स्मिता पाटील ह्या अतिशय गुणी आणि प्रतिभावान अभिनेत्री च्या स्मरणार्थ बोरिवली च्या प्रबोधनकार ठाकरे नाट्य सभागृहात आयोजित करण्यात आलेला “स्मितगंध “कार्यक्रम अविस्मरणीय अनुभुती देऊन गेला.
जसे या कार्यक्रमाबद्दल समजले, तसे लागलीच आरक्षण करून ठेवले. कारण स्मिता ह्या माझ्या अतिशय आवडत्या अभिनेत्री आहेतच त्याशिवाय त्यांच्या आठवणी सांगणारे प्रतिभावान दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल व अजूनही तरुणांना लाजवेल असे काम करणारे डॉ मोहन आगाशे, स्मिता ह्यांच्या एक गोड सखी, ओडिसी नृत्यात पारंगत असलेल्या झेलम परांजपे अशी सगळी दिग्गज मंडळी त्यांच्या आठवणी सांगणार होते.
शिवाय जोडीला स्मिता ह्यांच्या चित्रपटातील गाणी केतकी भावे जोशी, मंदार आपटे हे गायक गाणार होते. त्यामुळे गप्पा आणि गाणी अशी एकत्रित मेजवानी बघायला, ऐकायला मिळणार होती. असा हा अगदी दुग्ध शर्करा योग आला 😇
ठरलेल्या वेळेआधीच तयार झाले आणि ह्यांना पण लवकर निघा म्हणुन घाई करायला लागले 😅. हे मला म्हणाले पण की इतर वेळी तुला कधी वेळेवर तयार झालेल बघितल नाही 😜. आज बरी वेळेत तयार झालीस ! मी पण त्यांना बोलूनच टाकले, इतर वेळी कुठे अश्या छान कार्यक्रमाला जायला मिळाले.
डॉ मोहन आगाशे हे बापूंचे (माझे सासरे डॉ पार्श्वनाथ सिद्धराज सगरे, स्त्री रोग व प्रसूती शास्त्र तज्ञ) ह्यांचे ससून रुग्णालयातील सहकारी. घरी पण यायचे. डॉ जब्बार पटेल ह्यांच्या पत्नी बापूंच्या शेजार च्या निवासात त्या स्वतः सातारा civil hospital मध्ये internship करत असताना रहायच्या. त्यामुळे चांगली ओळख होती. त्या स्वतः सोलापूर च्या, मारवाडी कुटुंबातील. डॉ जब्बार पटेल मूळचे दौंड चे. ते जेव्हा त्यांच्या पत्नीला भेटायला येत तेव्हा शेजारी बापूं बरोबर गप्पा मारत बसत. अशी दोघाही डॉ बरोबर जुनी ओळख. त्यामुळे कार्यक्रम झाल्यावर दोघांना भेटायचे पण ठरलेले.
कार्यक्रम सुरू व्हायला 15 मिनट उशीर झाला पण जसजसा कार्यक्रम पुढे जायला लागला त्यातील रंगत वाढत गेली. स्मिता गवाणकर यांनी खूप छान संयोजन केल. त्यांच्या आठवणी तील गप्पा रंगत गेल्या. आणि गाण्या मुळे अजूनच कार्यक्रम बहरला.

स्मिता पाटील ह्या राष्ट्र सेवा दलाचे काम केलेल्या व्यक्ती. त्यामुळे त्यांच्यात सेवा भाव नैसर्गिकच. त्यासाठी ना कुठे प्रसिद्धी ना कुठे देखावा. स्मिता पाटील ह्यांच्या आई सौ विद्या ताई पाटील व वडील श्री. शिवाजीराव पाटील, हे दोघेही स्वातंत्र्य लढ्यात काम केलेले स्वातंत्र्य सैनिक व राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलींना देखील राष्ट्र सेवा दलाच शिबीर करायला उन्हाळी सुट्टीत पाठवत. ह्याचा त्यांच्या जडणघडण मध्ये खूप वाटा आहे. तसेच सौ विद्या पाटील ह्या शिस्तप्रिय व नम्र होत्या. पती आमदार, खासदार झाले तरीही त्यांनी कधीही त्या गोष्टीचा गर्व केला नाही.
सौ विद्या ताई पाटील स्वतः नायडू रुग्णालयात चीफ मेट्रन म्हणून काम करत असताना चा एक किस्सा डॉ जब्बार पटेल ह्यांनी सांगितला. नायडू रुग्णालया च्या बाजूच्या निवासात त्या कुटुंबा सोबत रहायच्या. डॉ जब्बार पटेल त्यावेळेस pediatrics मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत होते व नायडू रुग्णालयात internship करत होते. स्मिता ह्या त्यावेळी 12/13 वर्षाच्या होत्या. आणि त्यांच्या मैत्रिणीं बरोबर निवासाच्या समोरच्या प्रांगणात सायकल चालवत खेळायच्या. खेळताना सगळया मुलींचा गोंगाट चालू असायचा. एकदा डॉ जब्बार ह्यांची परीक्षा होती आणि ह्या मुलींच्या आवाजानं त्यांना त्रास होत होता म्हणुन त्यांनी एका काळ्या सावळ्या, हडकुळ्या मुलीला आवाज देवून ए, इकडे गोंगाट करू नका अस सांगितल. तर ती मुलगी धीट पणे म्हणाली की आम्ही तर रोजच इकडे खेळतो. मी कोणाची मुलगी आहे माहित आहे का, चीफ मेट्रन ची. आई ला सांगेन. तर डॉ जब्बार म्हणाले सांग पण गोंगाट करू नकोस 😃.. नंतर सौ विद्या पाटील यांनी डॉ जब्बार ना विचारल की अरे माझी मुलगी सांगत होती तू आवाज करू नका म्हणून रागावलास. त्यांनी पण मुलींना समजून सांगितल. त्यावेळेस डॉ जब्बार पटेल पण म्हणाले की कधी अस वाटल नव्हत की हि मुलगी अभिनेत्री होईल आणि ते तिला दिग्दर्शित करतील. त्या दोघांचे किती छान चित्रपट आहेत. जैत रे जैत, उंबरठा. त्या चित्रपटांच्या चित्रणा वेळचे हि खुप सुंदर किस्से डॉ जब्बार पटेल व डॉ मोहन आगाशे यांनी सामायिक केले. ते ऐकत असताना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
झेलम यांनी पण माणूस म्हणून स्मिता ह्या किती मनस्वी होत्या ते सांगितल. त्या दोघींची ओळख राष्ट्रसेवादला च्या कला पथकात झाली. खर तर झेलम ह्या स्मिता ह्यांच्या मोठी बहीण डॉ अनिता देशमुख यांच्या मैत्रीण. पण त्या म्हणाल्या की स्मितांनी त्यांना पटकन आपलसं केल. मैत्री केली. त्यांच्या वागण्या बोलण्यात खूप सहजता असायची आणि खूप मनापासून काम करायच्या. भूमिकेत समरसून जाऊन काम करायच्या. कित्येक वेळा ह्याचा सुद्धा त्यांना त्रास व्हायचा. स्मिता व झेलम ह्यांची मैत्री अशी होती की, स्मिता गेल्यानंतर झेलम यांनी त्यांच्या नृत्य शाळेचे नाव त्यांच्या स्मरणार्थ स्मितालय नृत्य अकादमी ठेवल. स्मिता ह्या स्वतः खूप छान नृत्य करायच्या व ओडिसी नृत्य काही काळ शिकल्या होत्या.
डॉ अनिता देशमुख (स्मिता ह्यांच्या मोठी बहीण) यांनी देखील चित्रफिती द्वारे संवाद साधून त्यांच्या आठवणी सामायिक केल्या.
ह्या सर्वांच्या सहज अश्या गप्पांच्या ओघात कार्यक्रम खरच खूप छान रंगला. अगदी संपू नये अस वाटत होत. पण बराच उशीर झाला होता. 9 ला चालू झालेला कार्यक्रम रात्री 12 वाजत आले होते त्यामुळे आटोपता घ्यायला लागला. एक अप्रतीम कार्यक्रम अनुभवता आला ह्याच मनाला फार समाधान वाटलं.

निघायच्या आधी डॉ जब्बार पटेल व डॉ मोहन आगाशे, दोघांचीही भेट घेतली. अजून काही ससून रुग्णालयातील व सातारच्या जुन्या आठवणींना दोघांशी बोलताना उजाळा मिळाला. मग मात्र निघालो.
गिरगाव कट्टा चे श्री प्रदीप मालनकर ह्यांचे हा कार्यक्रम आयोजित करण्याबद्दल मनःपूर्वक आभार व असेच छान सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी त्यांना शुभेच्छा.
— लेखन : सुप्रिया सगरे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800
