ए ओ सी केके मलिक सर
अनेकदा काही व्यक्ती आठवल्या की त्यांच्या समावेत घडलेले कटू प्रसंग उधृत करावेसे वाटतात. त्यातील एक असेच व्यक्तिमत्व म्हणजे श्रीनगरच्या पोस्टिंग मध्ये आम्हाला लाभलेले एअर ऑफिसर कमांडिंग केके मलिक सर.
कमांडिंग ऑफिसर हा नेहमीच खडूस असतो हे जग जाहीर आहे. परंतु त्यापेक्षाही पुढे जाऊन काही बॉस, काही कमांडिंग ऑफिसर हे जेव्हा दुष्टपणे वागतात त्यावेळेला त्यांच्याबद्दलचा रँकच्या आणि पदाच्या बरोबर असलेला मान, सद्भाव कमी होतो. माझे कोणाशी वैयक्तिकरित्या भांडण झाले नव्हते आणि नंतरच्या नोकरीच्या काळात तसे प्रसंग आले नाहीत. म्हणून हा प्रसंग, हे व्यक्तिमत्व वेगळाच ठसा माझ्या जीवनात घडवून गेले.
सेनादलात असे म्हणतात की तुमच्या आधी तुमचा नावलौकिक तुमच्या पोस्टिंगच्या जागी पोचतो. आपले पुढचे एओसी हे एकदम डिसिप्लिन आणि खडूसपणाबद्दल प्रसिद्ध आहेत. सगळ्यांनी जपून राहा, कोणावर काय प्रसंग येईल काही सांगता येणार नाही असे आधीच आम्हाला त्या पोस्टिंग वर यायच्या आत कळले होते. ठरल्या दिवशी त्यांनी आपली कामाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आम्हा ऑफिसर्स एकत्र बोलवून एक मीटिंग घेतली. त्यात सुरुवातीलाच त्यांनी सांगितले की मी “नो नॉन्सेन्स” बॉस आहे. माझ्या गरजा अत्यंत तातडीने आणि रीतसरपणे लक्षात ठेवून ती कामे ठराविक वेळेत करण्याची मी तुम्हाला आधीच ताकीद देतो. नंतर माझ्या नावाने शंख करू नका. मी एक टफ बॉस आहे. म्हणून लक्षात ठेवा की माझ्याशी सलगीने राहायचा विचार सोडून द्या. असे म्हणून त्यांनी आपले खांदे उडवत आणि मुद्दाम खाकरत पुढे बोलायला चालू केले.
आज पासून तुमची ६० दिवसाची रजा कमी करून मी ४५ दिवसाची केलेली आहे. का वगैरे प्रश्न मला विचारू नये.माझ्या पाहण्यात आलेले आहे की आजकालच्या थंडीच्या दिवसात प्रत्येक जण आपले हात पँटच्या खिशात घालून चालतो. मला ते चालणार नाही. तुम्ही आणि तुमच्या हाताखालील एअरमन लोकांना याची सक्त ताकीद द्या. दोन वेळा सांगून त्यांनी ऐकले नाही तर त्यांना सरळ चार्ज वर ठेवा. पुढचे मी पाहून घेईन. आणि हो महत्त्वाचे म्हणजे म्हणजे ऑफिसर्स मेस मधील पार्टीला काही कारणाने उशीर झाला आणि तो माझ्या येण्याच्या नंतर आला तर त्याने पार्टीत सहभागी न होता परत घरी जावे. मग तो आपल्या पत्नी समावेश आला असला तरी. दुसऱ्या दिवशी जे जे मेसची पार्टी अटेंड करू शकले नाहीत त्यांना मी बोलावून कारणे दाखवा नोटीस देईन तेव्हा त्यांनी लेखी कारणे द्यावीत.आता असे सगळ्यांना टरकावून ते निघून गेले. पहिल्याच दिवशी असा त्यांचा तो आक्रमक स्वभाव समजून आला.
आमच्या अकाउंट सेक्शनमध्ये माझे बॉस होते स्क्वाड्रन लीडर बीपी शहा. ते राहायचे राजबागमधे. जिथे माझ्या आधीच्या पोस्टिंगमध्ये भेटलेले स्क्वाड्रन लीडर पीव्ही राव राहायचे. शहा एक चांगले हॉकी प्लेयर म्हणून त्यांचा लौकिक होता. मधल्या काळात अकाउंट सेक्शनच्या कामासाठी मला ते नसतील तर एओसी के के मलिक सरांच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटून सह्या किंवा आणखीन काही निर्देश असतील तर ते घ्यावे लागत असत. त्या काळात ए ओ सी आणि अकाउंट सेक्शन यामध्ये इंटरकॉमवरून बोलण्याची सोय झाली होती. एओसी के के मलिक यांचा इंटरकॉमवरील रुद्रावतार स्क्वाड्रन लीडर शहाना अत्यंत कटकटीचा वाटत असे. काही दिवसांनी असे झाले की इंटरकॉम करून एओसी एअर कमांडर के के मलिक यांचा फोन आला की शहा म्हणत, ’यार ओक व इंटरकॉम ले ना जरा.’
तर कधी ‘वेअर इज शहा ? असे म्हणून मलिकांनी ओरडून विचारले की मला जवळच उभ्या असलेल्या शहांकडे पहात, ‘सर ते आत्ता इथे नाहीत, बोला तुमचे काय काम आहे ? असे म्हणून वेळ मारून न्यावी लागे. नंतर हे एयर ऑफिसर कमांडिंग, एयर कमांडर मलिक मलाच बोलवून ऑफिस मधली कामे करायला शहांना वगळून सांगायला लागले !
एकदा घडलेला तो प्रसंग आठवला की आता हसायला येते पण त्यावेळेला आम्हा सगळ्यांचीच मोठी हबेलहंडी उडाली होती. त्याचे झाले असे की पगाराच्या दिवशी लाखो रुपये आणून ते वेगवेगळ्या पेमेंट बॅग मध्ये भरून आम्ही तयार करून ठेवत असू. त्यादिवशी गार्डरूममधील चाव्यांची एक जोडी आम्हाला ऑफिसर्स पैकी एकानी जाऊन आणायची असे. दुसऱ्या चावीचा सेट हा खुद्द सीनियर अकाउंट ऑफिसर म्हणजेच स्क्वाड्रन लीडर शहा यांच्याकडे असे. झाले असे की त्या दिवशी शहांच्या आधीच्या दिवशीच्या युनिफॉर्ममध्ये त्या किल्ल्या तशाच राहिल्या.
तो दिवस अकाऊंट सेक्शनच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असे कारण बरेच असे ऑफिसर्स ऑफिसर पे परेड ड्युटी करण्याकरता अकाउंट सेक्शनमध्ये येऊन आपापल्या एअरमन लोकांना पगार वाटण्यासाठीच्या घेऊन जायला हजर असत. त्यामुळे अशा तऱ्हेची झालेली चूक ही सगळ्यांच्या नजरेला येऊन त्याची बातमी एओसीच्या कानावर जाईल या भीतीने शहा यांची गाळण उडाली होती. ते मोठे कुलूप कसे उघडावे या चिंतेत त्यांनी अब्दुल्लाला सांगून कोळसे फोडायचा हातोडा कुलपावर मारायला सुरुवात केली. आम्ही त्यांना कसेबसे आवरले आणि मी स्वतः राजबागच्या त्यांच्या घरी जाण्यासाठी निघालो. कारण मिसेस शहा मला ओळखत होत्या. शिवाय अन्य कोणाच्या हातात अशा चाव्या देणे हे त्यांना बरोबर वाटले नसते. एअरफील्ड पासून जवळजवळ वीस किलोमीटर दूर असलेल्या राजबाग भागात मी एका जोंग्यातून जाऊन त्या किल्ल्या आणल्या आणि नंतर दरवाजा उघडून बाकीचे काम सुरळीतपणे झाले. या घटनेचा गाजावाजा न करता आणि एअर कमोडर मलिक यांच्या कानावर जाऊ न देण्याकरता माझे बॉस आणि मी जमलेल्या सर्व ऑफिसर्सना हात जोडून विनंती करताना आजही आठवते. नंतर मलिकांना ही बातमी कळली नाही ही आनंदाची गोष्ट. आमच्या सेक्शन मधील अब्दुल बाबा रिटायर झाले त्या वेळेला १९९८ सालात त्यांनी या घटनेचा उल्लेख हसत हसत केला, ‘ओक साब को वो दिन जरूर याद आ जायेगा जब शहा साहेब सेफ की चाबी घर मे भूल गये थे. हाथोडे से लॉक तोडने लगे थे !’
माझी पोस्टिंग श्रीनगर होऊन एअर फोर्स स्टेशन, ठाणे या ठिकाणी झाली म्हणून मी सर्व तयारी केली होती. घरचे सामान ठाण्याला पाठवण्यासाठीचा ट्रक दुपारी येणार होता. त्या दिवसात ए ओ सी मलिक सरांची अशी आज्ञा होती की त्यांच्या ऑफिसमध्ये शेवटच्या दिवशी त्यांना कटाक्षाने भेटणे. त्यावेळी ते त्या ऑफिसरला त्याचे गुण आणि चुका किंवा दुर्गुण सांगून कशी सुधारणा करायला हवी याबद्दलचे आपले मत सांगत असत! नेमके त्यादिवशी ते ऑफिसमध्ये हजर नव्हते. तिकडे घरासमोर ट्रक येऊन थांबलेला असताना मला मलिकांची भेट घ्यायला थांबणेही शक्य नव्हते. म्हणून ती भेट तशीच राहिली.
नंतर मी ठाण्याला पोस्टिंगला आल्यानंतर दोन-तीन महिन्यानंतर मला एका कोर्टात इन्क्वायरीसाठी श्रीनगरला बोलावण्यात आले. खरे तर त्या एन्क्वायरीसाठी माझा सहभाग गरजेचा नव्हता. स्क्वाड्रन लीडर शहा हे तिथे असताना मला श्रीनगरला जाणे आणि साक्ष देणे हे चुकीचे होते. पण ऑर्डर म्हणजे ऑर्डर ! या खाक्याने मी मलिक यांच्यासमोर जाऊन माझे या एन्क्वायरी मध्ये काय काम आहे हे समजून घेण्यासाठी उभा होतो. थोडीशी सलगी करून ते मला म्हणाले, ‘ओक यार, एक काम तुम्हें करने के लिए मैने बुलाया है. ऐसा करो की तुम युनो के ऑफिस जाकर के हमे जो डॉक्युमेंट्स चाहिये वो तुम लेके आना. वो जब लाओगे तो तुम वापस जा सकते हो. त्यांची बोलण्यातील आणि वागण्यातील सलगी मला खटकत होती. एका कारमधून युनोच्या लाल चौक भागातील ऑफिसमध्ये मी पोहोचलो तेव्हा तिथे एक जपानी काम करत होता. युनोची लाहोरहून येणारी विमाने श्रीनगरला आल्यानंतर पेट्रोल भरून परत जात असत त्या संदर्भातले डॉक्युमेंट्स मला हवे आहेत असे मी त्यांना म्हटल्यावर त्यांनी मला सरळ सरळ उडवून लावले. मी हात हलवत परत आलो. तर मलिक सर म्हणाले, ‘यार मैने तुम्हे एक काम दिया वो भी तुम कर नही सके’ यूनो सारख्या ऑफिसचा कोर्ट ऑफ इन्क्वायरीशी काही संबंध नसल्यामुळे असे डॉक्युमेंट्स ते का देतील या प्रश्नाचे उत्तर त्यांना माहीत असून सुद्धा त्यांनी मला कामाला लावले होते. मग ते म्हणाले, ‘यु आर ए गुड बॉय. या एन्क्वायरीत तू माझ्या बाजूने साक्ष दे’. नंतर मी अकाऊंट सेक्शन मधील जी पेट्रोल संबंधीची वाउचर होती ती एन्क्वायरी समोर सादर केली .याशिवाय माझ्याजवळ आणखीन काही सांगण्यासारखे नाही असे म्हणून माझी साक्ष संपवली. मध्ये एक शनिवार रविवार ही गेला. कारण ऑफिसर कमांडिंग केके मलिक हे आपल्या घरामध्ये असलेल्या फोनवर येत नव्हते कारण त्यांनी मला सांगितले होते की तुझे जरी काम झाले असले तरी माझी परमिशन घेतल्याशिवाय तू परत ठाण्याला जाता कामा नये. शनिवार-रविवार माझा फुकट जावा हा त्यांचा उद्देश मला समजून चुकला होता पण जास्त न बोलता सोमवारी त्यांच्याशी बोललो तेंव्हा ते म्हणाले, ‘तुम पोस्टींगपर जानेसे पहले मुझे क्यों नहीं मिले ?’ त्याची शिक्षा म्हणून त्यानी मला एन्क्वायरीच्या बहाण्याने अद्दल घडवायला बोलावले होते !…
या घटनेला बरीच वर्षे होऊन गेली. मी ठाण्यावरून नवी दिल्लीतील वेस्टर्न एअर कमांडच्या पोस्टिंगवर आलो असताना एअर कमोडर के के मलिक श्रीनगर मधील एओसीचे पद सोडून आता नवी दिल्लीत वेस्टर्न एअर कमांड मध्ये ‘एअर वन’ या पोस्टवर आले होते. एकदा कॅरीडॉरमध्ये समोरासमोर आल्यामुळे मला त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये चहा प्यायला निमंत्रण दिले. चहा पिता पिता म्हणाले की तू माझे इन्कम टॅक्स चे रिटर्न भरायला मला मदत करायला हवीस. असे काही दिवस गेल्यानंतर एक दिवस ते आपल्या इन्कम टॅक्सच्या फाईली घेऊन माझ्या ऑफिस मध्ये आले. त्यातील महत्त्वाचे कागद मी हाताळत असताना त्यांना म्हणालो, ‘सर हे कसले कागद आहेत मला जरा सांगा ना. आता एअर कमोडर के के मलिक टेबलाच्या समोरून उठून मी बसलेलो असताना माझ्या शेजारी येऊन उभे राहिले आणि वाकून एकेक कागदावरील काही मजकूर व माहिती सांगण्यास लागले. चहापाणी झाल्यावर मी पुन्हा त्यांना माझ्या खुर्चीच्या बाजूला येऊन ते उभे राहून काही कागद दाखवताना मला त्यांच्यावरील सूड घेण्याचा आसुरी आनंद झाला! श्रीनगरला ते बॉस असताना त्यांच्यासमोर उभे राहणे म्हणजे धोक्याला निमंत्रण असे आणि आज माझ्या शेजारी येऊन उभे राहून मला इन्कम टॅक्सचे काम कॅल्क्युलेशन्स वगैरे करताना ते उभे अन् मी ऑफिसमधल्या खुर्चीत आरामात बसलेलो असताना आसुरी आनंद मला होत होता ! केके मलिक यांचे बरेच किस्से बरेच जणांच्या कडून कधीमधी इतरांकडून ऐकायलाही मिळत पण माझ्या बाबतचा हा एक किस्सा.
क्रमशः
— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800