Wednesday, April 23, 2025
Homeलेखहवा हवाई - 30

हवा हवाई – 30

सिंहावलोकन

मित्रांनो,
आपल्या न्यूज स्टोरी टुडे या पोर्टलवरून माझ्या हवाई दलातील आठवणी आपण वाचत आलेला आहात. या आठवणी साधारण 1971 ते 81 पर्यंतच्या दहा वर्षातील आहेत. या पुढील वीस वर्षातील आठवणी दर आठवड्याला सादर करेन.

1981 च्या नोव्हेंबर महिन्यात मी एअर फोर्स स्टेशन ठाण्याहून नवी दिल्लीतील वेस्टर्न एअर कमांड या नव्या पोस्टिंगच्या ऑफिसमध्ये रुजू झालो. विंग कमांडर जावळीकरने माझी घराची सोय केल्यामुळे नंतर मी जनकपुरीत दत्तविनायक मंदिराच्या सानिध्यात राहायला लागलो. आता माझ्या या पोस्टिंगमध्ये ऑफिसमधील आठवणी सादर करीत आहे.

डब्युएसी (वेस्टर्न एअर कमांड) हवाई दलाचे सर्वात मोठे कमांड हेडक्वार्टर आहे. त्यामध्ये संपूर्ण भारताच्या उत्तर भागातील सर्व हवाई दलांचे ३३ पेक्षा जास्त स्टेशन्स येतात. त्यांच्यावर कमांड करण्याकरता नवी दिल्लीत सुब्रतो पार्क येथे वेस्टर्न एअर कमांडची भव्य इमारत आहे. त्यात एअर मार्शल रँकचे एअर ऑफिसर कमांडिंग इन कमांडर (एओ सी इन सी) बॉस असतात. आमच्या अकाउंट्स ब्रांचचे कंट्रोल कमांड ऑफिस होते. अशा महत्त्वाच्या ऑफिसमध्ये मी सर्वात ज्युनियर फ्लाईट लेफ्टनंट या रँक वर रुजू झालो.

आमचे ऑफिस पहिल्या मजल्यावर होते. आणखी एक या कमांड इमारतीमधील सर्वांना अकाउंटिंग सर्विसेस देण्यासाठी एक युनिट अकाउंट सेक्शन होता तो पाचव्या मजल्यावर होता.

सुरुवातीला माझी पोस्टिंग पहिल्या मजल्यावरील ग्रुप कॅप्टन पुरोहित यांच्या हाताखाली झाली. कालांतराने 1983 ला माझी बदली पहिल्या मजल्यावरून पाचव्या मजल्यावरील युनिट अकाऊंट्स मध्ये झाली. त्यामुळे एकाच इमारतीत माझ्या दोन पोस्टिंग्स असल्यामुळे माझे दिल्लीतील वास्तव्य साधारण पाच वर्षे झाले. असो.

ग्रुप कॅप्टन व्ही एस पुरोहित, माझे बॉस एक मोठे प्रस्थ होते! अत्यंत हुशार अनुभवी आणि वरिष्ठांशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध असल्यामुळे वरिष्ठ ऑफिसर ही त्यांना टरकून असत. कुठलेही काम वेळेवर नव्हे वेळेच्या आधीच व्हायला हवे यासाठी ते दक्ष असत. त्यांच्या डायरीत प्रत्येक अकाउंट सेक्शन मध्ये काय चाललेले आहे याची बारीक नोंद असल्याचे त्यांच्या बोलण्यातून सतत जाणवत असे.

असे ऑफिसर्स संतापी नसले तरच नवल! अकाउंट्स सेक्शनमध्ये पोचल्यानंतर मला कळले की ज्या स्क्वाड्रन लीडर बरोबर एकाच खोलीत काम करत आहे तो काही महिन्यापूर्वी कामाचा ताण सहन न होऊन ब्लडप्रेशर वाढल्याने हॉस्पिटलमध्ये महिनाभर राहून आला होता! ज्याच्या जागी मी पोस्टिंग वर आलो होतो, त्याची कहाणी जास्त गंभीर होती. त्याला एकदा ग्रुप कॅप्टन पुरोहितांनी त्यांच्या बॉसकडे नेऊन, ‘मला हा असला युसलेस माणूस नको आहे. हवा तर तुम्ही त्याला तुमच्या ऑफिसचा चपरासी करा! असे म्हणून हाकलून दिले होते. अर्थात नंतर ताबडतोब त्याची बदली झाली आणि नेमका मी त्या खुर्चीत बसायला गेलो! त्यामुळे तुम्ही समजू शकता की माझी मानसिक अवस्था किती भेदरलेली असेल म्हणून. दर पाच दहा मिनिटांनी चपरासी येऊन साहेबांनी बोलावलंय असे म्हटल्यानंतर मला आणि माझ्या मित्राला, ‘आता काय झालं?’ असं वाटून भीती वाटत असे.

सुरुवातीला माझे काही महिने अशा दडपणात गेले. नंतर अशा काही घटना घडल्या की त्यामुळे मी ग्रुप कॅप्टन पुरोहितांचा आवडता झालो. अर्थात ते मी प्रोफेशनल कामातील प्राविण्य दाखवल्यामुळे होते. ग्रुप कॅप्टन पुरोहित हे होते मराठी, नागपूरचे. परंतु ते कधीच ऑफिसमध्ये मराठीत बोलत नसत. त्यांच्या आणि माझ्यामध्ये दोन विंग कमांडर आणि एक स्क्वाड्रन लीडर धाकात असत. दर सोमवारी मिटींगला म्हणून हजर असू. तेव्हा त्या मीटिंगचे मिनिट्स तयार करणे आणि नंतर ते सर्वांना पाठवून देणे हे देखील पुढच्या अर्ध्या तासात झाले नाही तर ते खरे नाही अशी परिस्थिती होती. त्यामुळे मला टिवल्या बावल्या करण्यात वेळ घालवणे शक्य नव्हते. शिवाय दर सहा महिन्यात सर्व एअर फोर्स स्टेशनचे इन्स्पेक्शन करायला जावे लागे. मी ज्युनिअर मोस्ट असल्यामुळे सगळ्यात जास्त धावपळ माझी होत होती. कधी विमानाने, कधी ट्रेन मधून तर कधी दिल्लीच्या आसपासच्या स्टेशनमध्ये कारमधून मला जावे यावे लागे. त्यामुळे पार लेह लडाख पासून ते राजस्थानातील सुरतगड नावाच्या वाळवंटात विहार करणे हे माझ्या कामाचा भाग होते.

ग्रुप कॅप्टन पुरोहितांची एक आठवण सांगतो. कुणी गचाळ आणि गलथानपणा करून त्यांच्यासमोर उभा असेल तर त्याची खैर नसे. एका कॉर्पोरलने काही कामासाठी आणलेली फाईल त्याच्या चुकांमुळे रागावून त्यांनी खिडकीतून भिरकावून दिली. त्याला तोंड दाखवू नकोस. गेट लॉस्ट असं ओरडून म्हटल्यावर तो बिचारा चिमणी एवढे तोंड करून परतला. ‘सर आपली फाईल पहिल्या मजल्यावरून खाली रस्त्यावर पडली आहे. मी काय करू?’ मी त्याला म्हटले, ‘तू आता काही करू नकोस. मीच बघतो काय ते’. मी सिक्युरिटी ऑफीसरला सांगून फाईल उचलायला लावली. नंतर काही दिवसांनी त्याच फाईलची जेव्हा विचारणा झाली तेव्हा मी म्हटले, ‘सर ती फाईल रस्त्यावर कशी पडली याची इन्क्वायरी सिक्युरिटी ऑफिसरकडे चालू आहे. त्यात तुम्ही ती फेकून दिलेली आहे असे रिपोर्टिंग झाले आहे’. नंतर फाईलींवर राग काढणे बंद झाले. असो.

हवाई दलातील कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिडंट फंड आणि पेन्शन देण्यासाठी एक वेगळे ऑफिस तयार करावे असे त्यावेळी ठरत होते. त्यासाठी एक कमिटी नेमण्यात आली, त्या कमिटीत मी ज्युनियर मेंबर होतो. ग्रुप कॅप्टन पुरोहितांनी मला या कामासाठी असे काही पळवले की काही बोलता सोय नाही कारण त्यांना हव्या त्या माहितीसाठी वेगवेगळ्या ऑफिसेस माहिती गोळा करायला लागत असे. वेगवेगळ्या महत्त्वाच्या ऑफिसेस मधील बॉस आणि कामाची पद्धत याची माहिती पुढे मला कामाला आली.

याच कमिटीने नंतर पार डिफेन्स मिनिस्टरपर्यंत प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी मला सहभागी व्हायचा संधी मिळाली. त्यांच्या मुळेच नंतर बऱ्याचशा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या काही व्यक्तिगत गरजा, गोष्टी सोडवण्यासाठी मला पुरोहित आवर्जून पाठवत असत. असेच एकदा मला एका मॅडमची इन्कम टॅक्सची केस सोडवायला पाठवले गेले. नंतरच्या ओळखीत त्या मॅडमची गॅस एजन्सी असल्यामुळे कळले. अलकाने आठवण करून दिली की आपण लोकांचे सिलेंडर वापरतो. तू लांबून लांबून ते स्कूटर वरून कसेबसे आणतोस. हे तुझ्या लक्षात नाही का आले. त्यांना म्हणावं मला सिलेंडरचे कनेक्शन द्या. आठ दिवसात जनकपुरीतून सिलेंडर मिळू लागले. असो.

असे होता होता ग्रुप कॅप्टन पुरोहित रिटायर व्हायच्या आधी एकदा माझ्याबरोबर चल असे म्हणाले, तेव्हा माझा मित्र ‘आता तूच काही खरं नाही’ असे म्हणून डोळे फाडून बघायला लागला. आम्ही सरळ चौथ्या मजल्यावर पोहोचलो आणि तिथल्या एओसी इन सीच्या ऑफिसमध्ये पोचलो. एयर मार्शल कात्रे यांना ते म्हणाले, ‘धिस यंग मॅन हॅज बीन व्हेरी इफिशियंट अँड डिपेंडबल डेप्युटी. मी मुद्दाम त्याला आपल्यासमोर कौतुक करायला आणले आहे. ग्रुप कॅप्टन पुरोहितांसारख्या थरो प्रोफेशनलचे हे सर्टिफिकेट फारच आनंददायक होते.

मला इथे नमूद करायला पाहिजे की स्क्वाड्रन लीडर प्रभाकर सहस्रबुद्धे हे माझे वरिष्ठ पाचव्या मजल्यावर ऑफिसमध्ये असत. ते हजरजबाबी आणि चुटकुले सांगण्यात प्रसिद्ध होते. आमच्या पहिल्या मजल्यावर ऑफिसमधील नेहमीचे टेन्शन असलेले वातावरण हलके करण्यासाठी आम्ही त्यांना बोलवत असू. तेव्हा ते चेष्टेने म्हणत तुम्ही पहिल्या मजल्यावरचे पाच पांडव काही झालं की लगेच बोलावता तेव्हा मला जणू तुमची द्रौपदी असल्याचे जाणवते. पुढे काही वर्षांनी ते माझ्या जागी आणि मी त्यांच्या जागी पोस्टिंग वर गेलो. ग्रुप कॅप्टन पुरोहितांच्या जागी ग्रुप कॅप्टन राव म्हणून आले. नंतर ग्रुप कॅप्टन जोशी आले. परंतु ते सर्व माईंड मॅनर्ड असल्यामुळे पूर्वीचे टेन्शनचे वातावरण नसे.

बऱ्याच वर्षानंतर ग्रुप कॅप्टन पुरोहित पुण्यात निवृत्तीच्या काळात खराडी येथील वृद्ध निवासात राहायला आले तेव्हा आमची पुन्हा भेट झाली. कर्म धर्म संयोगाने त्याच अप्पासाहेब बेहेरे यांच्या वृद्ध निवासात माझ्या आईची शेवटची पाच वर्षे व्यतित झाली. असो.

होता होता 1986 साली मे महिन्यात पुण्याला माझी बदली झाली. त्या काळातील किस्से आपल्यासमोर यानंतर सादर करीन.
क्रमशः

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
सुरेश काचावार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी on चला, कास पठार पाहू या !
शितल अहेर on काही अ ल क
शितल अहेर on काही कविता