Saturday, July 27, 2024
Homeसंस्कृतीहोळीचे बदलते रंगरूप

होळीचे बदलते रंगरूप

नमस्कार प्रिय वाचकांनों !
आपण सर्वांना होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा !
‘आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी’ अथवा ‘होली आई रे कन्हाई, रंग छलके सुना दे जरा बांसुरी’ सारखी कर्णमधुर गाणी टीव्ही वर पाहिली, की रंगपंचमीची सुरुवात फार आधीपासून झाली हे लक्षात येते. गुलालाने गुलाबी अन केशरी सुगंधी जलाने रंगलेल्या कृष्ण, राधा आणि गोपिकांच्या सप्तरंगी होलिकोत्सवाचे वर्णन आपल्याला सुपरिचित आहे. राधा आणि गोपींबरोबर कृष्णाची रसिक रंगलीला ब्रजभूमीत ‘फाग लीला’ म्हणून ओळखली जाते. ब्रज भाषेचे प्रसिद्ध कवी रसखान यांनी राधा आणि गोपी यांच्या सोबत कृष्णाने खेळलेल्या रंगोत्सवाचे अतिशय रसिकतेने ‘फाग’ (फाल्गुन महिन्यातील होळी) या सवैये काव्यप्रकारात बहारदार वर्णन केले आहे. उदाहरणादाखल दोन सवैयांचे वर्णन करते.

रसखान म्हणतात-
खेलिये फाग निसंक व्है आज मयंकमुखी कहै भाग हमारौ।
तेहु गुलाल छुओ कर में पिचकारिन मैं रंग हिय मंह डारौ।
भावे सुमोहि करो रसखानजू पांव परौ जनि घूंघट टारौ।
वीर की सौंह हो देखि हौ कैसे अबीर तो आंख बचाय के डारो।
(अर्थ: चंद्रमुखीसम ब्रजवनिता कृष्णाला म्हणते, “आज ही फाल्गुन पौर्णिमेची होळी बिनदिक्कत खेळ. तुझ्याशी ही धुळवड खेळून जणू आमचे भाग्यच उजळले आहे. मला गुलालाने रंगव, हातात पिचकारी घेऊन माझे मन तुझ्या रंगात रंगवून टाक. ज्यात तुझा आनंद समाहित आहे, ते सर्व कर. पण मी तुझ्या पाया पडते, हा घुंघट हटवू नकोस आणि माझी तुला शपथ आहे. हा अबीर माझ्या डोळ्यांत नको टाकूस, इतरत्र टाक, अन्यथा तुझे सुंदर रूप बघण्यापासून मी वंचित राहून जाईन!”)

रसखान म्हणतात-
खेलतु फाग लख्यी पिय प्यारी को ता सुख की उपमा किहिं दीजै।
देखत ही बनि आवै भलै रसखान कहा है जो वारि न कीजै॥
ज्यौं ज्यौं छबीली कहै पिचकारी लै एक लई यह दूसरी लीजै।
त्यौं त्यौं छबीलो छकै छवि छाक सो हेरै हँसे न टरै खरौ भीजै॥
(अर्थ: एक गोपी तिच्या मैत्रिणीला फाग लीलेचे वर्णन करतांना सांगते, “हे सखी! मी कृष्ण आणि त्याच्या प्रिय राधेला होळी खेळतांना पाहिले. त्या वेळेला जी शोभा पाहिली, तिची तुलना कशी होणार? ते शोभायमान दृश्य अतुलनीय होते. अगं, त्यावर ओवाळून न टाकण्याजोगी एकही वस्तू शोधून सापडणार नाही. सुंदरी राधा जसजशी कृष्णाला आव्हान देते आणि त्याच्यावर एका मागून एक रंग उधळते, तसतसा कृष्ण तिच्या सौंदर्याने अधिकच वेडा होत जातो. राधेची पिचकारी पाहून तो हसत बसतो, पण तिथून पळून न जाता तिथेच उभे राहून तिने उडवलेल्या रंगात चिंब भिजत राहतो.”)

या फाल्गुन महिन्यात केशरी अग्निपुष्पांचे वस्त्र लेऊन पलाश वृक्ष ऐन बहरात आलेले असतात. (त्याच पुष्पांना पाण्यात भिजवून सुंदर नैसर्गिक केशरी रंग तयार होतो). ही दैवी अन पावन परंपरा जपणारी गुलाल आणि इतर नैसर्गिक रंगांसमेत खेळल्या जाणारी होळी म्हणजे मथुरा, गोकुळ आणि वृंदावनातील खास आकर्षण. तिथे हा सण सार्वजनिक रित्या चौका-चौकात वेगवेगळ्या दिवशी खेळल्या जातो, म्हणूनच ही होळी फाल्गुन पौर्णिमेच्या महिनाभर किंवा पंधरा दिवस आधीच सुरु होते.

मथुरेजवळ एका मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी करतांनाचा माझा अनुभव अविस्मरणीय असाच होता. धुळवड जोरदार होतीच, पण होळीच्या या दुसऱ्या दिवशी कॉलेजला सुट्टी असल्याने होळी पोर्णिमेलाच सकाळी कॉलेजचे तमाम कॉरिडॉर गुलालाने रंगून गेले होते. अख्या स्टाफने कॉलेजमध्ये अशी ‘धुळवड’ खेळल्यावर दुपारी १२ वाजता पोबारा केला. होळी पोर्णिमेलाच ही अग्रिम धुळवड झाल्यावर मग दुसऱ्या दिवशी सार्वजनिक धुळवड अर्थातच आपापल्या परिसरात साजरी केली गेली. मी मात्र बघायला जाणे शक्य असूनही बरसाना (राधेचे मूळ गाव) ची लठमार होळी बघितली नाही, त्याचे वैषम्य नक्कीच आहे. लठमार होळीचे हे जबरदस्त आकर्षक दृश्य दिसते राधेच्या गावात बरसानात, मथुरा, गोकुळ, वृंदावनातील अन स्थानिक पुरुष मंडळींना बरसानाच्या महिलांच्या लाठ्यांचा प्रतिकार करतांना बघून मजा येते. तसेही त्या भागात राधेवरील नितांत भक्ती दिसून येते. तेथील लोक बहुदा एकमेकांना अभिवादन करतांना ‘राधे-राधे’ म्हणतात.

आमच्या लहानपणी प्रत्येक घरी ऐसपैस अंगण असायचे अन घरोघरी होळी पेटवली जायची. होळीसाठी जुनी लाकडे, जुन्या झाडांच्या वाळलेल्या काटक्या, जीर्ण झालेले लाकडी सामान, इत्यादी गोळा व्हायचे. शेण गोळा करून त्याच्या लहान लहान गोवऱ्या थापायच्या अन प्रत्येक गोवरीच्या मध्ये एक छिद्र ठेवायचे, अशा गोवऱ्यांची माळ तयार करून पेटलेल्या होळीला अर्पण करायची. आता अशा माळा विकत घेता येतात. या होलिकोत्सावाची प्रसिद्ध कथा अशी की, होलिका या हिरण्यकश्यपूच्या बहिणीला अग्नीपासून भय नव्हते. याच कारणाने हिरण्यकश्यपूच्या पुत्राला म्हणजेच विष्णुभक्त प्रल्हादाला मारण्यासाठी ती पेटलेल्या अग्निकुंडात त्याला आपल्या मांडीवर घेऊन बसली. मात्र प्रत्यक्ष विष्णूची कृपा असल्याने प्रल्हाद जिवंत राहिला, आणि होलिका राक्षसी जळून खाक झाली. त्याचेच प्रतीक म्हणून दर फाल्गुन पौर्णिमेला अग्नी पेटवून त्यात आपल्या घरातील आणि समाजातील वाईट गोष्टी जाळून टाकणे हे अपेक्षित असते. मात्र निरोगी वृक्षांची कत्तल करून आणि जंगलतोड करून लाकडे जमा करून होळी पेटवणे योग्य नाही. झाडांचा नाश म्हणजे पर्यावरणास हानी पोचवणे होय. आधीच अतोनात वृक्ष तोड झाल्याने दूषित पर्यावरणाची समस्या गंभीर होते आहे. त्यात भर टाकून अशी होळी पेटवणे अयोग्य आहे. आजकाल प्रत्येक मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये होळी पेटवतात. त्यापेक्षा दोन तीन किंवा जवळपासच्या परिसरातील लोकांनी एकत्र येऊन प्रतीकात्मक लहानशी होळी पेटवून हा सण साजरा करावा असे मला वाटते.

माझ्या लहानपणीच्या धुळवडीच्या रम्य आठवणी पाण्याशी निगडित आहेत. नागपूरला आमच्या आईवडिलांच्या घरी खूप मोठं अंगण होतं. त्यात एक बरीच मोठी कढई होती, म्हणजे साधारण ३ वर्षांच मूल उभे राहील इतकी. त्याचा उपयोग एरवी १०० हून अधिक असणाऱ्या आमच्या झाडांना पाणी देण्याकरता होई. माझे ते आवडते काम होते. कढईत पाणी भरण्याकरता एक नळ होता, अन त्याला जोडलेल्या लांबच लांब पाईपने झाडांना पाणी देणे, खास करून उन्हाळ्यात अति शीतल असे काम होते. मात्र धुळवडीच्या दिवशी त्याच पाण्यात रंग मिसळून एकेकाला बुचकळून काढणे अन पिळून काढणे हा आमचा प्रिय उद्योग असायचा. अशीच सिमेंटची टाकी प्रत्येकाच्या घरी असायची, त्यांत एकामागून एक अशा आंघोळी करणे आणि जिथे जे मिळेल ते विनासंकोच खाणे, अशी धुळवड साजरी व्हायची.

कराड, कोल्हापूर अन सांगली पासून प्रत्येकी अंदाजे ४० किमी दूर असलेल्या इस्लामपूर येथे मी २०१६ ला नोकरीच्या निमित्याने गेले. तिथे धुळवडीचा (होळी पेटण्याचा दुसरा दिवस) इतर दिवसांसारखा एकदम नॉर्मल होता. मला कळेना, हे काय? चौकशी केल्यावर कळले की इथे ‘रंगपंचमी’ साजरी होते. रंगपंचमी म्हणजे होळी पौर्णिमेपासून पाचवा दिवस. मात्र मला हे माहितीच नव्हते. सुट्टी मिळो न मिळो, इथे रंगपंचमीच्या दिवशी सगळे आवर्जून सुट्टी घेतात. आमच्या मेडिकल कॉलेजमधील मुले भारताच्या विविध भागातील असल्यामुळे त्यांनी आपली डबल सोय केली, म्हणजेच धुळवड आणि रंगपंचमी दोन्ही दिवशी मस्ती !

आता मोठ-मोठ्या निवासी संकुलांत धुळवड साजरी होते. हौसेला मोल नाही हेच खरे. बहुदा बॅकग्राऊंडला तत्कालीन चालणारी डिस्को गाणी अन त्यावर सानथोरांनी एकत्र येऊन आनंदाने बेधुंद नृत्य करणे हा अविभाज्य भाग! तसेच यासोबत कुठे कुठे (पाण्याचा अल्पसंचय असतांना देखील) कृत्रिम कारंज्यांची व्यवस्था आणि त्यात सचैल भिजणे. हा पाण्याचा अपव्यव खरंच अस्वस्थ करणारा आहे. त्यासोबत धुळवडीला मद्यपान आणि मांसाहार असलेल्या पार्ट्या देखील होतात. एकमेकांना रंगात रंगवून एकात्मकता वृद्धिंगत करणे हा धुळवड साजरी करण्यातला मूळ विचार आहे. मात्र त्याचे विकृत रूप समोर आले की दुःख होते. ज्यांचा कातडीवर वाईट परिणाम होतो आणि जे सतत धुवूनही जाता जात नाहीत असे केमिकल्स असलेले भडक रंग, तसेच चिखलात खेळणे, अचकटविचकट बोलणे, स्त्रियांची छेड काढणे, अश्लील शिव्या देणे, नशेत धुंद होऊन भांडण तंटा करणे, एकमेकांच्या जीवावर उठणे, कधी कधी तर चाकूने हल्ले करणे, खून करणे, इथवर अपराध होतात. या दिवशी वातावरण असे असते की, कांही ठिकाणी स्त्रियांना घराबाहेर पडण्याची देखील भीती वाटते. होळीचे हे अनाकलनीय बीभत्स रूप आपल्या संस्कृतीत बसत नाही. या सर्वच असामाजिक वागणुकींला आळा बसायला हवा. पोलीस त्यांची ड्युटी करतातच, पण समाजभान नावाची चीज आहे ना! आपला सण साजरा करतांना इतरांच्या सुखाची आपण ‘होळी’ तर करीत नाही ना याचे स्मरण असू द्यावे.

मैत्रांनो, होळी हा सामाजिक एकात्मकतेचे प्रतीक आहे, म्हणूनच कोरड्या, सुंदर पर्यावरण स्नेही विविध रंगांचा वापर करून, वृक्षतोड न करता आणि व्यसनाधीन न होता हा राष्ट्रीय एकात्मकतेचा प्रतीक असा होलिकोत्सव आनंदाने साजरा करावा असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते ?

— लेखन : डॉ मीना श्रीवास्तव. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८