Tuesday, September 17, 2024
Homeयशकथाआदर्श सून, आदर्श सासर !

आदर्श सून, आदर्श सासर !

आपल्या समाजात अजून ही बऱ्याच ठिकाणी असं समजलं जातं की विवाह झाला की सूनबाईने केवळ घर, संसार बघावा. सूर जुळले नाही तर कित्येकदा सून आणि सासरची मंडळी यात दुरावा निर्माण होतो. मधल्यामध्ये मुलाची मात्र ओढाताण होते. बायकोचं ऐकावं तर आई वडील (विशेषत: आई !) नाराज आणि आई वडिलांचं ऐकावं तर बायको नाराज !

पण हेच जर सून, पती आणि सासू, सासरे यांचे सर्व बाबतीत एकमत असेल, सहकार्य असेल तर सर्वांचे जीवन शांततामय होते. सर्वांनाच आपापल्या मनाप्रमाणे प्रगतीला वाव मिळतो. याचे सुंदर उदाहरण नुकतेच माझ्या पाहण्यात आले आणि सासरचा हा आदर्श आपल्या पुढे ठेवावा, म्हणून हा लेखनप्रपंच.

तर झालं असं की नांदेड येथील बी एस एन एल मधून कार्यालयीन अधीक्षक या पदावरून निवृत्त झालेले श्री सुभाष गर्जे आणि आपल्या पोर्टल च्या कवयित्री, लेखिका सौ अरुणा गर्जे यांच्या सूनबाई ऋतुजा, ज्या पती हर्षद सुभाष यांच्या समवेत सांगली जपानी भाषा शिकविण्याचे काम गेल्या १५ वर्षांपासून करीत आहेत, त्यांची निवड जपान सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या विद्यमानै जपान फाऊंडेशन तर्फे २०२४-२५ सालच्या जपानी भाषा प्रशिक्षण व संशोधन कार्यक्रमासाठी निवड झाली. सुमारे १८-२० देशांमधील जपानी भाषा शिक्षक ह्यांत सहभागी होणार असून ऋतुजा भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. तोक्यो, जपान येथे स्थित उरावा येथील संशोधन केंद्रात ऑगस्ट २०२४ ते फेब्रुवारी २०२५ असे सहा महिने त्यांचे उपक्रम चालतील. उद्योग व शिक्षण ह्यांच्यातील तफावत दूर करणारे व्यावसायिक भाषा कौशल्य विद्यार्थ्यांना कसे पुरवता येईल, हा विषय त्यांच्या संशोधनाच्या केंद्रस्थानी असेल.

गर्जे परिवार

दरम्यान, जपान मध्ये कुठला तरी साथीचा रोग पसरला, असे प्रसार माध्यमांत आले आणि ऋतुजा ने अशा परिस्थितीत जपान ला जावे की न जावे ? असा गहन प्रश्न निर्माण झाला. आपल्या पोर्टल वर मी लिहिलेली “मेरा जुता है जपानी” ही लेखमाला अरुणा गर्जे मॅडम च्या वाचनात आली. त्यांनी मला जपान मधील नेमकी परिस्थिती काय आहे ? सून बाईंनी तिथे जाणे योग्य आहे का ? अशी विचारणा केली. मी त्यांना सांगितले की, जपान अतिशय स्वच्छ, सुरक्षित आहे. सर्व दैनंदिन व्यवहार एकदम सुरळीत सुरु आहेत. हाच धीर त्यानी सुनेला दिला आणि आनंदाने जाण्याची तयारी करण्यास सांगितले. त्या प्रमाणे ऋतुजा सहा महिन्यांसाठी नुकतीच जपान साठी रवाना झाली. रुढीग्रस्त, बुर्सटलेली मानसिकता असलेले नवरे, सासू सासरे यांनी अनुकरण करावे, असेच हे उदाहरण आहे. या बद्दल सर्व गर्जे परिवाराचे हार्दिक अभिनंदन.

ऋतुजा यांना त्यांचे संशोधन यशस्वी व्हावे, जपान मधील वास्तव्य सुखद व्हावे यासाठी आपल्या न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. देवेंद्र सर, आपला हा लेख सामाजिक दृष्टया खूप छान आहे. ऋतुजा चे ह्या यशाचे रहस्य म्हणजे तिची प्रचंड मेहनत आणि अभ्यास आहे. त्यात हर्षद ची साथ असणे विशेष. आमच्या उभयतांच्या फक्त शुभेच्छाच तिच्या पाठीशी होत्या. तिच्या ह्या घवघवीत यशात तिचे आई वडील मनीषा व नरेंद्र गोखले ह्यांचा पण सिंहाचा वाटा आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा असल्यामुळे ऋतूजा चा भावी काळ उन्नतीचा आणि प्रगतीचा राहील ह्यात शंका नाही.
    सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद 💐💐🙏🙏
    सुभाष गर्जे
    अरुणा गर्जे

  2. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
    सासूबाई व सूनबाई चे
    खरच ह्या नात्यात चांगले सकारात्मक बदल होत आहे त. पुनश्च गर्जे परिवाराचे अभिनंदन

  3. “आदर्श सुन ,आदर्श सासर” हा देवेंद्र भुजबळ सरांचा लेख अतिशय प्रेरणादायक आहे. हर्षद व ॠतुजा यांच्या पाठीशी,सुभाष गर्जे व अरुणा गर्जे खंबीर पणे उभे राहीले.त्यामुळेच, हर्षद व ऋतुजा यांना आजचे सुयश मिळाले.अर्थात हर्षद व ऋतुजा यांनी सुध्धा यशासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. संपूर्ण गर्जे परिवाराचे हार्दिक अभिनंदन. असेच यश त्यांना भविष्यात मिळावे ही शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments