भारतीय हवाई दलातून विंग कमांडर म्हणून निवृत्त झालेले श्री शशिकांत ओक यांचे अनुभव आपण दर शुक्रवारी वाचणार आहोत. त्यांना लेखन आणि गूढ विद्येची आवड आहे. श्री ओक सरांचा ७५ वा वाढदिवस नुकताच थाटात साजरा झाला. श्री ओक यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात मनःपूर्वक स्वागत आहे.
– संपादक
१. हवाईदलात कसा गेलो ?
हवाईदलाचे काहींना जात्याच आकर्षण असते तर काहींच्या घराण्यात परंपरेने सैनिकी पेशा पुढील पिढीत चालवण्याची प्रथा असते. माझ्या बाबतीत यापैकी काहीच घडले नाही.
ना मला बालपणापासून हवाईदलात भरती होऊन विमान चालवण्याचे वेड होते ना आमच्या ओकांच्या घराण्याची तशी शानदार परंपरा होती. नाही म्हणायला माझे चुलत काका स्व. पुरुषोत्तम नागेश ओक यांनी आजादहिंद फौजेमधे भरती होऊन तारुण्यातील काही काळ मिलिटरीतील सेवेत काढला होता. तर एक दूरस्थ पुतण्या माझ्यानंतर हवाईदलात आला. असो.
मी बी.कॉम साधारण मार्कांनी पास झालो. नंतर आमच्या चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्सला एम. कॉमच्या वर्गाला आणखी जागा मिळाल्याचे ऐकून मी एम.कॉमसाठी पुन्हा कॉलेजात रुजु झालो. मित्रांच्या बरोबर माधवनगरातून सकाळसकाळी बसने सांगलीच्या पोस्ट ऑफिस स्टॉपवर उतरावे. मग मिरज रस्त्यावरील विलिंग्डन कॉलेजच्या पुढच्या स्टॉपला उतरून कॉलेजचे तास आटपावे. मग लायब्ररीत तळ ठोकून अभ्यास करीत बसावे. कधी कधी जेवणाचा डबा घाईने खाऊन इंग्रजी सिनेमा पाहून घरी परतताना चार-पाच वाजत. सभ्यतेच्या सीमेत राहून थोडी टिंगल टवाळी केली पण माझा बाज तसा जास्त बकबक न करण्याचा. घरी आले की घरातील कोर्टवर रिंग टेनिस खेळावे. नंतर रेल्वे स्टेशनवर मित्रांच्या सोबत फिरायला जाउन ७.३० ची पुण्याहून येणारी ट्रेन पाहून परतावे असा संथ पण मजेचा दिनक्रम चालला होता. जनता हॉटेलातील चार आण्याच्या झणझणीत चवीच्या अंबोळीला डिग्री सर्टीफिकेट प्रमाणे सुरळी पॅककरून घेतलेला आस्वाद आजही जिभेवर घोळतो.
आमचे माधवनगर गाव होते छोटेसे पण टुमदार. सांगली पासून ४ कि.मी दूर. नातू शेठजींच्या मालकीची कॉटन मिल व स्व. वसंतदादा पाटलांच्या श्रमांने उभी शुगर फॅक्टरी आमच्या माधवनगराची शान होती. पूर्वीच्या पुणे-बंगलोर मीटरगेज मार्गावरील सांगलीला उतरणाऱ्यांसाठी सोईचे ते स्थानक होते. शिवाय रिटायरमेंट नंतर मिळालेल्या पुंजीच्या भांडवलावर चार-चार पॉवरलूमची छोटी युनिटे टाकून चांगल्यापैकी उत्पन्न मिळवून राहणारा सुखवस्तू ब्राह्मण समाज तेथे बराच होता. टांगे व बसेसची सोय होती. रिक्षांचा सुळसुळाट नव्हता.
साल होते १९७०. अशाच एके दिवशी मी व माझे मित्र कॉलेजातून घरी परतत असताना मला हाक आली, ’तुम्हाला साहेब बोलावत आहेत’. छोट्या मागधारकांकडून धोतीचा माल विकत घेऊन तो तमिळनाडूच्या विविध भागात लुंग्या व धोतरे म्हणून घाऊक विक्रीचा वडिलांचा धंदा होता. आमचे गोडाऊन कम ऑफिस बसस्टॉपच्या समोर होते. मी दादांसमोर – वडिलांना दादा म्हणायचो – उभा. समोर टाईप केलेले काही फॉर्म होते ते मी फुली केलेल्या जागी सही करून परत दिले.
त्या संध्याकाळी मला दादा म्हणाले, ’कालचा टाईम्स वाचलास का ?
’हो !’ मी झोकात उत्तर दिले. ’पुन्हा वाच. पहा काही महत्वाची जाहिरात सापडते का’. आमचे टाईम्स वाचन स्पोर्ट्स पानावर चालू होऊन आर के लक्ष्मणच्या कार्टूनवर संपे. पेपर पुन्हा वाचूनही खास काही वाटले नाही. मग दादा पुन्हा म्हणाले, ’अमक्या पानावरील हवाईदलाची जाहिरात पहा, त्यातील जागांसाठी तू सकाळी अर्ज भरलास. उद्या सर्व सर्टीफिकिटे व मार्कशीट्स आणून दे’. तसे मी केले. पुढे बरेच दिवसांनी घरात चहा पिता-पिता गप्पांच्या ओघात त्या अर्जाची आठवण झाली व ज्याअर्थी काहीच कळाले नाही त्या अर्थी माझ्या नावाच्या अर्जाला कचऱ्याच्या टोपलीत जागा मिळाली असणार असे आम्ही म्हणत होतो. त्याच दिवशी टपालाने हवाईदलाकडून इंटरव्ह्यूसाठी म्हैसूरला जाण्यासाठी पत्र आले. अवधी होता. पण नंतर लक्षात आले की माझी परिक्षा इतकी जवळ आली असताना मला त्यासाठी तयारी करायला वेळ मिळणार नव्हता. माधवनगरात कोणी मार्गदर्शन करणारे नव्हते. एक दोन जणांशी विषय काढला तर त्यांनी मला वेड्यात काढले. म्हणाले, ’एकुलता एक तू. लष्करात जायचे कसले ठरवतोस. बापाचा धंदा चालव. मजा कर. तुझ्याच्याने ते निभणार नाही’. एक म्हणाले, ’मी तर नोकरी सोडायच्या विचारात आहे’. मीही फार उत्साही नव्हतो. घरी वडील मात्र म्हणाले, ‘अरे नाही म्हणून काय मिळेल जा मिलीटरीतील निवडीचा अनुभव तरी मिळेल. नाही झालास सिलेक्ट तर बिघडले कुठे. जा त्या निमित्ताने म्हैसूर फिरुन आलास असे होईल’. ते मला भावले.
आमच्या घरी वडिलांचे मित्र मुकुंदराव परांजपे म्हणून यायचे. त्यांनी पोंक्षे म्हणून एक नाव सुचवले. म्हणाले, ’ते मिलिटरीतून निवृत्त होऊन मिरजेत स्थायिक झालेत. भेट एकदा’. त्यांच्या सांगण्यावरून मी ’सूरज’ बंगल्यात त्यांना भेटायला गेलो. बाहेरच्या पाटीवर ले. कर्नल पोंक्षे असे झोकात लिहिलेले होते.
भारदस्त व्यक्तिमत्व. १५ मिनिटातच मला त्यांनी काही वाचायला दिले. काही प्रश्न विचारले. त्याची उत्तरे मी धीटपणे सांगितली. मग म्हणाले, ‘मी कोल्हापुरातील सिलेक्शन बोर्डातून रिटायर झालो. त्यामुळे तुला मार्गदर्शन करीन. ते तू लक्षपूर्वक समजून घे. वेळ कमी आहे. पुन्हा एकदा भेट’. दुसऱ्यांदा भेटलो. त्यांनी काही चित्रे दाखवली. काही संभाषणातील टिप्स दिल्या. जायची वेळ झाली तेंव्हा म्हणाले, ’मी तुझा वक्तशीरपणाची परीक्षाही केली. जा तू सिलेक्ट होशील. माझे तुला आशीर्वाद आहेत’.
मला वाटले माझे मन राखायला ते म्हणत असावेत. अशा बिन तयारीच्या मुलाला कोण सिलेक्ट करणार ? आणि झालेही तसेच. मी म्हैसूरला स्टेशनवर पोहोचलो. एकेकाची ओळख करून घेता घेता माझ्या लक्षात यायला वेळ लागला नाही की आपला पाड लागणार नाही. एक नागपूर युनिव्हर्सिटीतला फर्स्ट, एक गोव्यातील बोर्डात पहिला. एक मद्रासी सीए करून आलेला. काही जण आधी दोनदा धडका देऊन परत गेलेले. काहींनी यासाठी व्यायाम करून शरीर कमावले होते. बऱ्याच जणांचे फाडफाड इंग्रजी ऐकून मी मनात ठरवले की आपण एम.कॉम परिक्षेसाठी आणलेली पुस्तके वाचण्यात रमावे. जमले तर वृंदावन गार्डन वगैरे पाहून चालले जावे.
३-४ दिवसांत बऱ्याच कसोट्या झाल्या. पळापळ. धावा धाव. ड्रम, बल्ली, रस्सी वगैरच्या सहाय्याने आपल्या नेतृत्वाखाली एकेकाला काही अडथळे पार करणे, दोरखंडावरून लटकून अंतर पार करणे वगैरे… आता थोडे थोडे आठवते.
मात्र खरा कस लागला तो इंटरव्ह्यूला. खूप वेळ चालला. सोशॅलिझम, कॅपिटॅलिझम, मार्केट इकॉनॉमी, प्राईस डिटरमिनेशन, इंडियन इकॉनॉमी. जे विचारले त्यावर दणकून बोलत होतो. खूश होतो मी, आमचे प्राचार्य देवदत्त दाभोळकर दणक्यात कामाला आले म्हणून. शेवटी जायचा दिवस आला. सांगण्यात आले की जे सिलेक्ट होतील त्यांनी मेडीकल चेकअपसाठी बंगलोरला जाण्यासाठी थांबावे. बाकीच्यांनी आपापले भत्ते व लंच पॅकेट घेऊन परतावे. रिझल्ट सांगायला एक जण आला. म्हणाला, ‘निराश होऊ नका. जीवनात असे प्रसंग येतात. त्यातून शिका. स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा. नक्कीच सफल व्हाल’ वगैरे, वगैरे… मी मनात म्हणत होतो, पटकन आवरा. म्हैसूर-वृंदावन पाहण्यात वेळ गेला तेवढा पुरे. मला तयारी करायची आहे फायनल परिक्षेची. एका चिठ्ठीवरील नंबर वाचत तो म्हणाला, ’ओनली चेस्ट नं. २३ अँड ४५ आर सिलेक्टेड’. मला सगळ्यांनी गराडा घातला व शेकहॅंड व्हायला लागले तेंव्हा मला भान आले की मी – चेस्ट नं.२३- सिलेक्ट झालो होतो.
सगळे चित्रच बदलले. मला थांबून राहावे लागले. वॉरंटवर मी बंगलोरला गेलो. तेथे कोणी ओळखीचे नाही. पुर्वी महाराष्ट्र मंडळात राहिल्याचे आठवले. तेथे राहिलो. सकाळी ७.३० ला त्यांनी सांगितल्याप्रमाणे हजर झालो. तो होता शनिवार. सगळ्या टेस्ट झाल्या. शेवटी कमांडिंग ऑफिसर इंटरव्ह्यू घेणार असे सांगण्यात आले. दीडला ऑफिस सुटणार असे सांगण्यात येत होते. शेवटची दहा मिनिटे उरली. माझी उलाघाल वाढली. कारण शनिवारचा दिवस गेला तर सोमवार पर्यंत अडकून बसावे लागणार होते. मला ते परवडणारे नव्हते. होता होता अगदी पाच मिनिटे उरली असताना आम्हाला आत बोलावले गेले. (त्यावेळी तिथल्या सुभेदाराने केलेले वक्तव्य माझ्यासाठी पुढे मोठे काम करून गेले. तो म्हणाला, ‘साहेब अगदी जायला निघाले की पुढे ठेवलेले कागद जादा कटकट न करता पटापट सही करतात’. हा कानमंत्र मी लक्षात ठेऊन माझ्या वरिष्ठांवर तो प्रयोग करीत असे. मात्र माझ्या समोर आलेले कागद मी उद्या पाहू म्हणून लांबवत असे. असो.
एका भारदस्त व्यक्तिमत्वाने आमचे पेपर पाहून, ‘वेल बॉईज, यू हॅव पास्ड मेडिकल एग्झॅम. गो अँड वेट फॉर फरदर ऑर्डर्स’ म्हणून सही ठोकून एक पत्र आमच्या हातात ठेवले. ‘थँक्यू’ कसेबसे म्हणत बाहेर पडताच मी एका ट्रकमधे उडी मारून बसलो. स्टेशनवरून दुपारची तीन वाजताची मिरजेची ट्रेन पकडली. घरी मी सिलेक्ट झाल्याने खूप आनंद झाला. माझी परिक्षा ही छान गेली. मला हायर सेकंडक्लास मिळाला. कॉलेजला सुट्टया लागल्या होत्या. ले. कर्नल पोंक्षेंची वाणी खरी ठरली. (खरे तर मला त्यावेळी रॅंकच्या नावांचा गंध नव्हता. पण ले. कर्नल ही दारावरची पाटी वाचून ती रॅंक मला माहित झाली होती. ले फुलस्टॉप कर्नल मी तेंव्हा म्हणे, ले हा लेफ्टनंटचा शॉर्ट फॉर्म आहे. हे नंतर मला यथावकाश कळले.) तेही फार खुश झाले. हवाईदलात जायचे की नाही ते अजूनही नक्की होत नव्हते. पण देशातील विविध भागातून आलेल्या, हुशार व तयारी करून आलेल्या हजारो मुलांतून आपली निवड झाली याचेच मला अप्रूप होते.
म्हैसूरच्या वास्तव्यात माझी एका पुण्यातील कुलकर्णी नावाच्या मुलाशी गाठ पडली. मराठी बोलणारा म्हणून गट्टी जमली. तो सांगे, त्याने महाराष्ट्र मंडळातील कॅप्टन शि. वि. दामल्यांचे मार्गदर्शन घेतले असल्याने त्याचे सिलेक्शन झाल्यातच जमा आहे. फक्त त्याच्या नावाची घोषणा म्हैसुरातील केंद्रातून होण्याची किरकोळ बाब उरली आहे. त्या मित्राला माझ्या नावाची घोषणा ही चेष्टा वाटली. त्याचे नाव कसे आले नसावे याबद्दलचे त्याचे तर्क इतके अजब होते. म्हणाला, ’शश्या खर सांग, तुझा कोणाचा वशीला आहे. कारण त्याशिवाय तू कसा सिलेक्ट होणार ?’. मी त्याला म्हणालो, ’अरे माझ्या ऐवजी जर तू सिलेक्ट झाला असतास आणि मी तुला वशील्याचे तट्टू असे म्हणालो असतो तर ते खरे असेल का ? ते जर खरे नसेल तर माझी निवड बिनवशिल्याची आहे, हे तुला मान्य व्हावे’. नंतर एक-दोनदा तो पुण्यात भेटला. पुढे बँकेतून रिटायर झाला. त्याचे मिलिटरीत जायचे स्वप्न त्याने गालावर झुपकेदार दरारा वाटाव्या अशा मिशा राखून पुरे केले असावे. असो.
त्यावेळचा आणखी एक किस्सा आठवतोय. मला ओळखणाऱ्या दोन प्रतिष्ठितांचे संदर्भ द्यायला लागतात. त्यासाठी मी चिंतामणराव कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य चिं. ग. वैद्य व माधवनगर कॉटन मिल्सचे जनरल मॅनेजर केळकरांचे संदर्भ दिले होते. ते मी विसरूनही गेलो होतो. एक दिवस केळकरांनी हाक मारुन म्हटले, ’अरे शशी, तुझे एक पत्र आले होते. ऑफिस मधे ये. काय आहे ते पहा’. मी पहातो तर ते हवाईदलातून मी दिलेल्या संदर्भाच्या व्यक्तींकडून माझी चौकशी करणारे ते पत्र बऱ्याच दिवसापूर्वी आले होते. त्यांनी योग्य ते लिहून सही करून मला दाखवले. म्हणाले, ’तूच पोस्टात टाक. आधीच उशीर झालाय. आणखी नको व्हायला.’ ते पत्र घेऊन मी तडक कॉलेज गाठले. प्राचार्यांना भेटून माझ्यासाठी पत्र आल्याची विचारणा करता त्यांनीही ड्रावर मधून लिफाफा काढून म्हटले, ‘पहा हे तर नाही ? तेच पत्र होते. त्यांनीही योग्य ते लिहून सही केली. ते दोन्ही लिफाफे माझ्या हाताने पोस्टाच्या लालडब्यात टाकले व हुश्श असा निश्वास सोडला. पत्राबाबत दोघांनी दाखवलेली तत्परता (?) पाहून वाईट वाटले. नंतर हा किस्सा मी माझ्या मित्रांना रंगवून सांगत होतो. शेवटी मला ती पत्रे पोष्टात टाकावी लागली असे म्हणत पॅंटच्या खिशातून हात बाहेर काढला तर तीच दोन्ही पत्रे माझ्या हातात होती! मी चक्रावलो. ‘काय रे काय झाले’ मित्र म्हणाले. चेहऱ्यावर काही न दाखवता मग त्या दिवशी मी पेटीत काय टाकले ? याचा विचार करत राहिलो. गुपचुप ती पत्रे पेटीत नीट टाकली खरी पण आता तर मला कॉल येण्याची शक्यता मुळीच नाही. असा समज करून मी मनाला समजावले. आठवडे उलटले. एक दिवस एक जाडजूड लिफाफा हातात आला ! १९ जुलै १९७१ ला कोईमतूरच्या एयर फोर्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉलेजमधे रुजू व्हा असा आदेश व आणखी सूचनांची लांबलचक यादी होती !
हवाईदलात जावे की नको यावर फार चर्चा झाली नाही. वडिलांनी तुच ठरव म्हटले. आई म्हणाली, ‘सध्याची धंद्याची घडी पहाता नोकरी करणे शहाणपणाचा आहे. आलेली संधी सोडू नकोस. कर्तव्यात कसूर करू नकोस. सचोटी व शहाणपणाने वाग. जोखमीची नोकरी आहे. पैशाशी खेळ आहे. तु आहेस धांधरट. सावधपणे रहा. आम्हाला अभिमान वाटेल असे नाव कमव. जा. अणि मी कोईमतूरला ट्रेनिंगला पोचलो.
क्रमशः
— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
प्रिय वाचक हो,
देवेंद्र आणि अलका भुजबळांनी न्यूज स्टोरी टुडे वर माझे हवाईदलातील दिवस आणि किस्से दर शुक्रवारी प्रकाशित करायला प्रोत्साहित केले आहे.
यातील भाग काही हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. https://alkaoaksebookshoppy.online/
वर जाऊन ईबुक माध्यमातून वाचायला मिळतील.
एकदम छान लिहिले. आहे 🙏
आपले भाग्य की आझाद हिंद सैन्यात आपले चुलत काका होते , पुढच्या भागाची वाट पहात आहोत 🙏
अतिशय ओघवत्या भाषेत केलेले लिखाण आणि संदर्भ खूप छान आहे. मी पण माधवनगर ला रहात होतो माझ्याही मनात लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या, अप्रतिम शशिकांत .
फारच मनोरंजक आठवणी… त्याकाळची समाज व्यवस्था, लोकांचे परस्पर संबंध, तुलनेने साधे सोपे जीवन ह्यांचे दर्शन आनंददायक.. ओक साहेबांच्या कार्य कुशलतेचे यथोचित वर्णन..
बाकीचे भाग पण पाठवा..
लेखन शैली उत्तम
हवाईदलातील अनुभवांची ही मालिका खूप उत्कंठावर्धक होते आहे.पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
धन्यवाद, हवाई दलातील माझे अनुभव… कॅडेटशिपचे दिवस भाग २ वाचा आणि अभिप्राय द्यावा.