Wednesday, September 17, 2025
Homeलेखआठवणीतील स्वातंत्र्यदिन

आठवणीतील स्वातंत्र्यदिन

मला आज ही आठवते बालपणी आम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करायचो. भल्या पहाटे दादा आम्हा भावंडाना उठवत असत. वडीलांना आम्ही दादा म्हणतो. दादा तांब्याच्या हांडयात पाणी तापवायचे. आई अंगण झाडून त्यावर सडा टाकायची. अंगणात हिरवागार शेणाचा सडा पडायचा.

पहाटे पहाटे थंडीत उठणे नकोसे होत असे. पण दादांच्या कडक, शिस्तबद्ध स्वभावामुळे उठणे भाग पडे. दादा आंघोळ करून देव पुजा करत. देवपुजा करताना त्यांचे गोड आवाजातील स्त्रोत्र कानी पडे. आम्ही परसात चुलीसमोर स्त्रोत्र ऐकत थंडीत शेकोटी घेत असत. आई भल्या पहाटे घरकाम करत असताना गवळणी म्हणत असे.

हिरव्या गार सडयावर आई रांगोळी रेखाटत असे. स्वातंत्र्य दिन तिला समजत नसे, पण तरीही ती तिरंगी झेंडा अंगणात काढी. मी तिची रांगोळी लक्ष देवून पाहत असे. एवढ जाज्वल्य देशप्रेम तिच्यात कोठून आले ? देव जाणे ! पण ती आम्हां भावंडाना म्हणायची,
“हा देश स्वतंत्र करण्यासाठी अनेकांनी रक्त सांडले आहे. गांधीनी हा देश स्वतंत्र केला. बाळांनो खूप मोठे व्हा, पण देशाला कधीही विसरु नका”. तिचे देशप्रेम पाहले की अंगात बळ संचारायचे. वाटायचे कुठून आली तिच्यात एवढी विद्वता ? तिच्या त्या देशप्रेमाला मनोमन कडक सलाम ठोकत असू.

पाणी तापल्यानंतर ती आम्हांला आंघोळ घाली. गरम गरम पाणी, साबण आणि सोबतीला आईचे ते प्रेम ! किती अविस्मरणिय दिवस होते ते ? आंघोळ झाली की रामरक्षा म्हणावी लागे. तो आमच्या घरचा संस्कार होता. देवाला नमस्कार करून आईच्या हातचा चहा घेत असू. चहा कुठला ते अमृतच होते. तोपर्यत बरचसं उजडलं असे. दादा आदल्या रात्री कपडयांना इस्त्री मारत. तांब्यामध्ये गरम पेटता कोळसा घालून ते इस्त्री करत. आता बालपणीचे ते इस्त्रीचे कपडे आठवले की मनोमन हसू येते.

सहा वाजता आम्ही शाळेच्या मैदानावर असत. एमसीसी, एनसीसी, स्काऊट, गाईड व कब बुलबुल पथक आमच्या आधी मैदानात हजर असे. देशभक्तीची कोणती नशा होती ती ? आज एवढया मोठया पगारी घेवून ही आम्ही कर्तव्य म्हणून ध्वाजारोहणास उपस्थित असतो. काहीजण तर राष्ट्रीय सण सुट्टी म्हणून साजरे करतात. असो.….

मैदानावर पिटीचे कडक शिस्तीचे माळी सर असत. त्यांची आठवण आली की घाम फूटतो. सोबतीला निपाणीकर सर व धर्मराव बाई यांचं सुरेख सुत्रसंचालन कार्यक्रमाचे वैभव कैक पटीने वाढवत असे. आज मी काही भाषण करतो, तो त्यांचाच कृपाप्रसाद समजतो. शेख सर, काशिद सर, शेजाळ सर, सगट सर, लाडुळकर सर हे फक्त शिक्षक नव्हते तर ते संस्कार दाते होते.

गावातून प्रभात फेरी निघायची. बँड ढोल वाजत आम्ही मुलं प्रभात फेरीत सामिल होत असे. जोडीजोडीने जाताना आम्ही देशभक्तीपर घोषणा देत. त्यात मजा येत असे. खरचं आमच्यात देशभक्ती होती का ? पण एवढ नक्की ते सार करताना खूप उत्साह वाट असे. आपण खुप मोठे कोणीतरी आहे, असेच वाटत असे. गल्लीगल्लीतून जाताना घरासमोर मायमाऊल्या रांगोळ्या घालून स्वागत करीत असत. त्यांच्या या कृतीमधून देशभक्तीची मोठी प्रेरणा मिळायची. मोठ्या मोठयाने घोषणा देत आम्ही पोलिस चौकी, ग्रामपंचायत, पतपेढीचे ध्वजारोहणास मानवंदना देत असू. मग शेवटी शाळेच्या मैदानावर पोहचत असे.

आमचे सारे गुरुजी आम्हाला रांगेत उभे करत. माळी सर ध्वजारोहन करत असत. त्यानंतर मोठया आवाजात बँडवर तालात राष्ट्रगीत होई. मान्यवरांना बसण्यासाठी उंचावर स्वतंत्र व्यवस्था असे. गावातील स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक यावेळी उपस्थित असत. एमसीसी, एनसीसी मान्यवरांना परेड करुन सलामी देत असत. त्यानंतर लेझिम संचालन होई. डंबेल, रिंग व घुंगरकाठी कवायत होत असे. बैठी व खडी कवायत यात रंगभरत असे. त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे होत. माझ्या भाषणास खुप टाळ्या मिळत. त्यामुळे माझी छाती अभिमानाने फुलून येई. नंतर मान्यवर शुभेच्छापर भाषण करीत.

आम्हांस खरी ओढ लागे ते बक्षिस वितरण समारंभाची. मला निंबध, वक्तृत्व, चित्रकला व कथा सांगणे याचे हमखास बक्षिस मिळायचे. बक्षिसासाठी मी खूप आसुसलेलो असायचो. ते बक्षिस मान्यवरांच्या हस्ते घेताना राष्ट्रपतींच्या हातून बक्षिस घेत आहे असे वाटायचे. नंतर खाऊ वाटप होत असे.

सर्व कार्यक्रमापेक्षा खाऊ खाण्याची ती मजा काही औरच होती. आजच्या कॕडबरी, लालीपाॕप, गुडडे बिस्किटापेक्षा चुरमुरे, लेमन गोळया खूप चवदार लागायच्या. बालपणीचे ते स्वातंत्र्य दिन आठवले की, आजचे स्वातंत्र्यदिन दीन झालेत की काय ? असेच वाटते. आज या दिनाला हौस , कर्तव्य म्हणून उपस्थित राहतात तेंव्हा मनोमन चिड येते. आज या दिवसासाठी बाजारात कपडे, कागदी झेंडे आले आणि राष्ट्रभक्ती बाजारु व्हायला लागली. लोकांचे राष्ट्रप्रेम बेगडी होत आहे की काय, असे वाटायला लागले आहे. या दिवसात आम्हांस राष्ट्रभक्तीचा फिवर चढतो, आणि मग काय ? आम्ही व्हाटसअप्स, फेसबुक मेसेज आणि फोटो डाऊनलोड करतो, अगदी फिवर चढल्यागत. तीन दिवसानंतर परत जैसे थे. ‘राष्टभक्ती फक्त त्या दिवसापुरती राहावी का ? ‘ हा अंतर्मुख करणारा प्रश्न आपण स्वतःस विचारायला हवा, हेच खरे.

– लेखन : पंकज काटकर
– संपादन :  देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. खूप सुंदर वर्णन…
    आणि विचारप्रवृत्त करणारी अखेर…!
    धन्यवाद पंकज साहेब…
    जय हिन्द..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा