Wednesday, March 12, 2025
Homeलेखअमीट नीला सत्यनारायण

अमीट नीला सत्यनारायण

भारतीय प्रशासकीय सेवेबरोबरच कला, साहित्य, संस्कृती, गीत, संगीत अशा विविध प्रांतांमध्ये स्वतःचा अमीट ठसा उमटविलेल्या नीला सत्यनारायण मॅडम यांचं कोरोनामुळे गेल्या वर्षी १६ जुलै रोजी धक्कादायक निधन झालं. आज त्यांचा प्रथम स्मृतिदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनाचा आलेख, त्यांच्या सोबत काम करतानाच्या या काही आठवणी…

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात २००० साली मी कोकण विभागाचा माहिती उपसंचालक म्हणून कार्यरत होतो. त्या दरम्यान, सामान्य प्रशासन आणि माहिती व जनसंपर्क विभागाच्या प्रधान सचिव तथा महासंचालक म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी नीला सत्यनारायण मॅडम यांनी सूत्रे हाती घेतली. काही व्यक्ती अशा असतात की, त्यांच्याभोवती एक वलय असतं. असं वलय लाभलेल्या व्यक्तींमध्ये मॅडम अग्रणी होत्या.

मॅडमची एक कडक, शिस्तप्रिय, कणखर, निश्चयी अधिकारी म्हणून जशी प्रतिमा होती, तशीच एक संवेदनशील कवी, गीतकार, लेखक, कला रसिक म्हणून त्यांची प्रतिभा होती. एकाच व्यक्तीत अशी परस्पर विरोधी व्यक्तिमत्वे कशी असू शकतात ? याचं मला आश्चर्य वाटायचं. म्हणूनच मॅडमची आमच्या विभागात नेमणूक झाल्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळेल याचा मला आनंद झाला. त्यावेळच्या त्यांच्या मार्गदर्शनाचा, धाडसाचा, नवनवीन कल्पना उचलून धरून त्यांना केवळ तोंड देखलं नव्हे तर पूर्ण पाठबळ देण्याचा प्रत्यय मला येत गेला.

रत्नागिरी येथे २००० साली झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी विकास प्रदर्शन आयोजित करणे, बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांवर आधारित  “कोकण विकास : नवी दिशा- नवी आशा” हा दूरदर्शन माहितीपट, याच नावाची रंगीत चित्रमय पुस्तिका अशा अनेक कल्पक बाबी मला त्यांच्या भरघोस प्रोत्साहनामुळे करता आल्या.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोकण विकासावरील माहितीपट दाखवण्याचा त्यांचा निर्णय म्हणजे त्यांचे खूप मोठे प्रशासकीय धाडस जसे होते. तसाच तो स्वतःवरील, आपल्या सहकाऱ्यांवरील विश्वासही होता.

अशा एक ना अनेक बाबींमुळे, दैनंदिन कामकाजामुळे, बैठका, दौरे यातून मॅडमचं व्यक्तीमत्व उलगडत गेलं, अधिकाधिक भावत गेलं.

खरं म्हणजे, महाराष्ट्र राज्यात गेल्या २०/२५ वर्षात स्पर्धा परीक्षा, प्रशासकीय सेवा या विषयी आकर्षण वाढत आहे, ही समाधानाची गोष्ट आहे. असं असलं तरी मॅडम ज्यावेळी भारतीय प्रशासकीय अधिकारी झाल्या त्यावेळी असे वातावरण नव्हते. त्या या सेवेकडे वळल्या ती त्यांच्या पोलीस अधिकारी असलेल्या वडिलांची इच्छा होती म्हणून.

भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. इंग्रज अधिकारी भारत सोडून जाऊ लागले. प्रशासनात पोकळी निर्माण होउ लागली. त्यामुळे आपल्या मुलांपैकी कुणी तरी भारतीय प्रशासकीय अधिकारी व्हावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती.

दरम्यान, मॅडम इंग्रजी साहित्य घेऊन दिल्ली विद्यापिठातून बी.ए तर पुणे विद्यापिठातून एमए झाल्या. भारतीय स्टेट बँकेच्या अधिकारी आणि भारतीय प्रशासकीय अधिकारी अशा दोन्ही स्पर्धा परिक्षात त्या निवडल्या गेल्या. त्याकाळी बँकेची नोकरी अधिक आकर्षक होती तर प्रशासकीय नोकरी खडतर होती. पण वडिलांच्या इच्छेला मान देऊन त्या जुलै १९७२ मध्ये भारतीय प्रशासकीय अधिकारी म्हणून भारत सरकारच्या सेवेत दाखल झाल्या.

या सेवेत मॅडमनी सहायक जिल्हाधिकारी – नागपूर, उपविभागीय अधिकारी – भिवंडी, अतिरिक्त जिल्हाधिकारी – ठाणे, पुढे मंत्रालयात समाज कल्याण, सांस्कृतिक विकास व युवा कार्य, अन्न व नागरी पुरवठा, पर्यटन, वस्त्रोद्योग, महिला व बालविकास, सामान्य प्रशासन आणि माहिती व जनसंपर्क, गृह, महसूल व वने आदी विभागात सचिव, प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव अशा चढत्या श्रेणीने स्वतःचा ठसा उमटवत पदे भूषविलीत.

राज्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची पाच वर्षांची कारकीर्द लक्षणीय ठरली. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त होण्याचा मान त्यांना मिळाला. या काळात महिला लोकप्रतिनिधींनी सक्षमपणे काम करावं यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले.

मॅडमची प्रतिभा म्हणजे आजवर त्यांची ३५ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यात १२ ललित पुस्तकं, ९ काव्य संग्रह, काही प्रेरणा दायी, काही अनुवादित पुस्तकांचा समावेश आहे. त्यांच्या २ कथांवर चित्रपट निर्माण झाले आहेत. काही प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. १० संगीत सीडी प्रकाशित असून काही चित्रपट, दूरचित्रवाणी मालिकांसाठीही त्यांनी गीतलेखन केलं आहे.

मॅडमनी, त्यांचा गतिमंद मुलगा चैतन्य वर ओतप्रोत प्रेमाने लिहिलेलं “एक पूर्ण अपूर्ण” हे स्वानुभवातून लिहिलेलं पुस्तक तर उद्योजक पती सत्यनारायण सर यांच्या जीवनावर लिहिलेलं “सत्य- कथा” ही पुस्तकं नुसतीच गाजली नाही तर पालकांना, युवकांना सतत प्रेरणा देणारी आहेत. ही दोन्ही पुस्तकं मी स्वतःही वाचली आहेत. सुदैवानं “सत्य -कथा” माझ्या संग्रही आहे. त्यांची कन्या अनुराधा गरजूंना समक्ष समुपदेशन करून समाज सेवा करतेय.

मॅडमनी आयुष्यभर काही नियमांचे अत्यन्त काटेकोरपणे पालन केले. जे मी स्वतः पाहिले, अनुभले आहेत. हे नियम आपणही नेहमीच पाळले पाहिजेत.

काही नियम म्हणजे कार्यालयीन वक्तशीरपणा, शिस्तबद्धता, नियमांचं काटेकोर पालन, रविवारचा दिवस कुटुंबासाठीच देणें, आपल्या आवडी, छंद कार्यालयीन वेळेत नव्हे तर त्यानंतर घरी, किंवा सुट्टीच्या दिवशी जोपासणे अशा कितीतरी बाबी सांगता येतील.

मॅडम, परिवरा समवेत

प्रशासकीय सेवेत येणाऱ्या तरुण तरुणींनी शासकीय सेवा ही निरंकुश सत्ता नसून लोकसेवा आहे, याचं सतत भान ठेवलं पाहिजे असं मॅडमना मनापासून वाटायचं. कोरोनाच्या या काळात मॅडमनी केलेली एक कविता येथे देत आहे…

भय
मला भय वाटत नाही,
बंदिस्त जगण्याचं,
भय वाटतं
आजूबाजूला मिटत जाणाऱ्या
जगाचं –
उद्याची अशाश्वती
आणि वर्तमानातली
अस्वस्थता,
मरूही देत नाही
आणि बळही देत नाही
जगण्याचं……….

– नील

आजच्या तरुण तरुणींनीच नव्हे तर आपण सर्वांनी ही त्यांचा असीम आदर्श ठेवला पाहिजे. मॅडमना, भावपूर्ण श्रद्धांजली.

– देवेंद्र भुजबळ. 9869484800.

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. मॅडम बद्दल थोडक्यात पण उत्तम माहिती सांगितली आहे सर तुम्ही

  2. अमीट नीला सत्यनारायण madam च्या प्रथम स्मृतिदिनास भावपूर्ण श्रद्धांजली.🙏जेष्ठ सहकारी madam ची नियमबद्धता व त्यांच्या अंगी असलेल्या अनेक प्रतिभा, हया सगळ्याचे वर्णन भुजबळ सरांनी सुंदर मांडले आहे. धन्यवाद!

  3. मॅडम बाबत खुप छान व विस्तृत माहिती दिली सेर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित
सौ.मिनल शशिकांत शिंदे, on चित्र भाषा संमेलन : अभिनव उपक्रम