मला नेहमी असं स्वप्न पडायचे कि एका मोठ्या कार्यक्रमामध्ये माझं नाव अनौन्स झालंय आणि टाळ्यांच्या कडकडाटात मी तो अवॉर्ड घ्यायला जात आहे. आय मिन, मी ते अवॉर्ड स्विकारत आहे! तुम्ही एकच स्वप्न सारखं पाहिलत ना, तर एक ना एक दिवस ते स्वप्न नक्कीच पूर्ण होते.
माझ्या बाबतीत हे शक्य झाले. बिलिव्ह मी!
बेलापूर कॉलसेंटर मधील माझ्या लाडक्या मैत्रिणीं मुळे हे शक्य झाले.
सन २०१८.जागतिक महिला दिन. आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून एक दिवसीय पिकनिकला गेलो होतो.
बेलापूर कॉलसेंटरची आन बान शान ब्युटी क्वीन सुरेखा आणि सबके दिलों की धडकन गीता, चार्मिंग लक्ष्मी, सगळ्यांची लाडकी शुभदा, दमी, विजू यांनी पिकनिक अरेंज केली. स्थळ एन डी स्टुडिओ, कर्जत. मिनी बॉलिवूड. ….रिट्रो लूक फॉर ऑल.
८ मार्च २०१८ या दिवशी आम्ही खूप धमाल केली. संपुर्ण बस हास्याच्या आणि आनंदाच्या कल्लोळात न्हाऊन निघाली होती. अंताक्षरी चांगलीच रंगली. बस मध्ये दुसरा पण ग्रुप होता. तोही आमच्या मध्ये सामील झाला.
एका तासात आम्ही कर्जतला पोहोचलो. गेट वर छान स्वागत झाले.
नितिन देसाई, एन डी स्टुडिओचे सर्वेसर्वा स्वतः तेथे हजर होते.
जुन्या गाजलेल्या हिंदी चित्रपटांचे भलेमोठे फ्लेक्स बॉक्स ऑफिसवर लावण्यात आले होते.
एका मोठ्या डान्स ग्रुपने एक समुहनृत्य सादर केले.
शैलेश मधील धन्नो हैमा मालिनीची डुप्लिकेट तसेच गब्बर, शाहरुख आसरानी यांचे डुप्लिकेट्स तिकडे फिरत होते. आम्ही सगळे भारावून गेलो.
खूप मोठा परिसर होता. अर्धा दिवस फिरण्यात गेला.
आमच्या लाडक्या मैत्रिणीं रघुवीर मैडम आणि रेखा जोशी मैडम यांच्या साठी एक गाडी मागवली फिरायला कारण त्या थकु नये आणि त्यांना छान एन्जॉय करता यावे म्हणून.
जुन्या गाजलेल्या सिनेमाचे सेट जसेच्या तसे तेथे उभारले होते. मुगले आझम मधील शीशमहल त्यामध्ये अनारकलीची हुबेहूब प्रतिकृती असलेली एक मुलगी . सगळं काही अचंबित करणारे होते.
हिंदी चित्रपटात हमखास पाहायला मिळणारे कारागृह देखील होते. तिकडे आम्ही फोटोशूट केले. गीताने आणि सूरेखाने खूप मज्जा केली .
गीताचा विनोदी स्वभाव आणि सोबत आम्ही, बहार आली !
एके ठिकाणी तर छान गाव वसवले होते. घराबाहेर विहीर, आंगण, बैलगाडी अगदी गावरान घरं बांधून ठेवले होती. खूप मज्जा आली.
दुपारच्या सुमारास एका एसी हॉलमध्ये बुफे जेवण. व्हेज, नॉनव्हेज चंगळ होती.
आणि आता वेळ आली माझे स्वप्न साकार होण्याची.
तीन वाजता एका भल्यामोठ्या मंडपात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यामध्ये आपण नेहमी टीव्हीवर बघतो ती सामुहिक नाच गाणी मिमीक्री पाहायला मिळाली.
एकीने लता मंगेशकर यांच्या आवाजात गाणी म्हणून दाखवली.
सगळ्यात शेवटी बक्षीस समारंभ. एकुण ५०० महिलांमधुन फक्त ५ जणींना बेस्ट रिट्रो लूक अवॉर्ड देण्यात येणार होते. मी दुसऱ्या रांगेत बसले होते.सगळं काही जवळून बघता यावे म्हणून धावत जाऊन जागा पकडण्याच्या नादात मी जोरात आपटले.
आणि मला डायलॉग आठवला,
“कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है सिमरन!”
पहिल्या बक्षीसाची अनौन्समेंट झाली. एकीने छान मराठमोळा लूक केला होता. तिला अवॉर्ड मिळाला.
मी नेहमी प्रमाणे जोरजोरात टाळ्या वाजवल्या.
लहानपणापासून टीव्ही वर भरपूर अवॉर्ड फंक्शन पाहिले होते. आज प्रत्यक्षात लाईव्ह फंक्शन अटेंड करत होते. खूप सुखावून गेले होते. मोबाईलची बॅटरी संपतील एव्हढे फोटो काढले होते.
आणि आता तो सोन्याचा क्षण आला……..
दुसरे नाव अनाउन्स होणार तोच सुरेखा म्हणाली, जा स्मिता…..
मी म्हणाले, तु जा तुला मिळणार
आणि काय आश्चर्य माझे नाव अनाउन्स झाले.
स्मिता लोखंडे………!
माझ्या डोळ्यात पाणी आले..हसावे कि रडावे काही च कळेना. सेम टू सेम मिस इंडिया फिलिंग्ज!
मी स्टेजवर गेले. अवॉर्ड स्विकारला. सगळ्यांना धन्यवाद दिले. ऑफिसमध्ये घडाघडा बोलणारी मी! पण तिथे शब्दच फुटेना. मी धन्य धन्य झाले होते.
हा लेख लिहीण्याचे तात्पर्य.. .
करोनाचा वाढता प्रादुर्भाव. रोज सकाळी उठलं की एक वाईट बातमी ऐकायला मिळते.
आपण सगळ्यांनी आता पॉझिटिव्ह विचार करु या. चांगल्या गोष्टी आठवू या.
जे काही दिवस राहिले आहेत ते आनंदाने सकारात्मक जगु या. कोरोनाला हद्दपार करूया. सोनेरी क्षण जगु या.
– लेखन: स्मिता लोखंडे.
– संपादन: देवेंद्र भुजबळ. 9869484800.
आता खरच चांगल्या घटना आठवायची गरजच आहे