फार पूर्वी ‘मी ठाण्याची‘ असं म्हटलं की लोक मिश्किल नजरेनी पहात. कारण तेव्हा ‘ठाणे म्हणजे मेंटल हॉस्पिटल‘ एवढीच ठाण्याची ओळख बाहेरील लोकांना होती.

पण आता मात्र ज्याला त्याला ठाण्यात येऊन रहायला आवडतंय. कारण ठाण्याची मराठी भाषा आणि संस्कृती याचा एक वेगळाच प्रभाव पडत चाललाय, सांगताहेत मेघना साने………
ठाणे हे पूर्वी तलावांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. येथील मासुंदा तलाव, पोखरण लेक आणि कचराळी तलाव प्रसिद्ध आहेतच. पण या मासुंदा तलावाजवळ असलेले ‘गडकरी रंगायतन’ ठाण्याचे सांस्कृतिक वैभव आहे. येथे तालीम करून नवे नवे कलाकार आणि नवी नवी नाटके उदयास येत असतात. कचराळी तलाव आणि येऊरचा डोंगर ही फिरण्याची ठिकाणे आहेतच. शिवाय पोखरण लेक लगतच्या निसर्गरम्य वातावरणात अनेक कलामहोत्सव सांगीतिक कार्यक्रमांची मेजवानी देत असतात. अनेक कलाकार ठाण्यात राहायला आले आहेत, त्यामुळे आता आमचे ठाणे हे कलावंतांचे शहर म्हणून देखील ओळखल्या जाते. एकूणच काय आम्ही ठाणेकर माणसे अगदी कलासक्त आहोत.

सन २००० पूर्वी आम्ही मुंबईत गर्दीच्या ट्रेनमधून जायचो आणि बस मधुन रखडत कसेबसे घरी यायचो. पण आता तीन हात नाका वरून सुटणाऱ्या अनेक बसेस असतात. आता तर काय २ वर्षात मेट्रो सुद्धा येणार आहे. आमच्या घरासमोरच मेट्रो स्टेशन बनत आहे. जेव्हा मेट्रो ठाण्यातून धावेल तेव्हा आम्ही ठाणेकर गाड्या वगैरे घरीच ठेवून, मेट्रोने ऑफिसला जाऊ. कारण, छानछोकी आणि श्रीमंती दाखवण्यासाठी ठाणेकर कधीच पैसा उडवत नाही. सामान घेतानाही तो चार ठिकाणचे भाव पाहून खरेदी करतो.

आंब्याचा मोसम आला की प्रत्येक ठाणेकर आंबे स्वस्त आणि मस्त कोठे मिळतात हे शोधून काढतो. ठाणेकर हा माणूस खरेदीमध्ये कधीही फसवला जाऊ शकत नाही. इतके त्यांना बाजारभाव पाठ असतात आणि शहराचा भूगोलही पक्का असतो.
ठाण्यातील ज्येष्ठ नागरिक हा येथील सर्वात उत्साही असा जनसमुदाय आहे. ठाण्यात असलेले अनेक ‘ज्येष्ठ नागरिक संघ’ त्यांच्या करमणुकीसाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वर्षभर कार्यक्रम आयोजित करत असतात. त्यामुळे छान एकमेकांची साथ घेऊन, घराबाहेर कार्यक्रमांना आलेले दिसतात. ‘अत्रे कट्टा’, ‘ब्रह्मांड कट्टा’ येथे व्याख्याने, मनोरंजन, सांगीतिक कार्यक्रम ऐकण्यासाठी हे सारे उत्साहाने गर्दी करतात. ‘ज्ञानेश्वर मंदिरात’ संत साहित्याची व्याख्याने ऐकण्यात रमून जातात. त्यांचे स्वतःचे असे एक विश्व असते. ठाण्यातील जेष्ठ नागरिक नेहमी ताठ मानेने जगताना दिसतात.
गेल्या वीस वर्षात ठाणेकरांनी नोकरी, व्यवसाय करत आपली चांगलीच प्रगती करून घेतली आहे. दरडोई नाही, पण प्रत्येक कुटुंबाकडे एक गाडी असते. येथे घरकाम करणाऱ्या बायकांकडे फ्रीज, टीव्ही वगैरे असतो. माझ्याकडे पोळ्यांचे काम करणार्या बाईने दोन वर्षापूर्वी नवीन गाडी घेतली. शाळेत मुलांना पोचवायचा आणि आणायचा व्यवसाय ती करू लागली. त्यासाठी ती ड्रायव्हिंग देखील शिकली. ठाण्यातील पुढची पिढी काही वेगळेच ठाणे घडवणार आहे याची चुणूक मिळाली.
ठाण्यातून जाताना ईस्टर्न एक्सप्रेस हायवे घोडबंदर वरून दहिसरला जातो. त्यामुळे येथून पटकन मुंबईला जाण्याची सोय आहे. तमाम लेखक, कवी, कलाकार मंडळी आता ठाण्यात येऊन राहिली आहेत. हिरानंदानी मेडोज, हिरानंदानी इस्टेट, वगैरे कॉम्प्लेक्समध्ये श्रीमंत वर्गाने वस्ती केली आहे. ते तिकडच्या हायपरसीटी मॉलमध्ये खरेदी करतात आणि काशिनाथ घाणेकर रंगमंदिरात निवडक कार्यक्रमांना जातात.

घोडबंदर रोडवरील मोठमोठ्या सोसायट्यामध्ये अद्ययावत हॉल आणि समोर गार्डन्स असतात. तेथील माणसे फारशी बाहेर जात नाहीत.
याच भागात कलाकार मंडळीही वसती करून आहेत.
ज्येष्ठ कलावंत जयंत सावरकर, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, हिरो मकरंद अनासपुरे, अभिनेता आणि डबिंग आर्टिस्ट उदय सबनीस, ‘श्वास’ च्या लेखिका माधवी घारपुरे, लेखिका संपदा जोगळेकर आणि वासंती वर्तक, टीव्ही निवेदिका स्नेहा आघारकर आदि प्रसिद्ध कलाकार त्याचप्रमाणे व्याख्याते प्रवीण दवणे, प्रज्ञा पवार, धनश्री लेले हे सारे ठाण्यात राहतात. कवी मंडळींची येथे खूपच चलती आहे. कविवर्य अशोक बागवे आणि अरुण म्हात्रे यांनी ठाण्यातच वस्ती करणे पसंत केले आहे. या सर्वांमुळे ठाण्याला एक चेहरा प्राप्त झाला आहे. निरनिराळ्या कलावंतांनी मिळून येथे ‘टॅग’ नावाची संस्था स्थापन केली आहे व त्याद्वारे अतिशय उच्च दर्जाचे कार्यक्रम काशिनाथ घाणेकर रंगमंदिरात सादर केले जातात.

ठाण्यातील माणूस चालत चालत रस्त्यावरून जातो तेव्हा त्याच्या पिशवीत काय असेल असे वाटते तुम्हाला ? भाजी तर असतेच. एखादे उपवासाचे पीठसुद्धा आणि वाचनालयातील एक पुस्तक ! ठाण्यातील वाचनालये ही आमची फिरण्याची आणि भेटण्याची ठिकाणी आहेत. येथे सुज्ञ वाचक मंडळी एकमेकांशी वाचनालयातून बाहेर आल्याबरोबर संवाद करतात. ‘मराठी ग्रंथसंग्रहालय’, ‘ठाणे नगर वाचन मंदिर’ यांनी ठाण्यातील वाचक वर्ग उत्तम प्रकारे जोपासला आहे. खाजगी वाचनालयेही आहेत. आमच्या वाचन संस्कृतीचा आम्हाला अभिमान आहे.
‘सहयोग मंदिर सभागृह’, महापालिकेतील ‘बल्लाळ सभागृह’ येथील अनेक साहित्यिक कार्यक्रमांना रसिकांची मोठी उपस्थिती असते. ‘कोकण मराठी साहित्य परिषद’ देखील ठाण्यात अनेक साहित्यिकांच्या मुलाखती, भाषणे आयोजित करत असते. असे समृद्ध सांस्कृतिक जीवन ठाण्यात जगायला मिळते.
येथे नाटककार अशोक समेळ, कविवर्य अशोक बागवे, हास्यव्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे, सुप्रसिध्द चित्रकार विजयराज बोधनकर आणि हेमंत घरत हे सारे निरनिराळ्या प्रकारचं मार्गदर्शन देऊन तरुण पिढी घडवत आहेत. सुप्रसिद्ध नृत्यगुरू मंजिरी देव यांनी कथ्थकची कला जिवंत रहावी यासाठी दोन पिढ्या घडविल्या आहेत. नृत्यगुरू सदानंद राणे यांनी लोकनृत्याची अनेक शिबिरे शहरात व आदिवासी भागात देखील घेतलेली आहेत. या सर्वांच्या सहयोगाने ठाणेकरांची कलाजीवनाची वाटचाल जोमात सुरु आहे. अण्णा व्यवहारे व निकम गुरुजी यांनी अनेक वर्षे योग शिक्षण दिले आहे.
ठाण्यात अनेक मॉल्स झाले आहेत. कोरम मॉल येथे गृहिणी महिन्याचे सामान खरेदी करून चार पैसे वाचवून समाधानाने घरी जातात. तर विवियाना मॉलमध्ये पैसेवाले सुंदर सुंदर वस्तूंची खरेदी करताना दिसतात. दोन्ही मॉलच्या फूड कोर्ट मध्ये तरुणाई उतरलेली दिसते. मित्र-मैत्रिणींना भेटण्याचे हे एक उत्तम ठिकाण आहे.

आता लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहे बंद आहेत. नाहीतर चित्रपटांनाही ठाणेकर मंडळी परिवारासोबत आलेले दिसतात. ठाण्यात एकूण पाच ते सहा मॉल्स एकाच वेळी भरभरून वाहत असतात. याचा अर्थ येथे श्रीमंत वर्गही आलेला आहे. नव्हे, पूर्वीचा मध्यमवर्ग आता बऱ्यापैकी पैसा राखून आहे.
एकंदरीतच काय आम्ही ठाणेकर आणि आमचे ठाणे झपाट्याने बदलत आहे आणि आम्हाला त्याचा रास्त अभिमान आहे.

– लेखन : मेघना साने.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
अगदी अल्पशब्दांत मनोवेधक असे ठाणे शहराचे तेथील स्वभाव वैशिष्ट्यांसह चित्र रेखाटले आहे. अतिशय भावले..