पुणेकर 1 ते 4 यावर खूप विनोद ऐकू येतात पण खरा पुणेकर तिकडे कानाडोळा करतो. कारण तेवढा तो नक्कीच सूज्ञ आहे. “आमची कुठेही शाखा नाही” या विचारातून पुणेकर आता बाहेर पडला आहे. कारण चांगले बदल पुणेकर नेहमीच स्वीकारतो…….
नोकरीच्या निमित्ताने पुण्यात राहण्याचा योग जुळून आला. सुरवातीला सगळ्यांनी “पुणेकर” या विषयावर बरीच खरी-खोटी माहिती पुरवली. पण मी कोरी पाटी घेऊन पुण्यात आले होते. त्याचा फायदाच झाला आणि खूप जिवाभावाच्या मैत्रिणी मिळाल्या. मला वाटतं पुणेकर उगीचच कोणाच्या अध्यात – मध्यात नसतात पण हाक मारली कि मदतीला हमखास येणारच. स्वानुभव आहे राव !!
पुणेकर होण्यासाठी लागणार एक क्वालिफिकेशन अस्मादिकांत मूलतः होतच. ते म्हणजे दुपारची… वामकुक्षी ! ती आम्हाला ही लागतेच. त्यामुळे मी पुण्याच्या प्रेमातच पडले होते किंबहुना पुणेकर होण्याच्या दिशेने मी एक पाऊल पूढे टाकले होते. पण हा एकच गुण पुणेकर होण्यासाठी पुरेसा नाही हं ! बाणेदारपणा, पुण्याचा जाज्वल्य अभिमान, पुण्याची सायकल, सडेतोड उत्तर देण्याची प्रव्रुत्ती सगळं लागत बरं का !!
परदेशात असतांना वैशाली-रुपाली या बहिणींबद्दल खूप ऐकलं होत. एकदा भेट दिल्यानंतर मात्र नेहमीच भेटावस वाटू लागल.

तसच पर्वतीच ! जो पुणेकर पर्वती चढला नाही तो खरा पुणेकरच नाही. मग काय मी पण पुणेकर होण्यासाठी एक पाऊल उचलले, पण मग कळल कि एक नाही कमीत कमी 800/900 पाऊले, तरी किमान चालावी नाही तर चढावी लागतात. तसंच सिंहगडाच !! खरा पुणेकर कमीत कमी 5/6 वेळा तरी सिंहगड चढला असतोच. इतर …..कर भज्यांवर ताव मारून परत येतात.
पुण्यात आल्यावर नवश्या मारोती, ढोल्या गणपती, सोन्या मारोती अशी असंख्य मंदिर आणि नाव पाहिलीत. देवांच्या नावातलं एवढं वैविध्य पुणे सोडून कोठेही दिसणार नाही. पण सगळी कडे भाव मात्र तोच.

पण माझा गणपती दगडूशेठ ! ते ऐश्वर्य पाहून डोळे दिपतात. ती प्रसन्न मूर्ती मन शांत करते. तिथे जवळ असलेली तांबडी जोगेश्वरी नवसाला पावते.

जवळचा अबक चौक सगळ्या पुणेकरांची वाचनाची तहान भागवतो. कोणत्याही प्रकारची पुस्तकं तुम्हाला तेथे मिळणारचं ! समोरचा लक्ष्मीरोड !! क्या कहेने ! सदा गजबजलेला ! लेकीसुनांना अंगाखांद्यावर खेळवणारा !तशीच तुळशीबाग ! जगातील कोणती वस्तू तिथे मिळत नाही सांगा ? जे हव ते मिळणारच ! पुण्यातला ऊसाचा रस, मस्तानी आणि मिसळ सगळं स्पेशलं असत. चितळ्यांची बाकरवडी जगभरात पोचली.
पु.ल.देशपांडे, वसंतराव देशपांडे, शांता शेळके, माडगूळकर, सुधीर फडके किती थोर व्यक्तीच्या स्पर्शाने ही नगरी पुण्यनगरी झाली. बालगंधर्व आणि फिल्म इन्स्टिट्यूट, पुण्याचा अविभाज्य भाग आहे. कितीतरी दिग्गज कलाकार या संस्थेशी निगडीत आहेत. सवाई गंधर्व महोत्सव हा जगातील रसिकांसाठी एक पर्वणीच आहे.
पुण्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास अपूर्ण आहे.
लालमहालाची ख्याती काय वर्णावी !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची चुणूक शाहिस्तेखानाला लालमहालातच दिसली ! पेशव्यांच्या कारभाराला सलाम !
शनिवारवाड्याचा दिमाख काही औरच !!
पराक्रमाच्या शानदार इतिहासाची सोनेरी पाने म्हणजे पुणे !

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यातच केली. आगाखान पँलेस इथे महात्मा गांधी आणि कस्तुरबांचे वास्तव्य जवळजवळ दोन वर्षे होत. कस्तुरबा यांची समाधी पण आगाखान पँलेसमधे आहे. चाफेकर बंधूच्या साहसाला सलाम !!
पुणेरी पाटी हा इतर लोकांच्या टवाळीचा विषय!पण अशा पाट्या लिहायला डोक लागतं असं, अस्सल पुणेकर मानतो. “इथे पान खाऊन थुंकणाऱ्यांचे गाल लाल करण्यात येतील” ही माझी सर्वात आवडती पाटी !
पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या आदरणीय सावित्रीबाई फुले यांच्या नावाने पुणे युनिव्हर्सिटीला गौरवले आहे. फर्ग्युसन काँलेज, एस.पी.काँलेज, हुजुरपागा शाळा, टिमवी, ज्ञानप्रबोधिनी ह्या नावाजलेल्या शैक्षणिक संस्था इथे आहेत. आता तर पुणे आय.टी. हब झाले आहे. कितीतरी नावाजलेल्या कंपन्या पुण्यात आहेत.अशा या पुण्याच्या प्रेमात कोण पडणार नाही सांगा बरं ?? शेवटी “पुणे तेथे काय उणे” !.
(पुण्याचे रस्ते !! अरे चाँद पे भी तो दाग होता ही है नं !!)

– लेखन : वर्षा हेमंत फाटक
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.
मस्त पुण्याचा माझा खुप जीवाचा संबध आहे .माझ्या दोन मोठ्या बहिणी पुण्यास आहेत .माझ्या दोनी मुली पुण्यातचं दिल्या आहेत . धाकट्या मुलाचे शिक्षण नोकरी घरही पुण्यातचं त्यामुळें पुण्यात राहने येने जाने चालूच असते .सदाशिव पेठेतील छोटी भावजयही आहे .पुणे तिथें काय उने .
सुंदर लेख धन्यवाद। 🙏🙏
पुणे तेथे काहीच नाही उणे…खरंच प्रेमात पडावे असे हे पुणे आहे…पुण्यातील प्रत्येक जागेचा असा एक वारसा आहे.
अप्रतिम लेख आहे.
अकरावी नंतर उन्हाळ्याच्या सुटीत जाईल क्लास लावाला तेव्हा पुण्यात मामाकडे दोन महिने राहिलो होतो. त्यावेळी सायकलवरुन पुणे पालथे घातले होते. त्यावेळचे (सन १९८२) पुणे आणि आताचे पुणे यात बराच(जरा जास्तच) फरक पडला आहे. तुझा लेख वाचताना तो काळ आठवला. छानच लिहला आहेस,
पुणे, पुणेरी प्रेमात पडाव्या अशा या गोष्टी. सदाशिव पेठ, शनिवार वाडा, दगडूशेठ हलवाई श्रीमंत गणपती, सारसबागेतील गणपती, पुणेरी पाट्या या गोष्टी जगात कोठेही नाही आणि पुण्याशिवाय त्या कोठेही शोभत नाही. अप्रतिम लेख.
साॅरी, “पुण्याबद्दलचा अभिमान” असे मला म्हणायचे होते. चुकुन पुतण्याबद्दल झाले आहे.
एकदम मस्त. ओघवती खुसखुशीत भाषा, पुण्याच्या सगळ्या ठळक जागांचा व व्यक्तींचा उल्लेख छान रितीने केला आहे. शेवटचे वाक्य पण चपखल. पुणेकरांचा पुतण्याबद्दलचा अभिमान तिथले रस्ते हिरावून घेतांत हे पण लेखिकेनी समर्पक वाक्यात सांगीतले आहे. 👌👌