“कलाली (कलारी) बोलीलील पहिलाच काव्य संग्रह ठरलेला प्राचार्य डॉ. रामदास चवरे यांचा ‘असो चैतको मयना’ हा कविता संग्रह रसिक मनाला साद घालणारा आहे. शब्दांचे हृदयस्पर्शी नाद आणि जीवनाची विविध रूपे येथे साक्षात होत जातात, असे गौरवोद्गार मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांनी या कविता संग्रहाचे प्रकाशन करताना काढले.
डॉ. आवलगावकर पुढे म्हणाले की, “मराठीतील विविध बोलींपैकी समजल्या जाणाऱ्या कलाली बोली बोलणाऱ्यांची महाराष्ट्र व इतर राज्यातही या बरीच संख्या आहे. मराठीतील प्रसिद्ध लेखक, कवी, गीतकार, समीक्षक, संशोधक असलेल्या प्राचार्य डॉ. रामदास चवरे यांच्या 75 कवितांचा प्रस्तुत कविता संग्रह कलाल समूहाचे दु:ख, दैन्य, वेदना, विविध न्यास यांचा तलस्पर्शी आविष्कार ठरावा.” महाराष्ट्र शासन व मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे नुकत्याच संपन्न झालेल्या बोली अभ्यासक कार्यशाळेत या कविता संग्रहाचे प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे (कुलगुरू, भाषा संचालक अरुण गिते, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक मराठी भाषा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुबोध भांडारकर हे उपस्थित होते.)
भालचंद्र नेमाडे यांची पाठराखण :-
या कविता संग्रहाला मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांचीच प्रदीर्घ, अतिशय अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली असून पुस्तकाची पाठ राखण करताना “कोसला”कार , जेष्ठ लेखक श्री भालचंद्र नेमाडे म्हणतात, तेव्हा “तू पाठविलेला ‘असो चैतको मयना’ हा कलाली भाषेचा पहिलाच कवितासंग्रह काल मिळाला. त्याबद्दल आभार. मी तो लगेच रात्रभर वाचून काढला, त्यामुळे दिवस छान गेला.
कलालीसारख्या लहान-लहान पोटभाषांमुळेच मराठी समृद्ध झाली आहे. अशा प्रयत्नांना सवंग लोकप्रियता मिळाली नाही, तरी त्यांचे महत्त्व कमी ठरत नाही. ह्यामुळे पुढच्या पिढ्यांचे मार्गदर्शन होते. हे तू मोठे ऐतिहासिक काम केले आहे. तुझे मनापासून अभिनंदन. आपला स्वतःचा किंवा स्वतःच्या भाषेचा विशाल मराठीत ठसा उमटेल अशी खास शैली तयार करावी. सर्वांना ती आपलीच वाटली पाहिजे, म्हणून नवनवे प्रकार शोधत राहावे. माझ्या शुभेच्छा! प्रत्येक कवितेखाली काही शब्दांचे अर्थ दिलेले आहेत, ते उत्तम आहे, लिहीत रहा. कळावे. सवडीने भेटू.
— भालचंद्र नेमाडे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800