राजमाता जिजाऊ यांच्या कार्य कर्तृत्वाचा आदर्श व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराने प्रेरित होऊन आयुष्यभर अत्यंत प्रामाणिकपणे आपले कुटुंब व आपली मुले सातारा जिल्ह्यातील कुमठे येथील सौ. कमल जगदाळे यांनी उच्च शिक्षित व सुसंस्कारी केलीत.
सौ .कमल जगदाळे या शिरंबे येथील भोसले घराण्याच्या सुवर्णकन्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये एकत्रित कुटुंबाला सावरत आपल्या तिन्ही मुलांना उच्चशिक्षित करून त्यांनी डॉक्टर बनवले.
पती शिक्षण सेवेत उच्च कामगिरी करीत असताना कमलताईनी आदर्श गृहिणी म्हणून आपला संसार फुलविला. एक मुलगा डाॅ. महेश हे भूलशास्त्र तज्ञ, मुलगी डाॅ.सौ. सीमा, या कॉर्निया स्पेशालिस्ट, तर मुलगा डाॅ.गणेश अस्थिरोग तज्ञ म्हणून समाजसेवेचे व्रत पार पाडत आहेत.

नास्ति मातृसमा छाया, नास्ति मातृसमा गतिः ।
नास्ति मातृसमं त्राण, नास्ति मातृसमा प्रिया ।।
मातेने पुत्रांना दिलेले सुसंस्कार हे महालक्ष्मी ने दिलेल्या आशीर्वादा प्रमाणेच असतात हेच सुसंस्काराचे धडे कमलताईनी आपल्या मुलांना दिलेत. कुमठे नगरीच्या आदर्श परिवारातील आदर्श गृहिणी, आदर्श सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.संपतराव नारायणराव जगदाळे यांच्या सुविद्य पत्नी म्हणुन त्या सर्वांसाठी चंदनाप्रमाणे झिजल्यात.
आदर्श अशा आदरणीय दिवंगत नारायण तात्यांच्या ज्येष्ठ स्नुषा म्हणून कुमठे गावाशी त्यांनी कायमस्वरूपी नातं जोडले. जगदाळे कुटुंबाची नि:स्पृहपणे सेवा करत एक कुटुंब-वत्सल गृहिणीची जबाबदारी त्यांनी पेलली.
खानदानी पणाची भुषणं त्यांच्या व्यक्तित्वातून प्रदर्शित होतात. खानदानीपण व मराठ मोळंपण कसं असतं त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे काय ते त्यांच्या आचरणातून व राहणीमानातून सिद्ध होतं. तेच नेमके संस्कार त्यांनी आपल्या सर्व पाल्यांवर व नातवंडांवर अगदी काटेकोरपणे बिंबित करून त्यांच्या जीवनामध्ये प्रगल्भता आणली.
एक आई म्हणून, एक आज्जी म्हणून आपल्या संस्काराचा ठेवा मुक्त हस्ते त्यांच्यावर उधळला आणि त्यांना “यशस्वी” नागरिक म्हणून नावारूपाला आणलेत.
यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचं योगदान भरीव असतेच हे सूत्र त्यांनी आदरणीय सरांच्या बाबतीत तंतोतंत खरेपणाने सहचारिणी या नात्याने सिद्ध केले, म्हणूनच त्या एक आदर्श पत्नी व आदर्श माता म्हणून ओळखल्या जातात.

आपल्या कुटुंबातील सर्वांवर मायेची पाखर धरताना आपल्या कुटुंबा व्यतिरिक्त इतर घटकांवर सुद्धा त्यांनी आपलेपणाने माया केली, त्यांच्या विषयी सहकार भाव ठेऊन त्यांना दया भावाने मदत करीत आल्यात.
दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ।।
या तुकोबारायांच्या वचनसाधर्म्य त्यांची आचरण व शिकवण आजच्या नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल.
सरांच्या सामाजिक व शैक्षणिक सहभागाला त्यांनी नेहमीच समर्थपणे साथ दिली. कौटुंबिक व्यवस्थेशी एकरूप होऊन आपले कर्तव्य निष्ठेनं पार पाडले. कुटुंबाला आदर्शवत बनविण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान स्पृहणीय आहे. त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील, गोवा साहित्य परिषदेच्या सचिव सौ. चित्राताई क्षीरसागर यांच्या हस्ते त्यांना नुकताच सन्मानपूर्वक यशवंतराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आला.
खरंच, कमलताई जगदाळे यांचे जीवन व कार्य इतरांनी आदर्श घ्यावा असेच आहे.
– लेखन : सौ.स्वाती विकास भोसले
अध्यक्षा, यशवंत नगरी फाऊंडेशन
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800