Friday, November 8, 2024
Homeलेखहवा हवाई : १०

हवा हवाई : १०

“आमची रंगीत बाल्कनी”

प्रिय मित्रांनो,
संध्याकाळी रंगीत प्रकशाच्या बाल्कनीत बसून चहाचा घोट घेत, पावसाळ्याच्या रिमझिम पावसाचा आनंद लुटताना, गाणी, व्यक्ती, घटना आठवू लागतात. अशीच एक व्यक्ती मला आठवली ती म्हणजे “अब्दुल बाबा”.

‘सर्वोत्तम चहा आणि स्नॅक्स कॅन्टीन’ साठी अकौंट्स सेक्शनची सर्व एअरबेसमध्ये ख्याती आहे. सेक्शनच्या इमारतीच्या मागील बाजूस, सिव्हिलियन्स, एयरमन लोकांची पेमेंटसाठी जवळजवळ दररोज गर्दी जमते. पगार, टीए, व इतर अलौंन्सची चिल्लर पेमेंट्सच्या नावाखाली तर कोणी टिवल्याबावल्या करायला, टाइम पास करायला लोकांची गर्दी असते. काही अधिकारी फ्लाईंग मधल्या वेळात त्यांच्या आर्थिक समस्यांसाठी आम्हाला ऑफिसमधे भेट द्यायला येत. प्रत्येकासाठी, उत्साहाने सेवा देण्यासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य देऊन त्यांना परत पाठवायची जबाबदारी आम्हा अकौंट्स सेक्शनची असते. हे काम गरमागरम एका चहाच्या कपाने सहज करता येते. कडक चहा, चवदार समोसे, गरमागरम भजी, इडली-डोसा असे आकर्षक प्लेट साहेबांच्या टेबलवर पटकन घेऊन येणे हे काम आमच्या चटपटीत चपराशी कर्मचाऱ्यांचे असते. एओसी महिन्याच्या शेवटी कॅश मोजून सर्व पैसे हिशोबात बरोबर आहेत, असे सही करून जातात. ती अकौंट्स ऑफिसरांची, स्टाफची पर्वणी असते. बॉसला इंप्रेस करायची संधी गचाळपणे गमवायची नसते. यासाठी गुणी, तयार चपरासी हाताशी लागतात असे सांगितले जाते.

अशीच एक व्यक्ती होती ‘अब्दुल’. ७१ चे युद्ध संपून बरोबर १ वर्ष झाले होते. डिसेंबर १९७२ मधील श्रीनगरच्या टारमॅकवर, जिथे विमाने उतरतात, तिथे कडाक्याच्या थंडीत एक छोटीशी आकृती मला आठवते. ‘नमस्ते साबजी,’ तो ‘कोट पर्का’ घेऊन तो तयार होता. त्याची माझी पहिली ओळख होती. नंतरच्या पोस्टींगच्या काळात श्रीनगर अकौंट्स खात्यात काम करताना आमच्या भेटी साहजिक चालूच राहिल्या. आमच्या खात्यात सिव्हिलियन कर्मचारी कायम असत. त्यामुळे त्यांच्याकडे मनोरंजक मजेदार किस्से पण सांगायला असतात.आमच्या आधीच्या अधिकाऱ्यांची गमतीशीर उदाहरणे श्रीनगरमध्ये अब्दुलच्या काश्मीरी भाषेच्या लहजात ऐकताना रंगून जायला होई. बाहेर जोरदार बर्फवृष्टी होत असताना, मिणमिणत्या दिव्यात बसणे, बुखारी वातावरणात गरमागरम चहाचा कप अब्दुलच्या सराईत हातांनी तयार केलेला. ग्लासातील चहा पाहुण्यांसाठी आणि माझ्यासाठीही एक सोहळा असायचा.

नुकतेच ७१ ऑप्स झालेले होते. त्यावेळचा किस्सा. युद्धकाळात बॉंबिंगपासून वाचवायला जागोजाग ट्रेंचेस बनवलेले होते. पैकी काही नंतरही आपले अस्तित्व टिकवून होते. तशाच पैकी सेक्शनजवळच्या एका खंदकाकडे इशारा करत अब्दुल एकदा म्हणाला, ‘जब वॉर शुरू हुवा, तब फ्लाईट लेफ्टनंट सरदारजी हरबन्सलाल, पैसे से भरी सेफ को खुला छोडकर भागेभागे इस ट्रेंच में छुप गया. उस ट्रेंच के आसपास बॉम्ब गिर गया था! पर हम बच गए! जब बॉम्बिग खतम हो गया तब मोटे तगडे सरदारजी को बाहर निकालना बडी मुश्किल हुवा! वो ट्रेंच से बाहर आनेको तैयार नहीं था. जब निकला तो डायरेक्ट नाईटी टू बेस हॉस्पीटल में एडमिट हो गया! चावी बाबी, पैसे, सेफ का दरवाजा खुल्ला छोड कर! तब मैंने सेफ की चाबी स्टेशन कमांडर सनाडी साब को दी थी !’

अब्दुलच्या अनेक आठवणी होत्या, १९७७-१९७९ मध्ये, तेंव्हा मी रावळपोरा कॉलनीत राहायचो. रावलपुरा कॉलनी १९८७ साली फार प्रकाशात आली, यासीन मलिक एका बाईकवर मागे बसून आला आणि तिथे उभ्या असलेल्या हवाईदलातील लोकांवर फायरिंग करून पळून गेला होता. त्याच ठिकाणी चिनारवृक्षाखाली आमच्या सारखे ऑफिसर्स सिव्हिलियन कॉलनीत बदामी बाग मधील ऑफिसर्स मेस मधून निघून श्रीनगर एयर बेसला जाणाऱ्या बस मधे वाटेत चढत असू.
नुकत्याच काश्मीर फाईल्स मधे तो प्रसंग पहायला मिळाला तेंव्हा ते आठवून मन उदास झाले होते. असो.

अब्दुल माझ्या घरी येऊन बेबीसिटिंग करायचा, हिवाळ्यातले जाडे कपडे, भांडी साफ करायचा, मॉपिंग करायला पत्नी अलकाला मदत करायचा. त्याला मुलांची आवड होती. ४० पेक्षा जास्त वर्षांमध्ये त्यांनी अनेक अकौंट्स ऑफिसर्स साठी त्यांच्या घरी जाऊन कामे केली. माझ्या काळात माझा मुलगा चिन्मय ६ महिन्याचा असताना भर थंडीत एकाकीपणात अलकाला मदत करायला व धीर द्यायला होता. १९९७ मध्ये, जेव्हा माझे कुटुंब जवळजवळ २० वर्षांनंतर श्रीनगरात माझ्याकडे सुट्टी घालवण्यासाठी आले, तेंव्हा मुले विशेषःतः चिम्नयला अब्दुलला भेटण्याची उत्सुकता होती, तो कोण होता? ज्याने मला संध्याकाळी ‘बाबागाडीत’ लांब फिरवायला नेले होते? ऑफिसर्सना दगडी कोळसा घरातील बुखारीसाठी मिळत असे. अब्दुल कोळशाच्या अवजड गोण्या खांद्यावरून आणून ढीग करे. बुखारीत बंबासारखी साधारण रचना असलेल्या लोखंडी शेगडीत, आधी काही ढलप्या घालून रॉकेलने पेटवून मग कोळसा पेट घेत असे. आजूबाजूची राख साफ करणे, हेही जिकीरीचे काम असे. ऑफिसरच्या घरात बुखारी पेटवणे, जीवावर बेतायचे.
एकदा रात्रभर कार्बन जमल्याने आमच्या घराजवळच्या बंगल्यात एक जण झोपेतच मेला !

मला आठवतं, आमचे एओसी एयर कमोडोर लिमये सर, नाईक सर जे नंतर चीफ झाले, मंथ एंड कॅश चेकला आले की खास तयार केलेला अब्दुलचे हर्बल मिक्स काश्मीर स्पेशल ‘केहवा’ चहाची वाट पाहत असत !

मी तिसऱ्यांदा श्रीनगरला १९९८ मध्ये होतो, अब्दुलला हवाई दलाच्या कार्यकाळातून निवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला. त्याचे निरोपाचे भाषण एक भावनिक प्रवास होता. तत्कालीन स्क्वाड्रन लीडर हसिजा यालाही भाषण आठवत असेल, पीव्ही राव साब यांचे नाव त्यापैकी एक होते. त्याला कधीच अडचण आली नाही, ज्या त्या बॉससोबत त्याने समर्पणाने सेवा केली होती. त्यांनी ७१च्या युद्धानंतरचे आनंदाचे दिवस, सेपरेटिस्टचा कठीण काळ, ९० च्या दशकातील स्थानिक लोकांच्या पलायनाच्या समस्या पाहिल्या. पुढे त्याने श्रीनगर एअरबेसच्या अतिशय घनदाट हिरव्यागार झाडांना पाहिले. नंतर ते टक्कल पडेपर्यंत सफचट झालेले पाहिले होते. पोलादी स्लीपर्स ते विमाने पार्क करायच्या बंदिस्त पेन्सआणि हँगर्सभोवती हवाई पट्ट्या आल्या! पाकिस्तानातून युनोची ऑब्झर्वर विमाने येत जात असताना पाहिली.

अकौंट्स सेक्शनची जागा 3 वेळा बदलण्याचा तो आणि मी साक्षीदार आहे. सुरवातीला FPO, कँटीन इ. जवळच्या धावपट्टीच्या दुसऱ्याबाजूला, दुसऱ्यांदा मुख्यालयाच्या बाजूने J & SS या च्या इमारतीं जवळ. तिसऱ्यांदा गार्ड रूम जवळ. मला पायलट ऑफिसर ते विंग कमांडर असे बदलत्या जबाबदाऱ्यात वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळताना त्याने पाहिली.

निवृत्तीनंतर, अब्दुलला चहाचे कँटीन चालवायला अकौंट्स सेक्शनमधे स्नॅक्स कॅन्टीन ऑपरेटर म्हणून खास परवानगी होती. तोपर्यंत तो “अब्दुल बाबा” झाला होता. त्यांचा मुलगा एनसीई होऊन अकौंट्स सेक्शनमध्ये काम करत होता.

२००३ मध्ये हवाई दल सोडण्यापूर्वी, मला PAD/GD कमांड ऑब्झर्वर म्हणून विमानतळाला भेट देण्याची शेवटची संधी मिळाली. कमिशन मिळून दोन आठवड्यात एनिमी कमांडर झालेला, ततपप करत कमांडींग ऑफिसर समोर घाबरलेला मी, ते वेस्टर्न कमांड मधील सर्व महत्वाच्या हवाईदलाच्या ऑप्स एक्सरसाईचा कमांड अंपायर, एक अकौंट्स ऑफिसर म्हणून झालेला ३० वर्षाचा अभिमानाचा प्रवास होता. तिथे मी पुन्हा अब्दुल बाबांना भेटलो आणि तो शेवटच्या हार्दिक शुभेच्छा देण्याचा दिवस होता.
मला खात्री आहे की असे विविध क्षमतेचे बरेच ‘अब्दुल’ इतरांच्या मनात घर करून असतील, ज्यांना त्यांच्या खात्यात, विभागांमध्ये काम करतानाची छाप,चेहरा वगैरे आठवत असतील.
म्हणूनच संध्याकाळी बसतो, तेव्हा अब्दुल आठवतो, कॉपल पांडे आठवतो.
… कुछ लोग याद रह जाते हैं…
क्रमशः

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. आमची रंगीत बाल्कनी हा लेख वाचनीय आहे.अब्दुल बाबांचे चित्र
    डोळ्यासमोर येते.

  2. माझ्या आठवणी एका मागून एक सादर होत आहेत. यासाठी देवेंद्र भुजबळ आणि सौ अलका भुजबळांना धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on मतदान करा हो मतदान…..
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण भाग : २२
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” – १२
माधुरी ताम्हणे on अनुकरणीय “आडे”बाजी !
माधुरी ताम्हणे on
माधुरी ताम्हणे on
विजया केळकर on
Manisha Shekhar Tamhane on
Shrikant Pattalwar on