पूर्वीच्या काळी मुलामुलींची लग्ने खूप लहान वयात होत असत. श्रावण महिन्यात मंगळागौर, नागपंचमी, रक्षाबंधन वगैरे सण येतात, सासरी गेलेल्या नव-या मुली त्या निमित्याने पावसाळा सुरू होण्याच्या आधीच माहेरपणाला येत असत आणि माहेरपणाचे सुख उपभोगून झाल्यावर झाल्यावर सासरी परत जात असत.
त्यांच्यासाठी खाऊचे डबे, पापड, लोणची, मुरंबे, परकर-पोलकी किंवा साडी-चोळी वगैरेची गाठोडी बांधून त्यांची रीतसर पाठवणी केली जात असे.
या पार्श्वभूमीवर कवी सुधीर मोघे यांनी ‘हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटासाठी लिहिलेल्या या गीतात भाताच्या रोपांना नव्या नवरीची उपमा दिली आहे. कोकणात भातशेती करतांना आधी एका लहान जागेत भाताचे खूप दाणे फेकले जातात आणि त्यातून अगदी जवळ जवळ रोपे उगवतात. ती थोडी वर आली की उपटून आणि दोन रोपात पुरेसे अंतर सोडून ओळीत लावली जातात. नव्या जागेवर त्यांची व्यवस्थित वाढ होते, त्यांना बहर येतो, त्यातून भाताचे पीक येऊन समृध्दी येते.
भाताच्या रोपांची लावणी म्हणजे त्यांनी माहेरी लहानपण काढून पुढील आयुष्यात सासरी जाण्यासारखेच झाले.
पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेल्या अप्रतिम चालीवर आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि साथीदा9रांनी गायिलेले हे समूहगीत सर्वच दृष्टीने फारच छान आहे.
आला आला वारा संगे पावसाच्या धारा ।
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा ।।
नव्या नवतीचं बाई लकाकतं रूप ।
माखलं ग ऊन जणू हळदीचा लेप ।
ओठी हसू पापणीत आसवांचा झरा ।।
आजवरी यांना किती जपलं जपलं ।
काळजाचं पानी किती शिपलं शिपलं ।
चेतवून प्राण यांना दिला ग उबारा ।।
येगळी माती आता ग येगळी दुनिया ।
आभाळाची माया बाई करील किमया ।
फुलंल बाई पावसानं मुलुख ग सारा ।।
आकाशात आलेल्या मेघमालांना पाहून मोर आनंदाने नाचू लागतात ही एक सर्वमान्य संकल्पना आहेच, केवड्याच्या बागेत एका मोराला नाचतांना पाहून मेघांना गहिवरून आले आणि त्याने वर्षाव केला अशी कल्पना कवी श्री.अशोकजी परांजपे यांनी एका कवितेत मांडली आहे. पुढे मनामधील भावनाविश्वातील तरंगांचे वर्णन आहे. अलीकडच्या काळातील उत्कृष्ट संगीत दिग्दर्शकांमध्ये श्री.अशोक पत्की यांची प्रामुख्याने गणना होते. त्यांनी केलेल्या संगीतरचनेवर सुमन कल्याणपूर यांनी हे अत्यंत गोड गीत गायिले आहे.
केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर ।।
गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर ।।
पापणीत साचले, अंतरात रंगले ।
प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले ।
ओठांवरी भिजला ग आसावला सूर ।।
भावफूल रात्रिच्या अंतरंगि डोलले ।
धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले ।
डोळियांत पाहिले, कौमुदीत नाचले ।
स्वप्नरंग स्वप्नीच्या सुरासुरांत थांबले ।
झाडावरी दिसला ग भारला चकोर ।।
वरील गाणे खूप वर्षांपूर्वीचे आहे. थोड्याच वर्षांपूर्वी आलेल्या आईशप्पथ या सिनेमासाठी कवी सौमित्र यांनी लिहिलेल्या एका वर्षागीतालाही अशोक पत्की यांनी नव्या प्रकारची छान संगीतरचना केली आहे. त्यांनी दिलेल्या चालीवर साधना सरगम या हिंदी चित्रपटसंगीताच्या क्षेत्रात नावाजलेल्या मराठी गायिकेने हे मधुर गाणे गायिले आहे.
ढग दाटूनि येतात,
मन वाहूनी नेतात ।
ऋतु पावसाळी सोळा, थेंब होऊनी गातात ।।
झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची । सर येते माझ्यात ।।
माती लेऊनीया गंध,
होत जाते धुंद धुंद ।
तिच्या अंतरात खोल अंकुरतो एक बंध ।
मुळे हरखूनि जातात, झाडे पाऊस होतात ।
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात ।।
झिम्मड पाण्याची ……
सुंबरान गाऊ या रं, सुंबरान गाऊ या ।
झिलरी झिलरी आम्ही तुम्ही, सुंबरान गाऊ या ।
सुंबरान गाऊ या रं, सुंबरान गाऊ या ।।
जीव होतो ओला चिंब, घेतो पाखराचे पंख ।
साऱ्या आभाळाला देतो एक ओलसर रंग ।
शब्द भिजूनि जातात अर्थ थेंबांना येतात ।
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात ।।
झिम्मड पाण्याची …….
‘येरे येरे पावसा’ या काही पिढ्यांपासून चालत आलेली पावसावरील बालगीतांची परंपरा चालतच राहिली आहे. ‘पाऊस आला वारा आला’ हे श्रीनिवास खळे यांनी संगीतबध्द केलेले एक गाणे आधीच्या भागात येऊन गेले आहे. त्यांनीच संगीत दिलेले आणि आशा भोसले यांनी गायिलेले श्रीनिवास खारकर यांचे एक गीत असेच अजरामर झाले आहे. अलीकडे सारेगमपच्या स्पर्धेमध्ये बालकराकारांनी हे गाणे सादर केले तेंव्हा ”हे गाणे आमच्या लहानपणी आम्ही गात होतो” असे उद्गार परीक्षकांनी काढले होते.
टप टप टप काय बाहेर वाजतंय् ते पाहू ।
चल् ग आई, चल् ग आई, पावसात जाऊ ।।
भिरभिरभिर अंगणात बघ वारे नाचतात !
गरगर गरगर त्यासंगे, चल गिरक्या घेऊ ।।
आकाशी गडगडते म्हातारी का दळते ?
गडड्गुडुम गडड्गुडुम ऐकत ते राहू ।।
ह्या गारा सटासटा आल्या चटाचटा ।
पट् पट् पट् वेचुनिया ओंजळीत घेऊ ।।
फेर गुंगुनी धरू, भोवऱ्यापरी फिरू ।
“ये पावसा, घे पैसा”, गीत गोड गाऊ ।।
पहा फुले, लता-तरू, चिमणी-गाय-वासरू ।
चिंब भिजती, मीच तरी, का घरात राहू ?
लतादीदी, आशाताई, उषाताई आणि हृदयनाथ ही चार मंगेशकर भावंडे संगीताच्या क्षेत्रात सर्वोच्च पातळीवर जाऊन पोचली आणि दीर्घकाळ त्यांनी त्या क्षेत्रावर राज्य केले आहे. त्यांनाच मीना खडीकर नावाची एक सख्खी बहीण आहे आणि ती देखील त्यांच्यासारखीच संगीतात प्रवीण आहे या गोष्टीला मात्र तेवढी प्रसिध्दी मिळालेली नसल्यामुळे काही लोकांना ते माहीत नसण्याची शक्यता आहे. या मीनाताईंनी सुप्रसिध्द कवयित्री वंदना विटणकर यांच्या गीताला लावलेल्या चालीवरील खाली दिलेले गाणे गाजले होते. सारेगमपच्या बालकलाकारांच्या स्पर्धेमधून ते अलीकडे पुन्हा ऐकायला मिळाले. ते ऐकतांना मला जगजितसिंगांच्या ‘वो कागजकी कश्ती, वो बारिशका पानी’ या सुप्रसिध्द गाण्याची आठवण आली.
ए आई मला पावसात जाउ दे ।
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे ।।
मेघ कसे बघ गडगड करिती ।
विजा नभांतुन मला खुणविती ।
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे ।।
खिडकीखाली तळे साचले ।
गुडघ्याइतके पाणी भरले ।
तऱ्हेतऱ्हेच्या होड्यांची मज शर्यत ग लावु दे ।।
बदकांचा बघ थवा नाचतो ।
बेडुक दादा हाक मारतो ।।
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे ।।
धारेखाली उभा राहुनी ।
पायाने मी उडविन पाणी ।
ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल ते होऊ दे ।।
आताची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकतात.इंजिनियर, डॉक्टर, एमबीए, सीए वगैरे होऊन पैसे कमावण्याच्या मागे लागतात. त्यामुळे मराठी भाषा, त्यातले साहित्य, विशेषतः काव्य वगैरे लयाला चालले आहे अशी भीती काही जुन्या लोकांना वाटते. अशा या वर्तमानकाळात फक्त कवितांचे वाचन आणि गायन यांचा कार्यक्रम करायचे साहस कोणी करेल आणि त्याला भरपूर श्रोते मिळतील अशी कल्पनासुध्दा कुणाच्या मनात आली नसेल. पण कवी संदीप खरे आणि गायक व संगीतकार सलील कुळकर्णी या जोडगोळीने ‘आयुष्यावर बोलू काही’ या नावाने असा एक अफलातून कार्यक्रम रंगमंचावर आणला आणि मोठमोठ्या सभागृहांमध्ये त्याचे हाऊसफुल प्रयोग करून दाखवले. त्यातल्याच एका पावसावरील बालगीताने या लेखाची सांगता करते. ‘येरे येरे पावसा’ पासून ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ पर्यंतचा हा प्रवास वाचकांना पसंत पडावा अशी त्या इंद्रदेवालाच मनोमन प्रार्थना करते.
अग्गोबाई ढग्गोबाई, लागली कळ ।
ढगाला उन्हाची केवढी झळ ।
थोडी न् थोडकी लागली फार ।
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार ।।
वारा वारा गरागरा सो सो सूम् ।
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम ।
वीजबाई अशी काही तोऱ्यामधे खडी ।
आकाशाच्या पाठीवर चमचम छडी ।।
खोलखोल जमिनीचे उघडून दार ।
बुडबुड बेडकाची बडबड फार ।
डुंबायला डबक्याचा करूया तलाव ।
साबु-बिबु नको थोडा चिखल लगाव ।।
– लेखन : अलका माने. रत्नागिरी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
अलकाताई खूप सुंदर
तुम्हाला काय कंमेंट करू. तुम्ही तर बहीण माझ्या.
धन्यवाद बोलू शकतो 🌹🌹🙏🙏
धन्यवाद अशोकजी… एक भाऊ म्हणून तुम्ही पाठीवर दिलेली कौतुकाची थाप आणखी पुढे जाण्याचं बळ देते. हा हात असाच कायम पाठीवर राहू दे.