परभाषिक शब्द !
गेली काही वर्षे आपल्याकडे घरी मराठी भाषा, बाहेर पडल्यावर बहुश: हिन्दी आणि पूर्वी उच्च शिक्षण आणि आता प्राथमिक शिक्षणापासून ते नोकरीत इंग्लिश भाषा या सर्रास वापरल्या जात असल्यामुळे आपल्याकडे या तिन्ही भाषांचा एक विचित्र संकर सतत होत असतो॰ त्यामुळे आपण बोलताना कमी अधिक प्रमाणात या तिन्ही भाषांचा जमेल तसा वापर करत असतो॰
आपण महाराष्ट्रीय लोक तर या बाबतीत इतके बेफिकीर झालो आहोत की कित्येक अर्थवाही मराठी शब्द आपण विसरलो आहोत॰ आता व्यग्र हाच शब्द बघा॰ याला हल्ली आपण सर्रास ‘ व्यस्त ‘ हा हिन्दी शब्द वापरतो॰ मराठीत ‘ व्यस्त ‘चा अर्थ काय आहे ? तो अर्थ आपण केव्हाच विसरलो !
आपण तर दुसर्या भाषेतला शब्द केव्हा कळतोय आणि तो केव्हा वापरतोय, असे वागतो॰ आता यावर भाषा तज्ज्ञ म्हणतात की कुठलीही भाषा अशीच समृद्ध होते॰ हे मान्य आहे॰ पण सध्या ज्या वेगाने ही भेसळ चालू आहे ते बघितले की आपली भाषा समृद्ध होण्या ऐवजी ती भेसळयुक्त, भ्रष्ट होत आहे, हे सहज लक्षात येते.
असे कित्येक अन्य भारतीय भाषांतील शब्द आहेत, ते आपण सहज वापरू लागलो आहोत॰ लहान मुली परकर पोलके वापरत॰ त्याला ‘ चनिया – चोळी ‘ हा गुजराती शब्द आहे॰ हा आता इतका रूढ झाला आहे की मोठ्या वयाच्या स्त्रिया परकर पोलके हे शब्द विसरल्या; आणि नवीन पिढीला तर परकर पोलके म्हणजे काय, हे ठाउकच नाही ! तसेच आपण कवितांच्या – गाण्यांच्या ‘ भेंड्या ‘ लावत असू॰ आता त्या ‘ अंताक्षरी ‘ झाल्या आहेत ! तसा हा शब्द जास्त अन्वर्थक आहे, हे मान्य; पण भेंड्या शब्द नामशेष का करता ?
हिंदीत दावा आणि दावेदार हे शब्द ज्या अर्थाने वापरले जातात, त्याच अर्थाने ते मराठी लोकही वापरू लागले आहेत॰ वास्तविक, या शब्दांचे मराठीत खूप वेगळे अर्थ आहेत॰ हिंदीतील ‘ खाली ‘ आणि मराठीतील ‘ खाली ‘ एकदम वेगळे आहेत ना ? तसेच, संपन्न होणे हा हिंदीत ( कार्यक्रम ) संपणे, पूर्ण होणे अशा अर्थाने वापरला जातो॰ मराठीत त्याचा अर्थ वेगळा आहे॰ आजकाल मराठीतही कार्यक्रम ‘ संपन्न ‘ होऊ लागले आहेत॰
सार्वजनिक कार्यक्रमांना पाहुणे म्हणून बोलावले जाणार्या व्यक्तीचा हल्ली सर्रास ‘ अतिथी ‘ असा उल्लेख केला जातो; तो तर चीड आणणारा आहे॰ कारण या शब्दाने त्याचा पूर्ण अर्थ बदलूनच जातो॰ ‘ अतिथी ‘ म्हणजे न कळवता आलेला पाहुणा. कार्यक्रमाचे अध्यक्ष अथवा प्रमुख वक्ते यांना आपण सन्मानानं निमंत्रण देऊन बोलावतो. मग ते ‘ अतिथी ‘ कसे ?
एकदा एका कार्यक्रमाला ‘ महाभारता ‘चे ज्येष्ठ अभ्यासक दाजीशास्त्री पणशीकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले गेले होते॰ प्रास्ताविक करणार्याने त्यांचा उल्लेख अतिथी असा करताच, दाजी चिडलेच॰ त्यांनी तेथल्या तेथे त्याला थांबवून अतिथी आणि मुद्दाम बोलावलेला पाहुणा यांतला फरक समजावून सांगितला !
निवडणुकांच्या हंगामात वापरले जाणारे विरोधक या शब्दाला प्रतिद्वंद्वी, जवळचा याला निकटतम, हे शब्द केव्हाच रूढ झालेत॰ पूर्वी आपण फटाके वाजवत असू; आता हिंदीमुळे ते फोडू लागलो आहोत ! क्रिकेटच्या खेळात पूर्वी आपण धावा काढत होतो; आता त्याही जोडू लागलो आहोत ! योगदानचेही आता इतके मराठीकरण झाले आहे की त्याला मराठी शब्द काय हे कोणालाही आठवणार नाही !
तसेच नाष्टा हा शब्द॰ याला न्याहरी हा आपला मूळ शब्द आहे॰ तो ही आता अडगळीत पडला आहे॰ मनोवैज्ञानिक ( आणि त्याचा हिन्दी उच्चार – मनो वैग्यानिक ! ) दबावने मानसशास्त्रीय दबावाची केव्हा हकालपट्टी केली ते कळलेच नाही ! तसेच पंतप्रधान हे प्रधानमंत्री झाले ते कळले का ?
हिंदीमुळे आपली उपस्थिती आता ‘ प्रार्थनीय ‘ झाली आहे ! मराठीत प्रार्थनाचा अर्थ काय आहे ?
भाषाशुद्धीचा ध्यास घेतलेले स्वा॰ वी॰ सावरकर म्हणतात की स्वत:च्या भाषेतील अन्वर्थक आणि समर्पक शब्दांऐवजी परकीय भाषेतील शब्द वापरल्याने आपण आपल्या मुलांना उपाशी ठेऊन शेजार्याच्या मुलांचे लाड करण्यासारखे आहे॰
मी ‘ उर्दू – मराठी ‘ शब्द कोष चाळला॰ त्यात तर इतके मूळ उर्दू, फारसी, अरेबिक शब्द आपण आपलेसे केले आहेत, ते पाहून आश्चर्य आणि वाईटही वाटते॰
काही वर्षांपूर्वी मी डॉ॰ उज्ज्वला दळवी यांचे ‘ ग्रंथाली ‘ प्रकाशित ‘ सोन्याच्या धुराचे ठसके ‘ हे पुस्तक वाचले॰ हे पुस्तक अप्रतिम असून नि:संशय संग्राह्य आहे॰ या बाई तीन दशकांहून आधिक काळ सौदी अरेबियात होत्या॰ या स्त्री रोग तज्ज्ञ आहेत॰
त्यांनी आपले सौदी अरेबियातील अनुभव या पुस्तकात लिहिले आहेत; ते चक्रावून टाकणारे आहेत॰
एकदा अरबी बोलतांना दुपट्टा या शब्दाला अरबीत काय म्हणतात हे ठाऊक नसल्याने त्या अडल्या; पण त्यांनी बेधडक दुपट्टा हाच शब्द वापरला.
आणि तोच अरबी शब्दपण निघाला !
त्यांनी लिहिले आहे या प्रसंगा नंतर त्या अडल्या की आत्मविश्वासानं मराठीत रूढ असलेला शब्द वापरू लागल्या॰ गम्मत म्हणजे 90 % पेक्षा जास्त वेळा त्यांचे काम होत असे ! असे अमोज शब्द रूढ होण्याचे कारण म्हणजे मुस्लिम, मोगल आणि नंतर ब्रिटिश या अभारतीय लोकांनी आपल्यावर शतकांनी मोजावा असा काळ केलेले राज्य॰
राज्यकर्त्यांच्या बहुतेक सर्वच गोष्टी अनुकरणीय वाटतात॰ आपण तर त्या इतक्या झटपट आत्मसात करतो की तिर्हाईताला आश्चर्य वाटावे ! भारतीय पुरुषांनी तर धोतर, लुंगी आणि तत्सम पेहरावाचा त्याग करून पॅंट – शर्ट यांचा केव्हाच अंगीकार केला आहे॰ सुरवातीला पुरुष डोक्यावर टोपी घालायचे॰ ब्रिटिश काळात ‘ हॅट ‘ आली; यथावकाश ती ही अस्तंगत झाली॰ आता धोतर आणि नऊ वारी साड्या स्त्री पुरुषांना नेसताच येईनाशा झाल्या आहेत !
सध्या समाजातील सर्व स्तरांतील लोक आपली मुले मुली इंग्लिश माध्यमांच्या शाळांत घालतात. त्याचा परिणाम असा झाला की, मुलं जागतिक स्तरावर नोकरी व्यवसाय सहज करू लागतात; आणि भरघोस अर्थार्जनही करू शकतात. मात्र, त्या मुलांना मराठी आणि इंग्लिश यां पैकी कुठलीच भाषा ही भाषा म्हणून धड नीट लिहिता, वाचता , बोलता येत नाही !कारण शाळातील माध्यम इंग्लिश झाले तरी घराचं मराठीपण सुटत नाही !
जाता जाता ….
डॉ॰ मीना नेरूरकर या स्त्री रोग तज्ज्ञ गेली कित्येक वर्षे अमेरिकेत स्थायिक झालेल्या आहेत॰ त्यांनी आपल्या व्यावसायिक आठवणी लिहिल्या आहेत; त्याला ‘ धन्य ती गायनॅक कला ‘ असे अतिशय अन्वर्थक नाव दिले आहे॰ ‘ धन्य ती गायनी कळा ‘ असे गोपाल कृष्ण भोबे यांनी 1968 साली एक नाटक लिहिले होते॰ ते अपुरे असतानाच त्यांचे निधन झाले होते॰ हे भोबे ‘ गोवा हिंदू असो॰ ‘चे सक्रिय कार्यकर्ते होते॰ त्यामुळे नाटककार प्रा॰ वसंत कानेटकर यांना गळ घालून ते नाटक पूर्ण करून घेतले आणि ते रंगभूमीवर आणले होते॰ या नाटकाला भीमसेन जोशी यांनी संगीत दिले होते॰
गम्मत :
‘ दुपट्टा ‘ शब्द अरेबिकमध्ये तोच निघाला; म्हणून मग डॉ. उज्ज्वला दळवींनी मराठीत किती अरबी शब्द आले आहेत, याची यादी केली; ती दिली आहे॰ ते शब्द असे आहेत : शेला, दुकान, सैल, कंदील, व ( आणि अशा अर्थाने ), मंदिल, बाबा, मरवा, वार ( अंतर मोजण्याचा यार्ड ), हिसाब, रतीब, कंस, मजकूर, इभ्रत, इलाखा, कपार, कनात, कयास, कसब, कायदा, कुवत, कसबा, खन्दक इत्यादी॰
सुप्रसिद्ध विनोदी लेखक आणि माझे ज्येष्ठ मित्र दिवंगत वि. आ. बुवा नेहेमी म्हणायचे की मी इंग्लिश भाषेचा पुरस्कार करतो; पण इंग्लिश माध्यमाचा तिरस्कार करतो !
मला हे पटते !

— लेखन : प्रकाश चान्दे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800