Wednesday, July 2, 2025
Homeलेखहवा हवाई : ३२

हवा हवाई : ३२

“गाडीचे इंजिनच गायब !”

तो दिवस होता २ जानेवारी १९८५. पहाटे ३-३।। ची वेळ. पूर्वीच्या फर्स्ट क्लासच्या कूपेत खालच्या बर्थवर मी आरामात घोरत होतो. वरच्या बर्थवर एक चटपटीत सार्जंट (आता नाव आठवत नाही) झोपला होता. ऐन वेळी एका मेजरने इमर्जन्सी कामाला निघाल्याचे सांगून आपला होल्ड-ऑल खाली पसरला होता. गाडी अचानक प्रचंड हादरायला लागली. खालून प्रचंड धाड धाड आवाज येऊ लागले. करकचून ब्रेक लागल्यासारखी गाडी थांबली. सार्जंटचे पार्सल धप्पकन मेजरच्या अंगावर कोसळले. ‘तेरे की तो’ म्हणत तो ओरडला. ‘कौन है ?’ म्हणत उठून उभा राहिला. लाईट गेलेले. मिट्ट काळोख.
‘सर, गाडीला काही तर झालय’! खाली पडलेल्या सार्जंटचा कातरलेला आवाज होता. ‘येस, गेट रेडी’ चपळाईने सार्जंट फर्स्ट कूपेतून बाहेर गेला तितक्याच त्वरेने परतला. ‘सर, गाडीला इंजिनच नाही ये’! लोकांचे मोठमोठ्याने बोलल्याचे आवाज तोवर ऐकू यायला लागले.

‘हॅलो, हॅलो, मी गार्ड बोलतोय’ असा आवाज आला. तो इलेक्ट्रिक पोलवरच्या सेटला आपली यंत्रणा जोडून जवळच्या स्टेशनशी संपर्क करत असावा. ‘आमच्या झेलम एक्सप्रेसला अपघात झाला आहे. अंधार आहे. साईडच्या ट्रॅकला धक्का पोचला असावा. गाड्या पाठवू नका. रिकव्हरी व्हॅनची व्यवस्था करा. जळगाव-भुसावळ सेक्शनमधे ४३८ नंबर किमीच्या खांबांपाशी आम्ही आहोत. ओव्हर अँड आऊट.’

आता परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मी उतरलो. सार्जंट कूपेत थांबला. गाडीचे इंजिन गायब होते! नक्की कोणत्या दिशेना प्रवास होत होता याचा अंदाज येईना. कारण पुण्याहून निघताना आमचा फर्स्टचा डबा इंजिनपासून तिसरा होता. दौंडला ट्रॅक बदलून इंजिन मागे जाते म्हणून आमचा डबा आता मागून तिसरा होता. त्या अंदाजाने मी खडी तुडवत निघालो. पार्सल व्हॅनपाशी आलो. डबे एकमेकाला जोडतात त्या ठिकाणी अंदाजाने हात फिरवून पाहिला तर चटकाच बसला. त्या ठिकाणचा पत्रा फाटून मोठ्ठे खिंडार पडले होते! मी धीराने आणखी आत हात घातला. आतला पत्रा तरी शाबूत होता! हायसे वाटले, कारण आमचा माल त्या ठिकाणी होता !

लांबवर सायरनचा आवाज घोंघावत होता. लालबत्तीची उघडझाप होत होती. त्या वरून ते इंजिन १-२ किमी लांब जाऊन थांबले होते. वाटेतील लोकांच्या बोलण्यावरून कळत होते की गाडी रुळावरून घसरली आहे. पार्सल व्हॅनच्या खालची चाकांची जोडी शेजारचा ट्रॅक ओलांडून शेतात फेकली गेली होती. त्या आधी निखळलेल्या चाकांच्या दाबाने स्लीपर्स कापत गेले होते. त्याचा प्रचंड आवाज झाला व करकचून थांबण्याने बरेच जण धडपडले. दुसऱ्या ट्रॅंकवरील इलेक्ट्रिक तारांची नासधूस झाल्याने तो ही निकामी झाला होता. गाडीचे ४-५ डबे रुळावरून उतरले होते. पण उलटले नव्हते. ना आग लागली होती. तास-दोनतास असेच गेले. उजाडायला लागले. आसपासचे लोक, डॉक्टर मदतीला आले. मात्र कोणालाही गंभीर इजा न झाल्याचे लक्षात आले. जरा पुढे तापी नदीवर मोठा पूल आहे तिथे हा अपघात घडला असता तर मोठीच हानी झाली असती. ती टळली.

हळू हळू रेल्वेची कुमक आली. दुसऱ्या ट्रॅकवर जेथवर तो ट्रॅक ठीक होता तेथपर्यंत दुसरी मोकळी गाडी येऊन उभी राहिली. कर्ण्यातून पुकारा झाला की लोकांनी त्या गाडीत चढावे. ती गाडी भुसावळला जाईल. तेथे दिल्लीहून आलेली झेलम एक्सप्रेस उभी आहे. त्यामधे बसून पुढील प्रवास चालू होईल. प्रवासी धावले. त्यांची ती गडबड. इकडे आम्ही माल घ्यायला पार्सल व्हॅनपाशी. त्याचे आम्ही रक्षकवाहक होतो. ती सील केली होती. ते उघडायला गार्ड तयार होईना. खूप हुज्जत झाली. मी युनिफॉर्म चढवला होता. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेवटी तोड काढली व आमचे कामाचे ९ बॉक्स आम्हाला द्यायचे ठरले !

सील तोडले गेले. आत खच्चून माल भरला होता. कसेबसे ते अवजड खोके बाहेर आले. तिकडे एक लॅडीस तयार होती. रेल्वे ट्रॅक तपासणी करण्याकरता वापरली जाणारी ढकलगाडी सर्वांनी पाहिली असेल. तिलाच ‘लॅडीस’ म्हणतात. त्यावर सर्व खोके लादले गेले. त्या उंच रचलेल्या पेट्यांवर मी आरुढ झालेलो. लॅडीस ढकलणारे दोन पोर्टर व त्यांच्या मागे पळत येणारा सार्जंट! निघाली आमची वरात! साधारण एक कि.मी. पळत गेल्यावर दुसर्‍या ट्रॅकवर उभ्या गाडीत आम्ही ते खोके कसेबसे लादलेले पाहिले अन् ड्रायव्हरने ती गाडी सोडली !

भुसावळला प्रसंगावधान राखून चटपटीत सार्जंटने केळ्याचा मोकळा ठेला पाहिला व त्यावर ते खोके लादले. ते ढकलत आम्ही दिल्लीहून आलेल्या झेलम एक्सप्रेसपाशी पोचलो. जरा आरडाओरड करून आम्ही एका लेडीज कंपार्टमेंटमधे ते सामान चढवले. आता फर्स्टक्लासची चैन नव्हती. उरलेल्या जागेत कसेबसे बसलो तेंव्हा हायसे वाटले. पहाटे पासून जागे. भूखे-प्यासे. पुरी भाजी पॅक करून आम्ही घेतली. समोर केळी दिसत होती. मी सार्जंटला फरमाईश केली, ‘ती आणलीस तर पुढे खायला मिळाले नाही तरी चालेल’. ‘आत्ता आणतो’ म्हणून तो गेला अन् इकडे गाडी सुरु व्हायला एकच गाठ पडली. आता येईल मग येईल करत एकदम खांडव्याला गाडी थांबली. तरी याचा पत्ता नाही! तेवढ्यात ‘स्क्वाड्रन लीडर शशिकांत ओक कौन है ?’ असे विचारत एक जण आला. मी हो म्हणताच, ‘आपके लिए टेलिग्राम है’ म्हणून गुलाबी कागद हातात देऊन गेला. त्यावर लिहिलेले होते, ‘सर केळी घेण्याच्या नादात माझी ट्रेन चुकली आहे. माझी काळजी नको !’

अशी ती ‘लॅडीस’ वरची सफर कायमची लक्षात राहिली! पुढे तो सार्जंट भेटला म्हणाला, ‘सर केळी भलतीच महागात पडली. पण आपला डबा शेवटचा होता. त्यात आपण लेडीज कंपार्टमेंटमधे होतो म्हणून मला टेलिग्राम आपणाला मिळेल याची खात्री होती’.

माझी सासुरवाडी जळगावची. नंतर एकदा तेथील दै.गावकरीचे जुने अंक पाहिले त्यात त्या अपघाताचा फोटोसह उल्लेख होता. एका वरिष्ठ मिलिटरीतील अधिकाऱ्याने अमुक अमुक केले असा अस्मादिकांचा उल्लेख लक्षणिय होता. असो.
क्रमशः

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती :cसौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४