अविरत बरसणारा मनमोही, रोमांचित करणारा भुरभुरता पाऊस अन सोनेरी कोवळ्या सोनसळी उन्हाच्या लपंडावी खेळात आसमंती सप्तरंगी इंद्रधनुष्य तय्यार होते,अन मानवी मनास भुरळ घालते. परिवर्तनीय शक्तीचा स्रोत, ऊर्जा, चैतन्याची बहार, उर्मी अनुभवास मिळते.हे सारे रंग मानवी मनावर इतके गहिरे परिणाम करत असतात की खरंच आपण रंगात रंगून जावून, अवघा रंग एकचि झाला, अशी अवस्था एकंदरीत होते.
आसमंतातील ता, ना, पि, हि, नी, पा, जा, या सप्तरंगी इंद्रधनुष रंगाने मानवी मनावर अधिराज्य करत, मानवाचे जीवनात, अग्रणी स्थान मिळवले आहे. संपूर्ण भारतात होळी सणाचा उत्सव अन त्या नंतर रंगपंचमी, मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. रंगांची उधळण, पखरण, मनाला मोहक भासून तयाचा वेगळाच आनंद जाणवतो. या मूळ सात रंगापासून कमीतकमी 35 ते 40 छटा तय्यार होतात. ज्या योगे चित्रकार त्यांचा उपयोग, योग्यते नुसार, जिथे जशा रंगाची गरज आहे त्यानुसार कुंचला वापरून करत असतो.
बाल वयात रंग, यामुळे कान, नाक, डोळे, चेहरा, यांना इजा पोहोचू नये, म्हणून होळी, रंगपंचमी चा खेळ खेळणे दुरापास्तच होते. अन तारुण्यात हाच उत्सव खेळण्याच्या वेळी माझा नर्सिंग कोर्स ला प्रवेश झाला. सरकारी नोकरीचे महत्व जाणून त्यानंतर फक्त एकाच रंगाशी कायमचा संबंध जुळला, तो अगदी नोकरीतून थेट सेवानिवृत्त होईपर्यंत, तो म्हणजे पांढरा शुभ्र धवल सफेद रंग, ज्यामुळे चंद्रासम शीतलता तनमनास आल्हाददायक लाभली. स्वछतेचा गुण अंगी भिनला.
कोणत्याही डागाशिवाय, आपले जीवन शांततेने स्वीकारत, येणाऱ्या प्रत्येक समस्येला सामोरे जातच पुढे चालत राहायचे, हे मात्र अगदी योग्य वयातच प्रकर्षाने जाणीवपूर्वक कळून आले.
आज आठवायचे कारण, असे की, माझी सिस्टर पदावर पदोन्नती झाल्यानंतर आमच्या कॅटेगरीला 12/15 दिवसांनी night-super, हॉस्पिटल इन्चार्ज ची रात्रपाळी ची ड्युटी ही पूर्ण हॉस्पिटल साठी करावी लागत असे.

अशाच एका रात्रपाळीत माझ्या ड्युटीत कामकाज करत असताना अचानक कंट्रोल रूम मधून फोन खणखणला, अन उल्हासनगर हॉस्पिटल मधून 60 बालके होळीची रंगपंचमी खेळताना विषारी भेसळयुक्त रासायनिक द्रव पदार्थ वापरल्याने अत्यवस्थ स्थितीत आमच्या अत्यावश्यक कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आली. पुढे त्यांच्या नातेवाईकांची एकदम गडबड सुरु झाली.समोर असलेल्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून सर्व माहिती देवून, व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक कक्षात बालकांच्या दाखल करवून घेऊन, सर्व ऑन ड्युटी डॉक्टर्स, सिस्टर्स, कर्मचारी यांच्या मदतीने तात्काळ काम सुरु करून, उपाय योजनेसह नातेवाईक यांना समजावत धीर देवून शांतता राखत पुढच्या व्हरांड्यात त्यांना बसवण्यास गेले, तर बघते तर काय, एव्हाना सर्व रिकाम्या जागेत पोलीस व राजकीय वरिष्ठ मांदियाळी, कार्यकर्ते यांची गर्दी जमून रुग्णालयास छावणीचे स्वरूप प्राप्त झाले.
विषारी द्रव्य रंगात भेसळीने सर्व बालक रुग्णांची त्वचा, कमी अधिक प्रमाणात भाजली होती. त्यामुळे पालकही मुलांसोबत रडतच होते. सर्व वरिष्ठ डॉक्टर्स, आरएमओ, मेट्रन उपस्थित होऊन, सूचना देत आम्हा सर्वांकडून उचित कामकाज करवून घेत होते.
सर्व पालकांना धीर देत अन बालकांना योग्य ते उपचार करताना उष:काल होऊन सकाळ कधी उजाडली ती कळालीच नाही. अगदी ड्युटीची वेळ संपली तरी महत्वाचे अहवाल तयार करून वरिष्ठ अधिकार्यांना देवून, परत एकदा नातेवाईकना समजावून, ड्युटी संपल्याने मी घराकडे निघाले.माझी मुले सुद्धा त्यावेळेस त्याच वयाची होती. त्यामुळे त्यांची प्रकर्षाने आठवण होऊन थोडी चिंतीत झाले.
असा जीवघेणा खेळ अन वेळ अजाणत्या वयात निष्पाप मुलांवर आली, अन मनाला चटका लावणारा हृदयद्रावक अनुभव, आम्हा सर्व काम करणाऱ्याना बरेच काही शिकवून गेला. हळूहळू त्यांतील एकेक बालक बरे होत होत डिस्चार्ज झाले. एकही बालक न दगावता सर्वजण बरे झाले, अन तातडीने केलेल्या उपाय योजनेला उचित फल प्राप्त झाले, त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला. हॉस्पिटल मधून नातेवाईकांनी, सर्व पालकांनी आभाराचे पत्रक तय्यार करून आम्हा सर्वांचेच व वरिष्ठ यांचे धन्यवाद मानले.
कल्पनेतील रंग मनावर गारुड निर्माण करणारे अन प्रत्यक्षात वास्तवातील सत्य किती भयावह, भीषण होते याचा प्रत्यय आम्हा सर्वांनाच आला. ही आठवण मला प्रत्येक होळीपौर्णिमा सणाला, रंगपंचमीला अगदी जाणवतेच. जसे घडले तसं चित्राकृती डोळ्यसमोर झळकतेच !
किमान मला आलेल्या अनुभव लेखनाचे वाचन केल्यावर सजग पालकांनी आपापल्या बालकांवर वरील प्रमाणे वेळ येऊ देवू नये, असे कळकळीने मनापासून जाणवते.

— लेखन : सौ.मीना घोडविंदे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
