१. जय भारतमाते
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
मी आज पाहिला डोळा
गत आठवणींनी
माझा उर भरुनी आला
स्वातंत्र्य लढ्याची
मी एक साक्षीदार
वय माझे अठ्यायशी
तेव्हा मी होते बालशिलेदार
प्रभात फेरीतील घोषणा आजही स्मरणात
“अंग्रेजो भारत छोडो” अन “चले जाओ” चळवळ जोमात
स्वातंत्र्यासाठी लढत होते महक्रांतिवीर
भोगत होते “आजन्म कारावास” वीर सावरकर
नाही मिळाले स्वातंत्र्य, हे बलिदानावीण
म्हणुनी फडकला आज तिरंगा घराघरातून
त्या क्रांतीवीरांचे आठवावे जन्मोजन्मी ऋण
त्यांच्या चरणी त्रिवार वंदन माझे भाग्य महान
भारतमाते तुला मागते एकच वरदान
आम्हास देई असे महावीर जे नेतील तिरंगा “अटकेपार”

– रचना : नलिनी कासार. पुणे.
२. मी तिरंगा बोलतोय
आज केलं प्रेम उद्या, उतू जाणार नाही ना ?
रस्त्यावर मला तुम्ही, फेकून देणार नाही ना ?
आज पाहून गौरव माझा, मन आले भरून
आता पर्यंत स्वप्ने मी, पाहत होतो दुरून
दिडशे वर्षे गुलामीने, खूप रसातळी नेले
बलिदानी हुतात्म्यांनी, पुन्हा स्वतंत्र दिले
फासावर चढले कोणी, कोणी सांडले रक्त
अगणित गोळा झाले, स्वातंत्र्यासाठी भक्त
स्वातंत्र्याचा मनामध्ये, सदा असावा अभिमान
नाही तर शुरविरांचे, व्यर्थ जाईल बलिदान
एक दिवस गेला उद्या, विसरून जाऊ नका
पुन्हा मला रस्त्यावर, फेकून देऊ नका
माझा अभिमान मला, सैनिकात दिसतो
म्हणून मी सैनिकांच्या, सोबतच असतो
श्वास होऊन त्यांचा, मी बर्फामध्ये चालतोय
आज तुमच्या सोबत मी, तिरंगाच बोलतोय

– रचना : रामदास आण्णा
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
३. रंग एकात्मतेचा
स्वातंत्र्य मिळविले
निष्ठावान देशभक्तांनी
एकाच ध्यासासाठी
रक्त सांडले कित्येकांनी
पण झाकले गेले मुलायम अहिंसा वेष्टनांनी
अन् वेदनामय फाळणी सावरले एकमेकां त्यातूनी
शर्यत लागण्यास वर्णी मंत्रीपदी
निष्ठावान दुर्लक्षिले मात्र त्यांनी देशाची प्रगती धीमी
प्रयास करिती मूठभर ज्ञानी
समृद्ध वटवृक्ष तो पोखरला भ्रष्टाचाऱ्यांनी
अवतरले योगी पुरुष
अखेर या पावन भूमीवरी
चतुरस्त्र आज प्रगत
लहानथोर पुन्हां उद्युती
लखलखती आज देश हिऱ्यावाणी साऱ्या जगती
भारतीय हीच देशांत प्रत्येकाची जात, धर्म आहे म्हणूनच घराघरांत तिरंगा फडकत आहे
अमृत महोत्सवी स्वातंत्र्याच्या जगात कोठेही असे
‘मी भारतीय’ आनंदे, अभिमाने म्हणे
निष्ठा, अस्मिता, एकात्मतेचा रंग तिरंग्यात एकवटला आहे
या रंगाने रंगुनी भारत अद्वितीय ठरू दे जगीं
शुभेच्छा माझ्या साऱ्यांस स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी !

– रचना : नीला बर्वे. सिंगापूर
सर्व सुंदर कविता आहे