महानुभाव पंथातील पहिल्या ‘पद्मश्री पुरस्कार’ प्राप्त कै. सिंधुताई सपकाळ यांना महानुभाव पंथियांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. पुण्यात त्यांच्या पार्थिवाला भुमीडाग दिल्यानंतर नागपुरात आचार्यप्रवर महंत श्री न्यायंबासबाबा यांच्या अध्यक्षतेत शोकसभा घेण्यात आली.
महानुभावांतर्फे पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल सिंधुताईंचा नागरी सत्कार आयोजित करण्यात येणार होता. त्याला माईंनी होकरही दिला होता; कोरोनामुळे तो पुढे घ्या अशी सुचना त्यांनी आयोजकांना केली होती, ही माहिती बाबांनी देऊन त्यांच्या ४० वर्षांपासूनच्या आठवणी सांगितल्या.
सामाजिक कार्यकर्ते हरिहर पांडे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, जानेवारी २०१४ ला पारशिवनी जवळील करंभाडच्या ‘महाचिंतनी’त त्यांनी महिलांना केलेल्या उपदेशाची परिसरात सतत चर्चा होत असते. त्यांना अनेकदा भेटण्याची संधी प्राप्त झाली. त्यांच्यातील मायपणा चिखलदरा येथे अनुभवता आला.
महानुभाव पंथ संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विचारांशी एकरूप होऊन निष्काम समाजसेवा माईंनी केली. स्वामींनी सांगितलेला सत्य, अहिंसा हा उपदेश आपल्या भाषणांमध्ये त्या सतत करीत असत. माहेर नसलेल्यांचे माहेर असलेल्या रिद्धपूरचे भगवान श्री गोविंदप्रभूंच्या विचारांचा मोठा प्रभाव त्यांच्यावर होता.
सिंधूताईंचा जीवन परिचय प्राचार्या दीपा हटवार यांनी सांगितला. माईनी वर्धा जिल्ह्यात माळेगाव ठेका येथे श्रीकृष्ण मंदिराची उभारणी करीत अनन्य भक्तीचा संदेश समजाला दिला. त्यांनी एका कार्यक्रमात ‘श्रीचक्रधरांनी जीवाला लावलेलं वेड’ या गीतातून उपस्थितांना परमेश्वरीय भक्तीबद्दल त्यांच्या मनात असलेला जिव्हाळा व्यक्त केला होता अशी आठवण तपस्विनी पुष्पाताई विराट यांनी काढली.
कै. सिंधुताईंना परमेश्वर प्रेमदान देवो, अशा शब्दात स्वागत नगर येथील सर्वज्ञ श्रीकृष्ण मंदिरात (न्यू नरसाळा रोड, नागपूर) श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी तपस्विनी पुष्पाताई विराट, तपस्विनी बेबीताई विराट, महात्मा भूषणशास्त्री न्यायंबास, साक्षीताई विराट, निरंजनमुनि न्यायंबास, श्रीकृष्ण सेवा मंडळाचे चंदू वैद्य, सुरेश वाइंदेशकर, यशवंत करडभाजने, रत्नाकर पोतदार, संदीप यावले, सुनील मानपुरे, प्राचार्य दीपा हटवार, सिमा वैद्य आदी मंडळींनी श्रद्धांजली अर्पण केली.
– लेखन : हरिहर पांडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800