Saturday, July 27, 2024
Homeलेखहृदयातील राम !

हृदयातील राम !

‘राम’ या पवित्र शब्दात प्रचंड ऊर्जा, अलौकिक शक्ती आहे. जो या शब्दाचा सातत्याने उच्चार करतो त्याचे जीवन बदलून जाते. रस्त्याने चालताना, घरात बसलेले असताना कुठेही ही दोन अक्षरे कानावर पडली की, अंतःकरणात आणि शरीरात एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह संचारला जातो. आपल्याही मुखातून रामनाम बाहेर पडते. हात भक्तिभावाने जोडले जातात कारण राम सर्वांच्या मनात, हृदयात वसलेला आहे. हा भाव हनुमंताने स्वतःची छाती फाडून व्यक्त केला. प्रत्येकाच्या हृदयात आहे परंतु प्रत्येक जण हनुमंत नाही म्हणून आपण तशी कृती करू शकत नाही. इतकेच नाही तर रत्नाकरला राम नामाची संथा, मंत्र देऊन अंतर्धान पावलेले नारदमुनी अनेक वर्षांनंतर त्याच मार्गाने जात असताना त्यांना ‘राम… राम…’ हा मंत्र कानी पडला. नारदमुनींनी तो आवाज कुठून येतोय ह्याचा शोध घेतला. आवाज मानवाचा होता परंतु कुणी दिसत नव्हते. एकवेळ अशी आली की, त्या आवाजाचा मागोवा घेताना त्यांच्या लक्षात आले की, त्या परिसरातील झाडे, वेली, पक्षी इतकेच काय पण दगड मातीपासून तो रामनामाचा ध्वनी येत आहे. बाजूला असलेले एक वारूळ त्या ध्वनी -प्रतिध्वनीचे केंद्र असल्याचे लक्षात येताच मुनींनी ते वारूळ बाजूला केले आणि सर्वांना महर्षी वाल्मिकी मिळाले.

राम या या शब्दातील दोन अक्षरे ‘राम’ अशी न उच्चारता ‘मरा’ अशी उच्चारली तरी प्रभू रामचंद्रांची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. याची प्रचिती आपणास महर्षी नारद यांच्या सूचनेनुसार रत्नाकर नावाचा कोळी चक्क महर्षी वाल्मिकी होतो आणि रामायणासारखा अजरामर ग्रंथ लिहितो यावरून येते.

जर अंतःकरणात खरेच रामनामाची भक्ती असेल तर सोबत आजूबाजूचा परिसर राममय होऊन जातो. मनात असलेले राम ओठावर येण्यासाठी कुठल्याही जागेची, विशेष आसनाची, वेळेची आवश्यकता नाही. अगदी स्मशानभूमीतही रामनामाचा उच्चार होतो. ही दोन अक्षरे जिथे उच्चारली जातात तिथला परिसर आपोआप पवित्र, स्वच्छ होतो. इच्छा झाली की, राम नाम मुखी येते.

श्रीरामाचे भक्त मनोभावे राम नाम घेत असले तरीही राम नाम न घेणाऱ्या आणि श्रीरामाचा मुख्य शत्रू असलेल्या रावणाच्या आणि कुंभकर्णाच्या झालेल्या संवादातून श्रीरामाचा महिमा लक्षात येईल.

राम-रावण युद्ध सुरू असताना कुंभकर्णाला जागे करून सभागृहात आणण्यात आले. तेव्हा सारी परिस्थिती लक्षात येताच कुंभकर्ण रावणाला म्हणाला,
“ज्येष्ठ बंधू रावण, एक सांगा, सीतेला ज्यासाठी पळवून आणले ते कार्य साध्य झाले का ?”
“नाही. अनुज, नाही. सीता त्यासाठी तयार होणार नाही. श्रीराम एकपत्नी आहे तशीच सीताही पतिव्रता आहे.”
“ज्येष्ठ बंधो, कपटनीतीचा अवलंब का करत नाहीत.आपण श्रीरामाचे रूप धारण करून जा म्हणजे कार्यसिद्धी होईल.”
“नाही. तसे होणार नाही. मी कपट करून रामाचे रूप घेऊन सीतेजवळ गेलो तरी मी काही करू शकणार नाही कारण रामरूप धारण करताच मी रामाप्रमाणे एकपत्नी अर्थात मंदोदरीचा होऊन जाईल आणि सीतेपाशी न जाता तसाच परतून येईल.”

हा आहे रामनामाचा महिमा ! रावणाला वाटणारी ती भीती नव्हती त्याच्या मनात कुठेतरी नकळत का होईना श्रीराम प्रवेशले होते. त्यामुळे त्याची तशी मनस्थिती झाली होती. जटायूसारखा एक पक्षी बलाढ्य रावणाशी लढला होता तो केवळ त्याच्या मनात राम वसलेला होता म्हणून. जटायू पक्षाने रावणाला निःशस्त्र केले, त्याच्या रथाचे तुकडे तुकडे केले, त्याला निर्वस्त्र केले ते केवळ आणि केवळ अंतःकरणात असलेल्या रामामुळे.

अथांग समुद्रावर सेतू बांधतांना दोन दगडांमध्ये असणारी पोकळी भरून काढण्यासाठी चिमुकली खार मदत करते तेव्हा तिच्या पाठीशी कुणाची शक्ती असते… प्रभू रामचंद्र तिच्या पाठीशी नव्हे तर हृदयात असतात.

सागरी सेतू बांधतांनाचा एक प्रसंग रामनामाचे महत्त्व स्पष्ट करणारा आहे. वानरसेना मोठमोठ्या शीळा समुद्रात टाकत होते त्यावेळी रामनामाचा गजर सुरू होता. श्रीराम ते सारे कौतुकाने पाहत असताना त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली की, प्रत्येक सैनिक त्या शिळेवर ‘श्रीराम’ असे लिहून टाकत होता. ती प्रत्येक शीळा समुद्राच्या पाण्यात तरंगत होती. ते पाहून श्रीरामाचीही इच्छा झाली की, आपणही एक शीळा टाकावी. म्हणून श्रीरामानेही एक शीळा उचलली आणि समुद्रात टाकली. आश्चर्य म्हणजे ती शीळा पाण्यावर न तरंगता पाण्यात बुडाली. ते पाहून श्रीराम अधिकच आश्चर्यचकित झाले. जवळ उभा असलेला हनुमंत श्रीरामाला वंदन करून म्हणाला, “प्रभो, आपण टाकलेली शीळा तरंगणार नाही कारण त्यावर श्रीराम लिहिलेले नाही. प्रभू, हा आपल्या नामाचा महिमा आहे. ज्याचेजवळ रामनाम नाही तो हमखास बुडणार.”

पित्याने दिलेली वचनपूर्ती करण्यासाठी वनवास स्वीकारणारा राम, आदर्श पती, एकवचनी राम, पराक्रमी, परोपकारी, आदर्श राजा अशी प्रभू रामचंद्राची ख्याती आहे.

सुख असेल, दुःख असेल, आनंदाच्या प्रसंगी ‘आई’ सोबत ‘राम’ हा शब्दही आपोआप ओठावर येतो कारण मनामनात वसलेला आहे तो म्हणजे श्रीराम ! तो प्रसंगी मदतीला धावून येतो अर्थात तसा आपला विश्वास रामनामावर हवा. श्रीरामाला शरण गेले, रामनामाचा ध्यास घेतला की, श्रीराम धावून येतो.
‘जय श्रीराम’

नागेश शेवाळकर.

— लेखन : नागेश शेवाळकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८