किर्लोस्कर कुटुंबीय हे खरं तर महाराष्ट्रीय कुटुंब. यांचं मूळ आडनाव कोनकर. पण ते कर्नाटकात गुर्लहोसूर येथे स्थायिक झाले. अर्थात, नंतर ही सर्व मंडळी महाराष्ट्रात आली; आणि त्यांचं कर्तृत्व चहु अंगांनी फुललं !
डॉ. वा. का. किर्लोस्कर आणि ल. का. किर्लोस्कर हे 19 व्या शतकाच्या अखेरच्या काळातील दोन नामवंत बंधु. डॉ. वा. का. किर्लोस्कर हे सोलापूर येथे वैद्यकीय व्यवसाय करत असत. ते त्या काळातील नामवंत डॉक्टर होते. यांचा मुलगा म्हणजे शंकरराव किर्लोस्कर ( शं.वा.कि.).
यांनी किर्लोस्करांच्या किर्लोस्करवाडीच्या कारखान्यात महत्त्वाचं पद तर भूषवलंच; शिवाय विसाव्या शतकातील तिसऱ्या दशकापासून पुढे महाराष्ट्रातील साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक संचितात लक्षणीय आणि पुरोगामी भर टाकली. हे चित्रकार तर होतेच; शिवाय, त्यांनी ‘ यांत्रिकाची यात्रा ‘ हे ल. का. किं.चं वाचनीय चरित्र आणि ‘ शंवाकीय ‘ हे आत्मचरित्र लिहिलं आहे.
त्यांनी ‘ किर्लोस्कर ‘ (मूळ नाव ‘ किर्लोस्कर खबर ‘), ‘ स्त्री ‘ आणि ‘ मनोहर ‘ अशा तीन वैशिष्ट्यपूर्ण मासिकांची स्थापना करून ती आर्थिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक अंगांनी फुलवली. या तीन मासिकांनी 1930 पासून मध्यम वर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबांचे भावविश्व बहरण्यास आणि विस्तारित होण्यास मोलाचा हात भार लावला.
यांना दोन मुलं. एक मुकुंदराव आणि दुसऱ्या मालतीबाई.
मुकुन्दरावांनी शं.वा.किं. नंतर या तीन मासिकांची धुरा वाहिली; आणि ती तीनही मासिकं अग्रगण्य मासिकं झाली. यांनीही महाराष्ट्रातील साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणात मोलाची भर टाकली. ‘ मनोहर ‘ साप्ताहिक झाल्यावर त्यात पूर्ण वेळ चळवळीत कार्य करणारे डॉ. अनिल अवचट, निळू दामले यांच्यासारखे लेखक लेखन करत. ते नोकरी / व्यवसाय करत नसल्यामुळे त्यांना इतर लेखकांपेक्षा 5 पट मोबदला, याची जाण ठेवून, मुकुंदराव देत असत; असं प्रख्यात मुलाखतकार आणि त्या वेळेस ‘ मनोहर ‘ मध्ये काम करत असलेल्या सुधीर गाडगीळनं लिहून ठेवलं आहे !
मालतीबाई या एम. ए. होऊन ‘ डेक्कन एजुकेशन इनस्टिटयूट ‘ च्या महाविद्यालयांत मराठीच्या नामवंत प्राध्यापिका म्हणून प्रसिद्ध पावल्या. यांनी मोजकीच पण लक्षणीय पुस्तकं लिहिली आहेत.
1999 पासून त्यांच्या निधनापर्यंत मी मालतीबाईंच्या नित्य संपर्कात होतो. सांगलीला गेलो की, त्यांना भेटल्याशिवाय मला चैन पडत नसे.
डॉ. वा. का. किर्लोस्करांचे दुसरे बंधु लक्ष्मणराव किर्लोस्कर. (‘ ल.का.कि.’)
हे अभियंता होते. ते 1890 च्या दशकात ‘ VJTI ‘ या मुंबईतील अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्थेत प्राध्यापक होते. यांना डावलून त्यांच्या हाताखालच्या व्यक्तीला वरची जागा दिल्यावर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला; आणि बेळगावला जाऊन भारतात नुकत्याच आलेल्या दुचाकी (सायकल) विक्रीचं दुकान काढलं.
‘ आमच्याकडून सायकल विकत घेतल्यास स्वत: लक्ष्मणराव तुमच्या गावी येऊन सायकल शिकवतील ‘, अशी त्यांची जाहिरात असे; असं ‘ प्रबोधन ‘ कार ठाकऱ्यांनी आत्मचरित्रात लिहिलं आहे.
यथावकाश त्यांनी शेतीला लागणाऱ्या नांगराची निर्मिती सुरु केली. ती भरभराटीला आणली.
यांना चार मुलगे. त्यापैकी शंतनुराव हे सर्वांत ज्येष्ठ, अत्यन्त देखणे, उत्तम वेशभूषा करणारे, बुद्धिमान आणि चौफेर बुद्धिमत्ता असलेले. यांनी अमेरिकेतील ‘ MIT ‘ या जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्थेतून अभियांत्रिकी पदव्या घेतल्या.
भारतात कित्येक राज्यांत यांनी विविध औजारे निर्मितीचे कारखाने स्थापन करून किर्लोस्कर समूह हा भारतात टाटा, बिर्ला यांच्या बरोबरीनं स्थान पटकावणारा समूह झाला. यांच्या लेथ्स अमेरिकेत अतिशय लोकप्रिय होत्या; आणि यांनी 1962 साली जर्मनीत ‘ शुले ऑईल इंजिन्स ‘ हा कारखाना विकत घेतला.हे अनेक कंपन्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक होते.
यांची मुख्य ओळख म्हणजे महाराष्ट्रात ‘ ठेविले अनंते तैसेची राहावे “ (म्हणजे प्रामुख्यानं गरीबीत !) या लोकप्रिय उक्तीस छेद देऊन चांगल्या आणि प्रामाणिक मार्गांनी भरपूर पैसा कमवावा आणि त्याचा उपभोग घ्यावा असं; असं वारंवार प्रतिपादन केलं. तसंच, मराठी लोकांनी ‘ स्वामिनिष्ठ ‘ होण्याची वृत्ती सोडून ‘ स्वत:च स्वामी व्हावं ‘ असं ते आग्रहानं बिम्बवीत असत ! यांनी महाराष्ट्राच्या विविध अंगात लक्षणीय कर्तृत्व नोंदवलं.यांनी अक्षरश: किर्लोस्करांचा ‘ वेलु गगनावरी नेला ! ‘
शंतनुराव हे द्रष्टे होते. त्यावेळेस भारतात कारखानदारी भरभराटीला आलेली नव्हती. मात्र, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रत्येक राज्यानं कारखानदारीस प्रोत्साहन दिलं; आणि विविध सवलती देऊ केल्या. त्यांचा अचूक फायदा घेत त्यांनी भारतातील अनेक राज्यांत किर्लोस्कर समूहाच्या कारखान्यांची स्थापना केली. विशेष म्हणजे, कित्येक राज्यांत असे कारखाने स्थापन करणारे ते पहिले उद्योजक होते.ते नवीन कारखानदाराला सर्वतोपरी साहाय्य करत असत.शंतनुराव हे अत्यंत व्यावसायिक होते.
शंकररावांनी मासिके सुरु केली, तेव्हा शंतनुरावांनी त्यांना तीन मोलाच्या गोष्टी सांगितल्या :
एक म्हणजे एकही अंक विकला गेला नाही तरी मासिकाला तोटा झाला नाही पाहिजे, इतक्या जाहिराती दरमहा मिळवाव्यात;
कुठलीही सबब न सांगता मासिक ठरलेल्या दिवशी प्रकाशित झालंच पाहिजे, आणि प्रत्येक लेखकाला मानधन दिलं गेलंच पाहिजे.
त्यावेळेस या मासिकांची छपाई किर्लोस्करवाडी सारख्या छोट्या गावात आणि खिळे जुळवून छपाई करणाऱ्या ट्रेडल यंत्रावर होत असल्यामुळे ही मासिके प्रत्येक महिन्याच्या 1, 15 आणि 20 तारखांना प्रकाशित होत. या तारखा कधीही चुकवल्या गेल्या नाहीत. त्या वेळेस लेखकाला मोबदला पाठवला जायचा तो मनी ऑर्डरनं. किर्लोस्कर मंडळी तशी पैशाच्या व्यवहारात अत्यंत काटेकोर असल्यामुळे मोबदला पाठवताना तो मनी ऑर्डरचं कमिशन कापून पाठवला जायचा ! त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर, प्रा. ना. सी. फडके यांच्या रोजनिशींत किर्लोस्कारांकडून 14 रुपये 12 आणे मोबदला मिळाला; अशा नोंदी आहेत !
शंतनुराव हे अत्यंत लोकप्रिय होते. त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचं लोकांच्या मनावर एव्हढं गारुड होतं की, आ. अत्र्यांनी त्यांच्या ‘साष्टांग नमस्कार ‘ या पहिल्या नाटकात एका तरुण पात्राचं नाव ‘ शंतनु ‘ ठेवलं आहे. तसेच, किर्लोस्करवाडीत सुरवातीचं आयुष्य गेलेल्या देखण्या श्रीकांत मोघेनं त्याच्या मुलाचं नाव शंतनु ठेवलं आहे !
शंतनुरावांना नव्वदी पार करण्या इतकं दीर्घायुष्य मिळालं. ते शेवटपर्यंत कार्यरत होते.
मात्र, त्यांच्या दोन्ही मुलांचं, मुलांच्या पन्नाशीत, अकाली निधन झालं; हा त्यांना बसलेला मोठाच धक्का होता. पण ते दु:ख पचवून त्यांनी त्यांच्या सुनांना महिन्याभरात कार्यालयात जाऊन काम करण्यास उद्युक्त केलं.
विश्वनाथ प्रताप सिंग हे पंतप्रधान असताना काही व्यावसायिकांवर धाडी घालण्यात आल्या होत्या; त्यांत ‘ किर्लोस्कर समूहा ‘ वरही धाड टाकण्यात आली होती. तसंच, त्या काळात त्यांच्या एका मंत्रालयातील कामासाठी शंतनुरावांना 4 – 5 तास खोळंबून ठेवण्यात आलं होतं.
याचा महाराष्ट्रात जाहीर निषेध झाला होता; आणि ना. ग. गोरे यांच्यासारख्या कट्टर समाजवादी नेत्यानंही याचा निषेध केला होता.
हे शंतनुरावांच्या कार्याचं नि:संशय फलित होतं !
अण्णासाहेब किर्लोस्करांमुळे मराठी नाटकं बहरली आणि ल.का. किर्लोस्करांमुळे मराठी उद्योग जग बहरलं !
जाता जाता……
‘ किर्लोस्कर खबर ‘ नावातून ‘ खबर ‘ हा अमराठी शब्द गाळावा, असं त्यातून नियमित लेखन करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सुचवलं.
नंतर कर्मवीर झालेले शिक्षण महर्षी भाऊराव पाटील हे काही दिवस किर्लोस्कर इंजिनांच्या विक्री विभागात नोकरी करत होते; असं शं. वा. कि. आणि पां. चिं. पाटील — थोरात यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे.
ल. का. किं.च्या पश्चात त्यांच्या एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमात 6 – 7 वक्ते होते. व्यासपीठावर शंतनुराव होतेच. एका वक्त्यानं, शंतनुरावांची स्तुती केली. मग पाठोपाठच्या वक्त्यांनी त्याचीच री ओढत शंतनुराव किती मोठे आहेत (ते तसे, निश्चीत, मोठे होतेच !) याबद्दलच बोलू लागले.
चाणाक्ष यशवंतरावांनी या सर्वांनंतर बोलताना ‘ शंतनुराव कितीही मोठे झाले तरी ते लक्ष्मणरावांपेक्षा कधीच मोठे होऊ शकणार नाहीत, असं मला वाटतं ‘, अशी सहज सुरवात करून सभेचा झुकलेला तोल सावरला.
जाणकार श्रोत्यांनी यशवंतरावांच्या या धोरणीपणाला टाळ्या वाजवून दाद दिली !
प्रा. मालतीबाई आणि माझा बऱ्यापैकी नियमितपणे पत्रव्यवहार होता.
हिरव्या शाईत, सुवाच्य अक्षरात, मुंबईकडच्या साहित्यिक घटनांचा आढावा घेणाऱ्या आणि स्वत:च्या छापील लेटरहेड्सवर लिहिलेल्या माझ्या पत्रांचं त्यांना कौतुक होतं.
पुण्यात राहणारे त्यांचे बंधु मुकुंदराव त्यांना सांगलीत नियमितपणे भेटायला येत असत.
एका भेटीत, त्यांनी मुकुंदरावांना माझी पत्रे दाखवली. मुकुंदरावांनी ती वाचून त्या पैकी एक स्वत:जवळ ठेवलं; आणि म्हणाले की मी यांना भेटायला बोलावतो.
मालतीबाई यांनी मला तसं कळवलं; आणि सांगितलं की, त्यानं बोलावल्यावर भेटायला जा.
पण काही दिवसांतच मुकुन्दरावांचं निधन झालं ! … आणि ती भेट कधीच झाली नाही ! ! !

— लेखन : प्रकाश चान्दे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800