आग लावा तुमच्या त्या प्रॉव्हिडंट फंडला !
हा किस्सा आहे श्रीनगर मधला. आमच्या अकाउंट्स खात्यातील कामाचा एक भाग म्हणजे दर महिन्याला पहिल्या पाच तारखांपर्यंत वेगवेगळ्या रजिस्टर्सची समरी मागून त्यामध्ये काय काय कामे पेंडिंग आहेत ?काय ती का पेंडिंग आहेत ? याची कारणे वगैरे याचा शोध घेऊन त्यावर काय कारवाई करता येईल याचा निर्णय घेणे अपेक्षित असते.
अशाच एका रजिस्टरमध्ये मला एक पेमेंट पेंडिंग आहे, ते घ्यायला कोणी येत नाही असे दिसून आले. जास्त चौकशी करता असे कळले की हे पेमेंट एका सिविलियन ग्रुप डी चे असून तो ते घ्यायला नकार देत होता. हा काय प्रकार आहे ? नेहमीच रिटायरमेंटच्या वेळेला मिळणारा प्रॉव्हिडंट फंड एक महत्त्वाचा क्लेम असतो ,तो हा सिविलियन घेण्यासाठी का नाराज आहे ?हे मला समजेना. म्हणून अब्दुल (बाबा यांना) बोलवून मी विचारले की कोण आहे हा माणूस? ओळखीचा आहे का ?
सर मी ओळखतो त्याला. परंतु हे पेमेंट तो घेणार नाही, कारण मी त्याला बरेच वेळा निवृत्तीनंतर बोलावले होते. तो आमच्या घराशेजारीच राहणारा आहे पण या कामासाठी तो येणार नाही.
माझी उत्सुकता चाळवली आणि मी अब्दुलला म्हणालो की त्याला एकदा पुन्हा बोलवा. मला बोलू दे त्यांच्याशी. मध्ये बरेच दिवस गेले आणि एक दिवस श्रीनगरच्या अकाउंट सेक्शन समोर एक टांगा येऊन थांबला. थंडीचे दिवस होते त्यामुळे अंगावर फिरन घालून एक व्यक्ती ‘सलाम साब’ असे म्हणत समोर आला. नंतर कळले की हा हे पेमेंट घेण्यासाठी का नाराज आहे. म्हणाला, ‘देखिये साब, मेरी ३० साल की नोकरी के बाद आप प्रॉव्हिडंट फंड का पेमेंट सिर्फ पच्चीस रुपया देने जा रहे है.आपको लगता है ये सही है ? प्रॉव्हिडंट फंड बॅलन्स सिर्फ पच्चीस रुपया कैसे हो सकता है.? कितनी बार मैने कहा कि इसमें कुछ गडबडी है. इतने कम पैसे हो नही सकते. पण तुमच्या अकाउंट सेक्शनचे लोक म्हणतात की आम्हाला त्याबद्दल काही सांगता येत नाही. कारण ऑडिट केलेली ऑर्डर फक्त पंचवीस आहेत. तुला घ्यायचे असतील तर घे नाहीतर दे सोडून.
आता तुम्ही सांगा तीस वर्ष नोकरी करून फक्त पंचवीस रुपये प्रॉडक्ट फंड ही माझी चेष्टा नाही काय? म्हणूनच आग लावा तुमच्या त्या प्रॉव्हिडंट फंडच्या २५ रुपयांना. मला तेही नकोत. ते घेण्यासाठी १५ पैशाचा रेव्हेन्यू स्टॅम्प सुद्धा मला खर्च करायचा नाही. अब्दुलने सांगितले की एक नवे अकाउंट ऑफिसर आलेले आहेत ते तुला बोलवतात म्हणून मी त्याच्या शब्दाखातर तुम्हाला भेटायला आलोय. नंतर तो निघून गेला. पण मला हे खटकत होते की काहीतरी चुकतंय. परंतु काय चुकतंय हे मलाच काय कोणालाच सांगता येत नव्हते. आमच्या सेक्शन मधले क्लार्क सुद्धा म्हणायचे की सर इस मे कुछ गडबड है, इतके कमी पैसे कधी असू शकत नाही. पण आम्ही तरी काय करणार जे ऑडिट होऊन फायनल पेमेंटची ऑर्डर आलेली आहे ती आम्ही नाही बदलू शकत. मलाही त्यांचे म्हणणे पटत होते.
असे गप्प बसून चालणार नाही असे वाटून मी ज्युनियर असून सुद्धा काहीतरी खटपट करून ह्या मागील रहस्याचा शोध घेण्यासाठी आमच्या कमांडला सांगून म्हणजेच नवी दिल्लीतील ऑफिसची परवानगी घेतली. मला जेव्हा आमच्या इतर ऑडिटच्या कामासाठी डेहराडूनला जायला लागत असे त्यावेळेला वाटेत मेरठ मध्ये उतरून सिविलियन लोकांच्या प्रॉव्हिडंट फंडासाठीच्या ऑफिसमध्ये जाऊन या केसचा पाठपुरावा करावा म्हणून परवानगी मागितली. आणि त्याप्रमाणे मी एक दिवशी सकाळी मेरठच्या प्रॉव्हिडंट फंड ऑफिसमध्ये पोचलो. सकाळी नऊ वाजता ऑफिसच्या पटांगणात नेट लावून बरेच जण व्हॉलीबॉल खेळताना पाहिले. ऑफिसच्या कामाच्या वेळेत असे खेळ खेळताना पाहून मला थोडेसे आश्चर्य वाटले. तिथल्या ऑफिसमधल्या लोकांशी बोलून माझी काय गरज आहे हे थोडक्यात मी जेव्हा सांगितले की अमुक अमुक व्यक्तीला तीस वर्षे नोकरी करून सुद्धा शेवटचे पेमेंट फक्त पंचवीस रुपये मिळाले आहे. कारण तुमच्या ऑफिसमधून जी ऑडिट केलेली ऑर्डर असते त्यात फक्त २५ रुपये दाखवले आहेत. तेव्हा हा काय प्रकार आहे.? इतके कमी पैसे त्याला कसे मिळू शकतात ? हे मला समजून घ्यायचे आहे .आपण या केसची हाताळणी करून मला मदत करा.
यावर माझ्याकडील सर्व माहिती असलेली कागद घेऊन त्यांनी थोडेसे आश्चर्य व्यक्त करत म्हटले की तीस वर्षाच्या नोकरीत फक्त पंचवीस रुपये प्रॉव्हिडंट फंड हे मलाही पटत नाही. पाहू काय करता येतंय का असे म्हणून थांबा, व्हॉलीबॉल खेळणारा आमचा स्टाफ परत येईल तोपर्यंत थोडसं चहापाणी घ्या. हे क्लार्क लोक येणार परत कधी आणि माझे काम करणार कधी असा विचार मी मनात करत असताना ते ऑफिस सुप्रीटेंडंट म्हणाले, मी तुम्हाला माझा स्टाफ देतो तो .तुम्हाला आमची वाउचर लायब्ररी दाखवेल. तिथून तुम्हाला तुमच्या एयरफोर्सच्या लोकांच्या प्रॉव्हिडंट फंडचे बाईंडर शोधावे लागतील. मग नेमका दिवस व त्या माणसाचे बाकीचे डिटेल्स शोधून याबाबत छडा लावता येईल. माझे बाकीचे क्लार्क लोक हे काम करणार नाहीत. तुम्ही ऑफिसर आहात इतक्या दुरून आलेले आहात म्हणून एरवी कोणालाही जाऊन देण्याच्या त्या वाउचर लायब्ररीत तुम्हाला जाण्यासाठी परवानगी देतो. पण आमचा स्टाफ याबाबत मदत करू शकणार नाही. तुम्हाला माहित आहे की सध्या युनियन बाजीमुळे क्लार्ककडून कामे करून घेणे इतके दुरापास्त झाले आहे. आता हेच पहा ना ऑफिसच्या कामाच्या वेळेत हे लोक व्हॉलीबॉल खेळत बसतात. आणि आम्हाला मुकाटपणे ते सहन करावे लागते. मला त्या ऑफिस सुप्रीटेंडेंटची दया आली.
वाउचर लायब्ररी ही मी प्रथमच पाहत होतो. वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आम्ही पेमेंट केलेली वाउचर एकत्र करून त्यांना बाईंड करून फोल्डरमध्ये ठेवण्याची ती व्यवस्था ब्रिटिशकालीन असल्याचे जाणवले. आता या वाउचर लायब्ररीमध्ये मला हव्या त्या व्यक्तीचे प्रॉव्हिडंट फंडचे पेमेंटचे व्हाउचर शोधणे म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्याइतके जिकीरीचे होते. हळूहळू गर्मी पण वाढत होती फॅन तर नव्हताच. प्रथम दर्शनी मी आमच्या श्रीनगरच्या ऑफिसचे फोल्डर शोधायला चालू केले ते मिळाला मिळाले. आता साधारण दोन वर्षांपूर्वीचे फोल्डर शोधण्याकरता मला खटपट करावी लागत होती. तेवढ्यात एक सिविलियन तिथे आला विचारपूस करून म्हणाला. तुम्ही जो फोल्डर शोधता आहात तो तुम्हाला या रॅकमध्ये मिळणार नाही तर या ढिगार्यात मिळेल. जमिनीवर टाकलेली फोल्डर्स मला दिसत होती. तो म्हणाला की काम झाल्यावर ती फोल्डर जिथून काढली तिथे न ठेवता इथे जमिनीवरच आम्ही टाकून देतो. तेव्हा तुम्ही आता हा ढिगाराच शोधत रहा. मिळाले तर इथेच मिळेल. मला आता जमिनीवर मांडी घालून बसणे प्राप्त होते. एअर फोर्सच्या युनिफॉर्ममध्ये असे मांडी घालून शोध घेणे मलाही फार संकोचाचे वाटत होते. शेवटी मी माझा रँक आणि रिबीन असलेला शर्ट काढून बनियनवर बसून एक एक फोल्डर हातावेगळे करत होतो. धूळ झटकत असताना माझा रुमाल काळा पडला होता. अचानक मला हवे असलेले फोल्डर मिळाले .त्यामध्ये हव्या असलेल्या तारखेच्या दिवशीच्या सर्व पेमेंटचा मजकूर मला दिसायला लागला. त्या सिव्हिलियनचे नाव आणि त्याच्यासमोर असलेले पेमेंटचे २५ रुपये ही एन्ट्री पण मिळाली. पण तिथे एक गफलत असल्याचे मला लक्षात आले कारण त्याच्या खालच्या ओळी मधील एन्ट्रीचे पेमेंट जे जवळ जवळ सतरा-अठरा हजार होते ते पेमेंट या सिव्हिलियनच्या एंट्री दाखवले गेले असल्यामुळे उरलेली रक्कम फक्त २५ असे दिसत होती. खरे तर त्याला सतरा-अठरा हजार मिळायला हवे होते. (आता इतके वर्षानंतर ती रक्कम किती होती याचा नक्की आकडा मला आठवत नाही.) ती चूक मी शोधून काढून त्या ऑफिसमधील सुप्रींटेंडेंटच्या मदतीने मुख्य ऑफिसरला दाखवून ती दुरुस्ती करायला विनंती केली आणि त्याप्रमाणे मला एक नवी पेमेंट ऑर्डर मिळाली. माझी बाकीची कामे संपून मी जेव्हा श्रीनगरला परत आलो तेव्हा अब्दुलला सांगून त्या सिव्हिलियनला बोलावणे गेले. जेव्हा त्याला ती नव्याने ऑडिट केलेली रक्कम मी हातात दिली तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आले. म्हणाला, ‘हे काम दुसऱ्या कोणी करणे शक्य नाही असे असताना माझ्या करता तुम्ही स्वतः जाऊन हे काम केलेत. तुमचे आभार कसे मानू हेच मला कळत नाही’. सलाम करून तो निघून गेला.
पुन्हा दोन दिवसांनी एक टांगा थांबला त्यातून तो सिविलियन माझ्या ऑफिसमध्ये आला आणि म्हणाला, ‘साब मैं आपको कुछ बक्षीस देना चाहता हूं. मैने आपके लिये एक पेन लाया है, मेरी तरफसे आपको बक्षीस है. त्याची मला बक्षीस देण्याची भावना मोडवेना म्हणून मी त्याला म्हणालो, अकाउंट्स सेक्शनचे काम सगळे चालते पेनने. तुम्ही मला हे जे पेन दिले आहे त्याची कदर करीन. पुढे ते फाउंटन पेन माझ्याबरोबर बरीच वर्षे होते. नंतर मुले मोठी होऊन शाळेत जाऊ लागल्यावर केव्हा तरी त्यांनी ते वापरायला चालू केले आणि नंतर त्या पेनला पुन्हा पाहायला मिळाले नाही.
प्रश्न त्याने दिलेल्या त्या तीन चार रुपयाच्या फाउंटन पेनचा नव्हता. त्यामागील असलेली जी सद्भावना होती ती मला जपून ठेवावीशी वाटली. एक दिवस रागाने आग लावा तुमच्या त्या प्रॉव्हिडंट फंडला असे म्हणणारा तो सिविलियन, नंतर आनंदाने ते वाढीव पेमेंट घेऊन झालेला त्याचा आनंदी चेहरा, त्याने दिलेले ते फाउंटन पेन अजूनही आठवते…!
क्रमशः
— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800