Home पर्यटन अविस्मरणीय विमान प्रवास २

अविस्मरणीय विमान प्रवास २

0

अहमदाबादच्या विमान दुर्घटनेची बातमी सगळ्यांच्या मनात अजूनही ताजीच आहे. एका विमान प्रवासाचा मला असाच एक चित्तथरारक अनुभव आला.तो मी इथे सांगू इच्छितो.

मी तेव्हा मुंबई येथे हिंदी चित्रपट सृष्टीत गायक म्हणून काम करत होतो. आम्ही मद्रास येथे (आताचे चेन्नई) एका प्रोड्युसरचे काही दिवसासाठी बॅक ग्राउंड व गाण्याचे रेकॉर्डिंगचे काम घेतले होते. त्यांची शिस्त व काम करण्याची पध्दत खूपच वेगळी होती. जे काम मुंबईला करण्यासाठी पंधरा दिवस लागत असत तेच काम मद्रास येथे आठ दिवसात होत असे. त्यासाठी आम्ही सर्व जण मद्रासला जाण्यासाठी विमानाने निघालो. लक्ष्मीकांत प्यारेलाल,जितेंद्र,जयाप्रदा अरुण इंगळे, शर्मा बोगम, भवानी शंकर, रवी गुर्टु, अनिल मोहिले असे आम्ही बरेच जण होतो. सगळ्यांची नावे आठवत नाहीत. आम्ही सर्व विमानात बसलो. आमचा विमान प्रवास सुरू झाला. काही वेळाने आम्हाला मद्रास एअरपोर्टवर लँडिंग करायचे होते. तेव्हाच आमच्या विमानात इमर्जेन्सी जाहीर झाली. विमान उतरण्यापूर्वी त्याची चाके बाहेर काढण्यात येतात. त्या वेळी नेमका बिघाड झाला. पायलट व को पायलट यांनी खूप प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. त्यामुळे नंतर विमानात इमर्जेन्सी जाहीर करण्यात आली.

सर्व जण खूपच घाबरलेले होतो. तेवढ्यात शेवटचा प्रयत्न म्हणून आम्हाला उभे करण्यात आले व एक दोन म्हणून जंप मारण्यास सांगितले. जीवाच्या आकांताने सर्व जण घामाघूम होऊन जंप मारत होते. हा प्रकार पाच ते सात मिनिटे अंदाजे चालला. सर्वांचा धीर सुटत चालला होता. तितक्यात एक चमत्कार घडला व आमची उडी मारण्याची वेळ व चाके बाहेर पडली. त्यानंतर विमानाने यशस्वीपणे लँडिंग केले. त्यावेळी एअर पोर्ट वर सर्व इमर्जेन्सी सेवा तत्पर ठेवण्यात आली होती. तेथे आम्ही काही दिवस बॅक ग्राउंडचे काम केले.

लक्ष्मीकांत यांच्या समवेत उदय वाईकर

येताना आमच्यापैकी फक्त चार जण, लक्ष्मीकांत, अरुण इंगळे व भवानी शंकर आणि मी एवढेच विमानाने परत आलोत. बाकी सर्वजण रेल्वेने परत आले. हा एक माझ्या जीवनातील रोमहर्षक अनुभव होता.

उदय वाईकर

— लेखन : सिने गायक उदय वाईकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version