“उरलो फक्त ध्वज दोरी ओढायला !”
मित्रांनो,
२६ जानेवारीच्या आधीच्या भागात एका सिरीयल मधील कथानकात मला २६ जानेवारीच्या परेडमध्ये सहभागी होण्याचा आनंद मिळाला हे आपण वाचले असेल. हवाई दलातील सेवेच्या काळात नवी दिल्ली येथील कर्तव्य मार्गावरील प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या परेडमध्ये भाग घेण्याची माझी इच्छा प्रत्यक्षात जरी पूर्ण झाली नाही तरी ‘मन मे है विश्वास’ या सिरीयल मधील स्क्वाड्रन लीडर शशिकांत ओक वर आलेले कोर्ट मार्शलचे किटाळ श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तांच्या कृपेने कसे टाळले गेले हे आपण पाहिले आणि वाचले असेल.
२६ जानेवारीच्या संदर्भात आज काल मला निवृत्तिच्या काळात वेगवेगळ्या शाळा- कॉलेजमध्ये ध्वजवंदनासाठी बोलावले जाते. नंतर काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात. मोठ्या संख्येच्या विद्यार्थ्यांच्या शाळांमधून दिमाखदार संचलन केले जाते. त्यावेळी तिरंग्या ध्वजाखाली उभा राहून मानवंदना स्वीकारण्यासाठी सॅल्यूट करताना एक विलक्षण आनंद होतो. हवाई दलातील माझ्या पृष्ठभूमीमुळे हे सर्व प्राप्त होत आहे, याची जाणीव होत राहते.
कधीकधी अशा कार्यक्रमात सहभागी होताना मजेशीर अनुभवही येतात. त्यातलाच एक नुकत्याच झालेल्या २६ जानेवारीच्या पुण्यामधील एका प्रतिष्ठित शाळेच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये आला ,तो प्रसंग सांगावासा वाटतो. झाले असे की, त्या प्रतिष्ठित शाळेमध्ये सुरुवातीला बँडचे पथक, त्यामागे मी असा गार्ड ऑफ ऑनर मला दिला गेला. ध्वजारोहणासाठी निर्माण केलेल्या स्टेजवर मला पाचारण करण्यात आले. शाळेतील महत्त्वाच्या व्यक्तीने ध्वजारोहणासाठी मला हातात दोरी दिली. खसकन ती खाली ओढून ध्वजाच्या घडीला मोकळे केले आणि तिरंगा हवेत लहरायला लागला. त्याच वेळी बँड पथकाच्या सुरात राष्ट्रगीत म्हटले गेले. सगळे शांत झाल्यानंतर त्या दिवशीच्या परेड कमांडरने ‘परेड को मंच से गुजरने की आज्ञा दे श्रीमान’ असे म्हणून माझी परवानगी घेतली आणि नंतर एक दिमाखदार संचलन सुरू झाले.
शाळेतील तरुण मुला-मुलींनी एका मागे एक येऊन मला मानवंदना देण्याकरता ‘दाहीने देख’ म्हणत कडक सॅल्यूट करत संचलन पुढे पुढे जात होते. यानंतर जरा मजेशीर घटना घडली, ती अशी की त्या शाळेमध्ये श्वान, घोडे, उंट, विविध रंगी पक्षी यांचे प्राणिसंग्रहालय असल्याने त्यांचा एक दिमाखदार रोडशो झाला. एका मागे एक असे वेगवेगळ्या रंगातील काही गबदुल तर काही अगदी तुरकाटी, काही कुठल्याही क्षणी अंगावर धावून जातील असे तल्लख श्वान पथक एका मागून एक त्यांच्या ट्रेनर समावेत पुढे पुढे जात राहिले. तोवर बदकांच्या पिल्लांचा एक घोळका गडबडीने तुरुतुरू माझ्या समोर पुढुन गेला. त्यांची मानवंदना स्वीकारून आता कोणते जनावर येणार असे म्हणून मी वाट पाहत होतो. ते थांबल्यानंतर मला तिथे जमलेल्या एक हजार पेक्षा जास्त विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक यांच्यासमोर एक छोटेसे स्फूर्तीदायक भाषण करण्याची विनंती केली गेली. अशा कार्यक्रमात पाच मिनिटापेक्षा जास्त बोलण्याची तिथे जमलेल्यांची कोणाचीही अपेक्षा नसते त्याप्रमाणे भारत विश्वगुरू तर झालेला आहेच परंतु यानंतरच्या काळात भारताला आणि वेगवेगळ्या नव्या आव्हानांना तोंड कसे द्यायचे आहे याची थोडीफार ओळख मी करून दिली आणि भाषण संपवले, टाळ्या पडल्या आणि मला मंचासमोर एका आरामदायक सोफ्यावर स्थानापन्न होण्यासाठी सुचवले गेले. त्यावेळी माझ्या शेजारी एक चिमुरडी आपले पाय वर घेऊन मांडी घालून सोफ्यावर बसली होती. त्यानंतरच्या जवळजवळ एक तासाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात अत्यंत बहारदार नृत्ये सादर केली गेली.
मग माझ्या शेजारी बसलेल्या चिमुरडीने स्टेजवर जाऊन छोटेसे भाषण केले की माझा एक सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. तो आपण सिनेमाच्या हॉलमध्ये जाऊन जरूर पहावा.स्टेजवर त्या सिनेमाच्या संदर्भातील महत्त्वाच्या व्यक्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. तिथे जमलेल्या शाळकरी मुला-मुलींना स्टेजवर येऊन चिमुरडीच्या समावेत नाच करण्याकरता म्हणून आवाहन केले गेले. असे करत जवळजवळ दोन तासाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाची झलक आपण पुढील व्हिडिओत पाहू शकता..
नंतर काही पालक आपल्या मुला-मुलींना घेऊन माझ्या समावेत फोटो काढण्याकरता म्हणून जमलेले होते. एकंदरीत तो कार्यक्रम झाला दिमाखदार परंतु मला असे वाटत राहिले की या कार्यक्रमात माझा सहभाग फक्त ध्वजाच्या दोरीला जोरात ओढून ध्वजाला मोकळे करणे इतकाच होता. अर्थात हे थोडसं मजेने घेतलं पाहिजे. कारण अशा कार्यक्रमात लष्करी पार्श्वभूमी असलेल्यांचा सहभाग असाच असणार असे मी माझ्या मनाला समजावले.
कधी कार्यक्रमामधेच नगरसेवक टाईप पुढारी आपल्या घोळक्यासह मंचावर येतात. सत्काराचे शाल, श्रीफल स्वीकारून, छोटे भाषण ठोकून पुढच्या कार्यक्रमाला वेळ होतोय नाहीतर थांबलो असतो म्हणून रजा घेतात. आधीच्या कथानकाचे सूत्र जोडून मला महाराजांना मावळ्यांसमावेत तातडीने मोहिमेवर रवाना करून… बोला छत्रपती शिवाजी महाराज की… जय… अशी जुळणी करावी लागते. असे अनुभव अशा मजा. असो.
क्रमशः

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800