गार्ड ऑफ ऑनर परेड
हवाई दलातील कानपूर हे मोठे केंद्र आहे. इतके मोठे की त्याच्या सीमेच्या आवाक्यात ५ ते ६ खेडी येतात. अनेक विमानांचे मेन्टेनन्स रिपेअर, मोठा डेपो वगैरे पार पाडले जातात. तिथे ७४ सालात मी पोस्टिंग वर गेलो. प्रथमच प्रचंड सेरिमोनियल परेड अनुभवायला मिळाली. कांजी केलेले खाकी युनिफॉर्म, (आजकाल तो युनिफॉर्म निळ्या रंगाचा झाला आहे.) ब्रासो केलेले पितळी पट्ट्या, जाड पांढरा व्हाईटनर लावून सजवलेले पट्टे, जड शूज, छातीवर गोल मेडल्सची पट्टी, परेड ग्राउंड वर पोहोचायच्या आधी आर्मरी मधून प्रत्येक एयरमनकडे ३०३ रायफल, ऑफिसर्स करिता रिव्हॉल्वर असे घेऊन परेड ग्राउंडवर ठराविक स्क्वाड्रनमधील फ्लाईटमधे जमायचे असे.
कानपुरला ५ स्क्वाड्रन, प्रत्येक फ्लाईटमधे साधारण ५०, अशा १५ फ्लाईट्स, त्यात वॉरंट रँकर, ऑफिसर सुपर न्युमरिज वगैरे बँडच्या तालावर सर्वांना उभे राहून सहभागी व्हायला लागत असे.
ही प्राथमिक तयारी झाली की ग्रुप कॅप्टन रँकचे परेड कमांडर परेडस्टेट म्हणजे किती जण हजर आहेत ते प्रत्येक स्क्वाड्रन कमांडरांकडून संख्याऐकून मनात बेरीज करून तयार ठेवावी लागे.
त्या आधी फ्लाईट कमांडर आपापल्या फ्लाईट मधील असलेल्यांची मोजणी करून साधारण विंग कमांडर रँकच्या स्क्वाड्रन कमांडरांना रिपोर्ट करून आपापल्या संख्या सांगत असत.
अशी ही तयारी होत असताना, रिव्हूइंग ऑफिसर म्हणून एयर कमोडर, एयर ऑफिसर कमांडिंग येत आहेत असे सायरन वाजू लागत. रेड कार्पेट वरून ते परेड कमांडरच्या समोर डायसवर विराजमान झाले की परेड कमांडर त्यांना रिपोर्ट करून परेड स्टेटची उपस्थितांची संख्या सांगून परेडचे निरीक्षण करायला निमंत्रित करतात. मग ते दोघे त्यांच्या पुढे २ एस्कॉर्ट असे स्लो मार्च करत प्रत्येक स्क्वाड्रन समोरून जात राहतात. आजकाल ते निरीक्षण सजवलेल्या जीपने केले जाते.
नंतर परेड कमांडर पुढे, मागे प्रत्येक स्क्वाड्रन कमांडरच्या मागे त्यांच्या फ्लाईट्स असे करत डायसवर उभ्या रिव्हूइंग ऑफिसरकडे ‘दाहिने देख’ आज्ञा आल्यावर माना उजवीकडे वळवून पुढे जात रहायचे नंतर बाएं देख वर मान सरळ करून नजर आपल्या समोर धरून, लेफ्ट – राईट करत बँडच्या तालावर पावले टाकत पुढे सरकायचे. सर्व स्क्वाड्रन जिथून निघाले तिथे परत जाऊन थांबायचे. मग रिव्हूइंग ऑफिसर आपले १० मिनिटांचे भाषण करून महत्त्वाच्या घटना, गौरवाच्या बाबी सांगून पुढील काळात काय कामे आपेक्षित आहेत ते थोडक्यात सांगत.
नंतर पुन्हा बँड सर्वात पुढे मागे उपस्थित सर्व स्क्वाड्रन्स एका मागून एक करत डायसवरील रिव्हूइंग ऑफिसरना सॅल्युट करून परेड ग्राउंड वरून निघून जातात. साधारण दीड ते दोन तास रायफली हातात घेऊन उभे राहून, परेड करत जावे लागते. शस्त्रे आर्मरीत परत करून आपापल्या कामाला लागले जाते.
मी सुरवातीला पायलट ऑफिसर असताना सुपर न्युमरिज मधे असे. नंतर फ्लाईट लेफ्टनंट झाल्यावर फ्लाईट कमांडर असे, कधी रिव्हूइंग ऑफिसर करिता एस्कॉर्ट असे. विंग कमांडर झाल्यावर मी परेड कमांडर होत असे.
आता आठवते की मी एयर फोर्स स्टेशन पुण्यात पोस्टिंगवर होतो तेव्हाची ती घटना. २००१ साली जी जनगणना होत होती त्यासाठी हवाईदलातील वास्तव्याला असलेल्यांची जनगणना करायला माझ्या नेतृत्वाखाली टीम तयार करण्यात आली. कालांतराने ते काम करायला व योग्य अंमलबजावणी करण्यासाठी मुंबईत मंत्रालयात बैठकीत सहभागी होता आले. हवाईदलातील कामाव्यतिरिक्त अशी जबाबदारी मला मिळाली होती. महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्याच्या मंत्रालयाच्या भव्य आणि उत्तुंग भवनात जायची संधी अनायासे आली. आम्ही तत्परतेने जमवलेली माहिती पुणे जिल्हा कार्यालयात सादर करताना आमच्या टीमने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला होता.
ती सर्व माहिती आधी पुण्याचे कमांडिंग ऑफिसरांना सादर करायची होती. एयर कमोडर एन ए के ब्राऊन (जे नंतर हवाईदलाचे मुख्य झाले.) यांनी सुचवले की तू परेड कमांड कर आणि त्यातून मला त्या माहितीचे पाकीट सादर कर म्हणजे संपूर्ण स्टेशनला हे दिसेल. मग मी ती माहिती वाचून दाखवीन आणि तुम्ही केलेल्या कामाला शाबासकी देईन. ती परेड आजही माझ्या आठवणीत कायम आहे. असो.कानपूरच्या त्या परेड नंतर पुढे काय झाले ते वाचा.
क्रमशः
— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूप चांगली माहिती देत आहात विंग कमांडर ओक सर🙏🇮🇳
हवाईदलातील किस्से सांगताना परेड ग्राउंड वर आपली छाप पाडण्यासाठी ऑर्डर्स ओरडून सांगत राहावे लागते. त्यातील सीक्वेंस चुकता कामा नये यासाठी आरश्या समोर उभे राहून सराव करत राहायला लागतो. जरा जरी चुकून काही पुढे मागे झाले तर संपूर्ण स्टेशनच्या उपस्थितां बरोबर मुख्य पाहुण्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते. सुदैवाने माझ्या हातून अशी चूक झाली नाही. व शाबासकी मिळत राहिली. नाहीतर अकौंट्स ब्रांचच्या सीनियर ऑफिसर्सना कधी परेड कमांड करायची संधी आयुष्यभर मिळत नाही. असो.