९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त विशेष लेख…….
जन्म : १५ नोव्हेंबर १८७५.
निधन : ९ जून १९००.
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी हत्या झाली. त्यानंतर केंद्र सरकारने त्यांना मरणोत्तर “बिरसा मुंडा पुरस्कार” जाहीर केला. त्यासंदर्भातील बातम्या झळकल्या आणि ‘बिरसाचे’ नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पसरले.
बिरसा मुंडा याचा जन्म बिहार राज्यातील उलिहातू नावाच्या खेडेगावात १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला. आर्थिक परिस्थितीने त्याला फार शिक्षण घेता आले नाही. परंतु तो लिहायला, वाचायला शिकला होता. हिंदू आणि ख्रिश्चन धर्मियांकडून आदिवासींवर होणाऱ्या अन्याय व अत्याचार यामुळे बिरसा संतापला. त्याने स्वतंत्र धर्म स्थापन केला. त्यास सर्वजण “बिरसा धर्म” म्हणून म्हणू लागले. या धर्माच्या अनुयायांना ‘बिरसाइट्स’ म्हणून संबोधण्यात येऊ लागले.
या धर्मस्थापनेपासून सर्व आदिवासी बिरसाच्या नेतृत्वाखाली आंदोलने करू लागले. त्यामुळे इंग्रज हादरले. या आंदोलनात अनेक आदिवासी त्याच प्रमाणे इंग्रज अधिकारी म्रुत्यूमुखी पडले. बिरसा याची दहशत वाढू लागली. इंग्रजांनी त्याला पकडण्यासाठी खुप प्रयत्न केले. परंतु त्याला लोकाश्रय असल्यामुळे तो सापडत नव्हता. त्याचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास इंग्रजांनी पाचशे रुपये इनाम जाहीर केले. तेव्हा त्याच्या जवळच्या व्यक्तींनी त्याचा ठावठिकाणा सांगितला व त्याला ३ फेब्रुवारी १९०० रोजी अटक करण्यात आली. त्याच्यावर खटला भरण्यात आला. त्याची रवानगी रांचीच्या तुरुंगात करण्यात आली. ९ जून १९०० रोजी त्याचे कैदेत निधन झाले.
इंग्रजांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना कळवण्यात आले. त्याच्या मृत्युचे गूढ अद्याप उलगडले नाही. अवघ्या पंचवीस वर्षांच्या या क्रांतीकारकाने स्वातंत्र संग्रामात आपले बलिदान दिले.
डॉ विनायक तुमराम यांनी लिहिलेल्या १०२ पानी चरित्राची किंमत अवघी १२० रुपये आहे. तुमराम यांनी या चरित्रात क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली आहे. सर्व तरुणांनी हे पुस्तक वाचले पाहिजे. तीन वर्षांनंतर १५ नोव्हेंबर २०२५ रोजी बिरसा मुंडा याची १५० वी जयंती तर ९ जून २०२५ रोजी १२५ वी पुण्यतिथी आहे. त्यापूर्वी इतिहास संशोधकांनी बिरसा मुंडा यांच्यावर संशोधन करून विस्तृत प्रमाणात चरित्र प्रकाशित करावे ही अपेक्षा.
बिरसा मुंडा यांची माहिती पाठ्यपुस्तकात प्रकाशित करण्यासाठी सर्वांनी शासनाकडे पाठपुरावा करावा.

– लेखन : दिलीप प्रभाकर गडकरी. कर्जत-रायगड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800