रविवार, ९ मार्च २०२५ रोजी सायंकाळी मुंबईतील विले पार्ले येथील प्रसिद्ध लोकमान्य सेवा संघाचे स्वातंत्र्यवीर सावरकर पटांगण हळू हळू भरू लागले होते. खरं म्हणजे त्याच सुमारास भारत विरुद्ध न्यूझीलंडची क्रिकेट मॅच असल्यामुळे ती मॅच पाहणे सोडून या कार्यक्रमाला किती लोक येतील ? या विषयी मी साशंक होतो. पण आश्चर्य म्हणजे थोड्याच वेळात पटांगणात ठेवलेल्या सर्व खुर्च्या भरून गेल्या. अर्थात हा करिश्मा होता, तो या कार्यक्रमाचे आयोजक, ज्येष्ठ संपादक श्री प्रकाश कुलकर्णी यांच्या नावाचा, कर्तृत्वाचा आणि सन्मानासाठी निवडलेल्या योग्य व्यक्तींचा. मध्येच मराठी, हिंदी लोकप्रिय गीतांचे सादरीकरण तर मधे मधे सत्कार, हा असा छान मेळ साधल्या गेला होता की तीन साडेतीन तास कसे निघून गेले हे कळलेच नाही.

कार्यक्रमाची संकल्पना, सुरुवात या विषयी बोलताना श्री प्रकाश कुलकर्णी यांनी ते लोकसत्ताचे निवासी संपादक असताना, १९९२ मुंबई दंगलीत घरी असलेल्या आईची, पत्नीची, मुलीची कशी काळजी वाटायची हे सांगून आपल्या जीवनात महिलांचे असलेले अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन तेव्हाच महिलांचा सत्कार करण्याची कल्पना आपल्याला स्फुरली असे सांगितले. पुढे नवशक्ती चे संपादक असताना, नवशक्ती च्या माध्यमातून आणि तिथून निवृत्त झाल्यावर स्वतःच्या रमा प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी करीत असलेल्या महिलांना सात वर्षांपूर्वी पुरस्कार देण्याची सुरुवात कशी केली, किती चांगले अनुभव येत गेले, याचा थोडक्यात आलेख सादर केला.

यावेळी जेष्ठ पत्रकार, माजी खासदार कुमार केतकर यांच्या हस्ते स्वामी समर्थ मंडळ, पालघर यांना ५ मुलींच्या वार्षिक खर्चासाठी ५५ हजार रुपयांचा धनादेश संस्थेचे प्रमुख कमलाकर पाटील यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री कुमार केतकर यांनी समाज बदलण्याची अजूनही गरज असल्याचे सांगून मॉल, टिव्ही वगैरे बाबींनी आपल्याला मिळणारी सुखे ही इतरांच्या दुःखावर उभी आहे, हे विसरता कामा नये, याची जाणीव उपस्थिताना करून दिली.
पहिल्या सत्कारमूर्ती, स्त्री मुक्ती संघटनेच्या संस्थापक शारदा साठे त्यांच्या सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या, सर्व स्त्रियांच्या वतीने मी हा सत्कार स्वीकारीत आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने सर्व देशातील महिलांची परिस्थिती या विषयावर अहवाल तयार करण्यास सांगितले होते. भारतात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली अहवाल तयार केला गेला. पुढे संयुक्त राष्ट्र संघटनेने १९७५ हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केले. पण वर्षभरातच लक्षात आले की, एका वर्षात काही होणार नाही म्हणून १९७५ ते १९८५ असे पूर्ण दशक महिला दशक म्हणून साजरे करण्यात आले.

स्त्रियांच्या कल्याणासाठी, स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी फार काम करण्याची गरज होती. सुरुवात कुठून करायची,याची कल्पना येत नव्हती. म्हणून १९७५ साली स्त्री मुक्ती संघटनेची स्थापना करून कामाला सुरुवात झाली. हे काम अजूनही सुरूच आहे. अजूनही महिलांना समान संधी मिळत नाहीय. म्हणून महिलादिन साजरा करीत असताना, अजून जे काम बाकी आहे, त्याची आपण आठवण ठेवली पाहिजे. विषमता वाढते तिथे हिंसा वाढते. विषमतेचा सामना करणे हे मोठे आव्हान आहे, असे सांगून त्यांनी आजकाल सर्व संस्थांमध्ये स्वार्थाचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे आपला लढा अधिक कठीण झाला असल्याचे नमूद केले. पुरुष स्त्रीचा शत्रू नसून सहकारी आहे. पितृसत्ताक समाजाची चौकट खिळखिळी करण्याची गरज असून सर्वधर्म समभाव जोपासत असतानाच “आपले संविधान आपली गीता” आहे, असे समजले पाहिजे. स्त्रीचे प्रश्न हे फक्त स्त्रीचे नसून ते सर्व समाजाचे आहे. हिंसामुक्त जीवनाचा अनुभव मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
स्त्री मुक्ती संघटनेच्या ५० व्या वर्षानिमित्त मोठे संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणाही शारदा साठे यांनी केली.
दुसऱ्या सत्कारमूर्ती, ज्योती म्हापसेकर यांनी बोलताना,आपल्या “मुलगी झाली हो” या नाटकाचा पहिला प्रयोग १९८५ साली इथेच झाला होता, अशी आठवण सांगून आजपर्यंत या नाटकाचे देशविदेशात ३ हजार प्रयोग झाल्याचे सांगितले.
भारतीय राज्य घटनेने जरी स्त्री पुरुष समानता दिली असली तरी ती अजून प्रत्यक्षात आलेली नाहीय. म्हणून त्या दृष्टीने झोपडपट्टीत काम करताना कचरा वेचक महिलांची परिस्थिती लक्षात आली. जितका पैसा वाढतो, तितका कचरा वाढतो. मुख्य शहरांपेक्षा उपनगरामध्ये कचरा खूप निर्माण होत असतो. आपणच कचरा वेगळा करण्याची गरज असून नागरिक म्हणून आपण अधिक जबाबदार असलो पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

तिसऱ्या सत्कारमूर्ती, कटपुतळी दिग्दर्शक मीना नाईक या तब्येत बरी नसताना देखील कार्यक्रमास उपस्थित राहिल्या. आपण कटपुतळी चे प्रयोग केवळ मनोरंजन करण्यासाठी नाही तर मनोरंजनातून समाज प्रबोधन करण्यासाठी सुरू केले हे सांगताना त्यांनी वेश्यांमध्ये एड्स चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी त्यांनी कंडोम वापरण्याची किती गरज आहे, हे त्यांना पटवून देण्यासाठी १९९३ मध्ये पी एस आय या संस्थेतर्फे कटपुतळी चे प्रयोग करून सुरू केले, असे सांगितले.भारतात जरी या प्रयोगाची फारशी कुणी दखल घेतली नाही तरी इंग्लंड मध्ये त्याची दखल घेण्यात येऊन १९९४ मध्ये त्यांना आमंत्रित करण्यात आले होते असे सांगितले. आपले कटपुतळी चे प्रयोग हे गंभीर विषयावर असतात,असे सांगून आजही बऱ्याच लोकांना पॉक्सो कायद्याची माहिती नाही याकडे लक्ष वेधले. आपल्याला बलात्काराची माहिती असते पण आपल्यावर अत्याचार होत असतो हे लक्षात येत नाही कारण अत्याचार हे शारीरिक, मानसिक, भावनिक, ऑनलाईन अशा प्रकारचे असतात असे सांगून त्यांनी माझ्या नाटकांत मुलीच असतात कारण त्या पुढे महिला होणार असतात, असे स्पष्ट केले.

चौथ्या सत्कारमूर्ती, सुजाता रायकर यांनी विवाहापूर्वी वधूवरांनी आपली रक्त चाचणी करून घेतल्यास आणि जर ते दोघेही थ्यालेसेमिया मायनर असल्यास विवाह करू नये असे सांगितले. अन्यथा अशा जोडप्यांना होणारी २५ टक्के संतती ही थ्यालेसेमिया मेजर हा भयानक रक्त दोष घेऊन जन्माला येते असे सांगून थ्यालेसेमिया मायनर असणे ही काही समस्या नाही पण ती माहिती नसणे ही समस्या आहे. यासाठी लग्नापूर्वी अशी रक्त चाचणी करून घ्यावी जेणेकरून थ्यालेसेमिया ग्रस्त मूल जन्माला येणार नाही असे सांगून थ्यालेसेमिया मेजर असलेल्या बालकांच्या रक्तात हिमोग्लोबिन वाढत नाही म्हणून त्यांना परत परत १०/१५ दिवसांनी रक्त द्यावे लागत राहते. आयुष्यभर औषधे खावी लागतात. सामाजिक समस्या खूप येतात. त्या परिवाराला बहिष्कृत करण्यात येते. अशा मुलांच्या आयांना मी दुर्गादेवी समजते. त्या खऱ्या पुरस्काराच्या मानकरी आहेत. मी खारीचा वाटा उचलत आहे. आपण जनजाग्रणात भाग घेऊन भारत थ्यालेसेमिया मुक्त करू या, असे आवाहन केले.

आपली सत्कारासाठी निवड केल्याबद्दल पत्रकार, लेखिका, प्रकाशिका प्रज्ञा जांभेकर यांनी त्यांचे मुद्रित, आकाशवाणी, दूरदर्शन माध्यमांतील अनुभव तसेच क्रीडा पत्रकार म्हणून बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत आलेले अनुभव कथन केले.

यावेळी त्यांनी सादर केलेली त्यांची पुढील हिंदी कविता उपस्थितांची चांगलीच दाद घेऊन गेली.
“जिंदगी औरत की”
दुसरो को खुश रखते रखते
खुद को भूल सी गयी हूँ मै |
खुद के लिए जीना चाहा तो
हर एक को खो रही हूँ मै |
खुद का वजूद ढूंढ़ते ढूंढ़ते
पुरी हस्ती गवा रही हूॅ मै |
खुद को ही जानना चाहा तो
कई ताने सुन रही हूँ मै |
औरत का हाल कहते कहते
बहुत थक सी गयी हूँ मै |
असाधारण जीना चाहा तो
सब के खिलाफ गयी हूं मै |
खुद मर्यादा में रहते रहते
ज्यादा दूर तक आयी हू मै |
आकाश में उड़ना चाहा तो
जमीन से बंधी रही हूँ मै |
सुहावना होना सिखते सिखते
भली मादा बन गयी हूँ मै l
सिर्फ इन्सान होना चाहा तो
सौ तुफान झेल रही हूँ मैं |

आदित्य बिर्ला ग्रुपच्या फायनॅशियल्स प्रमुख स्मिता देव आदींचीही समयोचित भाषणे झाली. त्याच बरोबर प्रकाशजीना सहकार्य करणाऱ्या काही व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
निवेदिका अनुया गरवारे धारप यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण त्याच बरोबर हसतखेळत निवेदन केले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ किरण कुलकर्णी, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, रसिक प्रेक्षकांची मोठी उपस्थिती लाभली होती.

श्री प्रकाश कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या या छान, संवेदनशील कार्यक्रमाला मिती ग्रुपच्या उत्तरा मोने यांची उत्तम साथ लाभली. अशा या आनंददायी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे समाधान घेऊन सर्व जण आपापल्या घरी परतले.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ ९८६९४८५८००.