वारा पिसाटला असा
झाडे थरारून गेली
पिल्ले घेऊन पोटाशी
पाखरेही चूप झाली
किती पागोळ्या झरती
कौलं गेली फुटुनिया
घराचेही रूप पावसाने
जाहले जलाशयात
हात उंचावून झाडे
नभा घालतात साद
काळ्या ढगांना पाहून
झाला तृणाला आनंद
मनमुराद मोकळा
मृग बरसतो आता
भळीतून भुई तेव्हा
गाते तुकोबाची गाथा
फुटे नभाला पाझर
हाका चातक मारतो
उघडल्या चोची मध्ये
थेंब एकेक झेलतो
नीरफणसाची पाने
द्रोण पसरून हाती
लागे मुळांना तहान
थेंब थेंब पाजताती

— रचना : सागर प्रकाश. गोवा
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800