“मित्र धूमकेतू”
साल होते १९८१, साधारण ऑक्टोबर महिना असावा. मी एअर फोर्स स्टेशन कोलशेत, ठाणे येथील ऑफिसर्स मेस बारमध्ये मित्रांसोबत बसलेलो होतो. तेवढ्यात एक चष्मेवाला आला आणि माझ्या पाठीवर थाप मारून म्हणाला, ‘मी असं ऐकलं की तुझी दिल्लीला पोस्टिंग झाली आहे ? मी जरा चमकून मागे पाहिले, कारण हा काही ओळखीतला नव्हता ! म्हणून मी त्याला आपलं तोंड देखलं हो असं म्हणालो. हातात ड्रिंक घेत म्हणायला लागला, माझी तुला चांगलीच मदत होईल. ते कसं ? मी जरा आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. तो म्हणाला, ‘अरे मला माहिती आहे. ऑफिसमध्ये बसलो होतो त्या वेळेला तो ॲडजुटंट मला सांगत होता की तुझी पोस्टिंग झाली आहे दिल्लीला, वेस्टर्न एयर कमांडला ! तू एकदम फॅमिली घेऊन दिल्लीला ये, मी तुला मदत करतो. असं म्हटल्यामुळे मला त्याच्याबद्दल एक वेगळीच आपुलकी जाणवली. मी त्याला म्हटलं ठीक आहे बघू. माझ्या म्हणण्यात थोडासा तुटकपणा त्याला जाणवला. तो म्हणाला, ‘अरे सध्या माझ्या मॅरीड क्वार्टरमध्ये मी एकटाच असतो. माझी मिसेस बाळंतपणासाठी गेली आहे आणि आई पण सध्या तिथे राहत नाही. म्हणून क्वार्टर मोकळं आहे. पुढे मागे बाग आहे. मोर सुद्धा नाचतात.
मी फक्त अधूनमधून तिथे असतो. कारण मला डॉक्समध्ये जाऊन बोटीतून रशियाहून आलेले सामान उतरवून घेणे वगैरे या कामात मुंबईतच वेळ जातो. तू गुडगावला जा. साधारण चार-पाच किलोमीटर ते गावापासून दूर आहे. टू व्हीलरने तिथल्या बस स्टँडवरून तुला सुब्रतो पार्क सोयीचे जाईल’. त्यांनी इतका सगळा प्लान मला सांगून सुद्धा माझा जरा विश्वास बसणे अवघड होतं . कुठे ते गुडगाव, कुठे माझं ऑफिस. मी तर विचार करत होतो की मी एकटा मेसमधे राहीन. ‘तुला राहायला जागा मिळेल असे वाटत असेल तर विसरून जा. तिथे आधीच चारसहा महिन्यापासूनचे लोकांचे क्लेम लागलेले आहेत, त्यामुळे तुझी डाळ तिथे शिजायची नाही’. बघू, करू काहीतरी असं म्हणून मी जरा मोघम बोललो. आमची भेट तिथेच थांबली.
मी घरी येऊन हिला सगळं सांगितलं. ‘कोण कुठला, माझ्या मॅरीड क्वार्टरमध्ये येऊन राहा म्हणाला म्हणून लगेच तू निघालास ? तू त्याला ओळखतोस का ? जरा तू तू मैं मैं झाली. पण त्याच्यावर विश्वास ठेवून मी फॅमिलीसह नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर उतरलो. त्यावेळेला माझ्या बोगीच्या समोर हा माझा मित्र उभा होता ! चिन्मयला अंगावर घेत म्हणाला, ‘बाहेर गाडी घेऊन मी आलोय’. आम्ही त्याच्याबरोबर गुडगाव,म्हणजे सध्याचे गुरुग्रामला पोहोचलो. सगळं सामान लावले. त्यांनी सर्व्हन्ट क्वार्टरच्या आया, माळी वगैरे सगळ्यांना बोलवून आमची ओळख करून दिली. त्या दिवशी तो एक रात्र राहिला. आता मी उद्या पहाटे परत मुंबईला चाललोय म्हणून तो गायब झाला… !
युनिट छोटेसेच होते त्यामुळे फारच कमी क्वार्टर्स होते. तरीपण माझ्या या मित्राने मला अशा तऱ्हेने मदत केली.
तीन आठवड्यानंतर मला जनकपुरी मधल्या एका बंगल्यात भाड्याने जागा मिळाली. जवळच दत्तविनायक मंदिर होते. तिथल्सा घटनांचे वर्णन मी आधीच केलेलं आहे. आश्चर्य असं की १९९५ सालापर्यंत म्हणजे जवळजवळ पंधरा वर्ष हा मला कधी दिसला नाही. मी त्याचे नाव व चेहरा विसरून गेलो होतो. एकदा मी नागपूरला ऑफिसबाहेर पाटी वाचली. विंग कमांडर जावळीकर! माझ्या युनिफॉर्मधील नेम प्लेट वाचत तो म्हणाला, ‘गुडगाव ? इतक्या वर्षानंतर सुद्धा त्याच्या बोलण्यातला ओलावा मला जाणवला. नंतर त्याची मिसेस, मुलं वगैरे त्यांची भेट झाली. उद्या रविवार आहे तू असं कर की माझी स्कूटर घेऊन जा. फिर तुला काय कुठे फिरायचं तिथे. मला स्कूटर नकोय. रात्री पुन्हा आपण गप्पा मारत बसू. दुसऱ्या दिवशी माझ्या कामाला परत निघून गेलो. त्यानंतर हा जावळीकर मला कधीही भेटला नाही. म्हणूनच म्हणतो ना की हवाई दलातील मैत्री आणि मित्र धूमकेतूसारखे असतात. ते एकदम जवळ येतात आणि काम झालं की एकदम दिसेनासे होतात. पुन्हा कधी कधी भेटतही नाहीत. असा असा माझा मित्र विंग कमांडर जावळीकर.
क्रमशः

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800