Homeकलाहलकं फुलकं

हलकं फुलकं

असा ही एक “कट” !

नुकतंच कटाच्या आमटीचं *करी ऑफ कॉन्स्पीरसी* हे भन्नाट भाषांतर वाचनात आलं. हे भाषांतर करण्याचा *कट* ज्याने किंवा जिने शिजवला त्याला 21 तोफांची सलामी. 🫡

या कटाची एक वेगळी खास कृती आमच्या घरात केली जाते. माझ्या आजी, आई यांची ही रेसिपी आहे. मी पण तशीच करते. परवा होळीला पुरणपोळ्या केल्या तेव्हा केली होतीच.

आमच्या घरात शिजणारा हा आमटीचा कट :
पुरणासाठी डाळ शिजवली की आपण कट काढून घेतोच. आमच्याकडे, म्हणजे माझ्या माहेरी, रोजच्या आमटीत चिंच कोळून घातली जाते. पण या आमटीत चिंचेऐवजी आमसूलच घातलं जातं. कोरड्या खोबऱ्याचा खोलगट वाटीसारखा तळहातापेक्षा लहान तुकडा ज्वाळेवर उलटा ठेवून पेटवायचा. तो सगळीकडून पेटला की तसा पेटताच हळूच खाली ठेवून त्याच्यावर एक लहान चमचा जिरे, दोन-चार लवंगा, बोटाच्या पेराएवढा दालचिनीचा तुकडा, हलकेच घालायचे. खोबऱ्याला लागलेली ज्वाळ विझता कामा नये की बोटही भाजता नये. त्या आगीत ते जिरे लवंग दालचिनी हलकेच भाजली जाते. त्या जळत्या कोरड्या खोबऱ्याच्या तेलाचा वेगळाच स्वाद लागतो. जिरे तडतडायला लागले की हाताने खोबऱ्याची ज्वाळ  विझवायची. त्यावर हा कोरडा मसाला अर्धा कच्चा भाजतो.तो खोबऱ्याचा तुकडा थंड होऊ द्यायचा.मग त्याचे बारीक तुकडे करायचे. तो सगळा आतला अर्धवट भाजलेला मसाला त्या तुकड्यांबरोबरच ठेवायचा. आता कटाचा महत्त्वाचा भाग. ही गनिमी चाल जेवायला बसणाऱ्या सर्व टीकाचार्यांना तोंडात बोटं घालायला लावते.

ती चाल अशी की :
विड्याची मोठी 8/9 पाने स्वच्छ धुऊन कोरडी करायची. देठे काढून टाकायची. ती तव्यावर अगर कढईत तेलावर भाजून घ्यायची. ओली पाने भाजताना तडतडून अंगावर उडू शकतात. काळजीपूर्वक भाजायची.मग वर खोबऱ्या बरोबर भाजलेला मसाला, खोबऱ्याचे तुकडे आणि तळलेली विड्याची पाने एकत्र बारीक वाटायची. हा मसाला कटात सामील करायचा. उभ्या पोट फाडलेल्या दोन हिरव्या मिरच्यांना कटात जलसमाधी  द्यायची. बरोबर कच्चा हिंग, कच्ची हळद घालायची. चवीप्रमाणे मीठ, गूळ, चिमटीभर  लाल तिखट घालायचं. खोबऱ्याचे तुकडे, काजूचे काप घालायचे.
मुख्य म्हणजे शेवग्याच्या शेंगा तुकडे करून शिजवून घालायच्या. त्याशिवाय या आमटीला प्रमाणपत्र मिळत नाही. कच्चा कढीपत्ता कटात सोडायचा आणि पळीने छान ढवळून, सगळं एकसारखं करून कट शिजायला ठेवायचा. चांगली उकळी फुटली की वरून मोहरी, जिरं, हिंग, हळद यांची चरचरीत फोडणी द्यायची.
इतर मसाल्याबरोबर विड्याच्या पानांचा खमंग स्वाद आणि सुरेख हिरवा रंग आमटीला लागतो. फोडणीनंतर उकळलेल्या आमटीच्या स्वादाने घरदार दरवळते. वाढायला किती उशीर आहे याचा अंदाज घ्यायला पुरुष वर्गाच्या स्वयंपाक घरात फेऱ्या सुरू होतात.

पानात डावीकडे लिंबाची फोड, चटणी, लोणचं, कोशिंबीर, तळण, उजवीकडे भाजी, उसळ मधोमध पांढऱ्याशुभ्र वाफाळत्या भाताच्या मुदीवर पिवळं धमक, हिंग हळद घातलेलं वरण, वर तुपाची धार आणि वाटीत खळाळ उकळलेली कटाची आमटी शेवग्याच्या शेंगा बरोबर वाढली की जठराग्नीचं यज्ञ कर्म करायला कधी एकदा सुरुवात होतीय असं होतं. घासाच्या प्रत्येक आहुती बरोबर जठराग्नी चेतत जातो आणि तृप्त ही होत राहतो.

मसाले भात, पुरणपोळी वगैरे पुढे येणारे आनंदाचे चढते क्रम.
अहो पण इथे पडद्यालाच टाळी पडते, पुढच्या प्रयोगाबद्दल काय बोलावं !

ता. क.
आम्हाला लहानपणी शेवग्याच्या शेंगांना कट म्हणतात असं वाटायचं. म्हणून या आमटीला कटाची आमटी म्हणतात अशी आमची खात्रीच होती. “आमटीतले कट वाढ,” असं आईला सांगायचो.👌😋

— लेखन : वेदवती कुलकर्णी. विलेपार्ले पूर्व, मुंबई‌.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

7 COMMENTS

  1. मस्त रेसिपी. एकदम आई च्या हातची कटाची आमटी आठवली.

  2. तुझा लेख नेहमीप्रमाणेच खूप आवडला…
    निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या पद्धतीने पदार्थ केले जातात.
    हा ‘ कट ‘ विशेष भावला तो करण्याच्या पद्धतीमुळे .
    पाडवा आलाच आहे जवळ.
    बघू मलाही तसा ‘ शिजवता ‘ येतोय का…

  3. फारच सुंदर, अप्रतीम लेख. विड्याच्या पानाचा स्वयंपाकात वापर फारच अपरिचित आहे. लेख वाचून तो गंध अर्थात “आरोमा” नाकपुड्यात झिणझिणला. इतकं दर्जेदार तरीही सहज लेखन आजकाल वाचायला मिळत नाही. लिहीत रहा.

  4. कटाच्या आमटीची पाककृती भन्नाट!! परंतू त्यात शेवग्याच्या शेंगा कां घालतात ते समजले नाही! शेवग्याच्या शेंगा त्याच्या स्वादासाठी प्रसिद्ध आहेत असं असतांना त्या कटाच्या आमटीत का घालायच्या ते कल्पनेच्या पलीकडे!
    असो, कटाची आमटी आवडतेच!
    कटाच्या आमटी वरील लेख प्रपंच ही कौतुकास्पद!!
    परंतू सांगितलेली पाककृती स्विकार्य वाटत नाही!!
    लेख नक्वी आवडला, परंतू पाककृति….
    पुराणातली वांगी पुराणातच !!
    कटाची आमटी पुरणातच आणि केवळ पुरणाची आणि खड्या मसाल्याचीच!!
    तुमचा लेख वाचून विष्णूजीच्या रसोईची आठवण झाली, तेही असंच काही हटके संगत असतात, पण ते गळी पडत नाही!! ता.क. हा लेख वाचत असताना मी पुरण पोळी आणि कटाच्या आमरीचा स्वाद घेत आहे कटाच्या आमरीत शेवग्याच्या शेंगांचा पत्ता कर केला आहे!!

    • आमच्या घरात म्हणजे माझ्या माहेरी आजी आई यांच्यापासून परंपरेनं कटाची आमटी अशीच केली जाते. त्यात शेवग्याच्या शेंगा आवर्जून घातल्या जातात आणि ही आमटी खाऊन आज पर्यंत असंख्य पाहुणे अगदी तृप्त होऊन गेलेले आहेत. ही कृती कदाचित आपल्याला माहिती नसेल पण करून बघायला हरकत नाही .कदाचित आवडू शकेल .
      आपल्या घरात केली जाणारी कटाची आमटी वेगळ्या पद्धतीने बनवली जात असेल. ती उत्तमच होत असणार आणि तुमच्या घरात सर्वांना ती आवडतही असणार यात शंका नाही .

      दुसरं म्हणजे ही *पुराणातली वांगी* नाहीत. पुराणात “वांगी” नसतात तर “वानगी” असते. पुराणातील दाखले पुराणातच शोभतात यासाठी “पुराणातील वानगी पुराणातच” असे म्हणायची पद्धत आहे. तथापि लोक चुकीने पुराणातील वांगी म्हणतात. कदाचित त्याची भाजी ही करत असतील. लोकांच्या या अज्ञानाबद्दल आपण काय बोलणार?
      या वर्षीची होळी सुद्धा माझ्या घरात अशाच कटाच्या आमटीने पुरणपोळी बरोबर साजरी झाली…….पुराणातल्या नव्हे सत्यातल्या या कृतीच्या कटाच्या आमटीने !

  5. कटाची आमटीची खास पाककृती म्हणजे कटाची आमटीची खासीयत नजरेत भरते!! कटाच्या आमटीत शेवग्याच्या शेंगा घालतात हे नव्याने समजले! पण त्या मुद्दामून कटाच्या आमटीत कां घालतात ते काही समजले नाही कारण शेवग्याच्या शेंगाचा स्वाद काही औरच असतो!! असो जितकी माणसं तितकी डोकी!!
    कटाची आमटी आवडतेच , लेखही आवडला परंतु पाककृती
    पचनी पडली नाही!!

  6. तु छान लीहीतेसच फक्त वेगळ्या जागी व परीमाणा नुसार वाचायला हवं इतकंच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments