Sunday, September 14, 2025
HomeUncategorizedआकाश कंदील, पणत्या, उटणे, मेण पणत्यांसह भेटवस्तू:गतिमंद विद्यार्थ्यांची भरारी

आकाश कंदील, पणत्या, उटणे, मेण पणत्यांसह भेटवस्तू:गतिमंद विद्यार्थ्यांची भरारी

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मान्यताप्राप्त दिव्यांग, गतिमंद मुलांच्या शाळांमध्ये दिवाळीसाठी विशेष मुले आकर्षक आकाश कंदील, रंगीबेरंगी पणत्या, उटणे, मेणबत्त्या यांच्यासह भेटवस्तू तयार करण्यात सध्या गुंतली आहेत. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गिफ्ट पॅकमध्ये साबण-तेलांसोबतच सॅनेटायझरच्या बाटलीचाही समावेश झाला आहे ! या मुलांनी बनवलेल्या वस्तू, स्पेशल ऑलिंपिक, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सहभाग पाहून पंखाविना भरारी काय असते ते दाखवून दिले आहे.

इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित स्वयम मतिमंद शाळेतील उद्योग केंद्राच्या अध्यक्ष शोभा तावडे यांनी सांगितले की, या शाळेतील उद्योग केंद्रात 18 वर्षापुढील 56 मुले आहेत. ते अत्यंत सुंदर पध्दतीने गणेश मूर्ती तयार करतात. वेगवेगळी फुले तयार करतात. दिवाळीसाठी उपयोगी असणाऱ्या वस्तूंचे बॉक्स , फाईल तयार करण्यात येत आहेत. शिवाय पेंटींगचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे .दुर्लक्षित असणाऱ्या या मुलांना संस्थेमार्फत सक्षम करण्यात येते.नागरिकांनी या वस्तूंची खरेदी करून मुलांना प्रोत्साहन द्यावं ,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासाठी आपण नवीन न्यायालयाच्या मागे, कसबा बावडा, कोल्हापूर. प्रमोद भिसे- 7276051472 येथे संपर्क साधू शकता.

जिज्ञासा विकास मंदिर, या बौध्दिक अक्षम मुलांच्या शाळेत अत्यंत आकर्षक आकाश कंदीलांची निर्मिती होत आहे. या शाळेच्या स्मिता दीक्षित म्हणाल्या, मुलं मेण पणत्या सुंदर रंगवतात. वजनानुसार उटण्याचं पॅकिंग करतात. शिवण विभाग, पाक विभागातही या मुलांना वेगवेगळ्या पध्दतीचं प्रशिक्षण दिलं जातं. मुलांसाठी व्यायाम शाळा देखील आहे. मुलांना सतत कार्यरत ठेवलं जातं. या मुलांच्या सुंदर कलाकृती खरेदी करून आपल्या दिवाळीबरोबरच या मुलांच्या दिवाळीचा आनंदही व्दिगुणीत करावा. यासाठी आपण कृपया रघुनंदन हॉल, क्रशर चौक, कोल्हापूर. स्मिता दीक्षित- 9850060903 येथे संपर्क साधावा..

चेतना अपंगमती विकास संस्थेचे चेतना विकास मंदिर ,कृष्णात चौगुले व्‍यवस्थापकीय अधीक्षक यांनी त्यांच्या संस्थेत कागदाच्या लगद्यापासून इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवल्या जातात असे सांगून मुलींसाठी चेतना बजार सुरू केल्याची माहिती दिली . ते 50 हजार पणत्या, 1 हजार डझन आकाश कंदील, 5 हजार लक्ष्‍मीपुजन पुडे दिवाळीच्या निमित्ताने विक्री करणार आहेत .मोठी उलाढाल यामधून अपेक्षित आहे . यावर्षी लॉकडाऊनमुळे दिवाळीचे साहित्य त्यांनी मुलांकडून घरातूनच तयार करून घेतले आहे. आतापर्यंत 25 हजार पणत्या रंगवून आलेल्या आहेत. 200 डझन आकाश कंदील घरातून तयार करून आलेले आहेत. चिमण्यांची घरटी बनवली आहेत. यावेळच्या गिफ्ट बॉक्समध्ये सॅनेटायझरच्या बाटलीचाही त्यांनी समावेश केला आहे.

मुख्याध्यापिका उज्वला खेबुडकर , अमित सुतार, केदार देसाई, आशिष सावेकर, ओंकार राणे आणि प्राजक्ता पाटील या खेळाडूंनी स्पेशल ऑलिंपिक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी सांकेतिक भाषेत सादर केलेल्या राष्ट्रगीतात या शाळेतील 8 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. गोविंद निहलानी दिग्दर्शित वुई केअर फिल्म फेस्ट यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या चित्रफितीतही चेतनाचा सहभाग राहिला आहे. कुष्ठधाम शेंडापार्क, कोल्हापूर 0231-2690306/07 येथे आपण संपर्क साधू शकता.

स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी मतिमंद विद्यालय कागल येथील तृप्ती गायकवाड यांनी सांगितले की, या मुलांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना व्यवसाय प्रशिक्षणाचे काम दिले जाते. एकूण 25 विद्यार्थी शाळेत शिकत आहेत. वेगवेगळ्या सणानिमित्त साहित्य निर्मिती केली जाते. रक्षा बंधनला राख्या तयार केल्या जातात. दिवाळी सणासाठी आकाश कंदील, पणत्या, नक्षीदार मेणपणत्या, सुंदर फुले सध्या तयार करण्यात येत आहेत. गतिमंद मुलं देखील उत्तम पध्दतीने काम करतात हे त्यांच्या वस्तू निर्मितीमधून स्पष्ट होते . यामधून त्यांना विद्या वेतन मिळते. अधिक माहितीसाठी आपण श्रीमती तृप्ती गायकवाड यांच्याशी 9545159374 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता.

सन्मती मतिमंद विकास केंद्र इचलकरंजी,येथील व्यवसाय अधीक्षक किशोरी शेडबाळे यांनी सांगितले की त्यांच्या संस्थेत मुलांना लिफाफे तयार करणे, बुके तयार करणे, बॉक्स फाईल तयार करणे, पणत्या रंगवणे, गिफ्ट बॉक्स, लक्ष्मीपुजनचा पुडा, रंगीबेरंगी पणत्या आदींचे प्रशिक्षण दिले जाते. शाळेमार्फत काही विद्यार्थ्यांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. या वस्तूंची खरेदी करून आपण विद्यार्थ्यांचा सन्मान करावा असे त्यांना वाटते. आपण त्यांच्याशी 9096250952 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता.

ही विशेष मुले सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या जराही पाठीमागे नाहीत हे त्यांनी बनवलेल्या वस्तूंमधून दिसून येते. गरज आहे ती त्यांनी बनवलेल्या वस्तूंना खरेदी करून दिलखुलासपणे दाद देण्याची. आपण अशी दाद देणार ना ?

 

मूळ स्रोत: जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
Prashant Thorat GURUKRUPA on असे ही होऊ शकते !
CHANDRASHEKHAR PRABHAKAR KASAR on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अमेरिकन भारतीयांनो “रजा” घ्या !
यश चंद्रकांत करकरे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा