोरली गेली. नंतरच्या सर्व्हीसमधे कधी कधी मला माझे अकौंट्स काम असेच बँड पथकासारखे, हवाई चढाईच्या कामापासून दूर, लांबून ‘छान, वा वा, शाबाश’ म्हटले की संपले अशा खाक्याशी जुळणारे वाटले !

..तो रापलेला चेहरा,
“सर, सैन्याचा बँड सुमधुर गाण्यांसाठी नाही, रणांगणातील भीषण कत्तलीच्या, प्रचंड आवाजाच्या व धुळीच्या डोंबामधून आपली सेना लढतेय. ‘तुम आगे बढो’ याची जाणीव करून द्यायला उपयोगात आणला जातो.’ असा संदेश देऊन जात असे.”

कधीकधी आपण काय करतोय याचा परिणाम काय होईल याची शुद्ध नसल्याने मजेशीर घटना घडतात व अनेकांचे शिव्या शाप ऐकायला मिळतात. असा किस्सा माझ्याबाबत झाला नसेल तरच नवल !
त्याचे असे झाले…
मी नुकताच पायलट ऑफिसर म्हणून कमिशन मिळवून हवाईदलाच्या प्रेस्टीजस एयर फोर्स स्टेशन चंदीगडला पहिल्या पोस्टींगवर रुजू झालो. झाले असतील २ आठवडे. मला माझ्या बॉसनी बोलावले. ‘यस्स सर’ म्हणून मी सॅल्यूट ठोकून त्यांच्या समोर उभा राहिलो.
ते म्हणाले, ‘यंगमॅन, आजच्या ‘पीएडी-जीडी एक्सरसाईजमधे तुला भाग घ्यायला मी बोलावले आहे. गेट रेडी !…’
‘येस सर, मला काय अकौंटींग करायचे आहे ?’ मी बुचकळ्यात पडून म्हणालो. मला पीएडी, जीडीही अक्षरे मुळात माहित नव्हती ! अकौंट्समधे इतके शॉर्ट फॉर्म वापरले जातात त्यातील ते काही तरी असावेत असे मी मनात विचार करत होतो.
‘ऐसा है बेटे’, मल्याळी बॉस हिन्दीतून बोलायचा सराव करत असावेत असे ते बोलले, ‘एओसीनी मला एक ऑफिसर व काही एयरमनना एनिमी फोर्स तयार करायला सांगितले आहे. मीच पीएडी कमांडर आहे म्हणून तुला तो ऑफिसर करायचे मी ठरवले आहे. लीव्ह धिस सेक्शन एन्ड रिपोर्ट टू मी इन ऑप्स रूम.’
‘राईट सर’, म्हणत बाहेर पडलो. कारण बॉस नेहमी राईटच असतो…!

मी सेफच्या चाव्या द्यायला माझ्यापेक्षा जास्त सीनियर फ्लाईट लेफ्टनंट [१] स्वामीनाथनला भेटलो तर त्याने नाक उडवून, ‘अब तुझे मुर्गा बनाया क्या ? साल्ला, लास्ट टाईम मुझे उसने पकडा था…!’ असे म्हणून माझ्यावर नस्ती आफत आली असल्याचे सूचित केले…
अंडरग्राऊंड ऑप्स रूमबाहेर मी येता येता मनात म्हणालो, ‘अस्से आहे काय पीएडी जीडी ? म्हणजे… पॅसिव्ह एयर डिफेन्स व ग्राऊंड डिफेन्स ! म्हणजे लढाईच्या धामधुमीत शत्रुच्या विमानांच्या हल्ल्या वेळी ट्रेंचमधे लपून बसायचे, शत्रू सैन्याला शक्यतो स्टेशनच्या आत प्रवेशाला मनाई करायला व आत आलाच तर विमाने आणि अन्य महत्त्वाच्या जागी शत्रूकडून हातगोळे वा अन्य शस्त्रास्त्रांच्यामुळे विनाशापासून दूर ठेवायचा शिस्तबद्ध प्रतिकार करायला येता यावा यासाठी मॉक ड्रिलचे नाटक करायचे व आपले वीकपॉईंट्स शोधून त्यावर उपाय योजना करायची…!

बाहेर उभ्या काही काही एयरमनना फ्लाईटमधे इन थ्रीज् उभे करून ब्रीफिंग द्यायला लागलो. म्हणालो की आत्ता मला ऑर्डर मिळाली आहे की तुम्ही माझे साथीदार आहात. मी तुमचा कमांडर आहे. आपण सर्व एनिमी फोर्स असून आपल्याला थ्री टनर ट्रकने स्टेशनच्या बाहेर सोडण्यात येईल. तेथून आपल्या लपत छपत आत शिरायचे आहे व नंतर वेगवेगळ्या स्वाड्रनची जी विमाने उभी आहेत ती, एटीसी टॉवर, सिग्नल सेक्शन, पैशाची जागा म्हणून अकौंट्ससेक्शन वगैर हाय व्हॅल्यू टारगेट्स शोधून ती जिंकायची आहेत. त्यासाठी आपल्याला लढाई करायची नाही फक्त मी देतोय त्या रंगीत खडूंनी त्या त्या टार्गेटवर फुलीच्या खुणाकरून ती आपण हातगोळे फेकून नष्ट केली आहेत असे दर्शवायचे आहे. बाहेरून काही अंपायर आलेत ते यावर निर्णय देतील व रिपोर्ट एओसीला (एयर ऑफिसर कमांडिग) देतील.
‘कोई शुबा या शक ?’ असे आर्मीत जवानांच्यावर ओरडून त्यांची संमती मिळवताना म्हणतात तसे मी ओरडून छाप पाडायला पुकार केला.
‘सर, खाने का क्या ? एका पोट सुटलेल्या एयरमनची चिंता चेहऱ्यावरून दिसली.
‘इसका इंतज़ाम हो गया है… डोंट वरी’…
खरेतर मलाही काही माहीत नव्हते काय इंतजाम आहे ते ! …पण ‘मोराल’ महत्वाचे असे मी प्रिन्सिपल्स ऑफ वॉर मधे शिकलो होतो. त्याचा रट्टा कामी आला.

माझ्या दिमतीला दिलेले १८ जण व मी असे १९ जण होतो. त्यातला एकही चेहरा माझ्या माहितीचा नव्हता. असायचे कारणही नव्हते, एक तर मलाच येऊन दोन आठवडे झाले होते शिवाय जे एयरमन होते ते हवाईदलाच्या बँड पथकातले होते. त्यांचा अन् बाकी एयरमनचा संपर्क जवळ जवळ नसे. आपली वाजंत्री, आपले कडक युनिफॉर्म बरे, वर ‘सारे जहांसे अच्छा’ टाईप गाणी वाजवायचा सराव दूर कोपऱ्यात केलेला बरा असा त्यांचा खाक्या असतो अर्थात हे मला नंतरच्या सेवेच्या अनुभवावरून समजले !…
तर असे मी व माझे एनिमी ट्रूप पॅक लंच घेऊन एका ट्रकनी ५-७ किमीवर आलो. एक अंपायरबरोबर आला होता. ‘बच्चे समझाना क्या करना है ? डरो मत, एक्सरसाईज खत्म होने के बाद मुझे डायरेक्ट मिलना. किसीने बुलाया तो मत जाना’…‘यससर’ म्हणून मी त्यांना सॅल्यूट ठोकला. ती कार दिसेनाशी झाली. एयरमनचा ट्रक त्यांना खाली सोडून निघून गेला. सगळे जण माझ्याकडे ‘अब क्या ?’असे प्रश्नार्थक चेहरे करून पाहायला लागले.

त्यातल्या चीफी उर्फ फ्लाईट सार्जंटने मला म्हटले, ‘सर मैं ऐसे काम को जानता हूं। आप चिंता मत करो। मी व माझे साथी कुंपण कुठे तुटलेले आहे ते पाहून आलो आहे’. मला आश्चर्य वाटून मी म्हटले, ‘आपको कैसे पता?
‘साहेब, अहो बँडवादनात माझी जिंदगी सरली. आम्हाला अडगळीच्या जागेत लोकांपासून दूर जाऊन वाजवायला सांगितले जाते. कोणाला कर्कश्य वाद्यांच्या आवाजात गाण्यांचे तेच तेच सूर ऐकायला आवडणार? हिन्दी सिनेसंगीतातील गाणी मला वाजवायला मिळतील म्हणून मी हौसेनी घरचा बँड असताना इथे आलो. आता इथे फक्त परेडच्या सरावाला, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी अन पार्टीच्या वेळी ‘बँडइन अटेंडन्स’असेल तर ‘डायनिंगइन नाईट’च्या वेळी बोलावणे येते. ४-६ रमच्या बाटल्या आम्हाला देऊन “शाबाश” म्हणून बोळवण केली जाते…’

मला त्या उद्गारांची आठवण कायम लक्षात राहावी अशी मनावर कोरली गेली. नंतरच्या सर्व्हीसमधे कधी कधी मला माझे काम असेच बँड पथकासारखे, हवाई चढाईच्या कामापासून दूर, लांबून ‘छान,वा वा, शाबाश’ म्हटले की संपले असा खाक्याशी जुळणारे वाटले! तेंव्हा तेंव्हा तो रापलेला चेहरा, ‘सर, सैन्याचा बँड सुमधुर गाण्यांसाठी नाही, रणांगणातील भीषण कत्तलीच्या, प्रचंड आवाजाच्या व धुळीच्या डोंबामधून आपली सेना लढतेय. ‘तुम आगे बढो’ याची जाणीव करून द्यायला उपयोगात आणला जातो.’ असा संदेश देऊन जात असे.
‘ऐसे काम हम पहले भी करते आए हैं ! दरवेळी असे आम्हाला असे सोडतात मग आम्हीही सरावाने कुठून आत जायला येता येईल याची पहाणी करायला बाहेर पडतो. काही वेळी तारा बाजूला करून ठेवतो कारण रात्रीच्या अंधारात युनिफॉर्मचे कपडे फाटले तर पुन्हा नवा देणार कोण ?


याची पुढील आयुष्यात जाणीव ठेऊन एयरमन लोकांना फुकट युनिफॉर्म दिला जातो पण तो ठराविक काळानंतर, असे इक्विपमेंट अकौंट्समधून शिकून मी ऑडिट ऑब्जेक्शन काढायला तत्पर होत असे. काही केसेसमधे ते बाजूला ठेऊन खरोखरच काही कारणांनी युनिफॉर्म खराब झाला असेल तर त्यावरील ऑब्जेक्शन ओव्हररूल करून मी सँक्शन करीत असे.
‘सर लीजिये, लंच हम खा लेते है. पीएडी का सायरन कभीभी बज सकता है’ म्हणत एका कॉरपोरलने आपल्या पुर्वानुभवाचा साक्षात्कार करून देत म्हटले. एयरमन मेसमधील बनलेल्या पॅक लंचचे कोरडे तुकडे पाण्याच्या घोटाबरोबर तोंडात ढकलत संपवले.

इतक्यात कमी-जास्त आवाज करणाऱ्या सायरनचा आवाज कानी आला. एकाएकी विमानांचे गडगडाटी आवाज जवळ आल्यासारखे झाले. दोन विमाने, त्याच्या पाठोपाठ आणखी दोन येऊन भर्रकन गेली व जाता जाता दोन दिशांना वळली. म्हणजे आमच्या कामातील हवाईहल्याची सुरवात झाली होती. आता आमच्या सारख्या शत्रूपक्षाच्या तुकडीला हवाईतळावर घुसून अफरातफरीकरून जितका विध्वंस करता येणे शक्य आहे तो करायचा प्लान अंमलात आणायची संधी आली होती. आम्ही ३-४ जणांचे गट तयार केले. प्रत्येकाला टारगेट ठरवून दिले. मी विमानांवर धावा बोलायला जायचा प्लान केला. खूप पायपीट केल्यावर सराईत एयरमननी एका ड्रेनेजच्या गटारापाशी ‘सर यहांसे चलते है’ म्हणून आत जायचा मार्ग दाखवला. एरव्ही उंच उंच काटेरी तारा असलेले कुंपण पावसाचेपाणी जायला केलेल्या गटाराला काहीही बंधन करू शकत नव्हते. सर्व जणांनी आत प्रवेश केला. मला ज्याची चिंता फार लागली होती ते काम फारच लीलया झाले असे वाटून आम्ही मजल दर मजल करत पुढे सरकत होतो. मधून मधून सायरनचे आवाज सांगत होते की एयर रेड एलर्ट दिला गेलाय नंतर पुन्हा जणू शत्रूची विमाने प्रचंड वेगाने येऊन येऊन माराकरून परतली की सर्व शांत असा ऑल बॅक टू नॉर्मल असा संदेश देत असे. त्यानंतर विविध टीम्स हवाई हल्यामुळे झालेल्या हानीला शोधायला, कॅजुएल्टीला स्ट्रेचर वरून न्यायला व रनवे रिपेयर पार्टीला कामाला लावायला वेळ मिळत असे. कमांड हेड क्वार्टरमधे झालेल्या घटनेचा हानीचा अहवाल वरिष्ठांना सादर करायला झुंजत असे. टारमॅकवरील पार्क केलेल्या विमानांचे रक्षण करायला अनेक एयरमनना तैनात केले गेले होते. काही विमाने हँगर मधे तर काही उघड्यावर पार्क केलेली असल्याने आम्हाला त्या सुरक्षा कर्मींना चुकवून विमानाच्या आसपास जायला दबा धरून वाट पाहत थांबावे लागत होते.

उन्हे कलली. जुलैची सडी गर्मी. खाकी युनिफॉर्मचा घामाने ओल्या टॉवेल सारखा झाला होता. होता होता अंधार झाला. आमच्या टीम्सशी माझा संपर्क राहिला नाही. मी ३ जणांना बरोबर घेऊन दबा धरून पुढे पुढे सरकत होतो. एटीसी पाशी आलो. तिथून विमानाच्या येण्याजाण्यावर नियंत्रण करायचा टॉवर होता. दूरवर विमानांचे तांडे पार्क केलेले दिसत होते. मला तर त्यांचे प्रथम दर्शन होत होते. ज्यांनी आपल्या देशाचे रक्षण करायचे त्या विमानांचा विनाश करायला मी आलोय याची जाणीव होऊन मला खजील व्हायला झाले.

तेवढ्यात ‘यू, व्हाट इज युवर नेम ? असा ओरडून पुकारा झाला म्हणून मी तिकडे पहात होतो तो दंडाला अंपायर असल्याचा बॅज दिसला म्हणून मी त्याला लपत रिपोर्ट करायला गेलो.
‘तू एकटाच बाकीचे कुठे आहेत? त्याच्या आवाजाचा दणका असा होता की मी ततपप करत मला माहीत नाहीत पण माझ्या बरोबरचे इथे तीन आहेत’ असे चाचपडत म्हणतोय तोवर एयर रेडचा सायरन वाजला. तो अंपायर ऑफिसर मला म्हणाला, ‘रन सर्च फॉर शेल्टर यू फूल! व्हेयरीज युवर ट्रेंच रन?…’
‘बट सर’… मी म्हणायच्या आत तो म्हणाला, ‘डोंट वरी मी अंपायर आहे. कोणी काय काय चुका करतोय ते पहायला आलोय. मला ट्रेंचमधे लपायला जायची गरज नाही’!…
‘सर मी तर एनिमी आहे मी कसा अन् कुठे जाऊ शकते ?’
म्हणत कुरकुरलो.
‘पहली बार कर रह है क्या ? म्हणून फाजील जोकची सूरत करून म्हणाला, ‘अब तक कहां थे तुम लोग ? हमें तो लगा की तुम भाग गए हो! अच्छा अब शुरू करो अपना काम, मैं तुम्हारे पर नजर रख कहा हूं…
‘यस सर, म्हणेपर्यंत ऑल क्लीयरचा सायरन झाला. आमच्या टीममधील एकानी हातानी बोलावून म्हटले, ‘सर आपको उसके पास नही जाना चाहिए… आपके अगेन्स्ट रिपोर्ट करेगा तो पंगा खडा होगा…!’
कुठून या चंदीगडला आलो व आल्या आल्या आता माझ्याविरुद्ध रिपोर्ट वगैरे ऐकून मला भिती वाटायला लागली. ‘बुरी तरहसे फँसा तू रे’ असा मी मला म्हणत होतो. होऊ दे काय व्हायचे ते असा मी मला धीर दिला व एटीसीच्या टॉवरकडे नजर टाकली. तेंव्हा एक जण चहाची किटली घेऊन जिना चढताना दिसला. मी टीममधल्या एकाला ‘क्या तुम ऐसा किटली लेकर जा सकते हो? म्हणून विचारले. ‘सर मैं? ना मैं तो … करून तो कचरत नाही म्हणायला लागला. ऐन वेळी आपल्या साथीदारांनी अशी कच खाल्यावर मला ते काम करायला जावे असे वाटू लागले. मी युनिफॉर्मचा शर्ट काढला व त्या एयरमनला म्हणालो. ‘तुम उतारो अपना शर्ट मुझे पहनने को दो…! ‘सर, ये कैसे होगा यहां खुले में?’
‘चल निकाल साले’ मी शर्ट काढून बनियानमधे अन् हा चाचरत नाही म्हणतोय असे पाहून शिवी माझ्या तोंडात अलगद आली…

किटली एका हातात व चहाचे काचेचे कप सावरत एक आकृती टॉवरवर पोचली खिशातून खडू काढून मोठी फुली मारून परतली. मला असे करताना पाहून, ‘सर मैं चला’ म्हणून आमच्यातील एकाने ती किटली उठवून ऑप्स हेडक्वार्टरकडे मोर्चा वळवला. उरलेल्याला मी सामनेवाल्या हेलिकॉप्टरला क्रॉस करायला पिटाळला. ते परतले ‘थम्प्स अप करत!’ आम्ही पुढे सरकलो विमाने जवळ जवळ दिसायला लागली. कुठे हँगरची भिंत तर कधी दुरुस्तीच्या कामासाठी ठेवलेल्या विटांच्या भिंताचा अडोसा करत सरकू लागलो. मिग विमाने टप्प्यात आली. आम्ही फुली केली तोवर शिट्यांचा पुकार झाला आमच्यातील एक पकडला गेला. त्याला धरून नेताना पाहिले. पकडला तर जाणार तेंव्हा काही अलग पंगा नको असे मनात म्हणत आता मी परत माझ्या ड्रेसात आलो. एक सिव्हिलियन सायकल वरून जाताना दिसला मी त्याला ‘कुठ जातोयस ड्यूटी सोडून?’ म्हणालो, तर तो, ‘सर, मेरा काम हो गया, मैं आपके झंझट में नही हूं’ म्हणून मला टरकावले व सटकला. मी आणखी अंधार व्हायची वाट पहात एका भिंताच्या आडोश्याला बसलो चांगला तास भर उलटला असावा. हातातील घड्याळ, अंगठी, पर्स, आयकार्ड न बाळगता मला या कामगिरीवर पाठवले होते…

रेड एलर्टचे सायरन वाजायचे कमी झाले. कदाचित या कामाला लागलेल्या विमानांच्या सॉर्टीज संपल्या असाव्यात. काही काळाने जरा आवाज वाढला. एका थ्रीटनर मधून रात्रीच्या जेवायसाठी पॅकेट्स वाटायला तो ट्रक जात होता थांबून काहींना वाटून पुढे सरकत होता. मी एकाला त्या एयरमन लोकांच्या घोळक्यात शिरून ट्रकमधे बसून थांबत थांबत प्रत्येक विमानापाशी जायला चान्स घे म्हणून पिटाळला. ‘जी सर’ म्हणून त्याने त्या गार्ड एयरमनमधे डिनर पॅकसाठी आपली वर्णी लावलेली मी पाहिली! पुढे त्याचे काय झाले मला माहित झाले नाही! इतरांचे काय झाले असावे? किती पकडले गेले? वगैरे माहिती करून घ्यायला साधन नव्हते. मी आता सिग्नल सेक्शनकडे मोर्चा वळवला, चहा द्यायच्या पँट्रीरूम मधे एक डांगरी लटकलेली पाहिली ती चढवून मी डी एस सी गार्ड, एयरमन चेक पोस्ट पार करून शटरवर फुली मारली तेवढ्यात मागून शिटी वाजली. दोन जण धावले मी पटकन एका आडोशाला गेलो. ‘किसने लगाया ये क्रॉस? तुम क्या कर रहे थे? ये गया ना बॉम्ब के धमाकेसे! …’ म्हणताना ऐकत होतो. अंपायर तिथल्या गार्डची खरडपट्टी काढत असावा बहुधा…एका जोंग्यात मी लपलो तोवर तो चालू झाला व एके ठिकाणी थांबला मी मागून उतरून ऑफिसपाशी फुली लगावली… पाहतोत तो ते बॉसचे ऑफिस होते !
मला मागून ‘हॅंड्स अप’! अशी आरोळी मिळाली. ‘पहचान के लिए आगे बढ’ म्हणून पुकारा झाला. मी हात वर करून उभा. साईड कॅप जाड काळ्या बेल्टला पोटाशी खोचलेली…

‘शो युवर आय कार्ड… मी तरीही उभा!… ‘आय से शो युवर आय कार्ड आदरवाईज आय विल शूट बिलो नीज…!’
मी थरथरत होतो. काय करावे सुचेना मी फक्त म्हणालो, ‘एनिमी फोर्स कमांडर…’ मला लगेच पकडले गेले. एका रूममधे बसवण्यात आले. तिथे माझे साथी आधीच पोहोचले होते! तिकडे एका मागून एक गाड्या थांबल्याचे आवाज येत होते. मग मला एडजुटंट समोर उभा केला गेला. तोवर अंपायरची टीम आली. पैकी एक दोघांनी मला ओळखले. मानेने थांब म्हणून ओळख दिली. ते एओसीच्या ऑफिसमधे गेलेले पाहिले. आता मला पाणी व थंड गार झालेला चहा दिला गेला. तोवर मला आत बोलावलेय म्हणून पुकारा झाला. कडकडून थंडी वाजल्याप्रमाणे मला कंप सुटला होता. ‘आता काय एक्शन घेतली जाणार याची कटू सुनावणी ऐकायला मला भिती वाटायला लागली!’ … पंधरा दिवसापुर्वी पहिल्या भेटीतील पुसटशी ओळख झालेला एओसी राक्षसाप्रमाणे वाटत होता. सॅल्यूटमधून अवसान गळून मी कसाबसा उभा …!
‘हू’ज धिस ब्लडी पिडली पायलट ऑफिसर?’ सिंह गुरगुरल्याचा भास व्हावा तशा आवाजात विचारणा झाली…
माझ्याकडे बघत, मी कोण हे सांगायची नामुश्कीची वेळ आपल्यावर यावी असे वाटून ‘सर, ही इज माय बॉय’ म्हणत माझ्या मल्याळी अकौंट्सच्या बॉसने तोंड वेंगाडले…

आय सी… टेबलावर पडलेला अंपायरचा रिपोर्ट वाचत माझ्याकडे न पहाच ते गुरगुरले.
‘१४ टारगेट्सवर मार्किंग? आय कांट अंडरस्टँड! हाऊ डिड यू मॅनेज? माझ्याकडे नजर लाऊन त्यांनी अंपायराला विचारले, ‘सो व्हाट वी डू? मला असा फेल्यूअर रिपोर्ट कमांडला दिलेला आवडणार नाही…!’
‘ओनली वे वी डू पीएडी जीडी अगेन‘! अंपायरने बिरबली काव्यात अकबराला सुचवावे अशा पवित्र्यात समजावले. ‘ओके! इफ यू सो से…! कॉल ऑफ फॉर टुडे, एन्ड ऑर्डर टुमारो फॉर रिपीट एक्सरसाईज इमिडिएटली’ त्यांनी एडजुटंटकडे पहात म्हटले, ‘बट कीप धिस फेलो अवे…! ओके? ‘या कार्ट्यामुळे ही नाचक्की झाली’ असे ते मला म्हणतील असे वाटले.’
सगळे पांगले. मी उभाचा उभा! मी केलेले काम न नाकारून मानेचा झटका देत भुवया उंचावत ते म्हणाले, ‘You didn’t spare even my office? गुड…! टेक रेस्ट…!!’
दुसऱ्या दिवशी स्टेशनभर हंगामा झाला की पुन्हा पीएडी-जीडीची
कटकट करायचा हुकूम आहे. सर्वांनी यथेच्च शिव्या शापांचे हार माझ्या गळ्यात टाकले असणार हे समजायला नाडी भविष्याची गरज नाही.…

निवृत्तीवेळी – एयर मार्शल ईदुल जहांगीर धत्तीगारा
ता. क. – विमाननगरच्या जॉगर्स पार्कवर माझी भेट निवृत्त एयर कमोडर अनंत महाबळेश्वरकरांशी झाली. बोलता बोलता मी त्यांना विचारले, ‘सर तुम्ही १९७२ला चंदीगडला होतात ना? मग त्यावेळी AOC कोण होते ते सांगता येईल का? हो, का रे? म्हणून विचारणा करता, मी त्याना वरील कथानक थोडक्यात सांगितले. मला आठवतय तो सराव दोनदा केला गेला होता तो तुझ्यामुळे झाला होता काय? जरा डोके खाजवून विचार करत ते म्हणाले, ‘कोssण? कोण असावा बरं? चुटकीच्या आवाजासरशी म्हणाले, ‘हां, बापरे ते? ते तर धत्तीगारा! अरे तेच होते. तुझी बोबडी वळली असेत तर नवल नाही! भले भले त्यांना टरकून असत’!…
क्रमशः

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

वैशाली कोंडाजी on “माध्यम पन्नाशी” : ९
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” : ९