आश्चर्य वाटले तिला
एरवी घर घर करणारा आपला बाप
सहज पाश तोडून नव्या घरात स्थिरावला
पंचवीस वर्षाचे त्या वास्तूतले वास्तव्य,कडू गोड आठवणी
असतीलच सोबतीला
पिळवटून टाकायला
पण सहज तयार झाला
परवा त्याचा जवळचा मित्र ,शाळा सोबती गेला
अगदी अचानक
तासन् तास बोलायचे दोघं
अगदी मित्र गेला त्या दिवशी सकाळी देखील बोलले दोघं
तोच सांगत होता
सकाळी बोललो
संध्याकाळी तो गेल्याची बातमी!
तरी हा आपला कोरडाच
त्याचे हे कोरडे पण बघून
त्याच्या ऐवजी तीच अस्वस्थ..
काय झाले अचानक बापाला?
न राहवून तिने विचारलेच शेवटी त्याला
तुम्हाला काहीच कसे वाटत नाही?
तुम्ही रडत का नाही?
मोकळे का होत नाही?
लेकीचा प्रश्न ऐकून
तो हसला, अन् शांतपणे म्हणाला,
आता मी आतल्या आत रडायला शिकलो आहे!
अवघड असते आता या वयात
पण जन्म शिकवण्यात गेला
त्यामुळे हे शिकणेही सोपे झाले!
लेकीला समजले,
आपला बाप हाडाचा शिक्षक आहे!
— रचना : प्रा डॉ विजय पांढरीपांडे.
माजी कुलगुरू, हैद्राबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800