लोकप्रिय निसर्ग कवी ना.धों. महानोर यांचे आज निधन झाले. त्यांना न्यूज स्टोरी टुडे वेबपोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
काही मान्यवरांनी त्यांना अर्पण केलेली श्रद्धांजली पुढे देत आहे.
– संपादक
१. मराठी कवितेच्या प्रांतातला भावशील कवी..
ना.धों. महानोर म्हटलं की, रानातल्या, शेतातल्या निसर्ग सौंदर्याचा आविष्कार व्यक्त करणारा भावकवी. आपल्या जगण्याचं सूत्र निसर्गाच्या कलात्मकतेत शोधणारा संवेदनशील मनाचा कवी.
‘ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे’, ‘नांगरून पडलेली जमीन’, ‘नदीचा काठ’, ‘पक्षांचे लक्ष थवे’, ‘झाडे झाली हिरवीशी’ आणि ‘मन चिंब पावसाळी’ या त्यांच्या निसर्गकविता आपल्या मनाला खूप भावतात.
तर ‘चवळीची शेंग’, ‘विस्तीर्ण नदीचा काठ’, ‘पोर तोऱ्यात ऐन भरात’, ‘नुकत्या न्हालेल्या केसांना’ आणि ‘माळ्याच्या मळ्यात’ या प्रेमभावनेच्या कविता प्रेमातील विविध भावछटा दाखवितात. लोकपरंपरेतल्या लोकधारेशी खऱ्या अर्थाने नाळ जोडणारा हा कवी जात्यावरच्या ओवीशी नातं जोडणारा होता.
महानोरांच्या ‘हिरव्या पानात पानात’, ‘ घन ओथंबून येती’, ‘आज उदास उदास’, ‘राजसा जवळी जरा बसा’, ‘दूरच्या रानात’, ‘चिंब पावसानं रान’ या गीतात्म कविता आजही आपले भान हरपून टाकतात. आज महानोर गेले….खूप दुःखदायक घटना.
त्यांना कुटुंब रंगलंय काव्यात च्या सर्व रसिकांच्या वतीने विनम्र, भावपूर्ण श्रद्धांजली..

- — प्रा विसुभाऊ बापट. मुंबई.
२. पर्यावरणीय प्रबोधन करणारे कवी
कवी ना धों महानोर यांनी त्यांच्या कवितेने मराठी कवितेवर आपली स्वतंत्र मुद्रा उमटवली आहे. ही नुसतीच निसर्गकविता नाही तर ही पर्यावरणवादी कविता आहे. ते नुसते गाणेही नाही तर पर्यावरणीय प्रबोधन घडवण्याचे तसेच गीतातील, कवितेतील जानपद लोकलय जपण्याचेही मोठे कार्य महानोरांच्या कवितेसह त्यांच्या एकूणच कार्याने केले आहे.
कादंबरी लेखन, लोककथांचे, लोकगीतांचे संपादन, समकालीन कवितांचे प्रातिनिधिक संपादन, विपुल मराठी चित्रपट गीत लेखन, इतर गद्यलेखनही त्यांनी भरपूर केले आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळ्यांवरचे अनेक पुरस्कार, मानसन्मान त्यांना लाभले आहेत.
विधान परिषदेवर ज्या अपवादात्मक नियुक्त्या प्रतिभावंतांच्या झाल्या त्यात दोनदा विधान परिषदेवर ते नियुक्त केले गेले होते. तिथेही त्यांनी त्यांची छाप उमटवली आहे.
आम्ही विदर्भ साहित्य संघाच्या वतीने घेतलेल्या पहिल्या व शेवटच्या अनियतकालिक विकास परिषदेसाठी महानोर आले होते.त्या परिषदेच्या शिफारशी त्यांनी विधान परिषदेत लावून धरल्या होत्या. परिणामी त्यावर शासनाने दोनदा समित्याही नेमल्या.
‘पद्मश्री’ प्राप्त महानोर साहित्य अकादमीच्या पुरस्काराचेही मानकरी आहेत.‘जनस्थान पुरस्कार’ही त्यांना मिळाला आहे. ‘मराठवाडा साहित्य संमेलन’, ‘जलसाहित्य संमेलन’, ‘औदुंबर साहित्य संमेलन’ अशा अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. मात्र मराठवाडा साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अशा संस्थांचे अध्यक्ष राहूनही व ‘जागतिक मराठी अकादमी’, ‘साहित्य अकादमी’, ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ’, ‘चित्रपट महामंडळ’, ‘विश्वकोश निर्मिती मंडळ’ अशा साहित्य संस्थात्मक कार्याचे नेतृत्व करूनही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मात्र त्यांनी कधीच स्वीकारले नाही.
एकूणच मराठी साहित्य प्रांताला सतत जाणवत राहील अशी उणीव त्यांच्या जाण्याने आपल्या वाट्याला आली आहे.
अनेकांप्रमाणेच माझेही त्यांचे व्यक्तिगत मैत्र व परस्पर आदराचे संबंध राहिले होते.
त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली.
- –– श्रीपाद भालचंद्र जोशी

३. जात्यावरची ओवीशी नातं जोडणारा कवी..
लोकपरंपरेतल्या लोकधारेशी खऱ्या अर्थाने नाळ जोडणारा हा कवी जात्यावरची ओवीशी नातं जोडणारा होता.
महानोरांच्या गीतात्म कविता तर आमच्या विद्यार्थी दशेपासून हृदयात स्थान मांडून आहेत. मराठीतल्या अनेक चित्रपटातील त्यांची गाणी म्हणजे मनाला भावणारी लोकगीतेच. ‘हिरव्या पानात पानात’, ‘ घन ओथंबून येती’, ‘आज उदास उदास’, ‘राजसा जवळी जरा बसा’, ‘दूरच्या रानात’, ‘चिंब पावसानं रान’ या त्यांच्या गीतात्म कविता आजही आपले भान हरपून टाकतात.
शिवाजी विद्यापीठाने याचवर्षी बी.ए.भाग २ च्या अभ्यासक्रमात महानोरांच्या कविता घेतल्या आहेत. या कवितेवर बोलण्याची संधी आली आणि आज महानोर गेले. खूप दुःखदायक घटना.
त्यांना भावपूर्ण आदरांजली..
— डॉ.संपतराव पार्लेकर/ पलूस
— टीम एनएसटी. 9869484800
निसर्ग आणि मानवी जीवनाला शब्दबद्ध करणारा,सकारात्मक विचारांचा मोठा माणूस- ना.धों.महानोर यांच्या स्मृतीला सादर वंदन.