झटपट लघु कथा अर्थात थीम आहे – Irony याने की विरोधाभास..😊
“झलक – १”
“पुढच्या पंधरा मिनिटात निघतोय मी. आज एकदम महत्त्वाचं लेक्चर द्यायला जायचंय, म्हटलं होतं तुला काल. तुझा ब्रेकफास्ट रेडी नसेलच नं ?”
स्वत: उठायला उशीर करायचा मग ‘घाई’चं खापर फोडायचं घरच्या ‘बाई’वर ! शामरावांची ही तिरकस बोलण्याची सवय अंगवळणी पडलेल्या सुनंदाताईंनी शांतपणानं म्हटलं, “अहो, नस्ती चिडचिड नको, उगाच BP वाढायला कारण ! सगळं तय्यार आहे, उपमाही ‘निववून’ ठेवलाय त्यामुळे आटपेल तुमचं पटकन् नि लेक्चरला जायला अजिब्बात उशीर नाही व्हायचा.” धाडदिशी बंद करून गेलल्या दाराने शामराव बाहेर पडल्याची वर्दी दिली नि सुनंदाताईंनी आवरायला घेतलं.
बाथरूममधला एक्झॅार्स्ट फॅन नि बेसिनवरचा दिवा विनाकारण ‘चालू’ होते, त्यांना ‘बंद’ करून विश्रांती दिली. शामरावांच्या स्टडी-रूममधला फॅन मालकाशिवायच ‘सेवा’ देत होता त्याला रजा दिली.
लास्ट मोमेंटच्या टीप्स ‘गुगल’ केलेला लॅपटॅाप 😮 ’आ’ वासून चार्ज खात होता त्यालाही ‘बंद’बस्त करून ठिकाणावर ठेवलं.😊 ‘मुख्य’ म्हंजे TV नि AC चे ‘mains’ बंद केले अन् तेवढ्यात फोन खणखणला.
“हॅलो, अमोल, अरे थोडक्यात वेळ चुकली बघ तुझी. शामकाका आत्ताच बाहेर पडले. आज खूप महत्त्वाचं लेक्चर आहे म्हणाले. ‘एनर्जी कॅान्झर्व्हेशन’ ! हॅाट्ट टॅापिकै म्हणले” फोन ठेऊन सुनंदाताईंनी बेडरूमकडे मोर्चा वळवला. हमखास चालू असतील अशी खात्री असलेल्या, I-phone अन् I-pad च्या चार्जर्सची बटनं बंद करतांना ‘स्मार्ट’ सुनंदाताईंच्या चेहरयावर हलकिशी स्मितरेषा उमटली. 😊
“झलक-२”
काम आटपून अखेर रात्री साडेनवाला आली सुमेधा अन् पटापट जेवून (‘जेवण उरकूनच म्हणायला हवं खरंतर’ सुमेधाची आई मनातल्या मनात फणफणत होती.😒) स्वत:च्या रूमकडे जातांना म्हणाली, “आई, अजून एक आर्टिकल तयार करायचंय. आजच्या आजच ! “
सारखंच काम नि काम ! जेवणाच्या टेबलावर तरी संवाद होईल ह्या आशेवर रहावं तर तेव्हाही निराशा ! बरं, मान मोडून काम करतांना दिसतेय पोर तरी ‘थोडी तरी विश्रांती हवी जीवाला’ वगैरे सांगायचीही सोय नाही.
हल्लीच्या ‘गुगल-मुलांना’ ही सगळी ‘माऊली-विधानं’ रूचत नाहीत.
जेवणाचं टेबल आवरतांना ह्या अशा सगळ्या उलटसुलट विचारांनी घेरून टाकलं सुमेधाच्या आईला !!😣
रात्री साडेबारानंतर मात्र ‘न राहवून’ सुमेधाची आई शिरलीच तिच्या बेडरूममध्ये. “अगं एs बयो, वाजले किती बघ जरा ! अजून तुझं लॅपटॅापवर काम चाललंय ? झोपायचं नाही का ? कामालाही काही मर्यादा ? लेखनाचा विषय कायै ?”
“अगं आई, दिवसभरात laptop, मोबाईल, I-pad किंवा TV screen कसा कमीतकमी वापरायला हवा, झोपायच्या वेळेच्या किमान तासभर आधी screen पासून away रहायची शिस्त कशी पाळायला हवी इ. गोष्टींची मुद्देवार मांडणी करायची होती. पण आता झालं, तय्यार आहे, ‘पोस्ट’ टाकायचेय फक्त ! झोप तू, मीपण झोपते लगेच !” ‘लगेच झोपते !😳’
मऽऽग ते ‘झोपायच्या वेळेआधी किमान तासभर…. वगैरे नियंमांचं काय ?🤔 ह्या कोड्यात पडलेली सुमेधाची आई, confused अस्वस्थतेच स्वत:च्या रूमकडे वळली.😔
— लेखन : अनुजा बर्वे. मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800