“सिन्नरच्या वेशी”
🔘सिन्नरच्या किती वेशी आपणास माहित आहे ?
🔘सिन्नरच्या प्राचीन वेशींची खरी नावे काय आहे ??
🔘आज किती वेशी आपणास दिसून येतात ???
जाणून घ्यायचे आहे तर हा लेख संपूर्ण अवश्य वाचा
इतिहास हा केवळ पुस्तकांत नसतो; तो आपल्या गावातील दगडांत, रस्त्यांत, मंदिरांत आणि वेशींमध्येही जिवंत असतो. या वेशींनी अनेक पिढ्या येताना-जाताना पाहिल्या आहेत.नाशिक जिल्ह्यातील प्राचीन सिन्नर हे असेच एक ऐतिहासिक नगर आहे. यादवकालीन वैभव, गोंदेश्वर मंदिराची भव्य परंपरा, विविध शिलालेख, प्राचीन देवालये आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या शहराच्या वेशी आजही भूतकाळाची साक्ष देत उभ्या आहेत.
पूर्वी नगराभोवती तटबंदी आणि त्यामध्ये ये-जा करण्यासाठी भक्कम वेशी असत. या वेशींचे काम केवळ प्रवेशद्वार म्हणून नव्हते, तर त्या शहराच्या सुरक्षेचा महत्त्वाचा भाग होत्या. रात्री ठराविक वेळी वेशी बंद केल्या जात आणि पहारेकरी शहराच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळत. व्यापारी, यात्रेकरू, सैनिक, अधिकारी आणि सामान्य नागरिक यांचा प्रवेश याच वेशींमधून होत असे.
चला तर मग जाणून घेऊ या…
🚩सिन्नर नगरीच्या प्राचीन सहा वेशी 🚩
०१) नाशिक वेस
सिन्नर शहराच्या पश्चिमेला असणारी व नाशिक कडे व शहराच्या बारादारी,आयेश्वर मंदिर रस्त्याकडे जाणारी वेस म्हणजे नाशिक वेस होय.नाशिक वेस सध्या पूर्ण नामशेष झालेली असून भिंतींचा काही भाग शिल्लक आहे.नाशिक वेशीला लागून सरस्वती देवीचे मंदिर आहे.याच वेशीतून श्री सर्वज्ञ चक्रधर महाराज आयेश्वर मंदिराकडे गेले होते व सरस्वती नदीच्या पाण्यात क्रीडा केली होती.

०२ वेळू वेस (बाजार वेस)
सिन्नर नगरीच्या पश्चिम दिशेकडे गणेश पेठेतून ST स्टँड कडे जाणारी वेस म्हणजे वेळू वेस होय, जी आज बाजार वेस म्हणून ओळखली जाते.पूर्वी नेहरू चौक पासून बस स्टँड पर्यंतच्या टेकडीवर वेळूचे (बांबूचे)प्रचंड जंगल असल्याकारणाने सदर वेशीला वेळू वेस म्हटले जायचे.वेशीच्या बाहेर मोठा खंदक असल्यामुळे या वेशीची वर्दळ कमी असायची.
०३ लोणार वेस (पडकी वेस)
सिन्नर शहराच्या पश्चिम दिशेला असणारी व छ.शिवाजी चौक पासून- तानाजी चौक येथून गावठा भागाकडे जाणारी वेस म्हणजे लोणार वेस होय. लोणार शब्दाचा अर्थ खारे असा होतो.पूर्वी गावठा परिसर ते भाटवाडी, लोणारवाडी हा परिसर अगदी खडकाळ,मुरमाड टेकडी परिसराचा भाग असल्यामुळे त्याभागातील मातीत काहीच पिकत नसल्यामुळे तेथील भाग लोणार समजला जायचा तेथील वस्तीला लोणारवाडी म्हटले जात असे. त्या दिशेला जाणारी वेस म्हणजे लोणार वेस होय.
सिन्नर नगरपालिका स्थापने नंतर मालकीहक्काचा वाद असल्यामुळे सदर वेस पाडल्या गेली. कोर्टापर्यंत सदर वेशी संदर्भाने वाद पोहचला होता व शेवटी सिन्नर नगरपालिकेच्या बाजूने निकाल लागला होता.परंतु तो पर्यंत सदर वेस पाडल्या गेली होती.तेव्हा पासून सदर वेशीला पडकी वेस म्हणून नाव पडले व आज तेच नाव रूढ झालेले आहे.
०४ संगमनेर वेस
सिन्नर नगरीच्या दक्षिणेला व संगमनेर शहराच्या दिशेला जाणारी वेस म्हणजे संगमनेर वेस होय.लोंढे गल्लीतून खाली अमरधाम कडे जाणारा रस्ता व काजीपुरा येथून येणाऱ्या रस्त्याच्या चौकात सदर संगमनेर वेस होती.आज सदर वेशीच्या कुठल्याच खुणा अस्तित्वात नाही.परंतु सदर वेस ही वर्दळीचा व महत्वाचे ठिकाण होते.सदर वेशीच्या बाहेरच ब्रिटिशांनी संगमनेर रस्ता जोडणारा पुल बांधलेला होता.आज सदर पूल जीर्ण झाल्यामुळे पाडून त्या ठिकाणी नवीन पुलाचे काम सध्या सुरू आहे.
०५ वावी वेस
सिन्नर शहराची एकमेव सुरक्षित असणारी वेस म्हणजे वावी वेस होय. छ.शिवाजी महाराज चौकातून खाली काल भैरव मंदिराचा रस्ता व सिन्नर पोस्ट कार्यालय कडून येणारा रस्ता वावी वेशीकडे येतो.
*वावी गावाकडे जाणारा रस्ता म्हणजे वावी वेस असा अनेकांचा गैरसमज आहे, परंतु वावी या शब्दाचा अर्थ होतो सार्वजनिक पाणवठ्याचे ठिकाण अथवा पाण्याचे स्थान होय.सिन्नर शहरालगत असणारे कुंदेवाडी शिवारातील शिवनदी देव नदी व सरस्वती नदी संगम हे यादव काळापासून अत्यंत पवित्र व महत्वाचे ठिकाण होते. यादव काळापासून पाणवठ्याच्या ठिकाणी लष्कर आपला तळ ठोकत असत. वावी वेशी जवळ बाराव व विहीर असल्यामुळे सदर पाणवठ्याकडे जाणारी वेस म्हणून सदर वेशीचे नाव वावी वेस असे पडले होते.
सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज खोपडी गावातून प्रस्थान करत सिन्नर नगरी जवळ पोहचले त्यावेळेस याच वेशीतून प्रवेश करून चौदा चौक वाड्याच्या पश्चिम महाद्वारातून भिल्लम मठात प्रवेश केला होता.
सिन्नर नगरीचे चौदा महालाचे अंमलदार सरदार अमृतराव देशमुख यांनी नंतर सिन्नर नगरीचे कोट दुरुस्त करून भक्कम केले.त्याच काळात वावी वेशीच्या वरच्या भागात फारसी भाषेचा शिलालेख कोरलेला असून त्यात ‘मोहम्मदशाह गाजी आलम परवेज, फिरदोन बाला ११३९’ यावरून सदर वेशीचे मजबुतीकरण *सन १७२९* सालात झालेले असून मोहम्मदशाहा हा त्यावेळी मोगल बादशाह गादीवर होता.सदर वेशीवरती सूर्य, मोर, हरिण, चंद्र यांचे प्रतीके कोरलेले आहेत.
०६ गंगा वेस (नायगाव वेस)
सिन्नर शहराच्या लाल चौकापासून नायगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावर सदर वेस आहे.वेशीला लागूनच हिंगलाज मातेचे मंदिर आहे.
सिन्नर नगरी ही १२ ज्योतिर्लिंग मंदिरे असणारे, भैरवनाथ महाराज, गवळीबाबा मंदिर असल्यामुळे पूर्वी गोदावरी नदीवरून (दक्षिण गंगा) या गंगेचे कलश कावडधारी अभिषेकासाठी घेऊन येत असत त्यामुळे दिसून येतात.
चला एकजुटीने वेशींचे संवर्धन करू या
सिन्नर हे मध्ययुगीन काळापासून व्यापारी, धार्मिक आणि प्रशासकीय दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. यादव, बहामनी, निजामशाही, मोगल आणि मराठा अशा विविध राजवटींचा इतिहास या शहराने अनुभवला. त्या प्रत्येक काळात सिन्नरच्या वेशींनी असंख्य ऐतिहासिक घटना पाहिल्या असतील. त्यामुळे या वेशी केवळ दगडांच्या रचना नसून इतिहासाचे जिवंत दस्तऐवज आहेत.
दुर्दैवाने आज अनेक वेशी काळाच्या ओघात जीर्ण झाल्या आहेत. काही ठिकाणी अतिक्रमण, दुर्लक्ष, रंगरंगोटी, जाहिराती, विजेच्या तारा किंवा अनियोजित बांधकामामुळे त्यांचे मूळ स्वरूप झाकले गेले आहे. ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन केवळ शासनाची जबाबदारी नसून नागरिकांचीही तितकीच आहे.
प्रत्येक वेशीवर तिचा इतिहास सांगणारा माहितीफलक लावण्यात यावा. शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी वारसा फेऱ्या आयोजित करून या वास्तूंचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे. यामुळे नव्या पिढीत आपल्या इतिहासाविषयी अभिमान आणि जतनाची भावना निर्माण होईल.
आज जगभरात वारसा पर्यटनाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. गोंदेश्वर मंदिरासोबत सिन्नरच्या वेशी, प्राचीन देवालये, शिलालेख, बारवा आणि ऐतिहासिक स्थळे यांचा समावेश असलेला *“सिन्नर हेरिटेज सर्किट”* विकसित झाल्यास इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसाठी सिन्नर अधिक आकर्षक ठरू शकते. यामुळे स्थानिक रोजगार आणि पर्यटनालाही चालना मिळेल.
आता त्यांना जतन करण्याची जबाबदारी आपली आहे. सिन्नरच्या वेशी वाचल्या तरच सिन्नरचा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत जिवंत राहील. कारण वेशी या फक्त शहराचे प्रवेशद्वार नसून त्या आपल्या सांस्कृतिक अस्मितेच्या, ऐतिहासिक स्मृतीच्या आणि स्वाभिमानाच्या प्रवेशद्वार आहेत.
संदर्भ : गोंदेश्वर मंदिर दर्शन पुस्तक.
— लेखन : शिवव्याख्याता प्रा.जावेद शेख. सिन्नर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800