तू नसते तेंव्हा
वारा घरात शिरतो
घरभर फिरतो
वेडा ठरतो
पाहून रिकामे सारे
आपटूनी दारे
अबोला धरतो
तू नसते तेंव्हा
घड्याळ भिंतीवरचे
रिकाम्या घरचे
मंद चालते
अन बेल दारावरची
गोठल्या घरची
कमी बोलते
तू नसते तेंव्हा
अजबच काही घडले
जणु जीवन अवघे अडले
थेबांचे देऊन दान
कोरडे ठाण
नळ स्फूदूंन स्फूदूंन रडले
तू नसते तेंव्हा
ही रात्र जागत बसते
खट्याळ हसते
झोपही रूसते
पोरक्या मनाने
करीत बसतो
विचार नसते नसते.
— रचना : साहेबराव ठाणगे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800