त्या दिवशी खूप पाऊस पडत होता. अचानक वातावरणात बदल झाला. हवा ही थंड होती. तसा थंडीचा दोघांनाही त्रास होतो त्यामुळे वाटले होईल बरे. मग ह्यांना खूप खोकला येऊ लागला. डॉक्टरांचा सल्ला घेतला. ते म्हणाले की व्हायरल इन्फेकॅशन आहे व गोळ्या लिहून दिल्या.
दुसऱ्या दिवशी माझे डोके व पाठ दुखू लागली .माझे लिखाण चालू असते त्यामुळे मी थोडे दुर्लक्ष केले. कारण असा त्रास अधून मधून होत असतो. पण नंतर माझा घसा खूपच दुखू लागला. पाणी ही पिता येत नव्हते. जेवणावरची वासना गेली. आवाज पूर्ण बसला. अजिबात बोलता ही येत नव्हते.
पुण्यातील माझी लहान बहीण दीप्ती कपाडिया व तिचे पती हेमल कपाडिया यांनी लगेच कोरोना टेस्ट करण्याचे सुचवले. रिपोर्ट्स दुसऱ्या दिवशी उशिरा आले. माझी मुलगी प्रांजल, पती उल्हास हेडे व मी कोरोना बाधित झालो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी माझा मुलगा प्रणव ह्याची पण टेस्ट केली व तो ही कोरोना बाधित निघाला.
कोरोना कधी व केव्हा आपल्या घरात येईल हे सांगता येत नाही हेच खरे. मला आता खूप अशक्तपणा आला होता पण मला काय होत आहे हे ही स्पष्ट सांगता येत नव्हते कारण बोलताना खूप त्रास होत होता.
बहिणीला जेव्हा हे कळाले तेव्हा तिने मला लगेच दवाखान्यात ऍडमिट करा म्हणून यांना सांगितले. मग आमच्याच घरासमोर असलेल्या दवाखान्यात मला नेले कारण आधीच पाऊस व समोरच्या समोर जाता येता येईल हाच एकमेव हेतू. ह्या आधी कधीच त्या दवाखान्यात गेलो नव्हतो. डॉक्टरांनी तपासले तेव्हा माझे हात खूप थरथरत होते. खूप थंडीही वाजत होती. त्यावेळी त्यांनी सांगितले की खूपच अशक्त झाल्या आहेत. मला ऍडमिट करून सलाईन लावण्यात आली. पुढे त्यांनी काही इंजेकशन्स दिले. त्यावेळी मी त्या कोरोना वॉर्ड मध्ये एकटीच पेशंट होते.
औषध उपचार सुरू झाले. ह्यांची देखील तब्येत बरी नव्हती पण त्यांना वाटले खोकला औषधाने बरा होईल. रात्री एक आजोबा ऍडमिट झाले. दवाखान्यातील टॉयलेट अतिशय अस्वच्छ होते. मला त्याचा खूप त्रास होत होता. त्यामुळे अजूनच मळमळत होते. मी सांगितल्या वर तेव्हढ्या पुरते स्वच्छ करून पुन्हा तीच घाण. मला ह्या दवाखान्यातील वातावरणाचा अजूनच त्रास होऊ लागला.
नाश्ता व जेवण अजिबात जात नव्हते. अक्षरशः मोबाईलवर एखादे गाणे लावून मोजून चार घास कसेबसे खात होती. त्यात त्या भरमसाट गोळ्या. पाठ देखील खूप दुखत होती. हे नर्सला सांगितले पण होईल बरे हेच तिचे तुसडे उत्तर.
दिवसभर बसून राहत होती हे दुखणे नकोसे झाले होते. असे वाटले ह्या त्रासापेक्षा मरण आलेले बरे. असे नकारात्मक व वाईट विचार सतत मनात येत होते. मग मीच बहिणीला फोन करून मला येथून दुसरीकडे शिफ्ट करा असे सांगितले. जेव्हा ही बातमी तेथील नर्स ला समजली तेव्हा त्यांचा संवाद माझ्या कामावर पडला त्या म्हणत होत्या “जंबो कोविड मध्ये घरातील माणूस दिसत नाही व जर तब्येत जास्त बिघडली अथवा मृत्यू आला तर डायरेक्ट प्लास्टिक पिशवीत टाकून जाळण्यात येते घरच्यांना शेवटचे ही दर्शन नसते.” ह्यांना नर्स म्हणावे का ? हीच का तुमची सेवा ? ज्यांना तुम्ही मानसिक आधार दिला पाहिजे त्यांचे खच्चीकरण करतात का ? निदान थोडी तर माणुसकी असावी ना ? ह्यांना वैद्यकीय शिक्षण देण्याबरोबर थोडे माणुसकीचे धडे व नम्रपणा शिकवला पाहिजे.
त्याचे मार्क ह्यांच्या अभ्यासक्रमात असले पाहिजे. म्हणजे नुसते इंजेकशन व गोळ्या देणे हेच आपले काम नव्हे तर रुग्णांना मानसिक आधार देणे व निदान शांत बोलणे हे शिकतील. हे ऐकून सुद्धा मी माझे मन घट्ट केले व माझ्या मुलांना डोळ्यापुढे आणले की मला ह्यांच्या साठी बरे व्हायचे आहे.
सर्व घरातल्यांची खूप आठवण येत होती. मी मुलांना फोन करून ग्यालरीत उभे रहा मी खिडकीतून तुम्हाला हात करते असे म्हणाले. त्यांना पाहून डोळे भरून आले. मुलांनाही खूप आनंद झाला. जावांनाहीं ही टेरेस वर बोलून, त्यांना पाहिले तेव्हा खूप आधार मिळाला. ह्या कोरोनाने आपल्यांच्यात हा नकोसा दुरावा निर्माण केला होता.
दिप्तीची तयारी मला, पुण्याला चांगल्यातला चांगल्या दवाखान्यात नेण्याची देखील होती. मग हेमलने बहिणीला सांगितले की, मला जंबो कोविड सेंटर मध्ये शिफ्ट करू तेथे माझ्या परिचयाचे चांगले डॉक्टर आहेत जे व्यवस्थित काळजी घेतील, पण तेथील वातावरणाचा मला त्रास होऊ शकतो असे बहिणीने सांगितले म्हणून तो निर्णय रद्द केला.
माझी आई खूप हळवी. तिला जेव्हा हे समजले तेव्हा ती खूप रडली. तिने जेव्हा मला फोन केले तेव्हा मला बोलताच येत नव्हते त्यामुळे ती खूप घाबरली. शेवटी आईची माया……मुलगी कितीही मोठी झाली तरी आईची माया अतूट असते ना !
हेमलने माझ्या डॉक्टरांना फोन करून आम्ही आमचा पेशंट शिफ्ट करतो म्हणून सांगितले. पण….डॉक्टरांनी आश्वासन दिले की त्यांना पाच दिवसात बरे करून घरी पाठवतो. त्यांच्या बोलण्यातील आत्मविश्वास पाहून थोडे थांबावे असे ठरले. मला फोन करून त्यांनी स्वतः सांगितले, “ताई तुम्ही काळजी करू नका सर्व व्यवस्थित होईल व तुम्ही लवकर बरे होताल”.
त्याच वेळी मला आमचे स्नेही अँड हेमंत कासार ह्यांचा फोन आला की, “रश्मी तू अजिबात घाबरू नको, आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत व शिफ्ट होण्याचा विचार करू नको, कारण सगळीकडे परिस्थितीत सध्या वाईट आहे तरी पण तुला साई अमृत मध्ये ऍडमिट करू शकतो पण तेथे देखील प्रायवेट रूम उपलब्ध नाही व ह्याच दवाखान्यात सध्या उपचार घे कारण येथे गर्दी नाही. त्यामुळे, जास्त लक्ष दिले जाईल व मी स्वतः डॉक्टरांशी बोलतो तू काहीही काळजी करू नको”. ह्या दोघांच्या बोलण्यामुळे मला धीर आला व थोडी भीती देखील कमी झाली. हा मानसिक आधार खरच ह्या वेळी अतिशय महत्वाचा असतो.

माझ्या माहेरची इतर सर्व मंडळी म्हणजे, माझी सर्वात लहान बहीण श्रद्धा पालकर व तिचे पती अमोल पालकर जे बारामतीला असतात हे माझ्या मुलांच्या, बहिणीच्या व ह्यांच्या संपर्कात होते. माझ्या मोठया बहिणीच्या दोन्ही मुली व मुलगा अगदी रोज माझ्या बहिणीकडे चौकशी करत, कारण तिने सर्वांना सांगितले होते की मला बोलता येत नाही त्यामुळे मला फोन करू नये. सगळेच खूप घाबरले होते. केवळ दीप्ती व हेमल रोज फोन करत करून माझी विचारपूस करत होते. हेमल व हेमंत कासार रोज डॉक्टरांच्या संपर्कात होते.
माझी लहान जाऊ, मनीषा ही रोज गरमगरम नाश्ता व दोन्ही वेळचे जेवण देत होती. दीर संतोष भाऊजी व त्यांचा मुलगा सुजल, रोज डब्बा आणून देत होते. मला काय हवय नको ते पहात होते. खूप काळजी घेत होते. तसेच चुलत जाऊ सविता वहिनी व दीर अनिल भाऊजी ह्यांची देखील मोलाची मदत होत होती. मोठया जावेचा मुलगा आजारी असल्याने, त्यांचा सर्व वेळ त्याच्या सेवेत जात होता. त्यामुळे सर्व कामाचे व्याप लहान जावेवर होते. तिच्या संपूर्ण कुटुंबाची प्रचंड ओढाताण होत होती. मुलांची खूप मदत होती.
कोरोनाच्या वेळी खूप शारीरिक व मानसिक त्रास होत असतो. एक अनामिक भीती मनात असते. अशा वेळी मानसिक आधार खूप महत्त्वाचा वाटतो जो मला काही मंडळींनी फोन करून दिला, काहींनी मेसेज केले. माझ्या पुण्यातील व साताऱ्यातील काही जवळच्या मैत्रिणींचे रोज मेसेज येत होते. त्यांचे ते प्रेम, ती काळजी, ती आपुलकीचा खूप मोठा आधार होता जो मी कधीही विसरू शकणार नाही. काहीही लागले तर हक्काने सांग हे शब्दाने भरून आले अशी प्रेमळ मंडळी माझ्या जीवनात आहे हे माझे भाग्य. माझे गुरू देवेंद्र भुजबळ सर ह्यांनी देखील अनेक सकारात्मक प्रेरणादायी लेख मला पाठवले त्याचा देखील खूप आधार होता.
हे चार पाच दिवस माझ्या साठी खूप त्रासदायक व आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही असे होते. कारण……ह्यांना देखील दोन दिवसाने ऍडमिट केले. त्यामुळे त्यांची ही खूप काळजी वाटत होती व ते मला रोज फोन करत होते. आज मुलं पहिल्यांदाच एकटी पडली होती जणू ह्या कोरोनाने पोरकी झाली होती. कारण आम्ही दोघे, त्यांचे आई व वडील दवाखान्यात होतो. त्यामुळे त्यांचीही मानसिक अवस्था चांगली नव्हती, खूप घाबरले होते.
रोज माझ्या माहेरचे त्यांना फोन करून आधार देत होते व जाऊ व दीर त्यांची रोज विचारपूस करत होती, जेवण देत होती. अशा वेळी शेजारी राहणाऱ्या आशाताई कुंदप व अशोककाका जे मला मुलगी मानतात, ते रोज सकाळ संध्याकाळ फोन करून विचारपूस करत. त्यांचाही खूप मोठा आधार होता. ह्या सगळ्यामुळे मला एकटेपणा जाणवत नव्हता. नशीब एवढेच की मुलांना कोरोनाचा फार त्रास झाला नाही.

पुढे पाच दिवसांनी मला डिसचार्ज मिळाला. त्यादिवशी मुलगा मला घेण्यासाठी आला. त्याच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साह दिसत होता. मुलं खरे तर मुलींपेक्षा जास्त हळवे असतात, मुली रडून तरी मोकळया होतात. घरी आल्यावर आपलेपणाची जाणीव झाली. खूप छान वाटत होते. दुसऱ्या दिवसापासून थोडे फार जेवण थोडे जाऊ लागले.
मी घरी आली. एकच दिवस गेला व दुसऱ्या दिवशी सकाळी सविता वहिणींचा फोन आला की माझा पुतण्या श्रेयस गेला हा खूप मोठा धक्का होता. खूप रडले ……एकटीच. कारण मी होम आयसोलेशन मध्ये होते. मुलांना सांगितल्यावर ते दोघेही खूप रडले. पण……..त्याचे शेवटचे दर्शनही कोरोनामुळे आम्ही घेऊ शकत नव्हतो. याहून वाईट काय असू शकते ? एका चौकाचे अंतर असताना देखील ते पार करू शकत नव्हतो. ह्या गोष्टीची आयुष्य भर मनात खंत राहणार. सगळे आम्ही विखुरले गेलो होतो.
बहिणीने सांगितले, भाऊजी तुम्ही काही काळजी करू नका व हेमलने सांगितले की तुम्ही आधी एचआर सिटी स्कोर चेक करा. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आल्यावर त्यांचा स्कोर १३.२५ आहे असे समजले. तेव्हा आमचे मित्र सचिन खुटाळे, जे नेहमीच सर्वांच्या दुःखात मदत करतात त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून साई अमृत ह्या हॉस्पिटलमध्ये ह्यांना ऍडमिट केले.
त्यावेळी माझे लहान दीर संतोष भाऊजी त्यांच्यासोबत होते. तेथील डॉ दीपक घाडगे व डॉ जरग ह्यांनी लगेच उपचार चालू केले. अतिशय हुशार व माणुसकी जपणारे असे हे दोन्ही डॉक्टर, कोरोना परिस्थिती असल्यापासून दवाखान्यात येतानाच दुपारचा डब्बा आणतात व थेट रात्री घरी जातात. डॉक्टरांना देव मानणारी आपली संकृती त्यांचे ते एक उत्तम उदाहरण आहे. रुग्णांची सेवा करणे हा जणू वसा त्यांनी घेतला आहे व निरपेक्ष सेवा करत आहे. अशा ह्या डॉक्टरांना सलाम.
ह्यांच्यावर अगदी योग्य उपचार चालू होते. दवाखान्यात अगदी शिस्तबद्ध वातावरण होते. रोज त्यांचे बीपी व शुगर तपासत होते. वेळेत नाश्ता, जेवण व चहा येत असे. नर्स अगदी वेळेत औषध देत होत्या व डॉक्टर देखील रोज दोन राऊंड करून विचारपूस करत. सर्व रुग्णांकडे अगदी वैयक्तिक लक्ष देत. त्यांनी खूप काळजी घेतली. ह्यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा होत होती.
माझे लहान दीर, ज्यांना डायबिटीस असून रोज अनेक हेलपाटे मारत. ह्यांचा स्वभाव हळवा. त्यांची तब्येत बिगडू नये म्हणून सध्या तरी ह्यांना पुतण्या गेल्याचे काहीही सांगू नये असा घरच्यांनी निर्णय घेतला. जावेची तब्येत थोडी बरी नाही असे सांगून थोडे दिवस दवाखान्यातील जेवण व नाश्ता घ्यावा असे सांगितले. आज अतिशय वाईट वेळ होती एकीकडे दवाखाना त्यात पुतण्याचे अचानक जाणे खूप मोठे संकट होते.
आता पुढे काही दिवस आशा ताईंची, खूप मदत झाली. त्या मला व मुलांना नाश्ता व दोन्ही वेळचे जेवण देत होत्या. काही वेगळ्या भाज्या केल्या तर आवर्जून देत व सांगत, की काही लागले तर लगेच फोन कर संकोच मानू नको ‘मी आहे ना’ ! काकू स्वयंपाक करत व काका सर्व आणून देत. ह्या वयातही त्यांची प्रेमळ साथ मला लाभली. ही खरंच देव माणसे.
माझी चुलत जाऊ व दीर, सविता वहिनी व अनिल भाऊजी ह्यांनी खूप मदत केली व त्यांचाही खूप मोठा आधार होता. सर्व घरातल्यांची दुहेरी कसरत होती. पण……..ती सर्वांनी चोख निभावली. संकट चारी बाजूने होते. माझा व ह्यांचा दवाखाना, मुलं ही कोरोना बाधित. तिन्ही ठिकाणी डब्बे द्यायचे असत सर्वांची काळजी लहान जाऊ, दीर व त्यांची मुलं देखील करत. आठ दिवसांनी हे सुखरूप घरी आले. पुढील आठ दिवस होम आयसोलेशन मध्ये गेले. पुतण्या जाण्याची माहिती ह्यांना त्याच्या दहाव्या च्या दिवशी सांगितली ते खूप चिडले, रडले व मोकळे झाले.
माणसात देव असतो ह्याची प्रचिती आम्हा दोघांना आली. प्रथम म्हणजे सचिन खुटाळे ज्यांनी खूप धावपळ करून त्यांना ऍडमिट केले. दुसरे म्हणजे अँड हेमंत कासार जे रोज आमच्या दोघांच्याही डॉक्टरांना फोन करून विचारपूस करत होते. हा खूप मोठा आधार होता.

माझी बहिण दीप्ती व हेमल ह्यांनी लांब राहून देखील खूप मदत केली. माझे घरातील सर्व मंडळी जे रोज आम्हाला नाश्ता, जेवण व इतर सर्व गोष्टी पुढील अनेक दिवस घरपोच आणून देत होते, ह्यांत सर्व घरातील लहान मुलांचे देखील खूप मोठे योगदान आहे, कारण कोरोनाच्या बिकट परिस्थितीत जिथे लोक जवळ देखील येत नाही तिथे ही मुलं रोज येत होती. ह्यांच्या काही मित्रांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांचे मनापासून धन्यवाद तुमचा सर्वांचे ऋण आम्ही आजन्म फेडू शकणार नाही.
वेळ खूप वाईट होती. अशी वेळ शत्रू वर ही येऊ नये असे मनापासून वाटते. सुखात तर सगळेच असतात पण दुःखात आपली माणसं ओळखता येतात. जणू नव्याने आपल्याच माणसांची ओळख झाली. अनपेक्षित लोकांचे खूप सहकार्य लाभले. ज्यांना मी आपले समजत होती त्यांनी मला परके केले. कोरोनाने खूप शिकवले व माणसांची पारख देखील झाली. जणू हा एक धडा होता ज्यातून खूप शिकायला मिळाले.
प्ररमेश्वर व थोरा मोठयाचे आशीर्वाद व सर्वांची लाख मोलाची साथ त्यामुळे आमचे कुटुंब ह्या कोरोनाच्या महामारीतून सुखरूप बाहेर पडले.

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : अलका भुजबळ 9869484800.