१. ऋण
तो एक सावळा घन
गेला सहस्र धारा बरसून
मोती रूजता थेंबांचे
रूप डोलले कोंबांचे
पाषाण काळा कालचा
दिसे हिरव्या मखमलीचा
हिरवळीचे आगळे रंग
करी निर्झराशी संग
जागोजागी डोकावे तृण
कसे फेडू निसर्गाचे ऋण
२. मुरली
फुलता मनी आनंदांकुर
अलगद अधरा वर अधर
हळूच घालता फुंकर कानी
प्रणयसुर निनादतो रानी
करात नसता कटी बांधतो
कधी न मजला दूर सारतो
नसे रूक्खमीणी मी
नसे सत्यभामा मी
नाही हो वेडी राधा मी
सदैव ज्याच्या अधरावरली
सख्याहरीची मी मुरली
३. आठव
भेट नाही म्हणून खंतावणारे मन
क्षणाच्या भेटीला आसवले नयन
भेटीच्या आठवांचा मनी तरंग दरवळला मनी प्राजक्ती सुगंध
कळत नकळत माझ्यातच मी दंग
नुसत्या आठवांनी शहारले अंग
४. अलंकार
जिवन अंगण
मायेच रिंगण
कर्तृत्व पैंजण पायात—–
डोळ्यात डोह
स्वप्नांचा मोह
कर्माचे कंकण करात–
निंदक शेजारी
भाट सामोरी
साखर मोती गळ्यात—
भांडण तंडण
खंडण मंडण
निष्ठेच फुल कानात—
बु-याचा धिक्कार
भल्यांचा स्विकार
संस्कार बिंदी भांगात–
आयुष्य कोंदण
अलंकार भुषण
नित्य मी स्वानंदात
— रचना : शुभदा डावरे चिंधडे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
चारही कविता छान आहेत,