Thursday, September 18, 2025
Homeलेखअवती भवती (१)

अवती भवती (१)

या वर्षीच्या नवीन सदरांपैकी दर गुरुवारी प्रसिध्द होणारे एक नवीन सदर म्हणजे, आजचे ‘अवती भवती’ हे सदर आहे.

हे सदर श्री प्रकाश मोरेश्वर चान्दे लिहिणार आहेत. त्यांचा अल्प परिचय पुढे देत आहे.

रायगड जिल्ह्यातील महाड येथे जन्म व शालेय शिक्षण झाल्यानंतर श्री चांदे यांनी मुंबईच्या प्रख्यात व्हीजेटीआय इंजिअरिंग कॉलेज मधून मेकॅनिकल पदविका घेतली. पुढे जवळपास ५० वर्षे त्यांनी औद्योगिक क्षेत्रात विविध पदांवर काम केले.

श्री चांदे यांचे वाचन, प्रवास, हिन्दी – मराठी चित्रपट पहाणे, साहित्यिक कार्यक्रमांना हजेरी, चर्चा, गप्पा, पत्रलेखन असे छंद आहेत. आत्मचरित्रे हा त्यांचा आवडीचा प्रकार असून आजवर त्यांनी सुमारे 1,000 आत्मचरित्रांचे वाचन केले आहे.

कंपनीच्या कामानिमित्ताने आणि वैयक्तिक आवडीमुळे त्यांनी भारतात भरपूर भ्रमण केले आहे. त्यांचे साहित्यिक आणि हिन्दी – मराठी चित्रपट सृष्टीवर वर्तमान पत्रे आणि दिवाळी अंकांतून सुमारे दीडशेच्यावर लेख प्रसिद्ध झाले आहेत.

श्री चांदे यांची, 1) ‘चंदेरी सृष्टी सोनेरी गोष्टी‘, 2) आठवणी – मोठ्या आईच्या‘, 3) ‘अभिनेता विवेक’ चरित्र (सह लेखक) ही पुस्तके प्रकाशित झाली असून अजून 3 पुस्तके होतील, एव्हढे त्यांचे लेखन आहे.

श्री चांदे यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात हार्दिक स्वागत आहे.
– संपादक

स्त्री पुरुष संबंध !
आपण मध्यमवर्गीय माणसं स्त्री पुरुष संबंधात खूप हळवे आणि संवेदनशील असतो. जरा नीतीला धक्का लावणारं वर्तन दिसलं की, आपण अस्वस्थ होतो ! त्या मानानं तथाकथित खालच्या वर्गातील स्त्री पुरुष या बाबतीत खूपच मोकळे आणि व्यावहारिक असतात !
नाही पटत ?
मग ऐका तर हे काही प्रसंग !
‘कोरो’ संघटनेची कार्यकर्ती, सुजाता खांडेकर ही प्रामुख्यानं मानखुर्दच्या झोपडपट्टीतील स्त्रियांच्यांत कार्य करत होती.

हिचं ‘ग्रंथाली‘ प्रकाशित पुस्तक ‘आशेवीण आशा‘ मी 1990 च्या दशकात वाचलं आणि त्यातील दोन प्रसंग मला चक्रावून गेले !

या पुस्तकात सुरवातीलाच एक प्रसंग आला आहे.
त्या झोपडपट्टीत व्याजानं पैसे देण्याची सावकारी, लायसन्स न घेता, एक बाई करत असे. अशा व्यवहारांत व्याजाचे दर वार्षिक 35 – 40 % असे छाती दडपवून टाकणारे असत ! हे दर इतके चढे असत की, ऋणको वर्षानुवर्षे व्याजच फेडत बसे. मूळ मुद्दल तो फेडूही शकत नसे. अगदी शंभर रुपये मुद्दल असले तरी दरमहा त्याचे पंचवीस रुपये व्याजाचे दिले की, ऋणकोकडे मुद्दल फेडण्या इतके पैसेच उरत नसत.

एका ऋणको बाईनं असंच मुद्दल फेडून टाकलं; मात्र, तिच्याकडे व्याज फेडण्या इतके पैसे नव्हते. कबूल करूनही तिला व्याज फेडण्याइतके पैसे जमवता आले नाहीत. ही गोष्ट धनको बाईच्या लक्षात आली.

शेवटी ‘उदारपणे‘ ती ऋणको बाईला म्हणाली की, तुला व्याज फेडता येत नाही ना; मग आठ दिवस माझ्या नवऱ्याबरोबर ‘झोप‘ म्हणजे ते ‘पैसे वसूल’ झाले असं मी समजेन !

असाच दुसरा एक प्रसंग, सुजाता खांडेकरनं नोंदवला आहे.
एकदा दुपारी चारच्या सुमारास सुजाता एका झोपडीवरून चालली होती. तिच्या ओळखीची एक स्त्री त्या झोपडीच्या दारात उभी होती. तिनं सुजाताला चहा प्यायला बोलावलं.

ती चहा करत होती तेव्हा काही तरी बोलायचं म्हणून, सुजातानं त्या बाईचे यजमान कुठे गेले आहेत असं विचारलं. ‘त्यानं बलात्कार केला असा शेजारच्या बाईनं त्याच्यावर न्यायालयात दावा लावल्यामुळे आणि त्या दाव्याची तारीख आज असल्यामुळे तो आत्ता न्यायालयात गेला आहे‘, असं त्या बाईनं स्टोव्हला पिन करत निर्विकारपणे सांगितलं !

सुजाता खांडेकरच हे ऐकून अस्वस्थ झाली !

माझाही एक अनुभव सांगण्यासारखा आहे.
मी राहतो त्या भागात साधारण पन्नाशीची केळेवाली बाई केळी विकते. आठवड्यातून एक दोनदा मी या बाईकडून केळी विकत घेत असे. एकदा जवळ जवळ 15 दिवस ती बाई तेथे दिसली नाही.

ती परत आल्यावर कोठे गेली होती असं मी तिला विचारलं. तिनं आजीचं निधन झालं, तिच्या ‘दिवसां‘ ना ती गेली होती, असं सांगितलं. या बाईचं साधारण पन्नासच्या आसपास वय होतं हे पाहून मी, आजीच वय किती 75 – 80 होतं का, असा प्रश्न विचारला. ती म्हणाली की, ‘नाही. आजीचं वय 56 – 57 होतं’.

हे ऐकून मी विचार केला की आजी, तिच्या वडिलांची/ आईची लहान मावशी/आत्या/मामी असेल.

माझ्या चेहेऱ्यावरचा गोंधळ पाहून ती शांतपणाने बोलू लागली.

‘आजी म्हणजे तिची सवत ! तिच्या नवऱ्याची पहिली बायको’.

तिला मूल होईना, म्हणून त्या नवऱ्यानं दुसरं लग्न हिच्याशी केलं. हिला मुलं बाळं झालं. ती पहिली बायको याच घरात राहत होती; आणि तिचा पूर्ण कुटुंबावर ताबा होता. हिची मुलं तिला आई, आणि त्यांची मुलं हिला आजी म्हणू लागली. म्हणून सर्वच जण तिला आजी म्हणू लागले. ही दुसरी बायकोही तिला आजी म्हणू लागली !

त्या ‘आजीचं’ निधन झालं होतं, म्हणून तिच्या ‘दिवसां’ ना ही बाई गेली होती !
ज्या निर्विकारपणे ती सांगत होती ते ऐकून मीही अस्वस्थ झालो !
नंतर मी सिक्सर मारला; पण तो एका वर्षानं !
माझी स्मरणशक्ती चांगली असल्यामुळे या तारखा मी लक्षात ठेवल्या. एक वर्षानं ही बाई परत 4 – 5 दिवस केळी विकायला नव्हती.

ती परतल्यावर मी तिला म्हटलं की, मावशी, आजीच्या ‘वर्ष श्राद्धाला‘ गेला होतात का ?
ती थक्क होऊन माझ्याकडे बघू लागली !

प्रकाश चांदे.

– लेखन : प्रकाश चांदे. डोंबिवली
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. नमस्कार सर🙏 सर्व प्रथम “अवती भवती” या आपल्या नवीन सदराला शुभेच्छा 💐💐 आजच्या सदरातील तीनही घटना चक्रावणाऱ्या आहेत कारण अशा घटनांना आपण अनभिज्ञ असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा