काही नाती वेगळीच असतात शब्दांपलीकडची!त्या नात्यांना काहीच नाव नसते, ना ती आपल्या रक्ताची असतात, तरीही ती खूप जवळची वाटतात.
माझी मुलगी साईशाने एमबीबीएस झाल्यावर अमेरिकेला जाण्याचे ठरवले. आम्हाला तिकडच्या अभ्यासक्रमाबद्दल काहीच कल्पना नव्हती. खरंतर तिच्या आत्या, आत्याची मुले अमेरिकेत असूनही मी अनभिज्ञच होते. श्री श्रीकांत राऊत यांनी मला त्यांची भाची स्नेहाचा नंबर दिला. स्नेहा अमेरिकेत राहत होती. स्नेहाने मला तिचे कौन्सिलर श्री हिरेन राठोड सरांचा नंबर दिला. साईशा आणि तिचे बाबा रोज या नंबर वर फोन करत पण फोन घेतला जात नसे. सरते शेवटी मी फोन केला आणि एका छानशा भारदस्त आवाजाने मला प्रतिसाद दिला, “बोला, मीच हिरेन राठोड” त्यांनी त्यांच्या ऑफिसचा पत्ता देऊन तिथे बोलावले. मी काही त्यांना भेटायला जाऊ शकले नाही पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली साईशा कॅलिफोर्नियाला गेली.
जागा नवीन, अभ्यास नवीन, वातावरण वेगळं आणि एक दिवस तिने मला फोन केला “मम्मा मला हा कोर्स बदलायचा आहे, मी नाही करू शकणार हा कोर्स” माझ्या पायाखालची जमीनच सरकली. अतिशय विचारी शांत स्वभावाच्या साईशाने मला अंतिम निर्णय तर सांगितला, पण कधीही न रडणारी, खचणारी मुलगी रडू लागली. माझा तर धीरच खचला. “नाहीतर मी सर्व सोडून परत येते” असं ती म्हणाली. मला तर चहुकडे अंधारच अंधार दिसू लागला. काय करावे ते सुचेना. भरपूर खर्च झाला होता. पैसेही फुकट जाणार होते. आता माझ्यासमोर एकच नाव होतं श्री. हिरेन राठोड सर !
मी कोणालाही न सांगता हिरेन सरांना मेसेज केला. पण सरांनी तो पाहिलाच नाही. मी फोन केला तर लगेच मेसेज आला, “i will call you mam” मला तर धीरच नव्हता मी त्यांना सर्व परिस्थिती मेसेज करून सांगितली आणि त्यांनी मला समोरून फोन केला. माझी समजूत घातली. “साईशाला मला फोन करायला सांगा” असं ते म्हणाले.
राठोड सरांच्या बोलण्याने मला प्रचंड धीर आला. ते एक एक गोष्ट नीट समजावून सांगत होते. मी जवळ जवळ वीस ते पंचवीस मिनिटे त्यांच्याशी बोलत होते. एका न पाहिलेल्या अनोळखी व्यक्तीस मी अनुभवत होते. त्यांच्या शब्दा शब्दात जादू होती. त्यांनी मला आणि साईशाला भरपूर वेळ दिला. ती अजूनही तयार नव्हती आणि तेव्हाच हिरेन सर मला बोलले, “मी हॉस्पिटलला आहे माझी सर्जरी झाली आहे”
माझ्या डोळ्यात क्षणभर पाणी तरळले….ना नातं, ना ओळख काही नाही. साईशाच्या ऍडमिशनमुळे तिचा आणि तिच्या बाबांचा तेवढा संबंध आलेला तरीही हिरेन सर तेथूनही माझ्याशी बोलत होते. मी मात्र निशब्द झाले. स्वतःचे ऑपरेशन झालेले असतानाही त्यांनी आमच्यासाठी दिलेला वेळ खरोखरच बहुमोल होता. “तुम्ही काळजी घ्या सर मी बोलते तिच्याशी” मलाच गिल्टी वाटत होतं. मी असं म्हटल्यावर ते म्हणाले, “माझी गरज लागली तर नक्की फोन करा मॅडम” मला काहीच शब्द सुचत नव्हते. मी कसंतरी थँक्यू म्हणून फोन ठेवला.
हे सर्व काही ते पैशासाठी करत नव्हते तर हे सारे लाभेविन प्रेम होते. आम्ही त्यांना काहीही देणार नव्हतो पण एका आईची तडफड समजणारे हिरेन सर माझ्यासाठी निव्वळ एक देव होते, देव आणखी कसा वेगळा असतो!मी त्यांना कधीच भेटले नव्हते पण पलीकडच्या व्यक्तीची स्पंदने मला समजतात.
त्यानंतरही जेव्हा जेव्हा कोणत्याही मदतीसाठी मी सरांना मेसेज केला हिरेन सर लगेचच रिप्लाय करत राहिले. काय असतं नातं म्हणजे तरी ? माणूस म्हणून जन्माला आलो तर माणुसकी कशी जपावी कसं जगावं मानवतेच्या नात्याने हे मी त्यांच्याकडून शिकले. अत्यंत शुद्ध मराठीत ते कळकळीने आणि तळमळीने बोलतात. आपल्या विद्यार्थ्यांबद्दलची त्यांची तळमळ ओढ जाणवतेच पण मुलांच्या पालकांना त्यांनी दिलेली खंबीर साथ नक्की कशाच द्योतक होतं ? एका निरलस प्रेमाचं !
त्यानंतर त्यांच्या स्वभावाबद्दल त्यांच्या सर्वांसोबतच्या प्रेमळ वागणुकीबद्दल साईशाने मला माहिती दिली. त्यांच्या प्रेमळ समजावणीमुळे साईशाने कोर्स सुरूच ठेवला आणि आता पूर्णही होत आला आहे.
मला व्हिसासाठी अप्लाय करायचं होतं. मी हिरेन सरांना अगदी हक्काने मेसेज केला. अर्थात प्रतिसाद सकारात्मकच. त्यांनी लगेचच त्यांच्या ऑफिसमध्ये मला येण्यासाठी सांगितलं.
माणसाकडे सारं काही असतं तरी त्याच्यात मूळ गुणधर्म मानवता असेलच असे नाही. उलट पैसा, कीर्ती आल्यावर माणूस माणुसकी विसरतो, अहंकारी बनतो. हिरेन सरांनी या लहान वयात सर्व काही मिळवले कीर्ती, नाव, पैसा ! इम्पिरियलचे नाव खूप मोठे आहे. खूप ठिकाणी त्यांच्या शाखाही आहेत पण हिरेन सरांचे पाय घट्ट जमिनीशी जुळलेले आहेत. माणसाच्या मनापर्यंत त्यांच्या खोल अंतरंगापर्यंत ते पोहोचू शकतात. अनेक विद्यार्थ्यांना जीवनाच्या नव्या वाटा दाखवणाऱ्या ह्या किमयागार व्यक्तीस देव आरोग्य संपन्न जीवन प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबीयांसमवेत त्यांना दीर्घायु लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!
— लेखन : प्रा डॉ. सुचिता पाटील. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
हिरेन राठोड यांची प्रेरणादायक कथा.