दुर्गम, ग्रामीण भागामध्ये अनेक महिलांचा संघर्ष आपापल्या परीने चालू असतो. त्यांची संघर्षगाथा लोकांसमोर येत नाही, त्यांना प्रसिध्दी मिळत नाही, पण म्हणून त्यांच्या संघर्षाची किंमत कमी होत नाही. अश्याच एका कोल्हापूर जिल्ह्यातील आजऱा तालुक्यातील मसोली नावाच्या खेडयातील मष्णाबाईची ही संघर्षगाथा कर्तव्यदक्ष व संवेदनशील तहसीलदार अनिता देशमुख यांच्या शब्दांत……
निग्रह, जिद्द, चिकाटी कायम ठेवून, सरकारी यंत्रणेच्या अभेद्य भिंतीवर न थकता धडका मारून मारून, शेवटी तीला भेग पाडण्यात यशस्वी झालेल्या मष्णाबाईचे हे चित्रण आहे.
माझी पुण्याला नेमणूक असताना आता अतिरिक्त जिल्हाधिकारी असलेले श्री. संजय पवार साहेब जे की कोल्हापूरला निवासी उपजिल्हाधिकारी होते, त्यांची फेसबुकवरची एक पोस्ट माझ्या वाचनात आली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी आज-याच्या एका वयस्कर महिलेबद्दल लिहीले होते. “जमिनीच्या वाटणीबाबत आणि धुरा सरबांध यावरून शेजारच्या शेतक-याशी असलेला काही विवाद सुटावा म्हणून अर्ज देऊन, एक वाळून कोळ झालेली बारिकश्या अंगकाठिची, चेहरा रापलेली एक वयस्कर बाई अर्ज घेऊन येत असे. इतका वेळ आत न सोडल्याबद्दल, पुन्हा त्या दरवाज्यावरील शिपायाकडे रागाने पाहात, समोर आली की एकदम चित्र बदलायचं, म्हणायची “आये, आये माजे तेवढं काम करून दे आये ” तिचे काम स्थानिक पातळीवरील तहसिलदाराकडे होते. तहसिलदार दाद देत नाहीत, अशी तिची नेहमीची तक्रार….. अशा आशयाची ती पोस्ट होती….. ती पोस्ट मी विसरूनही गेले होते.
पण त्यानंतर २ वर्षांनी आज-याला माझी नेमणूक झाली. नवीन नवीन असताना, ४/५ मुले माझ्या केबिनमध्ये आली, आणि मसोली गावच्या कुणा एका म्हाता-या बाईबद्दल तक्रार करू लागली. तिच्याबद्दल तक्रार अर्ज घेऊन आली होती, की ही बाई सगळीकडे जाऊन आमची बदनामी करते, हिचे डोके फिरले आहे, आम्हांला शिव्या देते. केस अजून तहसिलदार कोर्टात आहे, अजुन निकाल नाही, आणि ही आम्हाला गावात शिव्या देते तिचा बंदोबस्त करा, अन्यथा आम्ही तिच्याकडे बघतो, असा अगदी थेट नाही, पण अप्रत्यक्ष त्यांचा आशय होता.
मी त्यांना थोडे समजावणीच्या व थोडे दरडावणा-या स्वरामध्ये सांगितले की, शिव्या दिल्याने तुमच्या अंगाला भोके पडत नाहीत, केसचा जो काही निकाल असेल तो होईल, पण तुम्ही कायद्याच्या कक्षेबाहेर जाऊन काही केले तर पहिल्यांदा तुम्ही रडारवर राहाल. तुझे पुढचे करिअर आहे, त्यामुळे तू दुर्लक्ष कर असे त्या मुलाला सांगितले. तो मुलगा आपला मित्रांना घेऊन तक्रार करायला आला होता.
नंतर आमच्या जमीन चे लिपीक कुंभार यांना बोलावले. त्यांना विचारले तेव्हा त्यांनी मला सांगितले की, ही मष्णाबाई नावाची बाई, सगळीकडे जाऊन तक्रार करत बसते, प्रांत, कलेक्टर सगळ्यांना भेटते. तिची अतिक्रमणाची शेजा-याविरूध्द कब्जाची केस आहे. शेजाऱ्यांनी तिच्या हद्दीत अतिक्रमण केले आहे, अशी तिची तक्रार आहे.
परस्परविरोधी तक्रारी, गावातील पुढाऱ्यांचा हस्तक्षेप यामुळे तिकडे लक्ष दिले नाही. ती बाई सगळयांना भेटते, आणि सगळयांचे डोके पकवते. शिवाय या विषयावर नायब तहसिलदार यांच्याशी पण बोलणे झाले. त्यांनी पण साधारणपणे असाच फीडबॅक दिला.
मी कुंभारना म्हणाले, की तिला अजून पर्यंत कोणी ठामपणे सांगितले नाही की तुझे काम होणार नाही, त्यामुळे ती सगळयांना भेटत असणार… ते म्हणाले मॅडम, तुम्हाला पण तिचे दर्शन होईलच, तुम्हीच तिला सांगा.
आणि खरचं, तीन चार दिवसांनी ती ऑफीसमध्ये आली. डायसच्या समोर येऊन थोडसं कडेला उभे राहून, “माझे आये, माझं तेवढं काम करून दे.” अस म्हणत….आदरणीय संजय पवार साहेबांनी हुबेहुब वर्णन केल्याप्रमाणे रापलेल्या वर्णाची, कासोटा घातलेली रूपायाभर कुंकू कपाळावर रेखलेली, एक सावळी वयस्कर महिला माझ्यासमोर उभी राहिली. तिच्याकडे पाहिल्यावर मला वाईट वाटले.
जवळ जवळ २०१२ पासून तिची केस पेंडिंग होती. दि. २ जून २०१२ रोजीच्या मोजणी अन्वये सिमांकन हद्दी निश्चिती करून ०.०१.२५ हे.आर क्षेत्रामध्ये तिच्या शेजाऱ्याने अतिक्रमण केल्याचे सिध्द झाले होते. तथापी त्या क्षेत्राचा ताबाच तिला शेजाऱ्याने दांडगाव्याने दिला नव्हता. परत गावातील पुढा-यांचा हस्तक्षेप यामुळे कोणी तिकडे लक्ष दिले नाही.
सुनावणीच्या एक दोन तारखा होऊन, परत नवी विटी, नवे राज्य असे होऊन, ती केस मागे पडल्याचे दिसून येत होते, स्पॉट व्हिजीट करून कब्जा दिल्याचे दिसून येत नव्हते. कार्यबाहुल्यामुळे तहसिलदारांनी तिकडे लक्ष दिलेले दिसत नव्हते.
मी मात्र ताबडतोब कुंभाराना तारीख लावायला सांगितली. दोन्ही पार्ट्या समोरासमोर आल्या. विरूद्ध बाजूचा माणूस अगदी शांत उभा होता आणि हिचा मात्र त्याला पाहिल्या पाहिल्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. त्यामुळे अर्थातच त्या विरुद्ध पार्टीबद्दल मला थोडासा सॉफ्ट कॉर्नर वाटू लागला. मी तिला शांत बसायला सांगितले. तर ती म्हणाली, “इथे तुमच्या समोर शांत बसतो, आणि घराजवळ कसल्या शिव्या देतो… मला मारुन टाकायची धमकी देतो.”.. मी दोघांना ही स्पॉट व्हिजीटची तारीख देवून पाठविले.
मष्णाबाईची मी अधिक माहिती घेतली असता, ती एकटीच राहाते, एक मुलगी होती ती स्टॅम्प व्हेंडॉरकडे काम करत होती, पण तिथेच कोणाबरोबर तरी लव मॅरेज करून मुंबईला गेल्याचे समजले.
मष्णाबाई रोज मसोलीहून आज-याला येते, रोज तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय व पोलिस स्टेशन कार्यालयात फे-या मारते, दुकानातून मागून खाते आणि रोज तहसिलदार, नायब तहसिलदार, पोलिस निरीक्षक यांना भेटून साहेब, माझे तेवढे काम करा असे सांगते, असे समजले.
तिचे अनेक किस्से ऐकले. एकदा ती कलेक्टर ऑफीसला, कलेक्टर साहेबांना की आरडीसी साहेबांना भेटायला गेली, शिपायाने साहेब कामात असल्याने भेटू दिले नाही, तर त्याची नजर चुकवून आत गेली आणि साहेबांना सांगितले की, “हा तुम्हाला भेटवायचे पैसे मागतो”! त्यानी शिपायाला चांगलेच फैलावर घेतले, इत्यादी.. ..
मी माहिती घेतली. अतिक्रमीत जागा सुध्दा जास्त नव्हती ०.०१.२५ आर गुंठे जागा…. शेजा-याने एक दिवस रात्री, हिच्या हद्दीत कुंपन घातले, आणि दांडगाव्याने ते तोडू दिले नाही. “माझी जागा आहे ती…. एक इंच मी त्याला देणार नाही…. मी हायकोर्टात जाईन.”… असे माझ्यासमोर बोलली. एकटीच राहाते, मागेपुढे कोणी नाही आणि हिला कशाला एवढा जागेचा सोस…. असे गावातल्या सगळ्यांचे मत होते.
गावातील असाच एक माणूस हे सांगायला आला, “मष्णाबाई आता तुला कशाला पाहिजे एकटीला ” तेव्हा ती म्हणाली, “दादा तू असं बोलायच नाही…. तू आणि मी साळंला जात होतो. मी ५ वी शिकलूय…. साळंला जाणाया माणसांने असं बोलायचं नाही, साळंमध्ये तू काय शिकला आहेस. माझी जमीन मी अशी दांडगाव्याने कुणाला बळकावू देणार नाही.”
मी स्पॉट व्हिजीट केली. बऱ्याच लोकांचे फोन आले होते. मष्णाबाईकडे लक्ष देवू नका, मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. भुमिअभिलेखच्या लोकांना सोबत नेऊन पुन्हा मोजणी केली. पांढरा चुना आणून हद्दी रेखल्या, पंचनामा केला, कब्जाची प्रोसेस पुर्ण केली. तेव्हां एवढा वेळ शांत बसलेला, कुणा कुणाकडून फोन करवणारा, तो विरूद्ध पार्टीचा माणूस प्रचंड ओरडू लागला, शिव्या देऊ लागला. त्यांच्या घरातल्या सगळ्या बायका धावून आल्या. प्रचंड कालवा करू लागल्या. त्यांचा तो आरडा ओरडा पाहीला, आणि प्रथमच मला मष्णाबाईच्या धाडसाची जाणीव झाली…..
या एवढ्या माणसांच्या गराड्यात, ही एकटी बाई इतक्या जागेसाठी रोज आज-याच्या वा-या करते. २०१२ पासून तिच्या अविरत तिच्या फे-या चालू होत्या. त्या आधीही मोजणीसाठी तिने आजऱ्याच्या भूमीअभिलेख ऑफीसच्या वा-या केल्याच असणार होत्या.
जिवाची अजिबात भीती न बाळगता, त्या १०/१२ लोकांच्या तोंडाला तेवढ्याच शिवराळ भाषेत उत्तर देत, ही बाई एकटी तग धरून उभी होती. गावातील कोणाची सहानभूती असलीच तरी ती वायफळ सहानुभूती होती. कोणीही तिच्या मदतीला येत नव्हते.
नकळत मनोमन तिच्याशी मी माझी तुलना केली, एवढा विरोध असताना, एखाद्या गोष्टीसाठी मी एवढी चिकाटी दाखवली असती का? एकटीने एवढे सगळया गावांबरोबर लढायचे धैर्य मला मी तहसिलदार नसते, तर दाखवता आले असते का?
कब्जा दिल्यावरही अनेकदा ती माझ्या ऑफिसमध्ये येत असे. आता काम बदलले होते. तिने संजय गांधी पेन्शनसाठी अर्ज केला होता. एकदा भर दुपारी धापा टाकत उन्हाने अगदी गलीतगात्र अशी ऑफीसमध्ये आली. मी शिपाई काकाना कोल्ड्रींगची बाटली आणायला सांगून तिला कोल्ड्रींग द्यायला लावले. शिपाई काकांनी ते कोल्ड्रींग साध्या ग्लासमधून दिले. ऑफीसमध्ये काचेचे ग्लास असताना, तिला साध्या ग्लास मधून का दिले, असे विचारून, त्यांना मी पुन्हा काचेच्या ग्लासमधून द्यायला लावले. तेव्हा मात्र ती अगदी गहिवरून गेली.
मग मध्ये मध्ये माझ्या केबिनमध्ये तिने डोकावून जाणे नित्याचेच झाले. प्रत्येक कार्यालयामध्ये तिचे असे काही ना काही काम होतेच, आणि ते न झाल्याने होणाऱ्या तक्रारीही होत्याच. एकदा मी तिला विचारले, “मुलगी कुठे आहे? तिच्याशी कॉन्टॅक्ट आहे की नाही”? “नाही बाई… ती गेली, तिचे तोंड पुन्हा पाहणार नाही… लव मॅरेज करून मला काळे लावून गेली.”…. असे उत्तर आले… मी म्हणाले, “बरं झालं, तुमच्या डोक्याचा ताप गेला, तुला लग्न जमवायचा, माझे सुध्दा लव मॅरेज झाले आहे. आता बोलावून घ्या मुलीला”. तर उत्तर आले, “बाई असं कुणाला पण घेऊन जायाचं नाही, सायबाले घेऊन जायांचं, मी कुठं नको म्हणलं असतं. तू बघ कशी सायबाबरोबर लगीन केलस. आता तिचं ती कायबी करू देत, मी बगणार नाही. तिला एक पै ही देणार नाही”, तिच्या तत्वज्ञानापुढे मी हात टेकले, तिला अजून समजावत बसायला अर्थातच माझ्याकडे वेळ नव्हता.
तिची संजय गांधीची पेन्शन सुध्दा मंजूर झाली. कमिटीमधल्या सदस्यांचा विरोध होता, कारण तिची ही प्रत्येक कार्यालयात जायची आणि तक्रार करायची हिस्ट्री. पण मी मध्ये पडून, तो विरोध मोडून काढला.

…जेव्हा माझी बदली झाली तेव्हा शेवटच्या दिवशी ती घाई घाईत कार्यालयात आली, “बाई मला सांगितल्या शिवाय जाणार होतीस का तू? थांब जाऊ नकोस, मला तुला भेट द्यायची आहे. मी आल्याशिवाय जाऊ नकोस”. असे सांगून गेली.
मी तिला म्हणत होते, मष्णाबाई तू मला काय देणार आहेस, मला काहीही नको. पण तिने ऐकले नाही. घाईघाईत बाजारात जाऊन एक शंकर, पार्वती व गणपतीचा फोटो आणला आणि मला भेट दिला. प्रशासकीय कारकिर्दीत भेटी मिळणे नवीन नाही. पण मष्णाबाईच्या या भेटीचे मोल मात्र माझ्यासाठी अनमोल होते. “मष्णाबाई, तू आता मला काय देणार”? असे म्हणणा-या मला, मष्णाबाईने माझ्या प्रशासकीय कारकीर्दीतील एक हळवा, अनमोल क्षण दिला होता.

महिला दिनी महिलांच्या कर्तूत्वाचा गौरव होतो. मष्णाबाई सारख्या अनेक स्त्रिया तेजस्वीपणे समोर आलेल्या छोटया मोठया संघर्षांना, मोठया धिराने तोंड देवून, त्यातून मार्ग काढत असतात, पण त्यांचे कर्तूत्व लोकांसमोर येत नाही. किंबहूना त्याच्यामध्ये काही कर्तूत्व आहे असेही समाजाला वाटत नाही. पण ते संघर्ष लढतांना त्या स्त्रियांना, समाजाची प्रतिगामी मानसिकता, परंपरागत स्त्रिला बंधनात अडकवणाऱ्या चाली रिती अशा अनेक न दिसणाऱ्या साखळ दंडाना तोडून तो संघर्ष लढावा लागतो. त्यावेळी त्या स्त्रिच्या मनाच्या होणाऱ्या घुसमटीचा अंदाजही समाजाला येवू शकत नाही. त्या सर्व स्त्रियांना मष्णाबाईवर लेख लिहीण्याच्या निमित्ताने माझा मानाचा सलाम.

– लेखन : अनिता देशमुख.
– संपादक : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
स्वतः च्या हक्कांसाठी लढणार्या मषणाबाई
आणि तिला न्याय मिळवून देणार्या अनिता मॅडम
दोघी ही Great
मष्णाबाईची संघर्ष गाथा आणि त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या आपल्यासारख्या प्रशासकीय महसुली अधिकारी.. आपणास सलाम.. खूप भावला लेख